बोल बैला बोल : नागपुरी तडका ॥३३॥
तोंडाला मुसके बांधून काळ्या मातीत राबणाऱ्या सर्व "मुक्या बैलांना" बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
=-=-=-=
पोळ्याच्या निमित्ताने तरी बोल रे बैलोबा
नुसत्याच आत्महत्या करू नकोस रे बैलोबा
=-=-=-=
बोल बैला बोल : नागपुरी तडका ॥३३॥
बोल बैला बोल तुला बोललंच पाह्यजे
बांधलेलं मुस्कं आता सोडलंच पाह्यजे...!
नांगर ओढू ओढू जेव्हा तोंड फेसाळंले
कोणी तरी आला का रे हाल पुसायाले?
ज्यांच्यासाठी पिकवलेस वखारभरून धान्य
आहेत का रे तरी त्यांना हक्क तुझे मान्य?
फ़ुकामधी रक्त आटणं थांबलंच पाह्यजे....!
थंडी-पाऊस, ऊन-वारा छातीवरी पेलतोस
वादळाचे तडाखे शिंगावरी झेलतोस
तेव्हा कुठे हिरवीगार होते काळी आई
तरी का रे तुझे श्रम मातीमोल जाई?
लुटीचं अर्थकारण तू शिकलंच पाह्यजे...!
इच्छाधारी गायवासरे राजबिंडे नवी
खुर्चीसाठी त्यांना तुझी हाडंकुडं हवी
तुझे कष्ट त्यांचे लेखी भिक्षापात्रतेचे
ऐद्यांना देणार 'अभय' अन्न सुरक्षेचे
जागा हो बैलोबा तू जागलंच पाह्यजे...!
- गंगाधर मुटे 'अभय'
=÷=÷=÷=÷=
अठरा/नऊ/दोन हजार तेरा
#नागपुरी तडका #अभय #गंगाधर_मुटे #माझी_वाङ्मयशेती
प्रतिक्रिया
फेसबुक लिंक
फेसबुक लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/posts/2137626579595352
शेतकरी तितुका एक एक!
फेसबुक लिंक
फेसबुक लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/posts/4687822817909036
शेतकरी तितुका एक एक!