दान ढेकळाचं देऊ...

Raosaheb Jadhav's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
छंदोबद्ध कविता

दान ढेकळाचं देऊ...

अंग घासत मातीशी
झाला फाळ टोकदार
हाती धरण्याला पेन
नाही धजत हे पोर......१

सांगा याला कोणीतरी
याचं परीक्षेचं साल
घाली बुडवून शाळा
तास नांगराचं खोल......२

झाले मन मातीमाती
लई सोसली रे कळ
तुझ्या डोळ्यात काजळ
शाई अक्षराच बळ.....३

काढ खूळ डोक्यातून
कर हिम्मत नव्याने
कर पांभर पेनाची
चाळ पुस्तकाची पाने.....४

शिक पोरा गड्या थोडं
बळ मातीतून घेऊ
व्यवस्थेला मग साऱ्या
दान ढेकळाचं देऊ......५

पोरा शिकण्यानं तुझ्या
फाळ होईल लेखणी
मुक्या बैलाच्याही तोंडी
जशी हिमतीची वाणी.....६

तुझं पाहून शिकणं
जीव धरील धरणी
ओल उडण्याआधी बा
पोरा कर तू पेरणी....७

रावसाहेब जाधव (चांदवड)
९४२२३२१५९६ rkjadhav96@gmail.com

प्रतिक्रिया

गंगाधर मुटे's picture

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....! CongratsCongrats