नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पाचवीला पुजलेलं -'ऋण'
ग्रिष्माच्या रणरणत्या उन्हात सत्यवान वावरात फरकाडा करत होता. सोन्या-मोत्याच्या साथीनं त्याच्या वखरान सपासप काशाची थोटकं घाबरल्यागत जमिनीतून बाहेर पडत होती. मेहनतीन अंगावरचा घाम अंगावरच जिरत चालला होता, घाम पुसता-पूसता सत्यवानानं तंबाकुची कुपी बाहेर काढली नी हातावर चिमुटभर तंबाकू-चुना कुरवाळत हातावर थाप मारली, तसा तंबाखू घशात घातला. आजूबाजूला नजर फिरवीत अजून लय काम बाकी हाये असा विचार करत, तोच मागून आवाजानं त्याची तंद्री भंगली.
सत्या, 'आरं घरी बावाजी कसेतरी करत हाये, घरी धावपळ सुरू हाये, चालं बर लवकर, माय न मले तुले बलवासाठी धाडलं...' श्यामराव चा आवाज होता तो. सत्यवानाच्या मनात कालवा-कालवा सुरू झाली. धाडदिशी जमिनीवर बसला, डोक्यावर हा ठेवूनं.
त्याच्या मनात रात्रीचा प्रसंग तरळून गेला. बावाजीले म्हातारपणात कमजोरी मुळं आजारान ग्रासल होत रात्रीच धावपळ करुन 'जानबाला' गावच्या वैदाकडून औषध-पाणी देऊन आराम करायला सांगितल होत.
जेमतेम अडिच एकराच्या वडिलोपार्जित तुकड्यात सत्यवान स्वत:च्या बैलान राब-राब राबून आपल लहानस कुटूंब ,म्हातारे आई-वडील, पत्नी, मुलगा अन् छोटीशी चुलबूली समवेत आपल्या जिवणाच राहाटगाडगं धकवत चालला होता. मांगच्या साली पावसान साथ दिली नाही ,कापसाची उतारीच झाली नाही. अडीच एकरित जेमतेम चार किंटल कापूस , जराशा तुरी आन् कठानात हरबरा लावून पोटापाण्याची व्यवस्था होवून राहिली होती. अशातच मुलामूलीची जबाबदारी ,म्हातारे आईवडिल यांच आजारपण यामुळे सत्यवानाचा जिव बेजार झाला होता.
मांगच्या साली पेरणीसाठी सावकाराकडून घेतलेल कर्ज उरावर बाकिच होत.सगळ्या विच्याराच्या तंद्रीतून सत्यवान स्वत:ला सावरत वखर बाजुला सारला. बैल झाडाला बांधून दमानच घराची वाट धरली. घरी म्हातारी माय , बापाचेे हातपाय चेपित बसली होती. चहाचा कप सामोर करत सावित्री म्हणत होती, ' काल वैद बावाजीन दिलेला काढा मी मामाजीले दिला, पण आराम काही पडताना दिसत नाही, कसेेतरी करताय मंघापासून ; वैद्यान त्यायले शहरातल्या ठिकाणी दवाखान्यात न्यायला सांगीतल हाय.'
सावित्रिचे बोलने संपते न संपते तेच लहान पिंट्या म्हणाला, ' बाबा गा मी बी येतो आप्पासोबत.' आपल्या मुलाचे लाड करत मांडीवर घेऊन आपुलकीने कुरवाळत निश्वास टाकला, ' होय रे तू बी चालजो संग.' मनात विचारंच थैमान सुरूच होत. बापाले दवाखान्यात नेण्यासाठी घरी शे-दोनसे रूपये असनं आन् इतक्यात काही दवाखाना भागत नवता. आता कस कराच असा विचार करत माय म्हणाली, ' बापू मायापाशी पोराच्या भातक्यासाठी ठेवलेले पाचशे रूपये हाये रे, पण! पाच-सातशेत काही दवाखाना होत नाही.' त्याला सावकाराची आठवण झाली. पण सावकाराकडं जावं तर पेरणीसाठी आणलेल्या पैशाच व्याज देवून बाकी भार डोक्यावर जसाच्या तसा होता. नाईलाजाने सत्यवानान सावकाराच्या घराकडं धाव घेतली. अन् सत्यवानचा "सत्या" कसा झाला हे त्याला कळलेच नाही. सावकाराजवळ गेला, हात जोडल, ' मालक मले बावाजीले दवाखान्यात न्याच हाये, दोनक हजाराची गरज होती.' सत्याच्या डोळ्यातून अश्रू निघाले. सावकारान सत्याकड पाहता-पाहता म्हटलं, ' तुवा स्वभाव पाहून मांगचे पैसे तुला दिले होते, पण अजून जमा झाले नाही! आता पुन्हा दोन हजार मी तुले कशाच्या भरोशावर देवू? ' 'मालक मेहेरबानी करा मायावर, मले बावाजीले दवाखान्यात न्यायचे हाये जी ' खालची मान वर करत सत्या केवीलवण्या नजरेनं मालकाकडे पाहात होता. ' लागलं तर माहा वावर तुमच्याकडे गहाण ठेवा.' छाताडावर दगड ठेवल्यागत तोंडातून एक-एक शब्द बाहेर निघत होता.
सावकाराने दोन हजाराचा बंडल सत्याच्या हातावर ठेवत सत्याचा आंगठा स्टँपावर ठोसला. अनं बस..
बैलबंडीन बापाले फाट्यापर्यंत घेऊन सत्या निघाला. संग सावित्री आणि पिंट्या होता. म्हातारी माय घरीच होती. नातीले खेलवत, घर राखत.
' अवो आता कस कराच ? घरचे मायापासचे तीनशे रूपये बी संग घेतले हाये. सार बर होईल. मामाजीची तब्येत ठीक होईन.' सत्याले धीर देता देता सावित्री आपलं पत्नीचं कर्तव्य पार पाडत होती. संजीवनी सारखा सावित्रीचा शब्द सत्याले धीर देऊन गेला.
गरीबा घरची पोरगी. दिसायला गोरीपान सावित्री आपल्या मनमिळाऊ स्वभावाने सत्याचा संसार सुरळीत चालवत होती. पण या सर्व गोष्टी जेम तेम परिस्थिती मुळे तिच्या कर्तव्यकुशलतेन सत्याचा घरचा भार कमी करत होती. सत्याला घरची चिंता कराची काही गरज वाटली नव्हती. पण बापाच्या आजारामुळे त्याचा जीव धडपडत होता. कसबसं करून सत्यान दवाखाना गाठला. चिठ्ठी काढून डाक्टरन तपासल ते भरती करायला सांगितले. म्हणाले, ' अशक्तपणामुळे बावाजीच्या अंगात ताकत राहिली नाही. शरीर साथ देत नाही. बावाजीच ऑपरेशन कराव लागते.'
' जी सायब, मंग करा जी लवकर. बावाजी कसेतरी तडफडत हाये. कसा बी इलाज करा आनं बावाजीले वाचवा जी!' 'ठिक आहे काउंटरवर जाऊन लवकरात लवकर पैसे भरण्याची व्यवस्था करा; मी बघतो काय करायचे ते ' ,डॉक्टर म्हणाले.
काऊंटरवर जाऊन सत्याने विचारले. सत्तर हजार पहिले जमा करावे लागेल. डॉक्टर ला ऑपरेशन करता येईल, आनं जो पर्यंत पैसे काऊंटर वर जमा होणार नाही तोपर्यंत उपचार करता येणार नाही.
झालं. सत्या थंडाच झाला. सत्यान मनात हाय खाल्ली. आता काय कराव हा विचार करत सत्याला वाटलं सावित्रिले कस सांगाव बापादेखत. पण वेळ आणिबाणीची होती.
त्यान सारं सावित्रिले सांगितल..पण सत्तर हजाराची व्यवस्था आत्ताच्या आत्ता कशी करायची हा 'यक्षप्रश्न' आ वासून उभा राहिला. दोन हजार सावकाराकडून आणून दवाखाना करावा असं त्याच्या मनात होत. पण नियती मात्र वेगळाच खेळ खेळत होती. बिच्चारा गरीब सत्या डोक्यावर हाथ ठेवून बसला होता. सावित्री तरी काय करणार बिचारी. सारे उपाय थकले होते. ' गरीबी तर त्यांच्या पाचविलाच पुजलेली होती. ' अनं नियती त्यांच्या जीवनाशी खेळ खंडोबा करत होती. ' बापू रे का झाल गा ? अजून डॉक्टर आले नाही का ? ' बापाचा घोगरा आवाज. केविलवाण्या नजरेन जानबा सत्याकड पाहात होता. उतरत्या वयात देखील जानबाचे सारे अनुभव त्याला सारं काही सांगत होते. अन खरं काय ते जानबाला समजायला वेळच लागला नाही.
आपल्या साध्याभोळ्या सत्यवानकड आपुलकीने पाहात जानबा सत्याला धीर देत होता. ' बापू राहू दे गा ! मी असाच बरा होईल, तू काही आता डोसक्याले तरास देऊ नोको. डोसक्यात काई विचार आणू नोको. माया नातवाले सांभाळ मातर. तुई माय बी तुई लय काळजी करत, तिले जप. अन मायी सुनबाई तर हाये तुया पाठीशी. तुव सारं बरं होईल. '
सत्यवान पार खचून गेला. असहाय झाला. आपण राब राब राबलो. मरमर कष्ट केले. तरी बापाचा इलाज करण्यासाठी पैशाची व्यवस्था करू शकलो नाही. याचे शल्य त्याच्या मनात बोचून राहिले. पण सर्वत्र नाईलाज होता. आता कस करायचे हा यक्षप्रश्न. सावित्री मामाजीच डोक चेपीत होती. तिची चिंता तिच्या काळजातून तिच्या डोळ्यातून झळकत होती. सत्याला खंबीर मनान धीर देत ती त्याच्या केविलवाण्या असहाय चेहऱ्याकडे बघत होती. तोच जानबाचा एक-एक शब्द तिच्या काळजाला धडकले. ' सुनबाई, माया सत्यवानला सांभाळून घेजो मा! लई भोळा हाये थो.' ती आपल्या सासऱ्याचे शब्द आपल्या हृदयात साठवून ठेवण्याचा असफल प्रयत्न करीत होती. तोच मामाजीचे शरीर सुन्न झाले. हात पाय गळाले. सर्व अवयव थंड झाले. आणि मामाजीनं श्वास घेन थांबवल... आन बस्स सार संपल.
सावित्रिच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागल्या. बाजूलाच पाय चेपित बसलेला सत्यवान निश्चल नजरेन बापाकडे एकटक पाहत होता. आणि त्याच्या जवळ या शिवाय काही उपायच राहिला नव्हता.
सावकाराने दिलेले दोन हजार रूपये अवंदाच्या साली पेरणीसाठी कामी आणता येईल असा सुखद विचार त्याच्या मनाला जरासा दिलासा देऊन गेला. पण या आधी सार काही एकदम शांत झाल होत. दुःख डोंगरा एवढ त्याच्या पुढे उभ होत.
सत्या बापाला गमावून बसला होता. गरीबीपायी सत्याचा "सात-बारा" सावकाराच्या निर्दयी तिजोरीत निपचित पडून होता.
असहाय.... केविलवाणा... अन लाचार......!!!
'एकांत'
नरेंद्र भाऊराव गंधारे
63- कबीर वार्ड,हिंगणघाट.
जि.-वर्धा.
संपर्क-९२८४१५१७५६
प्रतिक्रिया
वास्तविक व्यथा.. अप्रतिम कथा.
वास्तविक व्यथा.. अप्रतिम कथा...
धन्यवाद वकील साहेब, आभार !
धन्यवाद वकील साहेब, आभार !
Narendra Gandhare
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद, मुटे सर.
धन्यवाद, मुटे सर.
आभारी आहो आपला.
Narendra Gandhare
बहोत बढिया! नरेंद्र!
हृदय हेलकवणारी कथा, वा! क्या बात है नरेंद्र!!!
शुक्रिया मास्टर !
शुक्रिया मास्टर !
Narendra Gandhare
छानच
आशयित रचना
Dr. Ravipal Bharshankar
धन्यवाद
धन्यवाद
Narendra Gandhare
धन्यवाद डाक्टर सायब.
8
Narendra Gandhare
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
मानणिय सर,
मानणिय सर,
कथा स्पर्धाविजेती ठरली,त्यायोगे मा.परीक्षक गणांचे अन्
व्यक्तीशा आपले आभार मानावे तितुके अल्प आहे.
अगदी मनाच्या गाभाऱ्यापासुन आभार.
Narendra Gandhare
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
=-=-=-=-=
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
मोबाईल अॅप