नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कथा
व्यवस्थेचा बळी
शालीकराम धोटे हा कोरडवाहू शेतकरी.आता मात्र वयमानानुसार थकला होता. आजारपणात जीवनसंगीनी सोडून गेल्याने त्याचं मन कायच्यातच लागाचं नाई.त्याले तीन लेकरं होते.मोठा शामराव दुसरा मोतीराम व मुलगी मीरा.मीरा लग्न होऊन नांदाले गेली होती.दोन्ही पोरयचे लग्न लावून देलले होते. मोठा पोरगा शामराव व सुनबाई कांता दोघही समझदार होते. लायण्या मोतीरामची बायको अलका थोडी हट्टी होती, पण मोठा मुलगा व सून घर संभाळून नेईन याची शालीकरामले खात्री होती.एक दिवस शालीकरामनं दोन्ही पोरयले बलावलं अनं सांगतलं पोरयहो आतापर्यंत म्या कास्तकारी सांभाळली.येच्यापुढं मले काही काम होणार नाई. मोतीराम,शामराव तुम्ही एकमेकाच्या सल्ल्यानं शेत संभाळा. दोघयनही माना डोलवल्या.दोघही वावरात खूप मेहनत कराचे.वावरही चांगलं पिकत होतं.खर्चपणी जाऊन चार पैसे उरत होते;पण लायण्या मोतीरामच्या बायकोनं कुरापती कराले सुरवात केली.त्यामुळं दोघाभावात मतभेद व्हाले लागले. लायण्यानं हिस्सा मांगतला. शामरावनं वादविवाद न करता त्याले हिस्सा देऊन टाकला.आता दोघं भाऊ वेगवेगळे शेती करत होते.मोतीराम बायकोच्या मताचा असल्यानं त्यानं थोड्याच दिवसात वावर इकलं.शामराव व त्याची बायको मात्र रात्रंदिवस वावरात कष्ट कराचे.वावरातलं उत्पन्न वाढाले लागलं तसं त्यानं वावरात हिर खांदली,हिरीले चांगलं पाणी लागलं.नवीन मोटरपंप बसवला,कोरडवाहू वावर आता ओलताखाली आलं. तेच्यात शामराव व कांता यांना देवकी,नमा व संजय नावाचा मुलगा झाला.त्यांचं कुटूंब खाऊन पिऊन सुखी होतं.शामराव व कांता बैठकीत बसले होते.लेकरं तयारी करून शाळेत गेले. तुले एक सांगू कांता, "सांगाना" "आपल्याले गरीबीमुळं शाळा शिकता आली नाही,पण आता लेकरयले खूप शिकवाचं.आपले लेकरबी हुशार हाये.तेयले काहीच कमी पडू द्याच नाही." "बिलकूल मह्या मनातलं बोलले तुम्ही,मी ही दुप्पट कष्ट करनं तुमच्या साथीनं." कांता बोलली.हिरीले पाण्याचा चांगला आवक होता.जून महिना आला. काये काये ढग अभायात फिराले लागले. पावसायाले सुरवात झाली.जमीनीच्या पोटातून हिरवे हिरवे कोंब डोकावाले लागले होते.एक दिवस सकाई सकाई वावरातून चक्कर मारून आल्यावर,शामरावनं कांताले आंगणातूनच आवाज देलला."कांते ओऽऽ कांते,"कांता लगबगीनं बाहेर आली."काय म्हणता ओ? "थो मह्या दुपट्टा घे बरं" कांता बोलली,"का ओ? मी मनतो कुठं जाचं हाये एवढ्या घईनं?"अवं कांते,"तुले म्हटलं होतं ना या वर्षी संत्राचे झाडं बसवाचे म्हणून वावरात.थो देशमुखाचा गजा चालला त्याच्या बरोबर जाऊन संत्राची पनिरी घेऊन येतो शेघाटहून".कांतान आणलेला दुपट्टा खांदावर टाकून शामराव पनिरी आणाला निघून गेला.मजूर लावून संत्रा लागवड पूर्ण करून घेतली.कापसाची वखरनी,ज्वारीची डवरणी, हे कामं शामराव स्वतः कायजीनं करत होता.कांताबी वावरात निंदन, खुरपण करत होती.पीकपाणी चांगलं होत असल्यानं सारं आनंदात चाललं होतं.शामराव तसा माणुसकीचा माणुस अडीअडचणीत थो दुसरेयले मदत कराचा.कोणीही गोरगरीब अडचण घेऊन दारात आला का चार- दोन पायल्या समोरच्याच्या पदरात टाकाचा,आपल्या भावाच्या संसाराले मदत कराचा, वावरातल्या तुरीच्या शेंगा,चार दोन चन्याचे डाखोये नेणार्याले कवाच हटकाचा नाई. कवाकवा बायको त्याले म्हणाची, "कावो आपण दिवस रात्र कष्ट करतो अनं तुम्ही असे वाटत फिरता." शामराव म्हणाचा, "कांते म्या लहानपणा पासून खूप अडचण सोसली हाये. आता आपल्याले देवानं पदरी धरलं, शेर पसा कोणाले देलल्यानं कमी होत नाई". कांतीबी बिचारी काय बोलणार चुपचाप राहाची. संत्राचा बगीचा आता येता झाला होता.पयल्याच वर्षी सपाटून फुटल्यानं शामरावचं स्लॅबचं घर उभं रायलं होतं.शामराव त्याच्या वडीलाची म्हणजे शालीकरामचीही मनोभावे सेवा कराचा.मोठमोठ्या दवाखान्यात त्याले दाखवलं पण अराम पडत नव्हता.डॉक्टरन सांगतलं, "यांना आता घरी घेऊन जा,यांची शेवटची घडी जवळ आली आहे". दुसऱ्याच दिवशी शालीकरामनं जगाचा निरोप घेतला.शामरावनं भावाले संग घेऊन साऱ्या विधी पार पाडल्या.
दरवर्षी बगीचा येत होता, पण शामराव व कांताच्या मेहनतीत कवाच खंड पडला नाई.एक दिवस शामरावचा लहानपणीचा मित्र रविंद्र सोनारे घरी आला.ज्याचा शहरात व्यवसायात चांगला जम बसला होता.त्याले समोर पाहून शामरावाले खूप आनंद झाला.लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या."बरं इकडे कसा काय आलास एवढ्या दिवसानं?" रविंद्र बोलला, "अरे तुही आठवण येत होती,पण वेळच मिळत नव्हता.आता पोरगं धंदा सांभाळते चाला म्हटलं तुही भेट घ्या." "बरं झालं आला.मलेतं राजा ह्या कास्तकारीमुळं वेळच भेटत नाई." शामराव बोलला. कांतानं रविद्रासाठी पाहुणचार केला,आग्रहानं वाढलं, व बोलली,"पोटभर जेवा बापा भवजी.नईतं म्हणान वहिणीनं उपाशीच ठेवलं." "नाई ओ वहिनी मले हे घर परकं थोडीच हाये". रविंद्र बोलला.जेवण झालं तसं रविंद्रनं विचारलं "लेकरं काय करते शामराव?" शामराव उद्गारला,"ही मोठी शांती ईचं बी.ई सुरु आहे,दुसरी नमी बारावीत तर ह्या संज्या नववीत शिकते. "काहीबी मन राजा शामराव खेड्यात राहून त्याबी चांगलाच जम बसवला अनं लेकरयले वयण बी चांगलं लावलं." रविद्र बोलला."सारी थ्या ईश्वराची कृपा". शामरावच्या तोंडून उद्गार निघाले.भेटीने दोघांनाही समाधान वाटले. गावाकडे येण्याचं निमंत्रण देऊन रविंद्रने शामरावचा निरोप घेतला.
शामरावनं वावरात गहू टाकला होता. गव्हाले पाणी ओलाचं होतं,अनं दुसरे काही कामं सलटवाचे होते. शामरावनं नमीले आवाज देलला, "नमाऽ ओऽ पोरी" नमा धावतच आली. "काय म्हणता बाबा"? "मह्या थो अवजाराचा थैला आण बरं." नमानं थैला आणून देलला. "अनं मायले मना लवकर शिदोरी घेऊन ये जो." "हो बाबा सांगतो." शामराव रस्त्यान होता. गणपत कराळे आपल्या वावरात वखर वाहत होता.शामरावनं आवाज देलला,"ओऽ गणपतराव,आज सकाई सकाई वावरात.जोर्यावर दिसते बा काम." "कायचं राजा शामराव भऊ. तुह्य काम मोठं हाये राजा.तुह्या गहू पार जमीनीच्या वरतं आला.आणं आमची आता कुठं पेरणीची तयारी सुरु हाये. येणं गा अंदरऽऽ का रस्त्यावरूनच बोलशीन.घे पाणी गीनी पे".गणपत बोलला. तंबाखाले चुना लावत, पिकापाण्याच्या गोष्टी करत दोघं जण बसले.वेळ होते म्हणून शामरावनं गणपतचा निरोप घेतला.आता शामराव वावराकडे निघाला.मोटर सुरु केली.पाचची मोटर असल्यानं पाणी दांडानं सुसाट पयत होतं.शामराव सपासप दारे फोडत होता.थोड्या वेळानं त्याची बायको कांती शिदोरी घेऊन आली.तिनं
शामरावले आवाज देलला,"यावं हातपाय धुआ,अनं पोटात चार घास टाका.भूक लागली असन. सकईस पासून काम करून रायले".बायकोचं बोलणं आयकून शामरावनं पाच- सहा वाफ्यात पाणी लावलं आण हातपाय धुतले व जेवाले बसला. बायकोनं तेच्यासाठी एका वाफ्यातली मेथी व मिरची तोडून आणली.शामराव पोटभरून समाधानानं जेवला. कांतानं शामरावले पान बनवून देललं.शामरावनं ते तोंडात कोंबल.कांता शामरावकडे पाहात बोलली,"कावं मागच्या तीन वर्षे बगीच्यानं साथ देलली.आपलं घरही झालं व थो आपण बाजूचा दोन एकरचा तुकडाबी घेतला.मी काय मनतो,थ्या तुकड्यात चना टाकलातं." "मी बी थोच इचार करून रायलो होतो.किती मनकवळी हाये ओ तू"असं म्हणून शामराव खो खो हासाले लागला. "जा माय मी नाई बोलणार तुमच्यासंग,तुमी कवाबी माही टिंगलच उडवता." "नाई ओ मये सोने,मी खरचं बोलतो.आपल्या हिरव्यागार गव्हात हिरवा शालू नेसलेली तू, किती शोभून दिसतेस! माहीत हाये." कांतीबी लाजली. "अंऽअंऽअं लाजली." कांताबी पदर आडवा करून हासली."तुमीबीना वय सोय झालं तरी तुमची पोरकट सवय काई जात नाई." अशी हासीमजाक करून ते आपापल्या कामावर लागले.
संध्याकाळी शामराव व कांता आपले काम करून घरी आले. शामरावनं आवाज देलला, "शांता,नमे ओऽपोरी आणवं हातपाय धुवाले पाणी".नमा धावतच पाणी घेऊन आली.त्या दोघांनीही हातपाय धुतले.तोच शेजारची गंगुबूडी आंगणात आली."तुह्या पोरी मोठ्या कामाच्या हाये माय कांते.कवा रिकाम्या नाई बसत.भांडेकुंडे घासणं,धुणंपाणी, झाडझुड काहीनं काही सदा करतच रायते. नशीबवान आहे माय तू".अशी गंगुबूडी बोलली."याना ओ आत्याबाई घरात." गंगुबूडी त्या दोघांसोबत घरात आली व भितीले टेकून पालकट मांडून बसली.उल्यावर भाजी रटरट शिजत होती.शांती पोया लाटत होती व नमा शेकत होती.गंगुबूडी पुन्हा बोलली,"मोठ्या गुणाच्या हायेवं पोरीओ,ज्याबी घरी जाण त्या घराचं स्वर्ग करान". गंगूबुडीचे शब्द आयकून पोरी थोड्या लाजल्या. "ओ पोट्टेऽऽशांते," काय ओ माय?" आजीसाठी थोडा चहा ठेव बरं, तुहे बाबा अनं मी बी घिन थोडा थोडा".पलंगावर बसलेला शामराव म्हणाला,"का ओ पोरीहो, थो संज्या कुठं हाये?" नमीनं उत्तर देललं "बाबा थो खेलत असन तेच्या दोस्तयसंग गल्लीत.नुसता कानात वारा शिरलेल्या वासरा सारखा पयत रायते गावभर". " काऊन त्याले अभ्यास गिब्यास नाई काय?" शामराव बोलला."थो आमचं आयकतच नाई बाबा. धरून आणाले गेलं का लोयन घेते."शांतान पुष्टी केली."जाऊ द्या पोरी हो त्याचं खेला कुदाचं वयच हाये.मी समजावून सांगतो त्याले". शामराव बोलले.चहा पान घेऊन गंगुबूडीन रजा घेतली.
पोरीयले चांगले स्थळ चालून येत होते,पण शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय लग्न कराचं नाई असं शामरावनं ठरवलं होतं. पायता पायता तीन वर्षे निघून गेले,पण हे तीन वर्षे मोठे बाणीचे होते.ह्या काळात पोट भरणं कठीन हून बसलं होतं.हिरीचं पाणी बुडाले गेलं होतं. दुष्काळामुळं जमिनीतच पाणी नाही,तर मग हिरीत कुठून रईन. दहा हात दगड फोडला, आडवे, उभे बोर मारले तरी काई फायदा झाला नाई.कांताबाईच्या आंगावरचं सोनंणानं पार गेलं. घरातला होता नव्हता तो पैसा वावरात ओतला,पण आता निसर्गच कोपला तर न्याय कोणाजवळ मागावं.शामराव नुसता गोंधयुन गेला होता. बाहेरून चक्कर मारून आला व शामराव कांता जवळ जाऊन बसला.त्यानं वर आड्याकडं पायलं,पुन्हा कांताकडे नजर वळवली.कांताचा हात आपल्या हातात धरून म्हणाला, "कांते मी तुह्या दोषी हाये.मी तुले पार लंकेची पार्वती करून ठेवली. लागलंत तू मले बोल,शिव्या दे . मी नाई सावरू शकलो कांते संसाराले." "सावरा तुम्ही सोताले. तुम्ही जे केलं थे घरासाठीच केलं. यश-अपयश येतच रायते तेच्यात तुमचा काय दोष?" कांतान धीर देलला.पावसाया सुरु झाला चौथं वर्ष होतं.मागच्या वर्षी घेतलेली सोसायटी भरली नव्हती.तरी सायबाच्या विनवण्या करून कसतरी शामरावनं कर्ज मिळवलं. पेरणी झाली.दोन पाण्यावर पेरणी केली.पुन्हा मयनाभर पाणी आलच नाई. उगयलं होतं थे सारं पीक जयून गेलं.दुसऱ्यांदा पेरणीसाठी पैसा नाई.खात बियाण्याचे भाव कमी व्हाले पायजे थे उलट वाढले. "एवढ्या वेळेसच द्या पुढच्या वेळेस सारे पैसे देऊन टाकतो." हातापाया पडून कसतरी शामरावनं बियाणं मिळवलं.
अर्धे झाडं बसले होते.आतापर्यंत टँकरनं पाणी टाकलं होतं,पण आज दोन सांजच्या भाकरीचे वांदे झाले होते,मग त्या झाडयले कुठून पाणी टाकाचं.शामराव वावरात गेला,एका जागी मटकन बसला, अभायाकडे डोळे लावून पाहत. कांती मागोमाग आली होती.तिनं शामरावच्या खांदावर हात ठेवून म्हणाली,"अवं नका कायजी करू सारं ठिक हुईन.मी हाये तुमच्या संग.लागल्यास दगडं फोडून पोट भरू." "अवं कांते मले मईत हाये ओ तू सदा मह्या सोबत हाये. थ्या जोरावरतं म्या हे सारं उभं केलं होतं,पण तू म्हणतं कायजी करू नका.तर मग काय करू मी." शामराव भावनिक होऊन बोलाले लागला, "एवढया मेहनतीनं लावलेले झाडं कडब्यासारखे वायून चालले.मी पाहून रायलो हतबल होऊन.रानातलं पीक गेलं. कर्जहून बसलं.दोनी पोरी लग्नाले आल्या.तू म्हणतं कायजी नका करू.मग काय करू मी". कांताच्या मांडीवर डोक्स ठेवून रडून त्यानं मन मोकयं केलं. त्याचे मित्र गणपत कराळे,शंकऱ सिरसाट यायचेबी हाल त्याच्याच सारखे होते.थे तरी कुठून मदत करणार. "काय करावं बाई? सरकारी मदतबी मिळत नाई. आता आपलं अभायच फाटलं तर टाके तरी कुठं कुठं मारावे माणसानं." कांती बोलली.
"काहीही असलं तरी शांत बसून जमणार नाई." त्याच्या चेहर्यावर एकाएकी चमक आली."एकच माणुस आपली मदत करू शकते.हिरामण सेठ" शामराव पुटपुटला."राम राम हिरामण सेठ" "राम राम शामराव" हिरामण सेठ म्हणाले,"आज कशी काय वाट चुकाली म्हणावं शामरावांची" "सेठ मले पैशाचं काम होतं." सेठ म्हणाले,"बोलनं शामराव किती पायजे." शामराव म्हणाला,"पाच लाख रुपये." "काय?पाच लाख रुपये. काय बोलतं राजा शामराव. एवढे पैसे,अरे तुलेतं मईत हाये. यंदाच साल कसं हाय थे.अशा सालाले कोण दरवाजात उभं करते महाराजा." असं बोलू नका सेठ.मह्या बगीचा वायला मनजे मले तोंड लपवाले जागा रायणार नाई. "तुयं खरं हाय बाबा,पण मी तुले एवढे पैसे कायच्या भरोशावर देऊ.तुह्याजवळ काई सोनंनाणं हाय काय?" नाई सेठ. मग काय हाय तुह्या जवळ?माह्य वावर. शामरावचा हुंदका दाटून आला. ठीक आहे शामराव माहेवाले काई नियम हाये.तुले मंजुर असनतं पाय.आपली काई कोणाले जोर जबरदस्ती नाई. मले मंजुर हाये सेठ.पण मले पैसे द्या.मग आईक शामराव.तुले मह्या नावानं वावराची रजिस्टरी करून द्या लागन. रकमेचं व्याज पाच रुपये शेकडा.त्या पैसे देलले का वावर तुह्या नावानं.तीन वर्षात पैसे वापस देलले नाई का वावरावर मह्या कब्जा हुईन.मंजुर असनतं स्टॅम्पवर सहया कर नईतं तुही मर्जी.शामरावचं डोक्स चकरावाले लागलं होतं,पण काई पर्यायही नव्हता.वावराच्या बदल्यात पाच लाख रुपये घेऊन तो निघाला. मनात दुःख असलं तरी त्याले हिम्मत आली.पैसे घेऊन थो घरी आला.घडलेली हकीकत त्यानं कांतीले सांगतली.कांतानं धीर देलला,"आता नका कायजी करू. सारं ठीक होईल."
सुखा समाधानात वाढलेल्या लेकरयच्या आंगावर आज नीट कपडा नाई.शामरावनं थोडी मरगळ झटकली.लेकरयले नवीन कपडे आणले.चांगलंचुंगल खाले आणलं.शामराव घरी येऊन भितीच्या टेक्यानं बसला व चिंतेच्या सुरात बोलला, "कांते" बोलाना,"मी आता शेवटचा जुआ खेलणार हाये.जीतलोतं जीवन .. नाहीत ..." कांतीनं पटकन शामरावच्या तोंडावर हात ठेवला. असं काही बोलू नका. "करणार तरी काय हाये तुम्ही?" मी वावरात बोर पाडणार हाय.पाणी लागलंत एका बारावर सावकाराचं देणं फिटण अनं शांता व देवकीचं लग्नबी पार पडण. कांतानं देवाले हात जोडले."देवा मालकाच्या मनासारखं होऊ दे." तिच्या डोयात टचकन पाणी आलं.तिनं डोयाले पदर लावला. शामरावनं बोर पाडाले सुरुवात केली.एका मागून एक चारही कोनट्यात बोर पाडले,पण धुळल्याशिवाय काईच हाती लागलं नाई.पैसा निघून गेला.आता मात्र शामरावनं हाय खाल्ली. झोपीतही माह्य वावर माह्य वावर म्हणून बरळत होता. वाळलेल्या झाडाच्या रुपात करपलेल्या आपल्या स्वप्नाकडे पाहत होता. त्याची नजर फाकली होती. तो कोणासंगं बोलाच्या मनःस्थितीत नव्हता.तेवढयात सावकार दरवाजात अवतरला. प्रसंगाचं गांभीर्य ओळखून कांता पुढं झाली. कांता म्हणाली,"दादा आमाले थोडी मोहलत द्या". सावकार तंबी देऊन गेला. लवकर व्याजाच्या पैशाचं काय ते बघा.
शामराव अंगांचं गाठोडं करून बसला. कांतानं आवाज देलला अवो, तेव्हा त्याची तंदरी तुटली.कांताबाई म्हणाली,"मी काय म्हणत होती.आपल्या आमदार साहेबाले एखादं निवेदन देवून पहा.तेयनं मागच्या निवडणूकीत शब्द देलला होता. सरकारात द्या एखादा अर्ज. एखादी बॅक कर्ज देत असनतं पहा. सावकाराचं कर्ज फिटलतं वावर तरी रईन. शांती व देवकीच्या लग्नासाठी पावणेयले काई मोहलत मांगता येईन." कांती म्हणते म्हटल्यावर तसा एक प्रयत्न कराले काय हरकत हाये. असं म्हणून शामराव उठला. त्यानं अंगात कमीज चढवला, पायात चपला घातल्या व बॅकेत गेला.सर्व बॅका फिरून झाल्या पण कोणत्याच बॅकेनं खेड्यातल्या घरावर तेवढं कर्ज देण्यास होकार देलला नाई. बॅकेच्या सायबानं सांगतलं. "हे पहा शामराव तुमच्या जवळ घराचा नकाशा नाही.तुमचं घर सरकारी जागेवर आहे.सबब तुम्हाला कर्ज देता येणार नाही." शामराव काकुळतीनं बोलला, "साहेब माह्य घर पक्क आहे.नईतं तुमी चालून पहा." "हे पहा शामराव हे कागदच काय ते सांगतात. मला येऊन पाहण्याची गरज नाही. माफ करा. बँक तुम्हाला कर्ज मंजूर करू शकत नाही." शामरावनं मंत्रालयात अर्ज देलला होता. पी. ए ने शामरावला आमदार सायबापर्यंत पोहचू देललं नाई. सायेब दौर्यावर हाये, मिटिंगमधी हाये असे बायणे केले. शामराव कंटाळला.जे समजाचं थे तो समजला.विमनस्क मनस्थितीत थो घरी आला. कांतानं काय थे चेहर्यावरूनच ओयखलं.कांता बोलली,"या बसा,पाणी घ्या,भूक लागली असन थोडं जेवून घ्या." नाही कांता मले भूक नाई. हे पहा असं करू नका "तुमी असे वागलेतं आमी कोणाच्या तोडाकडे पहाव. चार घास खावून घ्या. तुमाले मह्या गयाची आण हाये." कांता बोलली. शामरावानं कोरभर भाकर पाण्याच्या घुटानं कशीतरी पोटात धकावली. त्यानं तोंडाचा पट्टा सुरु केला."काडी लावली ह्या व्यवस्थेले.आमच्या सारख्या ईमानदार,मेहनती माणसयले कोणी रुपया मारून फेकत नाई. तडफडून मेले तरी. तिकडे उद्योगपती मात्र कोटीनं रुपये घेऊन पयते.तवा नाई बुडत देश. वारे दुनिया,अरे आम्ही परत कराले तयार असुन कोणी फुटकी कवडी मारून फेकाले तयार नाई. मी कुठं पयून चाललो होतो काय?हे देवा हे जगच बईमानयचं हाये. ईमानदार माणसयले इथं न्याय नाई? पैसा फेक तमाशा देख असचं सारं चालू हाये" असं बोलत बोलत त्याचं भान गेलं. तिकडून पावणेयचा निरोप आला. बोलीबांदी प्रमाणं सारं असनतं लग्न हुईन. सकाई दिवस निघाल्यावर कांतानं पावण्याचा निरोप शामरावले सांगतला. शामराव बोलला,"अडल्या नडल्या माणसाची गरज भागवणारा, घरापर्यत आलेल्या माणसाची झोई भरून त्याले हासत पाठवणारा,ह्या हातानं आयुष्यभर कित्येकांना दान केलं,आणि आज तेच हात इतरांसमोर पसरण्याची वेळ आली.आज भीक मांगतली तरी हातात रुपया टाकाले कोणी तयार नाई,वा रे दुनियेचा न्याय". खरं तर शामराव पिसाळल्या सारखा झाला होता. थो एकटाच जोरानं बोलत होता "पिकलंत पिकाले भाव नाई भेटत. स्वतःच्या मालाची किंमत ठरवता येत नाई.सरकारानं केली मदत थे फरायले पुरत नाई.कास्तकार खरच उपरा ठरला हाये. सारेयले स्वातंत्र्य भेटलं,पण त्याले काही स्वातंत्र्य भेटलच नाई. बळीराजा बळीराजा म्हणून त्याचा रोज बळी घेणं चालू हाये". शेतकरी पोशींदा म्हणे,थोच उपाशी. विवश हाये मरण कवटाळाले. तुम्ही तयारच पुन्हा राजकरण कराले शेतकऱ्याविषयी पुळका असल्याचं दाखवाले.कवा बदलण रे बापा हे व्यवस्था. का असेच जात रईन बळी एकापाठोपाठ एक.जाऊ दे रे तुह्या बरळण्यानं काहीच होणार नाई. बयरे झाले सारे.आपल्या मरणानं कोणाले काई फरक नाई पडत.जाऊ दे काई फायदा नाई." शामराव थोडा भानावर आला.
शामराव आता कोणाचसंगं बोलाचा नाई.थो वेगळ्याच विश्वात राहात होता. हासणं, बोलणं,आनंदी रायणं हे थो विसरला होता.ह्या जगात आपलं कोणी नसल्या सारखं थो वागाचा. कांता शामरावाले म्हणाली, "अवो जे झालं ते झालं.आपण नव्यानं सुरवात करू.इथून दूर निघून जाऊ,कष्ट करू.तुम्ही कायजी करू नका." "हो बाबा आम्हीबी कामं करू" लेकरं म्हणाले लागले. नाही रे पाखरांनो तुमचा बाप आणखी जीवंत हाये.हे गाव आपलं,इथचं आपण काई करू शकलो नाई. बाहेरच्या जगात आपलं काय हाये. "तुमी असं बोलू नका. जाईल हे ही दिवस". कांता बोलली. चला आता जेवण करून घ्या. कसतरी वाकडं तिकडं तोंड करून त्यानं कोर कुटका खाल्ला,पण आज त्याले झोप लागली नाई. "बस..खूप झालं.आजची रात्र शेवटची. त्यानं तयार केलेल्या फायली टराटर फाडल्या.एकदा पोरींच्या व पोराच्या पायाशी गेला. मले माफ करा पाखरांनो.तुमचा बाप आज हारला.सपशेल हारला. कांते मले नेहमी साथ देलली.बस आपली साथ इथपर्यतच होती. आता नाई सोसवत मले.मले माईत हाये तुले एकटीले पुढचा प्रवास कठीन असन.पण मले सर्वजण माफ करा". असं मनोमन म्हणाला.हळूच दरवाजा उघडला व निघाला वावराच्या रस्त्यानं झपाझप पावलं टाकतं अनवाणी पायानं. काटे गोटे तुडवत,अंगात वारं शिरावं तसा पळत.एकदा शेतमाऊलीच्या पाया पडला,अनं लटकला झाडाले.कधी काळी ज्या झाडाखाली बसून सुखद भविष्याचे स्वप्न त्याने पाहिले होते.आज त्याच झाडाच्या कवेत त्याने जीव सोडला.
कांताले जवा हे समजलं तवा तिच्या पायाखालची जमीनच सरकली.ज्या खांबावर घराचं आडं उभं होतं तो खांबच आज निखडून पडला होता. तिनं रडून रडून आकांत केला. हात आपटून आपटून काच हातात घुसल्यानं तिचे हात रक्तबंबाळ झाले. लेकरही हंबरडा फोडत होते.
एखादं वादळ यावं आणि सारं संपावं असच झालं होतं.शासन, प्रशासन, आमदार,विरोधी पक्ष नेते सारे येत होते. मदतीचं आश्वासन देत होते. कांताले खूप राग आला ती त्वेषाने बोलली, "नाई पायजे मले तुमची मदत. जवा मह्या नवरा झोई फैलावत होता.मदतीच्या आशेनं कचेऱ्या, बॅकायचे उंबरे झिजवत होता,तवा नाई केली कोण मदत.तुमच्या व्यवस्थेनं मह्या नवऱ्याचा जीव घेतला.मह्या नवऱ्याच्या मरणाची किंमत म्हणजे तुमची मदत असनतं नाई पायजे मले अशी मदत.चालते व्हा. रडत रडतच कांता चक्कर येऊन कोसळली.
लेखक
लक्ष्मण लाड
मु.पो बेनोडा ता. वरूड
जि. अमरावती
मो.९८५०५६९१३२
Email-laxmanlad76@gmail.com