बैल जवा बोलते...
{ व-हाडी बोली लघुकथा }
आटपाट नगर होतं. नगराचं नाव होतं सैदापूर. सैदापूर हे नाव थ्या गावाले कामूनं पळ्ळ असा ईचार आपूनं करत असू..बराबर हायं. कारन थ्या गावात मोहाच्या माशा लय होत्या जागोजागी मो च्या पोया झाळाले लटकेलं दिसत म्हनूनसन्या थ्या गावाचं नावं सैदापूर पळ्ळ. हे गांव मुर्चापूर तालुक्यात येत असूनं लयचं दुर्गम भागातलं पंचीसक घराचं ऊल्स गांव. ह्या गावात गजानन तांबळे नावाचा एक मानूस राह्ये. त्याच्या घरी एक देसी गाय होती. थो थ्या गायीची लयचं कायजी घे. तीले वावरात जातानी संग चराले घेवूनं जाये. थे दिवसभर पळीतात चरे अन् संध्याकाय झाली की बंडीले मांगून बांधूनं घरी आने. तीले ढेपीचा, भाकरीचा, घुग-याचा , गयाचा अलप लाव्ये. तीले नितनेमानं खरारा करे. त्यानं तिचे नाक टोचलेच नाह्यी. कारन थो तीले लय जीव लाव्ये. अस करता करता दिस मास लोटत होते. गाय गामनं राह्यली. म्हनतात ना गाईचं अन् बाईचं यत सारखचं असते. नव मयने नव दिसानं थे गाय एक गोरं जंदली. गोरं लयच साजरं होतं पांढ भक जस काय कापसाचं बोंड. जल्मल्यावर थे ऊठाले करे. गजानन न गो-याचा गोट्यानं नाय तोळ्ळला
गो-याच्या तोंडातला बोटं फिरवूनं जाय काहाळला. नखानं खुरं कुरतयले. गाय लेकराले चटचट चाटाले लागली. गोरं ऊठे ऊभ राह्ये अन् बदकन पळे अन् डबलूनं ऊठे ओच्याले हुंदके देत झटे अन् गाय फरफर पना सोळे. गजानननं गो-याचं नाव संभ्या ठेवलं. थो रोज थ्या गो-याले पोटभर दुध पीवू दे अन् ऊरलचं त काहाळे.
दिस मास लोटत होते. गोरं मोठ होत होतं. गाय अन् संभ्या दोघही बंडीच्या मांग मांग वावरात जाये. संभ्या तसा लयचं ईपित्तर धुरे धारे हिरवे दिसले की बातच वरपूनं बंडी मांग धावत ये. माय लेक वावरात जायेत पळीतात दिसभर चरत. डोबीडाबीतलं पानी पेत अन् बसत पांदनीत बागूलं करत.
दिसमास जात होते गोरं संभ्या वाहाळत होतं. गजाननले वाटे एक गोरं ईकत घ्यावं अन् मंग मस्त जोळी तयार होते. गजाननन ईचार बायको जौळ बोलूनं दाखोला. गजाननची बायकोनं होकार देल्ला. पन् गजानन ले वाटे संभ्याच जीवघर कस ठेसावं. त्याच्या नाकाले भोक पाळूनं येसनं कशी घालावं ह्या ईचारात गजानन पळ्ळा. तीन वर्षाच्या संभ्या ले बंडीच वझ कस ऊचलनं , दिवसभर वावरात आरूचे कोंबे खात कसा नांगर-वखरं ओळनं ह्या ईचारात गजानन पळ्ळा. घरची जोळी भाळ्याची होती कुठलोग भाळ्याच्या बैलानं किस्तकाळी करावं म्हनूनसन्या मनावर गोटा ठेवूनं पाथरवटा ईकूनं त्यांनं संभ्याचं जीवघर ठेसूनं आनलं. नाकाले भोकं पाळूनं आनलं. नाक रगतानं लालभळक झालं होतं. नाकाले हयद लावल्या गेली. पायात खिव्यानं नाला ठोकल्या गेल्या. आता संभ्या लेकरातूनं मानसात आला होता. त्याचा ऊनाळपना पार गायब झाला होता. आता थो रोज बंडीले जुतूनं रोज वावरात जाये दिवसभर काम करे. फेंडीवरल्या माश्या शेपटीनं हकाले. दिवसरात गजानन संग मेहनत करे. ऊन असो हिव असो वा पावसाया थो काम करतचं राह्ये. संभ्या आपले लानपनीचे दिस गोठ्यात बसूनं आठवे. काय थे ऊनाळ जिवनं अन् काय हे आताचं जिवनं. पन् गजानन च्या घरची दलिंदरी हकालासाठी आपूनं घळीभरही थांबाचं नाह्यी. ह्या ईचारात संभ्या राह्ये. गजाच्या घामानं अन् संभ्याच्या रगतानं गजाननाकळे ईस एक्कर वावर झालं. मंग गजानन न टॅक्टर घेतला. संभ्या भाकळ म्हतारा झाला होता. आता थो फकस्त खाच्याच कामाचा राह्यंला होता. गावातला अयूब खाटिक एका रोजी गजाननच्या घरी आला. अन् म्हनते कसा.
" क्या चालू है गजानन शेठ. "गजानन बोलला...
" कुछ तो नही बावा. "
" बैल बेचते क्या. बहूत डंगरा हो गया ना. " " नही रे बाबा अयुब भाई घरके गाय का गोरा है ना. " " क्या करते बाबा डंग-या को रखके. खाने को काळ और जेमीन को भार. दस हजार दुॅगा . पटता होंगा तो बोलो. " " नही हो मेरेकू बेचनेकाच नही तो भाव कायको कर रहे बावा. मेरे गायवाळे के खुटे पेच मरेगा वो. लेकिन किसी भी किंमतपर बेचूॅगा नही मैं. " अयूब तो-यानं बोलला..." डाल फिर अचार घरकोचं. "
गजाननलेही घुस्सा आला. " हां हां मै अचारही डालूॅगा. जा बावा अब जा. "
अयूब खाटिक तनका-यानं निंगूनं गेला. गजानन न अयूब ची सारी हकीकत बायको गोकर्णा ले सांगतली. त थे म्हनते कशी ...
" ईका ना मंग संभ्याले . खुट्यावर बसूनं काय थो दुध देते काय. कामानं काजाचं दुस्मान अनाजाचं. " " अव पन् कस बोल्त तू थो आपला संभ्या हायनं. आपल्या गाईचं गोरं. लानपनी किती लाळ करो मी. " " मंग काय मरेलोग पोसता काय थ्याले. लोक बैल डंगरे झाले की ईकत नाह्यी काय कसायाले. " " अव पन् " " अव नाही ना काव नाही ना कोन्चा मनात किंतू परंतू ठेवू नोका. ऊद्याच्या ऊद्याच अयूब कसायाले ईका नाहीत शौकत खानाले ईका. आता हे जागा ही लयच अळवूनं बसलं. निरा ढो पानीचं हागते. थ्याच शेण ना सळ्याच्या कामी येत ना गव-या थापासाठी. ऊद्याच्या ऊद्या ईकूनं टाका. " गजानन रातभर ईचार करते कस् ईकू संभ्याले. पायट होते. गोर्कर्णाचं टुमनं चालू होते ईका ईका. गजानन नाईलाजानं संभ्या जौळ जाते. त्याले खरारा करते . संभ्या मालकाले पाहूनं शेपूटं हालोते. जिभीनं गजाननाले चाटते. कळब्याची पेंडी टाकते. संभ्या बसल्या बसल्या कळबा खाते. गजानन लळतचं खुट्याचा दोरं सोळते. संभ्याले ऊठोते. ओळत ओळत शौकत खान जौळ नेते. अन् म्हनते..." शौकत भाई ये बैल ईकने का है! कितना दोगे. " " छे हजार दुगा. " अरे वो अयूब तो दस हजार मे मांग के गया. " " अरे चटका दिया ऊसने. बैल के आंग पे मासखंड है क्या देखो ना गजानन भाई. मेरे पैसे तो वसूलं होने चाहिए ना. कलो सात देता हूॅ आखरी मे भाव पटता होंगा तो दो नही तो जानदो ब्वा. " शौकत खान सात हजार रूपये मोजून गजाननच्या हातावर ठुयते. गजाननचे हात थरथर कापतात. अन् शौकत म्हनते..." अरे क्या हुआ गजू भाई. हात क्यू काप रहे हो तुम्हारे. " " अरे कुछ नही ऐसे ही. " असं म्हनत गजानन काढता पाय घेते. रसत्यानं चालाले लागते. मांग पलटूनं पाह्यते त काय संभ्या मालकाले शेपटी हालवत अन् अळ्ळावत असते. बैलाच्या डोयातले आसू गजानन ले दुरूनचं दिसतात पन् थो मोठ्ठजात श्वास अंदरे घेत तथूनं निंघूनं जाते. घरी येते. गोकर्णा हासतचं नव-याच्या जौळ येते. " ईकला काय बैल. केवळ्यात गेला. बरा ईकला बापा. निरा जागा अळवूनं बसला होता. " बायकोचे बोलं आयकूनं गजाननचं डोक्स भनकते. अन् आनलेले पैसे बायकोच्या तोंडावर फेकते. " घे घे ह्या सात टीकल्या. आयुष्यभर जो संभ्या राबराबला. त्याच्या मेहनतीनं यवळा डोलारा ऊभा झाला. आज नाचूकल्या पैश्यासाठी थ्याले कसायाच्या दारात ऊभ करन्यात आलं. खाय थो पैसा आता. " असं म्हनत म्हनत गजानन ऊपाशीचं झपी जाते. गजाननले गार झोप लागते अन् मंग सपनात संभ्या येते अन् गजानन संग बोलाले लागते.
" काय गजानन शेठ कसे हा. मस्त माळी बांधली ब्वा. कनग्या, पेवायचे पोटही टच्च भरेल भुगीरले हायेत. आंगनात दोन दोनं टॅक्टर ऊबे हायेत. गावात मानपानं हायं. बायकोच्या आंगावर लदबद सोनं हायं. पिंटीले मोठ्ठाजात हुंडा देवूनसन्या शीरीमंत सोयरा केला बापा. खापराच्या तासकित जेवनारा बापा चांदीच्या तासकित जेवते अन् देव त बापा देव्हा-यात सोन्याचे हायेत. पयले शिदोरीत भाकरं ना सापळे आता रोजचं तयनं असते बावा. तुले फिराले फटफटी ही हायं. दोनदोनशे किंटल कापूस होते बावा तुले. पन् तू मले पार ईसरला. पैश्याची काय कमी होती तुले तरी दोन पैश्यासाठी मले त्वा खाटकाच्या खुट्याले तंगळ्ळलं. वा रे वा. लय बेस केलं गळ्या. पन् एक सांगू काय. कुतरं अन् बैल हे यवळे ईमानदार असतेत की मालकासाठी जीव ही देवू शकतेत. म्या तुयावर लय जीव लावला होता गळ्या. तुया पायात काटा जरी गेला तरी त्याचं दुखू मले होये. तुह्या घाम निंगतांना पाहूनं माह्या जीव कासावीस होये. त्वाल्या घरची दलिंदरी पाहूनं मी जोमानं वखर, नांगर, डवरे, डुब्बे ओळो. पन् आज त्वा मले खाटकाच्या खुट्याले बांधल. तुले रोज पाहूनं मी जगो रे गजानना . मले काह्यीच नाही पायजे. फकस्त तू रोज डोयानं दिसो हेच ईच्छा होती म्हायी. पन् जावू दे आता काय फायदा. बरं एक काम करजो. माह्या कातयाचे जोळे तरी बनवून घालजो. त्या मिसानं तुह्या जौळ तरी राह्यनं मी. बरं ठिक हायं सुखानं संसार कर. सदाई सुखात राह्यं. माह्या आशीरवाद सदाई त्वाल्या पाठीशी हायं. " गजानन सपनातून खळकन जागा होतं अळ्ळावते...." संभ्या ऽऽऽऽ " गोकर्णा जागी होते. " काय झालं हो सपन बिपनं पाह्यलं काय?" गजानन एक शबूद बोलतं नाही. रसत्यानं शौकत खानच्या घराच्या रसत्यानं धावत सुटते मनात एकचं ईचार गुंगत असते की संभ्या जीता असनं की मेला असनं...धावत पयत शौकत च्या फाटकी जौळ येते. जोरजो-यात फाटकी वाजोते..." शौकत भाई ओ ऽऽऽ शौकत भाई. " असा जोरजो-यात अवाज लगावते. शौकत डोये पुसत घराबाहेर येते. " कौन है इतनी रात को रे बावा. " गजानन दम टाकत म्हनते. " मै हू गजानन तांबळे शौकत भाई. मेरा बैल जिंदा है ना. " शौकत म्हनते.." अरे तुने बेचा ना अब जिंदा है क्या और काट दिया क्या तेरेकू क्या फरक गीरता गजानन भाई. " " किधर है मेरा बैल मेरेकू दिखावो शौकत भाई. " शौकत म्हनते..." चल आ दिखाता हू तेरा बैल चल आ. " गजानन धावतच शौकतच्या कसायखान्याकळे जाते. पायते त काय संभ्याचं मुंडक धळापासूनं अल्लग अन् डोये खुले ......
- सु. पुं.अढाऊकर.
अकोला.
९७६९२०२५९७
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.