Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




ये रे म्हणू की जा रे पावसा?

ये रे म्हणू की जा रे पावसा?

मी रक्त शिंपले, घाम ओतला, बैलोबावाणी,
शेत कोरले, बीज पेरले, वसाडल्या रानी;
ये रे पावसा, जरा तरी ये, ठुमकल्यावाणी,
कोंब बीजाचे व्याकुळ झाले, तहानल्यावाणी!

कोंब बीजाचे कुशीत दडले, ‘आई आई’ करुनी,
मायभूमीने पदर झाकला, ‘गाई गाई’ म्हणुनी;
ये रे पावसा, थेंब थेंब तरी, तुषारल्यावाणी,
माय बीजाची हतबल झाली, उदासल्यावाणी!

ढग येती बघ, ढग जाती बघ, नमस्कार करुनी,
धस्स जीवाला, फस्स करुनी, हृदय पाणी-पाणी;
ये रे पावसा, एक सरी तरी, रिमझिमल्यावाणी,
बाप बीजाचा मलूल झाला, हिरमुसल्यावाणी!

घायकुतीला शिवार आले, कासावीस झाले,
पोटामध्ये मान दडवुनी, उन्हामधी न्हाले;
लपत-झपत तरी गुपचूप ये रे, चोरपावलांनी,
ताई बीजाची स्तवन करते, याचकावाणी!

आषाढातही ऊन तापते, उन्हाळ्यावाणी,
तडसली ही धरा तडतडा, प्रलाप अस्मानी;
बिगीबिगी ये वा, थुईथुई ये रे, थिरकल्यावाणी,
बाल अंकुरा न्हाऊ-माखू दे, हिरव्या उटण्यानी!

ऐकुनी आर्त करुणावाणी, प्रसन्न तो झाला,
थेंब टपोरे, ढगफुटीसम, गडगड, कडकडला;
महापुराने तांडव केले, हिरवळ तुडवुनी,
माती, बीज, अंकुर नेले, पुरात खरडुनी!

“ये रे” म्हणू की “जा रे” पावसा, काय म्हणावे रे?
यत्किंचितही अभय न उरले, जलमय झाले रे;
होते तेही वाहून गेले—शेत, पीक, पाणी;
जिकडे तिकडे केवळ उरला, चिखल या रानी!

- गंगाधर मुटे ‘अभय’
अकरा/नऊ/दोन हजार सव्वीस
=°=°=°=°=°=°=

Share