Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



मातीत हरवल्या कविता : ग्रामीण कवितेचा समृद्ध हुंकार

लेखनविभाग: 
काव्यसंग्रह समीक्षण

मातीत हरवल्या कविता : ग्रामीण कवितेचा समृद्ध हुंकार

आधुनिक मराठी ग्रामीण कविता प्रभावी आणि समृद्ध आशयाविष्कारात लिहिली जात आहे. बोलीभाषेतील शब्दसामर्थ्याने नटलेली शेती आणि मानवी नात्यांची गुंफण उत्तम अभिव्यक्तीसह बोलीभाषेतील शब्दसंपत्तीची यथोचित केलेली योजना वाचकांना, रसिकांना भुरळ घालते. यामुळे कवितेवर प्रेम करणारा सामान्य ग्रामीण माणूस आणखीनच कवितेच्या मोहात पडतो. आपली वाटणारी भाषा, स्वतःच्या अनुभवांची, जगण्यातील सुख-दुःखाच्या काळाची, आपुलकीची भावना कवितेतून व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे ग्रामीण कवितेची रसिकप्रियता वाढली आहे. आधुनिक कवी उत्तम ग्रामीण कविता लिहू लागले आहेत. मराठी साहित्य विकसित झाले आहे. मराठी साहित्याला ग्रामीण साहित्यप्रवाहाने चैतन्य दिले आहे, गती दिली आहे. अस्पर्शित राहिलेल्या रसरशीत जीवनाचे दर्शन घडविले आहे. मात्र या ग्रामीण साहित्याची व्हावी तशी समीक्षा झाली नाही. ग्रामीण कवितेतून ग्रामीण जीवनातील बदलाचे कितपत चित्रण केले आहे, खेड्यापाड्यातील परिवर्तनाची आव्हाने कितपत पेलली आहेत याचे अंतर्मुख होऊन चिंतन करणे गरजेचे आहे. विश्वास जहागीरदार यांनी ग्रामीण कवितेच्या बाबतीत केलेल्या विवेचनानुसार ग्रामीण कवितेमध्ये बाह्यवास्तव हे खेडे, निसर्ग आणि पारंपारिक मूल्ये यातून घडलेले ग्रामजीवन आहे आणि त्यात आकाररूपाला आलेली संवेदनाशीलता त्या जीवनातील अनुभवाविषयीच्या प्रतिक्रिया देत असते. अशा कवितेच्या निर्मितीच्या बुडाशी असलेली संवेदनशीलता ही ग्रामीण संवेदनाशीलता आहे आणि अशी कविता ग्रामीण आहे असे स्थूलमानाने म्हणता येईल.

ऊर्मी, कुसुमाकर, कविता-रती, किशोर, चपराक, शब्द सर्वश्रेष्ठ, वारसा, साहित्यगंध, गोंदण, कादवा शिवार, ऋतुपर्ण, सीनातीर, वर्ल्डसामना, सकाळ सप्तरंग, अॅग्रोवन, दिव्य मराठी, दै. महासत्ता, मुंबई नवाकाळ व तरूण भारत यांसारख्या नामांकित विविध दैनिकांतून व नियतकालिकांतून प्रसिद्धीस आलेल्या संतोष आळंजकर या उमद्या कवीचा 'मातीत हरवल्या कविता' हा पहिलाच कवितासंग्रह ग्रामीण कवितांचे समृद्ध रूप लेऊन वाचकांसमोर आला आहे. परंतु यात नवखेपणा अजिबात जाणवत नाही. ग्रामीण संस्कृती, निसर्ग आणि शेती-मातीशी, गावातल्या माणसांशी नाळ जोडणाऱ्या भाव-भावनांचा आविष्कार अगदी तळमळीने मांडलेल्या या संग्रहातील कवितांमधून अनुभवता येतो. पिढ्यान् पिढ्यांचं कुणबीपण खांद्यावर घेऊन राबराब राबणाऱ्या माणसांच्या व्यथा, वेदना या कवितांमधून मोकळ्या केल्या आहेत. बालमनाला पडलेल्या सृष्टीतील कालचक्राच्या निर्मितीचे मूळ शोधण्याचे प्रश्न काही कवितांमधून आलेले आहेत. ग्रामीण वातावरणात वाढलेल्या संतोष आळंजकर या कवीला बालपणापासून खेड्याच्या संस्कृतीने जिज्ञासू वृत्ती बहाल केली. वारसाहक्काने कुणबीपण भोगलेला हा कवी गावाच्या, माणसाच्या, तिथल्या संस्कारिक, संसारीक जीवनात आपले माणसं जपतो. नातीगोती सांभाळून शैक्षणिक समृद्धी मिळवतो. शाळा आणि मळा या गोष्टींचा लळा सोडत नाही. निसर्गाशी एकरूप होणारा हा कवी पुसतकांच्याही प्रेमात पडतो. कुडाच्या, मातीच्या घरात राहून मातीचा लागलेला जिव्हाळा त्याला विसरता येण्यासारखा नाही. दिवसभर उन्हातान्हात शेतामध्ये राबून सायंकाळी खोप्याकडे येणाऱ्या थकल्या-दमल्या बाया-बापुड्यांच्या कष्टाची जाणीव 'मातीत हरवल्या कविता' या संग्रहातील कवितांमधून कवीने आपल्याला करून दिली आहे. या संग्रहातील कवितेला स्वतःची एक लय आहे. सहजता आणि प्रवाहीपणा हा या कवितेचा गुण म्हणावा लागतो. कवीची अस्वस्थता, तगमग, घुसमट आणि निरागसता या कवितांमधून सतत डोकावतात. कवीच्या बालमनाला, बालनायकाला पडलेले अनेक प्रश्न सुरूवातीच्या काही कवितांमधून वाचकांसमोर ठेवलेले आहेत. नंतरच्या काही कविता समाजातील दांभिकांच्या वृत्तीवर प्रहार करणाऱ्या आहेत. जातीधर्माचे अवडंबर माजवणाऱ्यांना चपराक देणाऱ्या काही कविता नक्कीच जातीअंताच्या लढाईत लढा देणाऱ्या, धर्मनिरपेक्षितांच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रेम, न्याय आणि एकतेचा पुरस्कार करणारी कविता देशाला एकत्रित आणि सुरक्षित ठेवण्याची भाषा बोलणारी आहे. या संग्रहातील कविता स्वतःची एक स्वतंत्र शैली विकसित करणारी कविता आहे.
यातील काही कविता महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक उत्तेजनार्थ अनुदान योजनेत पात्र ठरल्याचा उल्लेख कवीने मनोगतात केलेला आहे. औरंगाबादच्या 'जनशक्ती वाचक चळवळ' प्रकाशनाने अत्यंत सुंदर रूप या संग्रहाला दिले आहे. चित्रकार अरविंद शेलार यांच्या कुंचल्यातून साकारलेले मुखपृष्ठ दृष्टी खिळवून ठेवते.

'मातीत हरवल्या कविता' या संतोष आळंजकर यांच्या कवितासंग्रहात एकूण ८१ (एक्क्याऐंशी) कविता आहेत. अल्पाक्षरत्त्वाने नटलेल्या कविता चटकन आवडायला लागतात. लयबद्धता वाचनाची चटक लावते. प्रत्येक कवितेत आपलेपणाची भावना दिसून येते. ही कविता वाचकांचा ताबा घेते. बालसुलभ शब्दांची मुक्त आणि सहज उधळण असणारी ही कविता नक्कीच सूर, ताल, लयीमुळे ठेका धरायला लावते. यातील पहिलीच कविता पहा कशी उत्स्फूर्त निर्मिती आहे! 'कोण गं आई' अशी बालमनाच्या प्रश्नांची सरबत्ती उत्तम केली आहे.

कोण गं आई कळ्यास इवल्या
मृदुस्पर्शाने उमलत येतो
सडा अंगणी तुझ्यासारखा
कोण फुलांचा घालत येतो

असे अनेक प्रश्न लहान मुलांना पडत असतात. ते आपल्या आईला विचारून त्यांची या विश्वाविषयी असलेली जिज्ञासा वृद्धिंगत करतात. खरंतर या कविता मातीतून उगवलेल्या कविता आहेत. निसर्गाच्या किमयेची ओळख करून देणाऱ्या आहेत. 'हिरवी बोली' ही दुसरी कविताही अशीच प्रश्नांची सरबत्ती करणारी आहे. मातीचे गाणे गाणारी आहे. प्रश्नांची श्रृंखला घेऊन येणाऱ्या सुरूवातीच्या कविता निसर्ग भावना जोपासणाऱ्या आहेत.

कोण पेरतो नभात पाणी
कोण वाहतो निळ्या पखाली
दाह भुईचा वाढत जाता
कोण शिडकतो पाऊस खाली

असे नानाविध प्रश्न करून कवितेला वेगळी उंची प्राप्त झाली आहे. हे या कवितेचे वेगळेपण म्हणता येते. तिसरी कविता 'निःसंगाचे देणे' हीही कविता याच प्रकारात येणारी आहे. पुढील कडवे पहा,

कोण देतो बरकत
बीज पेरल्या हाताला
कसे लगडते मोती
एका एका कणसाला

'मिरुग' कविता वैशाखी उन्हात तापलेल्या मनाला थंडावा देणारी भावना व्यक्त करते. शेतातल्या कामाला हुरूप येण्यासाठी मिरगाचा पाऊस आस लावतो. नवचैतन्य देतो. पावसाच्या धारा म्हणजे अमृताच्या धारा वाटू लागतात. शिवारात वारा वाहतो. खरीपाच्या पेरणीची लगबग सुरू होते. कुणब्याच्या डोळ्यांत नवे स्वप्न फुलते. कष्टाचा भार हलका वाटू लागतो. त्यावेळी मनाचा मोर आनंदाने नाचू लागतो. त्यावेळी ओळी येतात,

असं आभाळाचं दान
नित मिळो धरणीला
पंख पसरून नवे
नाचू देत मोरणीला

पाऊस, श्रावण सरी, पावसाची सर, ओढ, वळीव स्पर्श, दान याही कविता पावसाशी नाते सांगणाऱ्या आहेत. पावसाची आस बाळगणाऱ्या कुणब्याच्या भावना मांडणाऱ्या या कविता कुणब्याचं गाणं होऊन मिरवतात. कुणब्याच्या आशा आकांक्षांना पंख देणाऱ्या पावसाशी एकरूप होणाऱ्या मनाची अवस्था सांगणारे हे शब्दरूप अनुभवावयास हवे. निसर्ग कवितांची हिरवळ ल्यालेला 'मातीत हरवल्या कविता' हा संग्रह आकाशातील चंद्र, सूर्य, ताऱ्यांचे गीत गाणाऱ्या कुणब्याच्या आयुष्याच्या सुख-दुःखाचा आलेख मांडतो. मातीशी इमान राखणाऱ्या कुणब्याला मेघांशी जवळीक साधावी वाटते. संपूर्ण विश्वाचा पोषणकर्ता म्हणून त्याचं नातं विश्वाच्या कल्याणाशी आहे. याचा प्रत्यय अनेक कवितांमधून येतो. चैत्रपालवी चांदणे, जागा, सुगी, हट्टी पाखरे, येता सुगीचे दिवस या कविता शेतकरी, मजूर, माणसांच्या कष्टाचं पीक काढणीला येईपर्यंतच्या राबण्याच्या आपलेपणाच्या ओव्या गाणाऱ्या आहेत.

बैलाच्या उतराईच्या कविता उतराई, दावण उल्लेखनीय आहेत.

किती बरसले पाठी
चाबकाचे फटकारे
नाही दिले परतोनी
कधी बंडाचे इशारे

बैलांच्या कष्टाचे मोल न जाणणारा कुणबी होऊ शकत नाही. म्हणून बैलाच्या कुळात पुढच्या जन्मी येण्याची भावना कवी व्यक्त करतो ती अशी,

तुझी होण्या उतराई
राजा सांग काय करू
जर झालास तू गाय
तुझे होईन वासरू

शेतीसाठी आयुष्याची माती झालेल्या, सर्वस्व वाहून घेणाऱ्या बैलांप्रमाणेच शेतकऱ्याची व त्याच्या कुटुंबातील सदस्यांची अवस्था झाली आहे. आयुष्यभर कष्ट करूनही फरपट सोसणाऱ्या कुणबी बापाची हयात हाल-अपेष्टांनी भरलेली असते. दुःख सोसणाऱ्या शेतकऱ्याचे मरणही कष्टदायक होते. त्याचे इथल्या व्यवस्थेला कसलेही सोयरसुतक नाही. बापाची ओढाताणीची जिंदगी मुला-मुलींच्या वाट्याला यायला नको. असे जगणे कुणाच्याही पदरी पडू नये असे कवीला मनोमन वाटते. आयुष्यभर एका दावणीला हयात काढणाऱ्या बैलाप्रमाणेच कुणबी बापाची हयात एकाच दावणीला बांधून आपल्या शासन व्यवस्थेने व इथल्या राजकीय पुढारलेल्या लोकांनी स्वतःची भाकर भाजून घेतलेली दिसून येते. याचेच वर्णन 'दावण' या कवितेतून प्रतीकात्मक रूपाने केले आहे.

किती ओढले नांगर
हेल कितीदा वाहिले
शेवटच्या घटकेला
कसे मरण पाहिले

कष्ट करूनही हाती काही उरत नाही तेंव्हा आत्महत्त्येने जीवन संपवणाऱ्या शेतकरी बापाचे कसे आयुष्य पणाला लागते याची ही कविता. अशी कोणती प्राक्तने, नको खचू रे कुणब्या, माझ्या बापाच्या शेतात इत्यादी कविता शेतकऱ्याची फरपट मांडणाऱ्या कविता आहेत. अशी कोणती प्राक्तने या कवितेतून शेतकरी स्त्री आपल्या पतीच्या चिंतेत आहे. त्याला आत्महत्येपासून वाचवण्यासाठी धडपडते आहे. तो शेतात एखाद्या बाभळीच्या झाडाला देह लटकवेल की काय? अशी भीती बाळगून आहे. तिला याचाच घोर लागलेला आहे. ती धन्याच्या पाठोपाठ पाठीवर झोळीत लेकरू बांधून शेतात जाते. कधी झाडाकडे तर कधी विहिरीत पाहते. अशी कोणती प्राक्तने कुणब्याला भोगावी लागतात? जी सुखाला पारखी करतात. नको खचू रे कुणब्या या कवितेत कवी म्हणतो,

मोजदाद सरणांची
कोणी करणार नाही
तुझ्या लेकरांची चोच
कोणी भरणार नाही

नको खचू रे कुणब्या
नको असा धीर सोडू
तोड बाभळीचा फास
खोड एकेकाची मोडू

वरील ओळी शेतकऱ्याचे आत्मभान जागृत करणाऱ्या आहेत. नको खचू रे कुणब्या या कवितेतून कवीने कुणब्याचे म्हणजेच शेतकऱ्याचे आत्मबळ वाढविले आहे. राजकीय लोकांच्या दिखावूपणावर प्रहार केला आहे. त्यांचे नाटकी प्रेम शेतकऱ्याला जगण्यासाठी प्रेरणा देणारे नसून फास बनून समोर वावरते आहे. त्यामुळे व्यवस्थेचा बळी न ठरता या व्यवस्थेचे कान पिळण्याचे काम आता शेतकऱ्यांनी करावे असे कवीला या कवितेतून सुचवायचे आहे.

माझ्या बापाच्या शेतात, माझा बाप विठूराया, माय, तीन पाट्या, कढ, एक म्हातारी, इत्यादी कविता आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव करून देणाऱ्या, जगल्या-भोगल्या क्षणांची साक्ष देणाऱ्या आहेत. भाकरीसाठी आणि शिक्षणासाठी शेतात तिफण हाकणाऱ्या बापाची कविता आहे. मुलाबाळांना या अघोरी, जीवघेण्या कष्टाचे चटके बसू नयेत म्हणून शिक्षणाचा मार्ग दाखवणारे शब्द 'तीन पाट्या' या कवितेतून आले आहेत.

एक पाटी शिक्षणाची
एक पाटी भाकरीची
राब राब राबणाऱ्या
एक कष्टाळू हाताची

माहेरपण ही कविता सासरी नांदायला गेलेल्या स्त्रियांच्या मनातल्या आठवणींची शिदोरी आहे. मैत्रीणींच्या सहवासात घालवलेल्या सोनेरी क्षणांची स्मरणगाथा माहेरपण ही कविता आहे. बाईच्या दुःखाला हलके करणारे माहेरपण बाईला हवेहवेसे वाटते. तेच माहेरचं बालपण सासरी उभ्या जन्माला बळ देतं. याचं वर्णन पहा,

माहेरचं बालपण
बाई मनात झुरतं
बळ देऊन सासरी
उभ्या जन्माला पुरतं

मृत्युला बोलावून स्वागत करण्याची कल्पना 'जर येशील' या कवितेतून अाली आहे. कुळ आपले मातीचे, मातीत हरवल्या कविता या कविता मातीचे गाणे गात जगायला शिकवणाऱ्या आहेत. दुःखाचे डोंगर पचवून मोकळा श्वास घ्यायला लावणाऱ्या आहेत. वेदनांच्या डोहतळाला स्फुंदून उगवून वर येणाऱ्या आहेत. रक्तात संचारणाऱ्या आहेत. खोल दबलेल्या कविता रूजून मातीतून वर आल्या आहेत. नांगराच्या फाळाला लागून मातीबाहेर डोकावणारी ही कविता मातीची सल मांडते. या कवितेने दुःखाचे बोचरे शब्दही सजविले आहेत.

दरवेशी पालं, गेली भूई डोईवर, खरेपणाचा दाखला, नग्न उभा ठाक, हरवली माणसं, गावची कविता, सपान, जातं, लेकीबाळी, शहाडा, आजी, पांढरी कवडी, पोपडे, जुनं घरटं, साद, गाव सोडताना, गाव अजून इथेच आहे, चिमण्या, पाण्याच्या कविता, झुंडी, पाखंड्यांचा मेळा, सांगा त्यांना, द्या निवडून, एल्गार, बडवा रे बडवा, सांग सूर्याला, तुकोबाची माफी मागून, एकदा म्या रानात, कायदेशीर तरतूद, बहिरे वाचाळ, काटेरी रानात, भाषा माझी, आता हात तुझे, मृत्यू, करार, जात कोणती, मन उधानलं, घर दोघांचे, हिंदोळा, मोठेपणीची कविता, या बाभूळ झाडावरती, क्षितिजावरती मावळतीला, पुढल्या जन्मी असे होऊ दे, ओढ्याकाठी, ग्रीष्म दुपारी, मैदानावर, फुला तुला रे, दिवस आजचा, असेल काटे, गाव जाळला त्या मेघांना, त्या काट्यांच्या कविता झाल्या आणि शेवटची चार ओळींची कविता 'झोळीत माझ्या', इत्यादी कवितांची या संग्रहात ताकदीने अभिव्यक्ती झालेली आहे.

कधी निसर्गाची ओढ, कधी अलवार प्रेम तर कधी बंडाची, एल्गाराची भाषा तर कधी सळसळणाऱ्या रक्ताची कविता, तर कधी कुणब्याची करूण कहाणी, आईची, आजीची, बहिणीची, सखीची, मित्राची ओढ लावणारी कविता, तर कधी समाजातील अनिष्ट चालींचा समाचार, तर कधी राजकीय डावपेचाचा धांडोळा घेणारे शब्द आपल्या स्वतंत्र शैलीत तर कधी मुक्तछंदातून व्यक्त होतात. बापाच्या कष्टाची जाणीव करून देणाऱ्या कविता या संग्रहात पुष्कळ आहेत. शेती-मातीची, नात्यांची हळूवार गुंफण अनेक कवितांमधून करण्यात आली आहे. गावगाड्याची कविता यात उत्तम रीतीने आली आहे. एकूणच संतोष आळंजकर यांनी 'मातीत हरवल्या कविता' या पहिल्याच संग्रहातून साहित्य क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले आहे. हा कवितासंग्रह त्यांनी आपल्या आई-वडिलांना अर्पण केला आहे. त्यांच्या पुढील कविता लेखनासाठी व समग्र साहित्य निर्मितीसाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा!

- केशव बालासाहेब कुकडे,
क्वार्टर क्र. जुने डी-८, शक्तिकुंज वसाहत,
परळी वैजनाथ-४३१५२०.
मो.९८६०९८५९११.

मातीत हरवल्या कविता (कवितासंग्रह) - संतोष आळंजकर
प्रकाशक - जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद
मूल्य - १०० ₹
पृष्ठे - ९६

Share

प्रतिक्रिया