नागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा
सातपुडा पर्वताच्या कुशीत अत्यंत दुर्गम भागात वसलेले नागद्वार हे तीर्थक्षेत्र अती कठीण व देवदुर्लभ आहे, असे मी अगदी लहानपणापासून ऐकूनच होतो. शरीराने धट्टेकट्टे, मनाने खंबीर व जिवावर उदार होऊन वाटचाल करणारेच नागद्वारला जाऊ शकतात, असाच त्या काळी समज होता. त्या काळी नागद्वार तीर्थाला जाण्यास निघालेल्या यात्रेकरूंना सार करायला (निरोप द्यायला) अख्खा गाव मारुतीच्या पारावर गोळा व्हायचा. तो निरोप समारंभ म्हणजे अक्षरशः ओक्साबोक्सी रडारडच असायची. "हा जगून वाचून आला तर आपला" अशीच कुटुंबीयांची मनोभावना असायची. त्यामुळे नागद्वार तीर्थयात्रा म्हणजे अती कठीण व देवदुर्लभ आहे, याची मला जाणीव होतीच.
मी म्हणजे देशाटनाला चटावलेला प्राणी. थोडाफार भाग वगळला तर अनेकदा अनेक कारणामुळे अख्खा देश कानाकोपर्यापर्यंत फिरलो आहे. निसर्गरम्य पहाडीतील निरनिराळी निसर्गरम्य स्थळे पाहिली आहेत. चिखलदरा, मैहर, बम्लेश्वरी, वैष्णोदेवी, उटी, कन्नूर, कोडाईकन्नल, माऊंटआबू पाहून झाली आहेत. आठ पैकी सहा अष्टविनायक, बारा पैकी अकरा ज्योतिर्लिंग, चार धामापैकी तीन धाम (रामेश्वर, पुरी व द्वारका) करून झालेत. आता एकदा बद्रीनाथ-केदारनाथ केले की बारा ज्योतिर्लिंग आणि चार धाम एकाच वेळी पूर्ण होणार.
पण या सगळ्या ठिकाणांपेक्षा नागद्वार सर्वार्थाने खचितच वेगळे आहे. फारच कष्टाचे आहे पण आनंददायी आहे. देशात सर्वत्र फसवेगिरी, ठगगिरी आणि खिसेकापूंचा सुळसुळाट असताना येथे मात्र प्रामाणिकपणा आणि इमानदारी अजूनही जिवंत आहे. पंचमढीला गाडी जेथे जागा मिळेल तेथे पार्क करा आणि बिनधास्त निघून जा. कोणी हात देखील लावणार नाहीत. तिथल्या कोरकूकडे सामानाची पिशवी द्या व तुम्ही निर्धास्त व्हा. तो त्याच्या वेगळ्या शॉर्टकट मार्गाने पुढे निघून जातो. त्याची आणि तुमची दिवसभर भेट होत नाही पण तो तुम्हाला ठरल्या ठिकाणी तुमचे ओझे बरोबर आणून देतो. त्यासाठी तुम्हाला त्याचे नाव माहीत करून घ्यायची किंवा ओळखसुद्धा ठेवायची गरज नाही. तोच तुमची ओळख ठेवतो व तुम्हाला शोधून तुमचे सामानाचे ओझे तुमच्या स्वाधीन करतो. यात्रा करणारे सर्व यात्रिक परस्परांशी अत्यंत आपुलकीने वागतात. एकमेकांना चढा-उतरायला स्वतःहून मदतीचा हात पुढे करतात. ही यात्रा करताना यात्रिकांमध्ये केवळ "भगत आणि भग्तीन" एवढेच नाते असते. दुर्गम रस्ता पार करताना व एकमेकांना मदतीचा हात देताना/घेताना स्त्री-पुरूष या भेदाभेदाचा कुणाच्याच मनात लवलेश देखील नसतो.
सहा-सात वर्षापूर्वी मी नागद्वारला जाऊन आलो होतोच पण या वर्षी (२०१३) पुन्हा मनात ऊर्मी आली आणि पुन्हा जायचा बेत ठरला. यावर्षी अती पावसाने अन्य पहाडीक्षेत्राप्रमाणे नागद्वार पहाडीक्षेत्रातील दरड कोसळून रस्ते अवरुद्ध झाल्याच्या आणि रस्ते चालण्यासाठी अयोग्य तथा प्रतिकूल होऊन बंद झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रात झळकतच होत्या. पण ठरल्याप्रमाणे ८ ऑगष्टला आम्ही प्रवासाला निघालोच. सोबत एक बायको, दोन मुले, एक भाचा आणि १० नातेवाईक असे एकूण १५ जनांचा लवाजमा घेऊन आम्ही निघालो. सौंसर पार केले आणि सुरू झाला घाटाचा रस्ता. प्रचंड नागमोडी वळणे. सौंसर ते पंचमढी या २०० किमी लांब घाटवळणाच्या रस्त्याची तुलना गोवा ते मुंबई या मार्गावरील कोकणी भागातील घाटांशीच होऊ शकेल. पाऊस संततधार कोसळत असताना या वळणांतून स्विफ़्ट-डिझायर चालविण्याचा जो आनंद मला मिळाला तो शब्दात सांगणे खरेच कठीण आहे.
सातपुडा पर्वताच्या नैसर्गिक वनस्पतींनी नटलेल्या पर्वतरांगांमध्ये पंचमढी हे गाव वसलेले आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ११०० मीटर उंच असलेलं हे ठिकाण नितांत सुंदर आहे. यालाच सातपुड्याची राणी असे म्हणतात. इथे आढळणारी जैवविविधता पाहता युनेस्कोने मे २००९ मध्ये पंचमढीला जैव विभागाचा दर्जा दिलाय. जैवविविधतेच्या बाबतीत WWF अर्थात World Wildlife Fund ने हा परिसर जगातील ४ थ्या नंबरचा परिसर घोषित केलाय. इथली निसर्गातली विविधता मनाला अक्षरशः मोहून टाकते. सभोवताल नैसर्गिक झाडाझुडुपांनी वेढलेल्या पर्वतरांगा, चांदीसारखे चमकणारे झरे, उंच शिखरावरून जागोजागी दुधाच्या फ़वार्यासारखे झरझरणारे छोटे-मोठे धबधबे आणि त्याही पेक्षा मनाला भुरळ घालणारे निसर्गरम्य वातावरण. पाऊस कधी सुरू झाला आणि कधी थांबला हे सुद्धा कळत नाही. धुवांधार कोसळणारा पाऊस त्रासदायक वाटण्यापेक्षा आल्हाददायक वाटतो. येथे नागद्वारला अनेक यात्रिक दरवर्षी नित्यनेमाने येतात. का येतात याचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही कारण लौकिकदृष्ट्या सांगण्यासारखे काहीच नाही. पंचमढीवरून नागद्वारकडे निघालो की कुठेही फुलझाडे नाहीत, बागबगीचे नाहीत, घरे नाहीत, पक्षी-प्राणी नाहीत; पायवाटा आहेत त्यादेखील अत्यंत ओबडधोबड. कुठे-कुठे अक्षरशः दीड-दोन फूट रुंदीच्या पायवाटा आणि बाजूला हजारो फूट खोल दर्या. चुकून पाय घसरला तर मानवी देहाचा सांगाडासुद्धा मिळणे कठीण. गेला तो गेलाच. त्याला त्या दर्यांमधून शोधून काढू शकेल अशी कोणतीही प्रणाली आज अस्तित्वात नाही. आणि तरीही दरवर्षी लाखो यात्री येथे हजेरी लावायला येत असतात.
आम्ही पंचमढीला रात्री मुक्काम करून ९ तारखेला सकाळी निघालो नागद्वारच्या दिशेने. यात्रेच्या दिवसात पंचमढीवरून पुढे धूपगढपर्यंत स्वतःचे वाहन नेता येत नाही. त्या मार्गाने फक्त स्थानिक परवानाधारक वाहनेच चालतात. आम्हाला एक जीप मिळाली. ९ आसनक्षमतेच्या जीपमध्ये १५ लोकांना कोंबून जीपगाडी ६ किमी अंतरावरील धूपगडाच्या प्रथमद्वाराशी थांबली.
धूपगढ : धूपगढ हे सातपुडा पर्वतराजीतील 4430 फूट उंचीचे सर्वोच्च शिखर आहे. उगवत्या सूर्याच्या पहिल्या किरणापासून ते मावळणार्या सूर्याच्या शेवटच्या किरणापर्यंत सतत उन्हाचा मारा आपल्या माथ्यावर झेलत धूपगढ उभा आहे. धूपगडावर एकाच जागी बसून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता येऊ शकतो. सतत उन्हामध्ये असल्यामुळेच याला धूपगढ हे नाव देण्यात आले असावे.
आणि येथून सुरू झाली आमची पायदळ यात्रा. काजरी, श्रावण बाल मंदिर, गणेशाद्वार, नागद्वार (पद्मशेषगुफ़ा), पश्चिमद्वार, अग्निद्वार, स्वर्णद्वार, निमपहाड़ी, आमकी पहाड़ी, चिंतामणी, गंगावन शेष, चित्रशाला माता (माई की गिरी) , दत्तगिरी, दादाजी धुनीवाले बाबा, नंदीगढ़, नागिणी, पद्मिनी, राजगिरी, गुलालशेष, चंदनशेष, हल्दीशेष हे सुमारे २० किमी अंतर पायी चालून परत धूपगढ असा प्रवास. मध्येमध्ये पाऊस कोसळत होता. बॅग किंवा सामानाची पिशवी घेऊन चालणे अवघड असल्याने आम्ही आमच्या जवळील मुक्कामाच्या साहित्याचे दोन भले मोठे गाठोडे केले व ते दोन कोरकूंच्या स्वाधीन केले. त्यांनी ते गाठोडे उचलले आणि भराभरा निघून गेले. काजरीला मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची आमची भेट होणार होती.
-----------------------
अशा पाऊलवाटांनी डोंगर चढत चालणे म्हणजे अवघडच
------------------------------------
काजरी येथे पोचल्यावर श्रावण बाल मंदिर दर्शन घेतले. काजरी येथेच रात्री एका झोपडीत मुक्काम केला. दुसर्या दिवशी मोठे अंतर चालायचे होते. म्हणून पहाटे ४ वाजताच पुढील प्रवासाला सुरुवात करण्याशिवाय गत्यंतरच नव्हते म्हणून सर्व पहाटेच उठलो, हाती विजेर्या घेतल्या आणि अंधारातच जंगलातून ओबडधोबड पाऊलवाटेने "एक डोंगर चढता, एक डोंगर उतरता" या प्रकारे मार्गक्रमण सुरू केले. तेथे सपाट म्हणून रस्ते नाहीतच. सर्व वाटा शिखर चढणार्या आणि शिखरावरून थेट दरीत उतरणार्या. मात्र रस्त्यावर अनेक ठिकाणी छोटे-छोटे "अन्नदानाचे भंडारे" लागलेले असतात आणि ते सुद्धा अगदी फुकट, नि:शुल्क. कुठे काजू-मनुका घातलेला उपमा असतो तर कुठे जिलबी-बुंदा. भात, भाजी, पोळ्या, चहा सारे काही रस्त्याने फुकटच मिळते. अनेक सामाजिक संस्था या कामी पुढाकार घेऊन स्वखर्चाने भोजनाची व्यवस्था करतात. सतत कोसळणारा पाऊस आणि या डोंगरखड्याच्या ओबडधोबड चालण्यास असुरक्षित अशा पायवाटेने स्वतःपुरत्या अन्नाचे ओझे सोबत घेऊन जाणे अशक्य. त्यामुळे एका अर्थाने सर्व यात्रेकरू त्या मार्गावर अन्नासाठी "गरजू" बनतात. त्यांना या भाविक मंडळींच्या सामाजिक संस्था "अन्नसुरक्षा" प्रदान करतात आणि तिही अगदी फुकट. वाटेने फुकटाच्या प्रसादावर ताव मारत आम्ही सकाळी ८ च्या सुमारास नागद्वारला पोचलो.
-------------------
नागद्वाराचे प्रवेशद्वार
--------------------
दोन पहाडांच्या मधोमध एका निरुंद कपारीत पद्मशेष बाबाची छोटीशी मूर्ती आहे. ती कपारी आता थोडी रुंद आणि उंच केली असावी, असे दिसले. त्यामुळे अंदाजे २०० फूट अंतर आता एकावेळी एकाला उभ्याने चालत जाता येते. काही काळापूर्वी सरपटत जायला लागत असावे. असा अंदाज येतो.
-------------------
पद्मशेषद्वार
---------------------
पंजाबी लंगर वगळता देशात इतरत्र कुठेही, कोणत्याही तीर्थस्थळी फुकट अन्नप्रसाद मिळत नाही. याउलट सर्वत्र नाडवणूक, खिसेकापू, भंकसगिरी होत असताना या दुर्गम भागात जेथे या संस्थांना सर्व साहित्य प्रचंड कष्टाने डोक्यावर घेऊन जावे लागते तेथे या संस्था लाखो लोकांसाठी फुकटात जेवायची व्यवस्था करतात आणि आग्रहाने जेवू घालण्यात धन्यता मानतात, हे इथले मोठे वैशिष्ट्य ठरावे.
---------------------
अन्नदानाचा भंडारा - येथे आम्ही पोटभर जेवण घेतले.
---------------------
काही ठिकाणी अशी लोखंडी निशाणीची व्यवस्था केली आहे.
---------------------
दगडधोंड्यांच्या रस्त्यातून वाट काढत चालताना यात्रिक.
--------------------
गुळगुळीत दगडाची वाट आणि बाजूला शेकडो फूट खोल दरी
-------------------
थकल्यासारखे वाटल्यावर काही क्षणांची विश्रांती घेताना
----------------
मनोहारी ओढा आणि दुर्गम वाटा
---------------------
या वाटेने अनवाणी पायाने डोंगर चढण्याचा आनंद काही वेगळाच.
-----------------
दोन दिवस सतत चालून आम्ही १० तारखेला परत धूपगढला रात्री ११ च्या सुमारास पोचलो. माझी चप्पल हरवल्याने मला मात्र प्रवास अनवाणी पायानेच करावा लागला.
-----------------
चौरागढ : पंचमढीला जटाशंकर, गुप्त महादेव अशी देवस्थाने आहेत. ते बघून आम्ही चौरागडच्या दिशेने निघालो. समुद्रसपाटीपासून 4315 फूट आणि सुमारे बाराशे पायऱ्या चढून आलं, की आपण चौरागडाच्या माथ्यावर येतो. इथे शंकराचं मंदिर असून सभोवताल त्रिशूळांच्या रांगाच रांगा आहेत. अनेक भाविक नवस फ़ेडायसाठी किंवा श्रद्धेने खांद्यावर त्रिशूळ घेऊन येतात.
-------------------
चौरागढाचे प्रवेशद्वार.
-----------------
चौरागढ चढण्याला पायर्या आहेत पण चढताना देव आठवतोच.
-------------------
चौरागढ चढताना क्षणभराची विश्रांती.
--------------------
एकदाचे चौरागढाचे शिखर दृष्टीपटात आले, शिवमंदिर दिसायला लागले आणि चेहर्यावर हास्य फुलायला लागले.
---------------------
प्राचीनकाळीन शिवमंदिर
---------------------
हर हर महादेव
--------------------
अन्होनी गरम पाण्याचे कुंड : पंचमढीवरून ४७ किमीवर अन्होनी येथे गरम पाण्याचे कुंड आहे. बाजूलाच ज्वाला माता मंदिर आहे. कुंडातील पाणी एवढे गरम असते की त्यातून वाफ निघत असते. या पाण्यात आपण हात घालू शकत नाही. बाजूलाच दोन हौद बांधले आहेत. या कुंडातील पाणी तेथे घेतले जाते. भाविक तेथे आंघोळी करतात. येथे आंघोळ केल्यास चर्मरोग दुरुस्त होतात, अशी जनभावना आहे.
----------------
गरम पाण्याचे कुंड - पाण्यातून वाफ निघते
---------------------
काही वैशिष्टे :
१) पश्चिमद्वार गुफेची उंची ३-४ फूट असल्याने गुफेत वाकून चालत जावे लागते.
२) स्वर्गद्वार गुफेची उंची २-३ फूट असल्याने गुफेत रांगत किंवा सरपटत चालत जावे लागते.
३) हल्दीशेष गुफेत रांगत जावे लागते. आत गेलो आणि आतील दगडांना स्पर्श झाला की आपले अंग आणि कपडे हळदीसारखे पिवळे होऊन जातात.
४) गंगावन शेष गुफेत ५०-७० फूट रांगत किंवा बसून किंवा सरपटत जावे लागते. आत मात्र अत्यंत रमनिय मनोहरी दृष्य अहे. मुर्तीवर होणारा नैसर्गिक झर्याचा अभिषेक विलोभनिय आहे.
काही अवांतर :
१) पचमढी मध्यप्रदेशात असले तरी नागद्वार, चौरागढ यात्रा करणारे मुख्यत्वे महाराष्ट्रीय आणि सिमेलगतचे मराठी भाषिक यात्रिकच असतात.
२) नि:शुल्क भोजन व अल्पोपहाराची व्यवस्था करणार्या बहुतांश संस्था वैदर्भियच आहेत.
३) प्रांतसिमा आणि पचमढी यामधल्या सौंसर, पांढुर्णा वगैरे भागात अजूनही मराठीच बोलली जाते.
४) नागद्वार यात्रेला प्रशासकिय सुविधा पुरेशा उपलब्ध न होण्यामागे व म.प्र शासकांची भूमिका उदासिनतेची असण्यामागे कदाचित हे एक प्रमुख कारण असण्याची शक्यता आहे.
५) नागव्दार यात्रा बंद करण्यासाठी म.प्र. शासनाकडून जाणिवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याची आतल्या गोटात चर्चा आहे. यावर्षी केवळ १० दिवसाची परवानगी मिळाली हा त्याचाच परिणाम असावा, असा संशय घ्यायला बराच वाव आहे.
६) नागद्वारला जाणारा बहुतांश यात्रिकवर्ग हा श्रमिकवर्गच असतो. कर्मचारी, व्यापारी किंवा सुखवस्तू घराण्यातील लोक नागद्वारला जातच नाहीत. श्रमिक वर्गाचे तिर्थस्थान म्हणूनच नागद्वारचा एकंदरित ट्रेन्ड बनलेला आहे.म्हणूनच या स्थळाबद्दल कुठेही चर्चा होत नाही. जर येथे शिक्षित-उच्चशिक्षित यात्रिक गेले असते तर कदाचित देशातिल सर्वोत्तम नैसर्गिक आनंददायी क्षेत्र म्हणून या स्थळाचा नक्किच गाजावाजा झाला असता.
७) शिवाय या स्थळाच्या भौगोलिक जडणघडणीच्या काही मर्यादाही आहेत.
अ) या मार्गावर दुचाकी किंवा चारचाकी वाहन जाऊ शकेल असे रस्ते निर्माण करणे, अशक्य आहे.
ब) हेलिपॅड तयार करायला देखिल तेवढी सपाट जमिन उपलब्ध नाही.
क) पायदळ यात्राच शक्य आहे पण अत्यंत असुरक्षित आणि शारिरीक कष्टाची आहे.
पंचमढीला आम्ही नागद्वार, चौरागढ आणि अन्होनी इतकेच पाहू शकलो. तीन दिवस सतत पायी चालून एवढे थकून गेलो की आणखी काही बघायची इच्छाच उरली नव्हती. मात्र येथे बरेच काही बघण्यासारखे आहे. गूढ आणि घनदाट जंगलातून लांबच लांब पसरलेले रस्ते आपल्याला इथल्या अनेक रमणीय स्थळांकडे घेऊन जातात. पंचमढीला सुमारे ४८ प्रेक्षणीय स्थळं आहेत. त्यातील काही स्थळं सामान्य लोकही अगदी सहज जाऊन पाहू शकतील अशी आहेत, तर काही ठिकाणं अवघड आहेत.
पांडव गुंफा, रॉक पेंटिंग, धबधबे, बी फॉल, अप्सरा, विहार, पंचमढी मधील सर्वांत उंच म्हणजे ३५० फूट उंचीचा रजतप्रताप हा धबधबा वगैरे बघायचे राहून गेले मात्र डिसेंबरमध्ये पुन्हा जायचा विचार आहे.
* नागद्वार यात्रा वर्षातून दोनदा असते.
-
गुरूपोर्णिमा ते नागपंचमी परंतु यावर्षी प्रशासनाने केवळ २ ते १२ ऑगष्ट अशी १० दिवसाचीच परवानगी दिली होती. हीच मुख्य यात्रा असते.
-
वैशाख महिन्यात वैशाखी यात्रा, पण यावेळेस पिण्याच्या पाण्याची टंचाई असते. जंगली प्राण्यांचा या भागात वावर असतो, नि:शुल्क भोजन किंवा अन्य सुविधा देखील नसतात. अजिबात गर्दी नसते. त्यामुळे ही नागद्वार यात्रेसाठी उपयुक्त वेळ नाही.
-
उर्वरित संपूर्ण काळ हा प्रभाग निर्जन असतो.
पंचमढीला कसे जावे?
-
हवाई मार्गाने जायचे झाल्यास भोपाळ वरून १९५ कि. मी.
-
रेल्वेने जायचे झाल्यास होशंगाबाद जवळील पिपरिया इथे उतरून पुढे बसने - अंतर ४५ कि. मी. आहे.
-
नागपूरहून बसने पंचमढीला जाता येते - अंतर सुमारे २७० कि. मी. आहे.
- गंगाधर मुटे
----------------------------
(१२ ऑगष्ट २०१३)
प्रतिक्रिया
माहितीपूर्ण लेख. आवडला!
माहितीपूर्ण लेख. आवडला
धन्यवाद गोळे साहेब.
धन्यवाद गोळे साहेब.
शेतकरी तितुका एक एक!
हमारे आसपास ही स्वर्ग है
प्रिय गंगाधरराव,
मै आज तक इस यात्रा को टालता आ रहा था किंतु आपका संपूर्ण अनुभव पढ़ने के बाद ऐसे लगता है की अब और रुकना केवल बेवकूफी होगी. हमारे आसपास ही स्वर्ग है किंतु हम जिंदगी की हर रोज की आपाधापी में सभी से वंचित है.
दिनेश शर्मा
धन्यवाद शर्माजी,
धन्यवाद शर्माजी,
नागद्वार तो साल मे एकही बार किया जा सकता है, नागपंचमी के समय। किंतु पचमढी और चौरागड कभीभी किया आ सकता है।
आपको अगर नागव्दार करना है तो मेरा सुझाव है की यह यात्रा आप दो स्टेप मे करे तो थोडा आसान होगा.
पहली बार पचमढी और चौरागढ - यह यात्रा के लिये ३/४ दिन पचमढी मे मुक्काम करना पडेगा।
दुसरी बार केवल नागव्दार।
ऐसा करनेसे यात्रा बडे पैमानेपर आसान हो सकती है। नागद्वार करनेके बाद हमजैसे कभीकभार पैदल चलनेवाले लोग अक्सर थक जाते है। बदन मे दर्द भी महसूस होता है, चलने कठीनाई महसूस होती है इसलिये नागव्दार के बाद अगर सिधा घर वापस आयेंगे तो अच्छा है।
शेतकरी तितुका एक एक!
श्री. मुटे यांस स. न.लेख
हा प्रतिसाद सिस्टिमच्या चुकिच्या हाताळणीने डिलिट झाला आहे.
धन्यवाद
धन्यवाद
शेतकरी तितुका एक एक!
फेसबुक लिंक
फेसबुक लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/posts/2010280438996634
शेतकरी तितुका एक एक!
पचमढ़ी के दर्शनीय स्थल
पचमढ़ी के दर्शनीय स्थल
मध्य प्रदेश के होशंगाबाद जिले में स्थित पंचमढ़ी मध्य भारत के सबसे खूबसूरत पर्यटन स्थलों में एक है। सतपुड़ा की पहाड़ियों के बीच समुद्र तल से 3550 फीट की ऊंचाई पर बसा पंचमढ़ी मध्य प्रदेश का यह एकमात्र हिल स्टेशन है। हरे-भरे और शांत पंचमढ़ी में बहुत-सी नदियों और झरनों के गीत सैलानियों में मंत्रमुग्ध कर देते हैं। पंचमढ़ी घाटी की खोज 1857 में बंगाल लान्सर के कैप्टन जेम्स फोरसिथ ने की थी। इस स्थान को अंग्रेजों ने सेना की छावनी के रूप में विकसित किया। पंचमढ़ी में आज भी ब्रिटिश काल के अनेक चर्च और इमारतें देखी जा सकती हैं।
मुख्य पर्यटन स्थलों में निम्न हैं:-
जटाशंकर -
पंचमढ़ी नगर से डेढ किलोमीटर की दूरी पर स्थित जटाशंकर एक पवित्र गुफा है। इसके ऊपर एक बिना किसी सहार का झूलता हुआ विशाल शिलाखंड रखा है। यहां शिव का एक प्राकृतिक शिवलिंग बना हुआ है। जटाशंकर मार्ग पर एक हनुमान मंदिर है जहां हनुमान की मूर्ति एक शिलाखंड पर उकेरी गई है। जटाशंकर गुफा के नजदीक ही हारपर्स गुफा है। इस गुफा में वीणा बजाते हुए एक व्यक्ति का चित्र है।
पांडव गुफाएं -
एक छोटी पहाड़ी पर यह पांच प्राचीन गुफाएं बनी हैं। इन्हीं पांच गुफाएं के कारण की इस स्थान को पंचमढ़ी कहा जाता है। कहा जाता है पांडव अपने वनवास के दौरान यहां ठहर थे। सबसे साफ सुथरी और हवादार गुफा को द्रोपदी कुटी कहा जाता है जबकि सबसे अंधेरी गुफा भीम कोठरी के नाम से लोकप्रिय है। पुरातत्वेत्ताओं का मानना है कि इन गुफाओं को 9वीं और 10 वीं शताब्दी में गुप्त काल के दौरान बौद्धों द्वारा बनवाया गया था।
अप्सरा विहार -
पांडव गुफा के साथ ही अप्सरा विहार या परी ताल को मार्ग जाता है जहां पैदल चाल द्वारा ही पहुंचा जा सकता है। यह तालाब एक छोटे झरने से बना है जो 30 फीट ऊंचा है। अधिक गहरा न होने की वजह से यह तालाब तैराकी और ग़ोताख़ोरी के लिए बिल्कुल उपयुक्त है। इस तालाब को पंचमढ़ी का सबसे सुन्दर ताल माना जाता है।
महादेव गुफा -
नगर से 10 किलोमीटर दूर स्थित महादेव हिन्दुओं के लिए पूजनीय स्थल है। यह पवित्र गुफा भगवान शिव को समर्पित है। यह गुफा 30 मीटर लंबी है और यहां सदैव पानी बहता रहता है। कहा जाता है कि भस्मासुर से बचने के लिए भगवान शिव यहीं पर छिपे थे। भगवान शिव ने भस्मासुर को वरदान दिया था कि वह जिस के सिर पर हाथ रख देगा वह भस्म हो जाएगा। गुफा के भीतर एक शिवलिंग बना हुआ है। शिवरात्रि यहां पूर जोश के साथ मनाई जाती है। महादेव पहुंचने का मार्ग काफी दुर्गम है।
प्रियदर्शिनी प्वाइंट :
यह सतपुड़ा की पहाड़ियों का सबसे ऊंचा प्वाइंट है। इसी स्थान से कैप्टन जेम्स फोरसिथ ने 1857 में इस खूबसूरत हिल स्टेशन की खोज की गई थी। इस प्वाइंट का मूल नाम फोरसिथ प्वाइंट था लेकिन बाद में इसका नाम बदलकर प्रियदर्शिनी प्वाइंट रख दिया गया। यहां से सूर्यास्त का नजारा बेहद मनमोहक लगता है। चौरादेव, महादेव, धूपगढ़ नामक सतपुड़ा की तीन प्रमुख चोटियां यहां से देखी जा सकती हैं।
रजत प्रपात -
अप्सरा विहार से आधा किलोमीटर पूर्व दिशा में रजत प्रपात है। इस प्रपात की ऊंचाई 350 फीट है। झरने से गिरता जल यहां तरल चांदी के समान प्रतीत होता है। झरने तक पहुंचने का मार्ग काफी दुर्गम है। केवल साहसिक पर्यटक ही ट्रैकिंग के माध्यम से झरने तक पहुंच सकते हैं।
राजेन्द्र गिरी -
इस पहाड़ी ने भारत के प्रथम राष्ट्रपति डॉ॰ राजेन्द्र प्रसाद को बहुत लुभाया था। वे यहां की खूबसूरती से प्रभावित होकर कई बार आए थे। उनके नाम पर ही इस पहाड़ी नाम रखा गया है। उनके ठहरने के यहां रवि शंकर भवन बनवाया गया था। पहाड़ी के चारों ओर की दृश्यावली सैलानियों को मंत्रमुग्ध कर देती है।
हन्डी खो -
यह पंचमढ़ी की सबसे गहरी और तंग घाटी है जिसकी गहराई 300 फीट है। दोनों ओर घने जंगलों से घिरी इस घाटी के नीचे बहते पानी की स्पष्ट आवाज सुनी जा सकती है। कहा जाता है कि भगवान शिव ने यहां एक असुर सर्प को दफनाया था। स्थानीय लोगों में यह घाटी अंधी खो के नाम से जानी जाती है।
चौरागढ़ -
महादेव से 4 किलोमीटर की खड़ी चढाई से चौरागढ़ पहुंचा जा सकता है। पहाड़ी के आयताकार शिखर पर एक मंदिर है जहां भगवान शिव की प्रतिमा स्थापित है। भगवान शिव को त्रिशूल भेंट करने के लिए श्रद्धालु बड़े जोश के साथ मंदिर जाते हैं। आराम करने के लिए यहां एक धर्मशाला भी बनी है।
मुधमक्खी झरना -
नगर से 3 किलोमीटर दूर स्थित मधुमक्खी झरना यमुना प्रपात के नाम से भी जाना जाता है। नदी में गिरते इस खूबसूरत झरने से पंचमढ़ी को पानी की आपूर्ति की जाती है। नहाने के लिए यह झरना काफी लोकप्रिय है। इस झरने तक आसानी से पहुंचा जा सकता है।
तामिया -
हमेशा पर्यटकों से भरा-पूरा रहने वाला तामिया खूबसूरती के मामले में पंचमढ़ी से कम नहीं है। तामिया के सनसेट प्वाइंट में घंटों बैठकर सूर्यास्त की खूबसूरती देखी जा सकती है। सतपुड़ी की पहाड़ियों यहां अपने सुन्दरतम रूप में दिखाई देती हैं। तामिया पंचमढ़ी से 78 किलोमीटर की दूरी पर है और यहां जीप या बसों के माध्यम से पहुंचा जा सकता है।
सतपुड़ा राष्टीय पार्क
1981 में स्थापित सतपुड़ा राष्ट्रीय पार्क 524 वर्ग किलोमीटर के क्षेत्र में फैला है। यह पार्क असंख्य दुर्लभ पक्षियों का घर है। यहां बिसन, टाइगर, तेन्दुए और चार सींग वाले हिरन जसे जानवरों को देखा जा सकता है। यह पार्क सदाबहार साल, टीक और बांस के पेड़ों से भरपूर है। पार्क के आसपास ठहरने की उत्तम व्यवस्था है।
(wikipedia च्या सौजन्याने)
शेतकरी तितुका एक एक!
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
=-=-=-=-=
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
मोबाईल अॅप