Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



कुणब्याचं जगणं काळजावर गोंदवणारा कवी : संतोष आळंजकर

लेखनविभाग: 
कवितेचे रसग्रहण

कुणब्याचं जगणं काळजावर गोंदवणारा कवी : संतोष आळंजकर

" मातीत हरवल्या कविता " या अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण शीर्षकानेच मनाला भुरळ घातली नाही तर नवलच ? चित्रकार अरविंद शेलार यांच्या आश्वासक आणि उत्कृष्ट अशा मुखपृष्ठाचा साज चढवून वाचकांच्या नजरेत भरणारा, वाचन जनशक्ती चळवळ प्रकाशनने प्रकाशित केलेला कवितासंग्रह म्हणजे "मातीत हरवल्या कविता" होय. गावमातीपासून ते शेतशिवारातपर्यंत निनादणारं सुंदर गीत या संग्रहात आहे. शेती, माती आणि नाती याबरोबरच गाव, गावातील माणसं, निसर्ग, हवा, पाणी, पिक, शिवार, पाखरं यांचा अनोखा मिलाप या संग्रहांमध्ये बघायला मिळेल. कुणब्याचं जगणं, त्याचं भोगणं जवळून पाहिल्याने त्याचं जसंच्या तसं वास्तव आणि भेदक चित्रण कवीने शब्दात पकडल्याचं जाणवते. मुळातच शेतीमातीशी जखडलेली कवीची नाळ वाचकाला वास्तवतेकडे घेऊन जाते.

राबराब राबून उन्हं, वारा, पाऊस अंगावर झेलत कुणबी बांधावर ठामपणे उभा असतो, तो त्याचा हंगाम मनासारखा व्हावा म्हणून. त्यासाठीच तर तो रातंदिन रक्ताचं पाणी करत असतो. भविष्य उज्वल व्हावं म्हणून वर्तमान हरवून बसतो. सण, वार याची तमा न बाळगता तो वाहून घेतो मातीसाठी.म्हणून तर काय काय तिचीच उपासना करत तो राहतो त्याच्या वावरात. दिवस उगवला काय नी मावळला काय याचा काहीही सबंध नसतो त्याच्या राबण्याला.म्हणून तर येणाऱ्या सुगीची चाहूल त्याला मनोमन आनंदुन सोडत असते. किंबहूना याचसाठी तर त्यांनं थंडी,पाऊस,ऊन अंगावर झेलत मातीची सेवा केलेली असते.परिणामी येणारी सुगी त्याला खुणावते.

आले सुगीचे दिवस
विळे पाजळून ठेवा

अन मग आलेल्या सुगीने कुणब्याच्या कणगीबरोबर त्याचं उधाणलेलं मनही भरत असतं. धान्याची रास पाहून तो कृतार्थ होतो, अशातच आनंदाचं गाणं त्याच्या ओठांवर न आलं तर नवलच. सूगी हा कुणब्याचा सोहळा असतो, म्हणूनच हा सोहळा त्याच्या जीवनात बऱ्याच अपेक्षांची स्वप्नपूर्ती करणारा असतो.

येता सुगीचे दिवस
सांडे शिवारात सोने
फुटे कुणब्याच्या ओठी
एक आनंदाचे गाणे

आयुष्यभर राबणाऱ्या कुणब्याच्या जीवनात त्याचा खरा सखा सोबती कोण असतो ? असा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो, तेव्हा त्याचे जित्राबं आपल्या नजरेत भरतात. हेच मूके जीव त्यांच्या सुखादुःखात त्यांच्याशी संवाद साधतात. तो अविरत संवाद फक्त कळतो तो कुणब्यालाच. त्यांच्या ऋणातून उतराई होणे कदापीच शक्य नसते, तरी त्यांचे ऋण शब्दात व्यक्त करताना कवी लिहितोच,

तुझी होण्या उतराई
राजा सांग काय करू
जर झालास तू गाय
तुझे होईन वासरू

जन्मोजन्मीचं नातं कुणबी आणि त्याच्या बैलाचं असतं, किंबहुना ते अतूट असतं, हे त्यांच्या कवितेत अधोरेखित होताना दिसून येते.

शेतात,रानात ठाण मांडून राबणाऱ्या हाती शेवटी काय लागतं ? कुणब्याच्या घामानं पुलंकित झालेली माती सरते शेवटी त्याच्या ओंजळीत काय दान देते ? उभे आयुष्य बांधावर घालवणाऱ्या कुणब्याच्या घरात शेवटी काय उरतं ?अशी अनेक प्रश्न सतावत असताना त्याच्या भाळावर लिहिलेल्या प्राक्तनाचा संदर्भ कवी द्यायला विसरत नाहीत.

अशी कोणती प्राक्तने
डोळा पाही मरण
कुणब्याच्या जगण्याचे
रोज जळते सरण

अशा बिकट परिस्थितीत हिम्मत आणि धैर्य गमावून बसणारा कुणबी जेव्हा हताश आणि अगतिक होतो,तेव्हा त्याच्या मनात आत्महत्येचे वाईट विचार घोंगावत असतात. मस्तक बधीर अन सून्न होतं. काय करावे ते सूचत नाही. अपेक्षांचे अनेक धागे जीर्ण होऊन तुटत जातात, तेव्हा त्याच्या खचणाऱ्या मनाला धीर देत, आधार देत कवी त्याला शब्दात सावरतो.

नको खचू रे कुणब्या
नको असा धीर सोडू
तोड बाभळीचा फास
खोड एकेकाची मोडू

हिरव्या सुगीचे डोलदार स्वप्न उरात बाळगून मिरगाच्या पावसात मातीची कूस भरणाऱ्या कुणब्याच्या मनात बहरणाऱ्या पिकाचे स्वप्न आकारात असतानाच मध्येच निसर्ग त्याला चकवा देतो,भुलवतो.दुष्काळ हळूहळू हात पाय पसरतो.पिक करपायला लागतं. त्यांन केव्हाच माना टाकलेल्या असतात. अशातच त्याला पावसाची प्रचंड अभिलाषा असते,म्हणून कुणब्याचे डोळे ढगाकडे पाहत पाहतच झरत जातात. जणू त्याच्या काळजाला झालेली जखम चिघळत जाते. तेव्हा मनात त्याची सल कायम राहते.

माझ्या बापाच्या शेतात
ढग फिरलेच नाही
त्याच्या प्राक्तनाचे भोग
कधी सरलेच नाही

गावातील माणसांची तांडे जेव्हा शहराकडे सरकत जातात, तेव्हा गाव सुनसान पडायला लागतं. ओसाड दिसायला लागतं. जगण्यासाठी गाव सोडणं ही माणसाची अपरिहार्यता आणि अगतिकता असते. अशा परिस्थितीत गावाबाहेर पडलेली माणसं शहराच्या वाटेनं चालायला लागतात. त्यांच्या परतीच्या पावलांचे ठसे कुठेच उमटत नाहीत. अस्वस्थ मनाचा भार सांभाळत माणसं शहरात विलीन होतात. ती गावाचीही राहत नाहीत अन शहराची होत नाहीत. ती मध्येच कुठेतरी लोंबकळत असतात. अशी गाव सोडताना माणसांची होणारी तगमग कवी नेमकी शब्दात पकडतो.

गाव सोडताना
दाराला लावलेलं कुलूप
पुन्हा उघडता येत नाही कधीच ...

शहरे आपल्याला खुणावत असतात.तिथले चकाकणारे रस्ते, मोठाले मॉल्स, इमारती, दुकाने यांची माणसाला भुरळ पडत असते. हे कितीही खरं असलं तरी शेताच्या बांधावर कवीला मिळणारी साद ही शहरात मिळेल याची काय शाश्वती ? म्हणून कवी शहरात कुणाशीच साद घालत नाही कारण त्याला भीती वाटते स्वतःचाच आवाज गर्दीत हरवण्याची ...

गावाबरोबर माणसातील माणूसपणही हरवत चाललंय. बदलत्या जीवनशैलीने माणसाचे मन हिरावून घेतले. त्याच्या काळजातील हळवा कोपरा गायब झालाय. नेहमी सुखदुःख वाटून घेणारी माणसं, एकमेकाचं दुःख हलकं करणारी माणसं, दुर्मिळ होत चाललीय. हे सांगताना कवीची घालमेल होते.

पहिल्यासारखं गड्या आता करमत नाही
हरवलेली माणसं सापडत नाहीत ...

परिवर्तनाच्या महापुरात गाव वाहून गेलं. माणसाबरोबर गावाची दशा आणि दिशा बदलत गेली. बदलाच्या वाऱ्यानं खेडीपाडी व्यापून टाकलीय. बदलत्या गावाची करुण कहाणी मांडताना कवी कमालीचा उद्विग्न होतो. त्याला आपला भूतकाळ आठवतो.

मातीच्या भिंतींना लाकडाचा धीर होता
मंदिराच्या शेजारीच पावणारा पीर होता
आल्यागेल्या झोळीसाठी ओंजळभर दाणे होते
अंगणातल्या झाडावर चिमण्याचे गाणे होते

गळक्या छपराचा, पडक्या भिंतीचा, मोडक्या अन ढासळणार्‍या भिंतीच्या आडोसावजा घरात कसबसं जीवन कंठणाऱ्या कुणब्याला एखाद्या विटाच्या घराचं स्वप्न पडावं यात काय नवल ? मात्र हे स्वप्न जेव्हा स्वप्नच राहून जातं, तेव्हा हळहळणारा कवी बेचैन होतो. म्हणून माय-बापाच्या संवादाच्या आठवणी उजागर करताना तो कमालीचा हळहळतो अन लाखो कुणब्यांच्या स्वप्नांचा प्रतिनिधी बनतो.

अशीच कैक सालं राबता राबता
आई-बाच जीवन सरलं
अन एक ईटाच्या घराचं सपान
खोपटातच राहून गेलं

माय बापाचं हे स्वप्न कालांतरानं जेव्हा कवी पूर्ण करतो,तेव्हा मायबाप मातीआड दडलेले असतात. मग त्याच घरात आला दिवस जगूही देत नाही, आणि रात्र नीट निजूही देत नाही.

मी मात्र अस्वस्थ होऊन
बदलत राहतो कूस रात्र रात्र
त्याच घराच्या जागेवर बांधलेल्या
सिमेंट विटाच्या घरात ...

पूर्वी माणूस किती समृद्ध होता. पाऊस होता. पाणी होतं. चिमण्या होत्या .पाखर होती. झाड, झुडूप जंगलं होते.मात्र कालांतराने माणूस कालसुसंगत झालाय. धनधान्यांनी भरलेल्या कणग्या घरामध्ये असल्या, तरी पाखरांना त्यांचा वाटा आणि बिदागी देणारे हात मात्र राहिले नाहीत. स्वार्थी होत चाललेल्या माणसाचा बुरखा कवी इथे फाडतांना दिसतो.

सुपातलं धान्य पाखडतांना पसाभर धान्य अंगणात टाकणारे हात गेले

आयुष्यातील सुखाची किनार जेव्हा हरपते.जगण्याच्या वाटा कुठेतरी विरून जातात. उजेड अचानक गायब होतो.अंधारानं कायमची सोबत केलेली असते. तेव्हा दुःखासोबत करार करणारा कवी भेटतो अन हसत हसत दुःखाला मिठी मारत कवटाळतो.

दुःख सारे चालत आले
वादे कसमे हजार केले
अरे सुखांनो थांबा थोडे
दुःखाशी मी करार केले

कवी संतोष आळंजकर यांची कविता केवळ थंड बसत नाही,तर ती बंड करत पेटूनही उठते.दंड थोपटते. पिढ्यानपिढ्या कुणब्याचं रक्त शोषणाऱ्या दलालांना, सावकारांना, व्यवस्थेला ती सावधतेचा इशारा देत,एल्गारही करते.

आता कोणत्याही क्षणाला
होऊ शकतो एल्गार ...

शेती मातीशी नाळ जखडून ठेवणाऱ्या कवीची लेखणी प्रचंड ताकदीची आहे. सडेतोड आहे.परखड आहे. वास्तवतेपासून ती अजिबातही ढळत नाही. ग्रामसंस्कृतीचा तिला बाज आहे. शेती मातीचा सन्मान हा कवीचा मूलाधार आहे. कुणब्याचं जगणं जवळून पाहिल्याने,अनुभवल्याने त्यांच्या लेखणीला वास्तवतेची धार येत जाते.वाचकाला अंतर्मुख करत करत वाचकांच्या हदयात शिरते.ती वाचकांना आपलंसं करते.यात शंकाच नाही.संतोष आळंजकर यांची कविता एकूणच वाचकाच्या काळजाला कोरत जाते,आणि त्यांच्या काळजाचा ठाव घेते. हेच या कवितेचे आणि कवीचे यश म्हणावे लागेल,हे निश्चित ..!
कवीमित्र संतोषजी आपण आणि आपल्या कविता कायम माझ्या हदयात आहेतच ...
पुढील लेखन प्रवासासाठी मन:पूर्वक हार्दिक सदिच्छा ..!

सचिन शिंदे
मुरली ता.उमरखेड
जि. यवतमाळ
8421527542

कविता संग्रह : मातीत हरवल्या कविता
कवी : संतोष आळंजकर
प्रकाशन : जनशक्ती वाचक चळवळ
मूल्य : १००
पृष्ठे : ९६

Share

प्रतिक्रिया