IT कार्यशाळा - आपण साक्षर की निरक्षर? - भाग-२
आपण साक्षर आहात की निरक्षर आहात ? हा प्रश्न मी ज्यांनी चाळीशी ओलांडली आहे त्या सर्वांना विचारतो आहे. मोबाईल, संगणकीय (कॉम्पुटर) आणि संस्थळीय (वेबसाइट) तंत्रज्ञान ज्या प्रचंड द्रुतगतीने झेप घेत आहे ते लक्षात घेतले तर अगदी येत्या दोनचार वर्षातच ४० वयोगटापुढील पिढी सपशेल अनपढ, अशिक्षित आणि अज्ञानी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरळ सरळ थेट बोलायचे असेल तर असे म्हणता येईल कि तुम्ही जर संगणकीय इंटरनेट तंत्रज्ञानाशी आज अगदीच अनभिज्ञ असाल तर पुढील काही वर्षात तुमची गणना निरक्षर या पातळीवर होण्याची दाट शक्यता आहे.
ज्या तर्हेने नेट तंत्रज्ञान पुढे जात आहे ते बघता येणारा काळ हा पूर्णत: संगणकीय प्रणालीवर आधारलेलाच असेल; जिथे कागद, पेन आणि वही हद्दपार झालेली असेल. त्यांची जागा संगणकाच्या किंवा मोबाईलच्या कळफ़लकाने घेतलेली असेल. हा व्यवस्था बदल अटळ आहे कारण हा पर्याय कमीखर्चिक, वेळ वाचवणारा, सुरक्षित आणि सोईचा आहे. येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाचा बदल थांबवणे किंवा अडवून धरणे कुणाच्याच आवाक्यात नसणार आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करणे, एवढाच एक पर्याय उपलब्ध आहे.
आज जे चाळीशीच्या आत आहेत ते सहजगत्या अगदी आपोआप हा बदल आत्मसात करुन घेतील पण जे चाळीशीच्या वर आहेत त्यांचीच खरी गोची होणार आहे. एकतर ही पिढी या तंत्रज्ञानाबाबत उदासिन, अनभिज्ञ असल्याने त्यांना नव्या तंत्रज्ञानाच्या आवाक्याची जाणीव झालेली नाही, शिवाय येऊ घातलेला काळ सर्व सद्यव्यवस्थेची उलथापालथ करणारा असणार आहे याची पुसटशी कल्पना देखील त्यांच्या ध्यानीमनी नाही. या पिढीने वेळीच सावध होऊन अभ्यासाने, महतप्रयासाने नव तंत्रज्ञान आत्मसात करणे अत्यावश्यक झाले आहे. काळाची पावले ओळखता आली नाही आणि तदनुरुप स्वत:त बदल करुन घेता आले नाहीत तर सर्वसामान्य व्यक्तींची बात सोडा; अगदी स्वत:च्या नावासमोर अॅड, बॅ, डॉ, प्रा. अशी बिरुदे लावणारी मंडळी सुद्धा अगदी अनपढ, अशिक्षित आणि अज्ञानीपणाच्या पातळीवर घसरलेले काही काळाने आपल्याला बघायला मिळतील कारण त्यांच्या पेक्षा त्यांचा बालवाडीत शिकणारा चार-पाच वर्षाचा नातू त्यांच्यापेक्षा कैकपटीने सुशिक्षित, व्यवहार चतूर, मोबाईल अथवा संगणक सक्षमपणे हाताळून प्रत्यक्ष कृती करणारा आणि सर्वज्ञानी असलेला बघायला मिळणार आहे.
एवढा काळबदल होण्यास पुढील पाच वर्षे पुरेशी आहेत!
मरेपर्यंत आत्मनिर्भर राहायचे असेल तर ......
स्वतःचे व्यवहार त्यातही विशेषतः बँकिंगचे व्यवहार स्वतःचे स्वतःच करायचे असेल तर....
सावध व्हा! शिका!! आणि.......आत्मसात करा!!!
बस. एवढाच एक पर्याय तुमच्या-आमच्या समोर शिल्लक आहे.
- गंगाधर मुटे
=====