नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
चल, उठ गड्या आता,
सोडून दे कुढणं !
याच्या त्याच्या पायावर,
डोकं ठेवून रडणं !!
रडून तुझा फायदा होईल,
खरंच तुला वाटते?
चिलखती, दगड धोंड्यांना,
कुठं रे पाझर फुटते?
तुझ्या कितीक पिढ्यांनी,
सोसल्यात इथे कळा !
रक्त,घाम आटवून त्यांचा,
गहाण राहिला मळा !!
माणुसकीच्या नात्यास इथं,
अर्थ कुठंय उरला?
बेईमानी व्यवस्थेनं सदाच,
इमानदार पुरला !!
हात जोडून मिळत नसते,
बाबा, जिंकायला शिक!
घामातून पिकविलेलं आता,
मालक होऊन विक !!
कुणब्याच्या पिकावर मस्त,
गब्बर झाले दलाल !
या लूटारू व्यवस्थेनं फक्त,
तुलाच केले हलाल !!
कुणालाच सोडवता येईना,
तुझ्या दारिद्र्याचे कोडे !
अख्खे आयुष्य झीजवूनही'
तुझ्याच नशिबी धोंडे !!
मंगळावरच्या जीवसृष्टीचा,
फारच त्यांना लळा !
धरित्रीच्या लेकरांच्या मात्र,
का समजू नये कळा?
पोशिंदाच लटकवून मेला,
कोण लावणार छडा?
या लुटारू यंत्रणेला आता
'तूच शिकव धडा' !!
- प्रा संजय कावरे
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने