नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पुस्तक समीक्षण-
ऐक ना : नवजात लेखणीला पडलेलं देखणं स्वप्न
काव्य क्षेत्रात येऊन अगदी अल्प कालावधीत पुण्यातील युवा कवी श्री.गणेश बनसोडे यांनी त्यांचं साहित्यरुपी आकाशात क्षितिजापल्याड झेप घेण्याच भव्य स्वप्न पाहिलं आणि 'ऐक ना' या काव्यसंग्रहाच्या रुपाने त्यांनी त्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल चालू केली आहे. या कविता संग्रहाला प्रसिध्द गझलकार श्री. गोपाल मापारी आणि प्रसिद्ध लोकप्रिय कवी श्री. अनंत राऊत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पुस्तकाला अतिशय समर्पक व आकर्षक असे श्री. कैवल्य यांचे मुखपृष्ठ व सौ. सारिका गणेश बनसोडे यांचे मुखचित्र लाभले आहे. काव्यसंग्रहातील प्रत्येक कवितेची दिलखेचक अशी मांडणी व सजावट करण्यासाठी चि. आर्यन बनसोडे यांनी मेहनत घेतली आहे. गणेश बनसोडे या संग्रहातील 'सार माझ्या वारीचा' या कवितेत मांडतात,
'फुलांच्या बागेत काटाच नशिबी होता
सुगंध पसरविण्या फुलांचा नकार होता
गाव मनीचा दिसता, प्रश्न उभा राहिला होता
याचसाठी अट्टाहास का? हा प्रश्नच होता' (पृ.१५)
आपल्या आजूबाजूला सर्वत्र चांगल्या गोष्टी असूनदेखील एखाद्या माणसाच्या नशिबी कायम वाईटच येतं. आणि आयुष्यभर ज्या गोष्टीसाठी आपण धडपडत असतो ती गोष्ट आपल्याला जेव्हा प्राप्त होते, तेव्हा माणसाला स्वतःला प्रश्न पडतो की आजपर्यंत एवढा अट्टाहास, एवढी धडपड एवढे प्रयत्न आपण याच गोष्टीसाठी केले का?
पुढे कवी आपल्या 'दोन घटके' या कवितेत मृत्यूवर भाष्य करताना लिहितात की,
'एक दिवस आयुष्याची दोरी तुटणार आहे
राजा असो की भिकारी, मृत्यू अटळ आहे
जीवन रंगमंच हा सगळे कलाकार इथले
प्रत्येकाचे पात्र सजलेले दोन ओळींचे आहे' (पृ.२०)
ज्या गोष्टीला जन्म आहे, त्या गोष्टीला मरण देखील चुकलेले नाही.संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे 'जातस्य ही ध्रुवो मृत्यू' त्याप्रमाणे हा मृत्यू श्रीमंत गरीब, उच्च नीच, काळा गोरा असा भेदभाव कधीच करत नाही, असे लिहून कवी पुढे जीवनाची तुलना रंगमंचाशी करतो आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेने आपल्या नशिबी आलेले पात्र आपल्या परीने चांगल्या प्रकारे वठविण्याचा प्रयत्न करावा. अशाप्रकारे कवीने प्रत्यक्ष जीवन आणि रंगमंच यांची सांगड घालून मृत्यूवर भाष्य केले आहे.
त्यानंतर पुढील 'पण हरलो नाही' या कवितेत कवी लिहितो,
'तुझ्या कट्यारीवर अभिमान असेल तुला
माझ्याही लेखणीवर गर्व कमी नाही मला
तुटलो काही काळ, हरवलोही काही काळ
पण हरलो नाही, उगवेल एक दिवस सकाळ'
कवीच्या स्वतःच्या लेखणीवरील विश्वास या ओळीतून झळकतो. माणसाचं आयुष्य ज्या आशेवर सुरू आहे ती आशाच माणसाला सदैव जगण्याचं कारण देत असते; त्यामुळे आत्ताच्या अंधकारमय परिस्थितीमध्ये देखील उद्याच्या सुंदर सकाळची स्वप्ने पाहणाऱ्या कविमनाचं प्रतिबिंब या ओळींमध्ये उमटले आहे.
तथापि, या सर्वांगसुंदर काव्य संग्रहाला जर कवीने वृत्तांची जोड दिली असती तर या पुस्तकाच्या देखणेपणात कैकपटीने वाढ झाली असती, यात तिळमात्र शंका नाही. काही ठिकाणी व्याकरणाचे नियम पाळून सुधारणा करणे अपेक्षित आहे.
कवी गणेश बनसोडे यांनी अनेक वेगवेगळ्या धाटणीचे विषय हाताळण्याचा प्रयत्न या कविता संग्रहाच्या माध्यमातून केला आहे. या संग्रहात एकूण ९४ कविता आहेत. बाह्यरुपाप्रमाणे या संग्रहाचे अंतरंगदेखील तेवढेच सुंदर आहे. नवोदित कवीने लिहिलेल्या या पहिल्याच काव्यसंग्रहाचे रसिक-वाचक नक्कीच स्वागत करतील अशी आशा आहे. त्यांच्या या काव्यसंग्रहसाठी व आगामी लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा...!!
महेश ज्ञानोबा होनमाने
रा. ताडकळस, ता. पूर्णा, जि.परभणी
ह. मु. जुनी डी/१६,शक्तिकुंज वसाहत,परळी वैजनाथ-४३१५२०
मो.९९२३५२५५३३
ईमेल: maheshhonmane96@gmail.com
ऐक ना (काव्यसंग्रह)
कवी : गणेश बनसोडे
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.
प्रथमावृत्ती : सप्टेंबर -२०२१
पृष्ठे : १००
मूल्य : ₹ ११० /-
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण विषयाशी
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.