नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कर्ज विळख्यातला शेतकरी !!
आजकाल शेतकरी म्हटलं की लागलीच त्याला लागून मनामध्ये शब्द उमटतो तो म्हणजे कर्ज ! शेतकरी आणि कर्ज यांचा इतका संबंध दृढ होत चालला आहे की कर्ज हे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजले आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसते. माझ्या दृष्टीकोनातून शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकण्याची जी अनेक कारणे आहेत त्यामध्ये एक कारण हेही असावे की सध्याचा शेतकरी पारंपारिक शेतीपासुन दूरावलेला दिसतो.
कालचा शेतकरी आणि आजचा शेतकरी यांचा जेंव्हा मी तौलनिक अभ्यास करतो तेंव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती ही की आजचा शेतकरी जरी तुलनात्मक जास्त उत्पन्न घेत असला तरी आजच्या शेतकऱ्यांची ऊर्जेची मागणी ही भूतकाळातील शेतकऱ्यांपेक्षा वाढलेली आहे.आजचा शेतकरी हा पारंपारिक शेतीपासून दुरावला. जसजसा काळ पुढे सरत गेला तसतशी सर्वच क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाची प्रगती होतं गेली.शेती क्षेत्रातदेखील विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये क्रांती झाली. तंत्रज्ञानाचा मूळ उद्देशच मानवाचे कष्ट कमी करणे आणि त्याचे जीवन सुसह्य बनवणे हे आहे. पारंपारिक शेती मध्ये क्रित्येक कामासाठी शेतकऱ्याला कष्ट करावे लागायचे त्याऐवजी शेतकऱ्यांची तीच कामे आता यंत्र करू लागली. अगदी काही वर्षापूर्वी शेतीला पाणी पाजण्याचे काम असो त्यासाठी विहिरीवर बैलजोडीच्या सहाय्याने चालणाऱ्या मोटीचा वापर शेतकरी करायचा. पण आज त्याचं मोटेची जागा आता मोटर ने घेतली आहे. मोटरने शेतकऱ्यांचे कष्ट कमी केले पण त्यांची विद्युत ऊर्जेची सवय वाढवली आणि मागणीही वाढवली. पूर्वमशागतीची खूपशी कामे जसे की नांगरट कुळवणी पेरणी कोळपण इत्यादी जी स्वतः शेतकरी मनुष्यबळ किंवा गोवंश याच्या सहाय्याने करत होता त्यासाठी आता घातक तणनाशक तसेच ट्रक्टर चा वापर करू लागला. ट्रक्टर ने शेतकऱ्यांचे कष्ट खूप कमी केले पण ट्रक्टर घेण्यासाठी शेतकरी बँकेच्या दारात हेलपाटे मारू लागला. एक नवी बाजारपेठ उपलब्ध झाल्याचे बघून वाहन उद्योग तसेच बँका यांनी परस्पर सामंजस्याने शेतकऱ्यांचे सातबारावर बोजा चढवून भरमसाठ व्याजाने अर्थसहाय्य उपलब्ध केले. शेतकरी कष्ट विसरला आणि यंत्रावरती अवलंबून राहू लागला. शेतामध्ये ट्रक्टर उभा राहिला तर व्याज वाढवू लागला आणि चालला तर तो प्रदूषण वाढवू लागला. एकंदरीतच पारंपारिक शेतीमधील कष्ट कमी झाले पण ऊर्जेची आवश्यकता वाढली आणि या ऊर्जेच्या वापरामुळे प्रदूषनाची नवीनच समस्या निर्माण झाली. फक्त एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित सुध्दा बिघडले. आणि शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकला स्वतः कष्ट करायची सवय मोडल्यामुळे शेतकरी ज्यांच्याकडे अशी यंत्रे आहेत त्यांना पैसे देवून त्यांची वाट पहात बसू लागला. मनुष्यबळाचा वापर करून भांगलण करण्याऐवजी तो विषारी तणनाशकाचा मारा करू लागला त्यामुळे जमिनीतून जिवाणूची संख्या कमी झाली आणि जमीन नापीक होऊन त्याचा मानवाच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ लागला.
सद्यस्थितीत आधुनिक यांत्रिकीकरणापासून पारंपारिक शेतीकडे वळणे शेतकऱ्यांना अवघड जाणार आहे पण सध्या लागणाऱ्या ऊर्जेबाबत मात्र अजूनही शेतकरी विचार करू शकतो. पारंपारिक ऊर्जा स्त्रौतापेक्षा अपारंपारिक ऊर्जेकडे वळण्याची वेळ आता आली आहे. वीजबिलाचा आर्थिक ताण आणि ग्रामीण भागात असलेली लोडशेडींगची समस्या जर मुळापासून घालवायची असेल तर विद्युत ऊर्जेऐवजी सौर ऊर्जा, पवनऊर्जा अशा पर्याया कडे एकतर वळावे लागेल किंवा पारंपारिक शेतीला प्रोत्साहन द्यावे लागेल. तरच शेती खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता रहाणार नाही यांत्रिकीकरणाला जसे अनुदान मिळते त्याचं धर्तीवर गोवंश पालनासाठीदेखील अनुदान मिळायला हवे. शेतकरी हां पर्यावरणाचा एक महत्वाचा घटक आहे. त्याचा विकास होताना पर्यावरणाचा ह्रास होऊ नये याची काळजी आता सर्वानी घेणे आवश्यक आहे. कुणीतरी असे म्हटलंय
"कौन हमारा सुखदाता !
धरती, गंगा, गोमाता !"
या उक्तीप्रमाणे धरती पाणी आणि गौमाता याची पर्यायाने
पर्यावरणाची काळजी सर्व शेतकऱ्यांनी घ्यावी शेतीबरोबरच पुरक व्यवसायांची कास धरावी शेती उत्पन्न तसेच पुरक उत्पन्न वाढवावे आणि कर्जाच्या विळख्यातून स्वताची सुटका करून घ्यावी हीच कृषीदेवता भगवान बलरामाचरणी प्रार्थना !!
© श्री. राहुल दत्तात्रय राजोपाध्ये
1073, नरसोबा गल्ली, तासगाव
ता. तासगाव जि. सांगली
9130215836
rdrajopadhye@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने