नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

काळ्या मातीचा गंध शब्दाशब्दांतून जाणवतो.

डॉ.श्रीकृष्ण राऊत's picture
प्रकाशीत: 
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)

काळ्या मातीचा गंध शब्दाशब्दांतून जाणवतो.

'रानमेवा', हा गंगाधर मुटे यांचा कवितासंग्रह प्रकाशित होतोय, हे वाचून आनंद झाला.ह्या पहिल्या-वहिल्या संग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा.

गंगाधर मुटे हे केवळ हाडाचेच नव्हे तर वर्‍हाडाचे-विदर्भाचे शेतकरी आहेत हे त्यांच्या कविता वाचल्या की ठळकपणे लक्षात येतं. त्यांच्या कवित्ता-गझलांमधून वर्‍हाडी-वैदर्भी बोलीचे अनेक शब्द येतात. तोंडवळा हरवलेल्या शहरी गर्दीत गावाकडचा माणूस अकस्मात भेटल्यावर होणारा हरीख अशा शब्दांनी मला भरभरून दिला आहे.अर्थात अशी शब्दपेरणी त्यांनी मुद्दाम केलेली नाही तर लिहिण्याच्या ओघात ते शब्द सहज आलेले आहेत.

शेती-मातीच्या कवितेतला आंतरिक ओलावा त्यांच्या शब्दाशब्दांतून पाझरतो. त्यामुळे ती कविता केवळ हवेतली न वाटता तिच्या पाळामुळांना झोंबलेल्या काळ्या मातीचा गंध शब्दाशब्दांतून जाणवतो.

‘असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी.’

अशा किती तरी ओळी मनात रेंगाळत राहतात.

मुक्तछंदाच्या आजकालच्या चलतीच्या काळात ‘सुमंदारमाला’ सारख्या वृत्तात लिहिण्याची जोखीम स्वीकारणे ही सोपी गोष्ट नाही.आणि त्या सोबत गझलसारख्या काव्यप्रकारातली त्यांची वाटचाल पाहिली की वाचकांनी त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा ठेवाव्या, हे स्वाभाविक आहे.

‘भरारीस उत्तुंग झेपावतो मी, कवी कल्पनेला अभय गाठतो
परी वास्तवाने घरंगळत येता, उरे एक भूमी दुजे ना कुणी.’

ही ‘भूमी’ अशीच पायाखाली आधाराला राहो.दिसामासानं वाढणार्‍या कवितेतलं नवखेपणाचं न्यून सरत जावो आणि मायबोलीचे हे नमन सुजलाम,सुफलाम होवो. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास-

‘जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकात एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो बायबोली!’

मन:पूर्वक शुभेच्छांसह

- डॉ.श्रीकृष्ण राऊत
अकोला

......... **.............. **............. **..............**............

Share