Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते

काव्यप्रकार: 
मराठी गझल

गझलेची बाराखडी

कविवर्य सुरेश भटांनी गझलकारांना गझलेच्या तंत्रावर, व्याकरणावर माहिती म्हणून 'गझलेची बाराखडी' नावाची एक पुस्तिका लिहिली होती.

वाचक-रसिक, सगळ्यांनीच ही पुस्तिका वाचावी, संदर्भासाठी जवळ बाळगावी अशी आहे.नवोदित कवींना गझल कळावी म्हणून ते ही पुस्तिका त्यांना स्वखर्चाने पत्रासोबत पाठवीत असत. नवे-जुने गझलकार असोत वा गझलेबद्दल जाणून घ्यायची इच्छा बाळगणारे वाचक-रसिक, सगळ्यांनीच ही पुस्तिका वाचावी, संदर्भासाठी जवळ बाळगावी अशी आहे. लाभ घ्यावा.

प्रस्तावना
आता महाराष्ट्रात गझल हा काव्यप्रकार आपल्या अंगभूत शक्तीमुळे दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होऊ लागला आहे. आता नव्या दमाची तरूण पिढी गझलेकडे वळू लागली आहे. परंतु दुर्दैवाने गझलेची पुरेशी किंवा मुळीच माहिती नसल्यामुळे कोणतीही रचना अनेकदा "गझल" म्हणून सादर केली जाते.

गझल हा एक प्रभावी काव्यप्रकार असल्यामुळे गझल लिहिणारा आधी उत्तम कवी असला पाहिजे, ही गझलेची पूर्वअट आहे. आणि त्याबरोबरच गझल लिहिणाऱ्याला आधी वृत्तात कोणतीही चूक न करता लिहिता आले पाहिजे. गझलेमध्ये शेवटपर्यंत एकच वृत्त वापरले पाहिजे, हे गझल लिहू इच्छिणाऱ्या कवीने लक्षात ठेवले पाहिजे.

"गझल" हा शब्द स्त्रीलिंगी आहे. मूळ अरबी शब्द "गजल" आहे. तोही स्त्रीलिंगी शब्द आहे. हा शब्द जसाच्या तसा फारसीत आला आहे तोही स्त्रीलिंगी म्हणूनच. आणि मराठीत "गजल" ह्या शब्दाला "गझल" हे रूप मिळाले. गझलेचा एकूणच पिंड, तिचा नखरा व नजाकत पाहाता तिचे लिंगपरिवर्तन करणे योग्य नव्हे.

एकाच वृत्तातील, एकच यमक (काफिया) व अन्त्ययमक (रदीफ) असलेल्या प्रत्येकी २-२ ओळींच्या किमान पाच किंवा त्याहून अधिक कवितांची बांधणी म्हणजे गझल.गझलेमधील ह्या प्रत्येक ओळींच्या कवितेला आपण "शेर" म्हणतो. गझलेमधील प्रत्येक शेर हा आपल्या जागी एक संपूर्ण अभिव्यक्ती असलेली स्वतंत्र आणि सार्वभौम कविताच असते.

नेहमीची कविता सलग असते. तिची एक "थीम" असते आणि म्हणूनच ती उलगडत जाते. पण गझल उलगडत नसते. एकाच गझलेत विविध विषय हाताळले जाऊ शकतात. प्रत्येक शेराचा आशय स्वतंत्र असू शकतो किंवा एकच संवेदना, एकच भाव किंवा एकच मूड असलेले सर्व शेर असू शकतात.

जर आपण गझलेमधून कोणताही शेर बाहेर वेगळा काढून त्याचे चिंतन केले, तर मागचा पुढचा कोणताही संदर्भ किंवा संबंध नसूनही तो शेर म्हणजे एक संपूर्ण अभिव्यक्ती असलेली एक वेगळी कविताच असल्याचे आढळून येते.

गझलेच्या फॉर्ममध्ये उलगडत जाणारी सलग कविता लिहिली जाऊ शकते, पण ती कविताच; गझल नव्हे! म्हणून गझलेचे खरे गमक हेच आहे की, प्रत्येक सुटा शेरसुद्धा स्वतंत्र कविताच असतो.

नेहमीची कविता आणि गझल ह्यांत - १) अनेक कवितांची एकाच फॉर्ममध्ये बांधणी आणि मांडणी आणि २) प्रत्येक शेराचे स्वतःचे कविता म्हणून स्वतंत्र अस्तित्व, हे दोन महत्वाचे व मूलभूत फरक असतात.


गझलेचा आकृतिबंध

आता गझलेचा आकृतिबंध म्हणजे काय हे समजून घेऊ या. कारण हा आकृतिबंध समजल्याशिवाय गझल लिहिता येत नाही.

गझलेचा आकृतिबंध

संबंधित गझलेचे वृत्त (बहर), यमक (काफिया) आणि अन्त्ययमक (रदीफ) असल्यास अन्त्ययमक या घटकामुळे गझलेचा आकृतिबंध निश्चित होतो. या आकृतिबंधालाच "जमीन" असे म्हणतात.

ही न मंजूर वाटचाल मला
दे भविष्या तुझी मशाल मला

संत समजून काल मी गेलो
भेटला शेवटी दलाल मला

मी कधीचा उभाच फिर्यादी
वाकुल्या दाखवी निकाल मला


माझ्या या गझलेतील हे तीन शेर आपण वाचले. या तिन्ही शेरात (जातीच्या अंगाने आलेले) एकच वृत्त आहे.

राधिका, राधिका, यमाचा, गा

हेच वृत्त या गझलेत शेवटपर्यंत कायम राहते. या गझलेचा शेवटचा शेर असा आहे-

ये, लपेटून चांदणे घेऊ
तू कशाला दिलीस शाल मला?


वर निर्देशिलेले वृत्त "राधिका, राधिका, यमाचा, गा" या शेवटच्या शेरातही कायम आहे.

गझलेच्या पहिल्याच शेरात तिचा आकृतिबंध- तिची जमीन 'जमीन' स्पष्ट होते. कारण पहिल्या शेरात गझलेचे वृत्त, यमक आणि अन्त्ययमक स्पष्ट होते.

वर दिलेल्या उदाहरणात वृत्त (राधिका, राधिका, यमाचा, गा) स्पष्ट झाले आहे. आणि पहिल्या दोन ओळीत "वाटचाल" व "मशाल" ही दोन यमके आली आहेत. त्याचप्रमाणे दोन्ही ओळीत "वाटचाल" आणि "मशाल" या यमकानंतर "मला" हे अन्त्ययमक आले आहे.

गझल शेवटपर्यंत एकाच वृत्तात चालत असली तरी तिच्या फक्त पहिल्या शेराच्या दोन्ही ओळीत यमक आणि अन्त्ययमक येते. नंतर येणाऱ्या प्रत्येक शेराच्या दुसऱ्या ओळीतच यमक आणि त्यानंतर अन्त्ययमक येते.

गझलेतील अन्त्ययमक (रदीफ) गझल संपेपर्यंत बदलत नाही. काही गझलात अन्त्ययमक नसते. पण ज्या गझलेत अन्त्ययमक असते, त्या गझलेत ते अन्त्ययमक शेवटपर्यंत कायम राहते. एका शेरात एक अन्त्ययमक तर दुसऱ्या शेरात दुसरे अन्त्ययमक असा हास्यास्पद प्रकार गझल खपवून घेत नाही.

त्याचप्रमाणे आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, गझलेत यमक उर्फ काफिया बदलत नाही, त्याचे शब्द बदलतात. यमकाच्या शब्दात असलेली "अलामत" उर्फ "स्वरचिन्ह" हेच त्या यमकाचे स्थायी गमक असते. या अलामतीवरच त्या यमकाचे जीवन अवलंबून असते. हे स्वरचिन्ह (अलामत) सांभाळून यमक कसे साधावयाचे, हे मी येथे नंतर यथास्थल स्पष्ट करीन. त्यापूर्वी "काफिया" आणि "रदीफ" या शब्दांचे अधिक स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे.

काफिया आणि रदीफ

"काफिया" या अरबी शब्दाचा अर्थ आहे- मागेमागे चालणारा, पुन्हापुन्हा येणारा, पायाला पाय लावून चालणारा.

मी वरील व्याख्येवरून "काफिया" अधिक स्पष्ट दाखविण्याचा प्रयत्न करतो.

चंद्र आता मावळाया लागला
प्राण माझाही ढळाया लागला

काय तो वेडा इथेही बोलला
हा शहाणाही चळाया लागला?

हाक दाराने मला जेव्हा दिली
उंबरा मागे वळाया लागला


नमुन्यादाखल दिलेल्या माझ्या एका गझलेतील ह्या तिन्ही शेरात "मावळाया, ढळाया, चळाया, वळाया" हे चार शब्द काफिया म्हणून आलेले आहेत. 'मावळाया' ह्या शब्दामागून 'ढळाया' हा शब्द येतो. 'ढळाया'ची पाठ धरून 'चळाया' येतो आणि 'चळाया' नंतर लगेच 'वळाया' हा शब्द त्याच्यामागे येतो. 'ढळाया' ह्या काफिया म्हणून येणाऱ्या शब्दाने 'मावळाया' ह्या काफिया म्हणून येणाऱ्या आधीच्या शब्दाचे अनुसरण केले आहे, तर नंतरच्या शेरात 'चळाया' ह्या काफिया म्हणून येणाऱ्या शब्दाने 'मावळाया' व 'ढळाया' ह्या शब्दांची पाठ सोडलेली नाही. आणि 'वळाया' हा काफियाचा शब्द "मावळाया, ढळाया, चळाया" ह्या आधीच्या (काफिया म्हणून आलेल्या) शब्दांशी नाते राखत आहे. "मावळाया" ह्या काफियाच्या शब्दाच्या मागेमागे, एकामागे एक, अशी एकमेकांचा पदर धरून ही इतर (काफियाच्या) शब्दांची माळ चालत आहे. काफिया हा शब्द पुल्लिंगी आहे. काफियांचे बहुवचन 'कवाफी' असे होते.

आता आपण रदीफ म्हणजे काय ते पाहू या. "रदीफ" ह्या अरबी भाषेतील स्त्रीलिंगी शब्दाचे दोन अर्थ आहेत ते असे-

१) घोडा किंवा उंटावर बसलेल्या स्वारामागे बसलेली व्यक्ती किंवा २) गझलेतील शेरात काफियाच्या (यमक) नंतर पुन्हापुन्हा येणारा शब्द किंवा शब्दगट.

गझलेच्या संदर्भात सांगायचे झाले, तर तिच्या प्रत्येक शेराच्या बाबतीत हे दोन्ही अर्थ अगदी चपखलपणे लागू होतात. कारण आपण जर काफिया (यमक) म्हणून येणाऱ्या कोणत्याही शब्दाला वृत्ताच्या घोड्यावर किंवा उंटावर बसलेला स्वार मानले तर रदीफ (अन्त्ययमक) म्हणून येणारा शब्द किंवा शब्दगट त्या स्वाराच्या मागे हटकून स्वार होतो, उदाहरणार्थ -

कालची बातमी खरी नाही
हाय, स्वर्गात भाकरी नाही

मागता काय लेखणी माझी
ही कुणाचीच बासरी नाही

राहिले काय पूर्णिमेत अता?
चंद्र माझ्या उशीवरी नाही


वरील तीन शेरात काफिया (यमक) म्हणून आलेले "खरी, भाकरी, बासरी व उशीवरी" हे शब्द "राधिका, राधिका, यमाचा गा" ह्या वृत्ताच्या घोड्यावर किंवा उंटावर बसलेले स्वार आहेत. पण ह्या प्रत्येक स्वाराच्या मागे "रदीफ" म्हणून आलेला "नाही" हा शब्द हटकून बसतोच!

इस्लामपूर्व काळापासून अरब जमात काव्यप्रेमी आहे. आणि ह्या जमातीच्या जीवनात घोडा आणि उंट ह्या दोन प्राण्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. अरबी भाषेनुसार "रदीफ" ह्या शब्दाचा अर्थ "घोड्यावर किंवा उंटावर बसलेल्या स्वाराच्या मागे बसलेली व्यक्ती" असा आहे. आणि म्हणूनच अरबांनी आपल्याला छंदशास्त्रातातही काफियानंतर हटकून व चिकटून मागोमाग येणाऱ्या शब्दाला किंवा शब्दगटाला "रदीफ" हेच नाव दिले. "रदीफ" या स्त्रीलिंगी अरबी शब्दाचे बहुवचन "रदाफी" असे आहे.

स्वरचिन्ह उर्फ अलामत

स्वरचिन्ह उर्फ अलामत

गझलेच्या पहिल्या शेरात तिचा आकृतिबंध स्पष्ट झाल्यानंतर, तिची "जमीन" निश्चित झाल्यावर मग यमक उर्फ काफिया आपल्या वैशिष्ट्यांसह शेवटपर्यंत तोच कायम राहतो. काफियाचे शब्द बदलतात. पण त्याच्या अंमलबजावणीचा कायदा गझलेच्या शेवटापर्यंत तोच कायम राहतो. उदाहरणार्थ- वाटचाल, मशाल, दलाल, निकाल, रुमाल, हालचाल वगैरे.मात्र गझलेतील अन्त्ययमक उर्फ रदीफ म्हणून असलेला शब्द किंवा शब्दगट शेवटपर्यंत बदलत नाही.

नमुन्यादाखल दिलेल्या शेरात "मला" हे अन्त्ययमक उर्फ रदीफ आहे. हे अन्त्ययमक, ही रदीफ पहिल्या ओळीत येणार आणि नंतर येणाऱ्या प्रत्येक शेराच्या दुसऱ्या ओळीत यमकांनंतर म्हणजेच काफियानंतर हटकून येणार. उदाहरणार्थ - वाटचाल मला, मशाल मला, दलाल मला, आणि शालमला वगैरे.

ज्याप्रमाणे गझलेच्या पहिल्या शेरात (मतला) तिचा आकृतिबंध उर्फ "जमीन" वृत्त, यमक व अन्त्ययमकावरून ठरत असते, त्याचप्रमाणे ज्या जमिनीत अंगभूत असलेल्या यमकाचे उर्फ काफियाचे स्वरूप त्यातील स्वरचिन्हावरून ठरत असते. या स्वरचिन्हालाच "अलामत" म्हणतात. म्हणूनच ही "अलामत" समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

यमकाच्या उर्फ काफियाच्या शेवटच्या न बदलणाऱ्या एका अक्षराआधी किंवा एकाहून अधिक अक्षरांआधी येणाऱ्या एका विशिष्ट अक्षरात जो न बदलणारा स्वर असतो, त्यालाच स्वरचिन्ह किंवा "अलामत" समजावे.

उदाहरणार्थ-

हा ठोकरून गेला, तो वापरून गेला
जो भेटला मला तो वांधा करून गेला

वरील शेरात "ठोकरून, वापरून, करून" अशी यमके उर्फ काफिये (कवाफी) आलेले आहेत. (एकाच ओळीत दोन यमके चालू शकतात.) जर आपण यमकांचे बारकाईने निरीक्षण केले, तर आपणास असे आढळून येईल की "ठोकरून, वापरून, करून" या तिन्ही यमकात "रून" ही शेवटची दोन अक्षरे बदलत नाहीत. मात्र त्यांच्याआधी येणाऱ्या- "ठोकरून" मधील "क" या अक्षरात 'वापरून' या यमकामधील "प" या अक्षरात आणि पुन्हा "करून" या यमकातील 'क' या अक्षरात - हटकून "अ" हा स्वर आलेला आहे. क्वचित 'अ' च्या जागी ऱ्हस्व 'इ' किंवा 'उ' हा स्वर वापरला जातो. परंतु तो अपवाद समजावा.

याच गझलेतील अजून एक शेर पहा.

आजन्म ही तुझी मी केल्यावरी प्रतीक्षा
माझाच भास माझ्या अंगावरून गेला


वरील शेरात यमक म्हणून "अंगावरून" हा शब्द आलेला आहे. या यमकात शेवटी "रून" ही दोन अक्षरे अटळपणे आलेली आहेत. परंतु त्याचवेळी "रून" या शेवटच्या दोन अक्षरांआधी असलेल्या 'व' या अक्षरांतील 'अ' हा स्वर सांभाळला गेला आहे. म्हणजे "रून" ही शेवटची दोन अक्षरे कायम आणि त्याआधी येणाऱ्या "व" या अक्षरात "अ" ही अलामत कायम.

अलामतीची कल्पना देण्यासाठी मी याच गझलेतील अजून एक शेर येथे देतो-

कानात कोठडीच्या किंचाळला झरोका-
"बाहेर एक कैदी तारा धरून गेला!"

स्वरचिन्ह उर्फ अलामत-२

स्वरचिन्ह उर्फ अलामत-२

गझल लिहिण्यासाठी फक्त शेवटपर्यंत एकाच वृत्तात लिहून भागत नाही, तर एकदा पहिल्या शेरात यमक आपल्या स्वरचिन्हासह प्रस्थापित झाले की, अलामतीसकट काफियाचे स्वरूप स्पष्ट झाले की, मग शेवटपर्यंत त्या अलामतीच्या कायद्यानुसारचे, ते स्वरचिन्ह सांभाळून नंतरचे यमकाचे शब्द योजावे लागतात.

उदाहरणार्थ-

हरेक आवाज आज अर्ध्यात छाटलेला
हरेक माणूस आज आतून फाटलेला


अरे कुणी चोरला उद्याचा पहाटतारा
उजेड येई दिव्यादिव्यातून बाटलेला

माझ्या एका गझलेचे हे दोन शेर आहेत. पहिल्या शेरात "छाटलेला" आणि "फाटलेला" असे दोन यमकाचे शब्द आहेत. येथे जर काळजीपूर्वक विचार केला, तर आपणास असे आढळून येईल की, गझलेच्या पहिल्या शेरातच यमकाचे स्वरूप स्पष्ट झालेले आहे.

ह्या यमकात शेवटची ती अक्षरे - "ट-ले-ला" ही अटळ आहेत, आणि त्याआधी येणाऱ्या "छा" आणि "फा" ह्या प्रत्येक अक्षरात "आ" ही अलामत आहे. ह्याच कायद्यानुसार ह्या गझलेत "काटलेला, दाटलेला, पहाटलेला, थाटलेला, वाटलेला, झपाटलेला" असे यमक म्हणून शब्द येतील. कारण 'ट-ले-ला' ह्या शेवटच्या तीन न बदलणाऱ्या अक्षरांआधी येणाऱ्या 'का, दा, हा, था, वा, पा' ह्या अक्षरांत न चुकता 'आ' ह्या स्वराची अलामत आलेली आहे. म्हणजे आधी 'आ' हा स्वर असलेले, 'आ' ही अलामत असलेले अक्षर आणि नंतर 'ट-ले-ला' ही शेवटची तीन न बदलणारी अक्षरे, असे हे यमक आहे.

अलामत गझलेनुसार येणाऱ्या विविध यमकात आपली जागा बदलू शकते. उदाहरणार्थ-

मी असा त्या बासरीचा सूर होतो
नेहमी ओठांपुनी मी दूर होतो

मी न केली चौकशी साधी घनांची
ऐन वैशाखातला मी पूर होतो

ह्या गझलेत सूर, दूर, आणि पूर ह्या यमकात 'ऊ' ही अलामत आहे. शेवटचे अक्षर 'र' हे आहे. येथे यमकातील शेवटून दुसऱ्या अक्षरात अलामत आहे. ही अलामत सूर, दूर आणि पूर यमकातील 'सू,दू, आणि पू' ह्या शेवटून दुसऱ्या अक्षरातील 'ऊ' ह्या स्वरांची आहे. ह्याच गझलेतील अजून एक शेर पहा-

कोणत्या स्वप्नास आता दोष देऊ?
जीवनाला मीच नामंजूर होतो

ह्या शेरातील 'नामंजूर' ह्या यमकातील 'जू' ह्या अक्षरात सुरवातीचीच 'ऊ' ही अलामत आली आहे. मात्र 'र' ह्या शेवटच्या अक्षराच्या आधी येणाऱ्या अक्षरातच 'ऊ' ही अलामत आहे.

मघाशी आपण पाहिले की, 'ट-ले-ला' ह्या तीन न बदलणाऱ्या (छाटलेला, फाटलेला) अक्षरांआधी येणाऱ्या शेवटून चौथ्या अक्षरात 'आ' ही अलामत होती. तर आता वरील शेरात 'ऊ' ही अलामत असून तिचे स्थान मात्र यमकाच्या शेवटून दुसऱ्या अक्षरात आहे.

गझलेच्या पहिल्या शेरात 'जमीन' निश्चित होते. जमीन म्हणजे काय याचे स्पष्टीकरण आधी झालेले आहेच. परंतु ह्या जमिनीत असलेले यमक ऊर्फ काफिया कसा असावा, हे अलामतच ठरवते. आणि ह्या अलामतीच्या कायद्यानुसारच शेवटपर्यंत यमक ऊर्फ काफिया चालवायचा असतो. अलामत म्हणजे काय हे स्पष्ट होण्यासाठी आता मी शेवटचे उदाहरण देतो -

बेरका होता दिलासा मानभावी धीर होता
पाठ राखायास माझी लाघवी खंजीर होता

मी जरी हासून आता बोलतो आहे ऋतूंशी
ऐन तारुण्यात माझा चेहरा गंभीर होता
 
वरील शेरात 'धीर, खंजीर' आणि 'गंभीर' ह्या यमकातील 'धी, जी, आणि भी' ह्या अक्षरात 'ई' ह्या स्वराची अलामत आहे. शेवटचे 'र' हे अक्षर मात्र कायम!

शेवटी महत्वाचे

महत्वाचे-१. गझल लिहिण्यासाठी निर्दोष वृत्तात लिहिता येणे आवश्यक आहे. शक्यतोवर गणवृत्तात लिहावे. अगदी आवश्यक असल्यासच मात्रावृत्तांचा (जातीचा) उपयोग करावा.

२. प्रत्येक शेर म्हणजे एक संपूर्ण कविताच असते. गझल उलगडत नसते. कोणताही शेर सुटा वाचला तरी तो संपूर्ण अभिव्यक्ती असलेली कविता वाटणे, हे गझलेचे गमक आहे. नुसत्या आकृतिबंधाने गझल ठरत नसते.

३. बदलत्या काळाच्या संदर्भानुसार गझलेमधील शेरांचे संदर्भ बदलू शकतात. पण गझल म्हणजे काय हे कवीच्या सोयीनुसार ठरत नसते- आणि ते समीक्षकांच्या सोयीनुसार नव्हेच नव्हे!

४. मराठी गझलेसाठी आवश्यक असलेली प्रतिमा, रूपके आणि संकेत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वातावरणात भरपूर आहेत. मराठी गझलेला मराठी मातीचाच सुगंध आला पाहिजे.

५. यमक, अन्त्ययमक आणि वृत्तांचे बंधन पाळूनसुद्धा शेर अगदी सहज व सोपा पण तितकाच गोटीबंद असावा. फालतू शब्दांना जागा नसावी. अनावश्यक शब्दांनी वृत्ताची मात्रापूर्ती करू नये.

६. शेर सहज कळावा आणि ऐकणाऱ्याच्या किंवा वाचणाऱ्याच्या थेट हृदयात शिरावा, अशी शब्दाची मांडणी असावी. जणू आपण बोलत आहोत, असा शेर असावा. सोपेपणा हे यशस्वी शेराचे रहस्य होय.

७. शेरातील दोन्ही ओळींचा परस्परांशी संबंध असलाच पाहिजे. शेर म्हणून परस्परांशी संबंध नसलेल्या दोन सुंदर ओळी एकत्र लिहिल्या म्हणजे शेर होत नाही. शेरात जे सांगायचे आहे, त्याची प्रस्तावना पहिल्या ओळीत असते, तर दुसरी ओळ म्हणजे पहिल्या ओळीतील प्रस्तावनेचा प्रभावी समारोप असतो.

८. गझलेमधील शेर विरोधाभासावरच (PARADOX) आधारित असतात, ही समजूत पार चुकीची आहे. स्थलाभावी नमुन्यादाखल माझा एकच शेर येथे उद्धृत करतो-

उरली विरंगुळ्याला ही सांजवेळ माझी
उरल्या तुझ्या जराश्या प्राणात हालचाली

९. शेर लिहितांना शेवटच्या शब्दातील शेवटचे अक्षर लघू असल्यास ते कधीही गुरू करू नये.

शेराच्या ओळीतील शेवटी असलेले लघू अक्षर गुरू करण्याची एक अत्यंत वाईट सवय खोड मराठीतील बऱ्याच कवींना फार वर्षांपासून लागलेली आहे. उदाहरणार्थ-

ही वाट हुंदक्याची थकली अता रडून s s s
रहदारि गच्च आहे देवा तुझ्यापुढून s s s

 
एकवार 'रहदारि' मधील ऱ्हस्व "रि" समजून घेता येईल. पण ओळ संपतांना हा 'न s s s s s' कशासाठी?

म्हणून निदान तरूण पिढीने तरी ही चूक करू नये. व्याकरणाची बाब बाजूला ठेवली तर शेवटच्या लघू अक्षराला ओढूनताणून गुरू केल्यावर ओळीतील प्रसाद व माधुर्य कमी होते, हाही मुद्दा लक्षात घ्यावा.

१०. गझलेची भाषा तिच्या पिंडाला मानवणारी असावी. ज्याचा आपल्या मातृभाषेवर संपूर्ण ताबा आहे. त्याला कोणताही विषय किंवा कोणतीही भावना शिवीगाळ न करता तेवढ्याच प्रभावीपणे शेरातून व्यक्त करता येते. क्वचित प्रसंगी अगदी अपरिहार्य झाल्यास एखादा असा शब्द त्या शेराच्या अभिव्यक्तीत चपखलपणे बसत असल्यास उपयोगात आणायला हरकत नाही. पण तसा शब्द अपरिहार्य असावा.

महाराष्ट्रातील तरुण पिढी ह्या माहितीचे सार्थक करील आणि महाराष्ट्रात यापुढे अधिकाधिक उत्कृष्ट व निर्दोष मराठी गझला लिहिल्या जातील, अशी मी आशा बाळगतो

जरी ह्या वर्तमानाला, कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या, पिढ्यांशी बोलतो आम्ही

- सुरेश भट
=======
(http://www.sureshbhat.in/ च्या सौजन्याने)
=======

 

--

Share

प्रतिक्रिया