नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

पिकलेला काटा अन् करपलेली पिके

Bhaskar Bhujangrao Bade's picture

!!अनुभवकथन स्पर्धेसाठी !!
प्रवेशिका
********************

पिकलेला काटा
अन्
करपलेली पिके
""""""""""""""""""""""""""""""
उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी होतो,तेव्हा माचाडाच्या शेतात पाहिले तर, पाच-सहा गुंठ्याचे रान दगडधोंडे आणि काटेरी झुडपाने काबिज केलेले.शेताची अवस्था रंडक्याबाईसारखी झालेली.रान मोकळे करायचे तर जेसीबी लावावे लागणार त्यानंतर लेवलचे ट्रँक्टर.पाठलाग करुन जेसीबी आणले.झाडंझुडपं काढली.बांदाभोवतीच्या पाल्या.काट्याकुपाट्या काढल्या.मोठाली दगडं बांदावर ठेवली.शेत मोठे दिसू लागले.काट्याकुट्या नंतर जाळल्या.परंतू लेवलचे ट्रँक्टर मिळालेच नाही,येणेही अशक्य ,पाऊस पडून गेला.पेरणीची घाई.उडीद पेरायचा ठरवला,महिनक्याला काट्याकुट्या वेचायच्या सांगितल्या त्यानेही,"घोडीला घोडा लावला":शेत स्वच्छ झाल्याचा माझा समज.पेरणीला गेलोत तर तकलादू काम केलेले.लहान काटेरी फांद्या तशाच विखूरलेल्या.आता काय करणार,तिफण सुरु झाली.पायात काटे मोडू लागले.काहीच पर्याय नव्हता,
उडीद उत्तम उगला.पण गेल्या पंधरा दिवसापासून पाऊसच नाही.उडदाला फुलं,शेंगा येऊ लागलेल्या.चार -चार शेंगा दिसू लागल्या.अशातच भर उन्हात उडीद सुकू लागला.तर कडीकाठावर उडदाचे ठोंब करपले.फुलं वाळू लागली,पाऊस येईना.पाणी सोडण्याशिवाय पर्याय नव्हता,भिंतीखालच्या विहिरीवरील मोट्रीचे पाणी तिथे येते.पाईपलाईन केलेली होती.परंतु गेल्या पाच- सहा वर्षात बुजून गेलेली.म्हणून हुसासापासून प्लास्टिक पाईप अंथरला.तो शेवटच्या टोकापर्यत.आता दिवसाची लाईट होती.एक दिवसाचे भरणे.दंड किंवा पाळी टाकली असती तर भरणं उरकायला सोपं गेलं असते.मीच घाई केली.त्याचा परिणाम भोगतोय.तटस दार्यावर उभा रहावा लागतेय.पाणी मोकळे पळतेय,त्याला वळवावे लागते,सरळ भरणे न होता,वाकडे तिकडे होतेय.म्हणून उर्कत नाही,त्यात शेत चढाचे.पाणी चढायला त्रासच,पाचची मोटर,सनाट पाणी मारतीय.प्लास्टिकचा पाईप सहा महिन्यापूर्वी आणलेला सुईवाणी भोकं पडलेली,त्यातून कारंजे उडत होते.रान पाणी पित होते.पाईपसोबत जातायेता पायात काटे घुसत होते.तर काही मोडत होते.सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता.काही काटे भयंकर त्रास देत होते,निब्बार काटे बरे.पण कुचकट काटे भलते बेकार,ते पायात सहज मोडतात.कुजटच ते.
अर्ध्यापर्यत भिजवले,चढाकडे भिजावयाचे राहिलेले.तिकडे प्लास्टिकच्या पाईपणे पाणी चढवले.मोट्रीची ताकद दांडगी म्हणून पाणीसुध्दा जोरात फेकत होती,क्षणभराने पाहिले तर.कारंजे वाढलेले,पाईपला काय करणार?
पाणी वर चढू लागताच पाठीमागे प्लास्टिक पाईप फुटला.भळाभळा पाणी वाहून चालले.अशा पाईपला कापून लगेच जोड देणे.जोड बसू लागलो की चिळकांड्या उडाल्या,या धावपळीत काट्यावर पाय पडला .त्यामुळे डोळ्यातून टचकण पाणी आले.काटे काढूण टाकले,बाईडींगच्या तारीने पँक केले.पाईपमधून मागे कारंजे जोरजोरात वाढतच होते.मी त्याकडे लक्षच दिले नाही,आता पाणी कोरड्या ठिकाणाकडे सोडले.माचाडाचे रान.मुरमाड माती.लौकर वाळणारी.त्यामुळे पिके लवकर सुकतात.अचानक लाईट गेली.अन् पाच मिनीटात आली.आली ती बंगबंग करीत.पाण्याचा जोर वाढलेला.अन् एका ठिकाणी दाभणावाणी चिळकांडी जोरात सुरु झाली.अन् थोड्यावेळात पाईप चीरला .पाणी भडाभडा खालच्या दिशेने वाहू लागले.चढाच्या रानाकडे पाण्याचा थेंब जाईना. सायंकाळी फुटलेल्या पाईपला कापले आणि जोड दिला,पाईप पँक झाले,
भरणे सुरु.
जोडावर बारीक छिद्र होते ते फाटत मोठे झाले.थेंबभर पाणी पुढे जाईना.बाईडिंग वायर घेतली .पकड घेतली.जोड पक्का करताना तोल जावून उजव्या हातावर पडलो...आयोssओठातून शब्द पडले.सावरलो,हाताच्या अंगठ्यात काटा घुसला.कुजट होता.उपसायला गेलो तर खुडला,अंगठा नाजूक जागा,पायाखाली काट्याची फांदी आली.त्यानेही इंजक्शने ठोकली.सावरलो अन् काटेरी फांदी हळूहळू काढली.घसा कोरडा पडला होता पाईपमधून येणारे पाणी ओंजळीने पिलो,पुन्हा तयारीने जोड पक्का केला,पाणी पुढे पळाले,सुकलेल्या पिकाला पाणी मिळाले. की पिकाला तरतरी यायची...हे पाहून मला आनंद वाटायचा,,,.हे अनुभव पाहता या शेताला "काटेरी शेत" का म्हणू नये,आता पिकाची तहान भागली होती.पायातले काटे खड्यावर पाय पडला की बोंब ठोकायला लावत होते,भरणं उरकले होते .शंभर फुटी अखंड असलेल्या पाईपचे पाच -सहा तुकडे झाले होते.
आज ध्यानात राहिले ते काटे आणि चाळणी झालेला पाईप,भरणं संपले .लंघडत लंघडत घर गाठले.पायातला काटा ,काट्याने काढला.पण अंगठ्यातला काटा रक्तात बुडाला,काढता आला नाही,त्याच्यामुळे प्रसंगानूरुप मी बोंब मारतोय,तो पिकल्याशिवाय काढता येणार ,तोपर्यत तो माझ्या शरीरात पाव्हणा.,
करपलेल्या उडदाने एकदाचे पाणी पिले,
अंगठ्यातला काटा मात्र चांगलाच दुखतोय,
दुखरे बाबा.
पिकूस्तोर,पिकला की होशील ना बेवारस,
तोपर्यंत कर मजा.
''''''''''''''''''''''''''''''''
डाँ,भास्कर बडे नारायणनगर.लातूर.४१३५१२
ईमेल;bhaskarbade2@gmail.com
भ्र.9422552279

********************'

लेखनप्रकार: 
लेखनप्रकार निवडा
लेखनप्रकार : 
लेखनप्रकार निवडा
लेखनविभाग: 
अनुभवकथन
शोधखुणा: 
Share