नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पोटची भाकर
हिरवकंचं उभ पिक दादांना उदास भासलं. फांद्या फांद्यावर धूळवड साचलेली. पाना पानावर काजळी रंगानी आपले साम्राज्य व्यापलेलं. संपुर्ण वावराले कोणी बांधून ठेवलं का काय ? तसं स्तब्ध होतं. एखाद्या चित्रकाराने काढलेल्या चित्रासारखं शांत. मौनागत. बिलकुल कुठेच हालचाल नव्हती. मेलेल्या मानसावर पांढरा कापड वढावा तसं उन्ह रानावर पांघरलं होतं. कुठेच जिवंतपणा नव्हता. जीव सोडला का काय ? असं दिसत होतं. या अस्वस्थ रानातून दादा मंदपणे चालत होते. केवळ पायाने. मन मात्र पिकागत उदास होतं. राखी रंगाच्या ढगात बुडून तळमळत होतं. ह्या उदासीतून बाहेर पडण्यासाठी हळहळत होतं. हा खिन्नतेचा फासा केवा सुटन ? हा प्रश्न चालणाऱ्या मनाला पडलेला होता.
"आमदार तिंमाडे विजयी होवो....येवून निवडून.. तुमीच आमदार होवो !" सकाळचे नुकतेच आठ वाजलेले होते. सकाळच्या कोवळ्या तांबूस उन्हात दादा असे नारे देत होता. मागे आमदाराच्या पक्षाचे माणसं, बाया नि पोरं-पोरी चालत होते. प्रत्येकाच्या खांद्यावर पक्षाच्या चिन्हाचा टॉवेल होता. डोक्यावर पांढरी टोपी होती. टोपीच्या एका बाजूला 'विजयी करा..विकास भरा' असं लाल अक्षरात लिहून होतं. दादाचा येटाळ नि अख्खा शिवार या आमदार पक्षाचा होता. निवडणूक तोंडावर आल्याने बरेच लोकं आपापले हातचे कामं टाकून आमदार निवडून आला पाहीजे म्हणून प्रचार करीत होते. दादाही बायको पोरांसहीत प्रचार करत होता.
हा हा म्हणता काती कोदवस गेली. निवडणूक आली. आमदाराचा प्रचार प्रामाणिक जीव लावून गाववाल्यांनी केला. निवडणूकीच्या दिवसी कोणाचा झगडा नाही. भांडण नाही. कोणाले बोल्न नाही न काही नाही. ह्याचा माणूस त्याच्या घरी गेला न् त्याचा माणूस याच्या घरी आला. असं काहीच नाही. साऱ्या बुथवर आपापले माणसं बरोबर शुद्धीत होते. काय खायचं प्यायचं त्याची सर्व व्यवस्था दादांनी केलेली होती. आपापल्यापरी खोक्यातले टिल्लू उचलायचे...रिचवाये...चकना घ्यायचा नि रोयका करत बसायचं...अगावू राजकारण गजकरणासारखं इंतं तितं खाजवायचं नाही. असं सर्वांना दादांनी व्यवस्थित सांगितलं होतं. सारं सारं मस्त उत्तम व्यवस्थापन दादांनी केलं होतं. बघता बघता निवडणूकीचा दिवस सुकर गेला.
दुसऱ्या दिवशी पेट्या फुटल्या. आमदार बहुमतानं निवडून आलेला होता. या खुशीत दादांनी तेव्हाच तालूक्याला पेढे वाटले. पेढे वाटन्याला कारण एवढच होतं की, तो आमदार दादाच्या जातवाला होता. गावात आल्यावर आमदाराची फेरी निघाली. दादा पुढे पुढे फटाके फोडत होता. आमदार गाडीतून रोडच्या बघणाऱ्या लोकांना हात जोडून मान वाकून नमस्कार करत होता. फिरता फिरता गावाच्या मध्यभागी फेरी आली. अगल्या पक्षाचे कार्यकर्ते उभे होतेच. दादांनी फटाका चेतवला. फटका पुर्वीसारखा एका जाग्यावर न फुटता कार्यकर्त्यांच्या दिशेने फुटून त्यांच्या आंगावर उडला. कार्यकर्ते आधीच बावरून होते. आगीत तेल वतावं न् भडका व्हावं असच त्या फटाक्याने भडका घेतलेला होता. ते कार्यकर्ते दादावर येवून पडले. दादाला लगलगे करू लागले. दादाकडचे कोणीच धावले नाही. सारे मूलमूल पाहात होते. कोणी याला वळखत नाही का काय ? अनोळखी माणूस एखाद्या गावात मार खातो. तसा दादा निमुटपणे मार सोसत होता. आमदार दुरूनच पाहून 'आरेरेरे!'हळूच म्हणाला. इकडे तिकडे पाहून चूप झाला. कोणी तरी वयवृद्ध माणसांने आमदाराच्या कानात कुजबूज केली. आमदार ताडकन टाटा येस मधून खाली उतरला. नि दादाच्या दिशेने चालत आला. "सोडा सोडा रे ! दादाला...थांबा थांबा..हे कायची दादागीरी आहे. " म्हणत दादा जवळ आलेला होता. अगल्या पक्षाचे कार्यकर्ते आमदाराचा आवाज ऐकून बाजूला सरले. आमदारांनी दादा बोलायचा इतक्यात दादाच्या कानफडात एक जोराची वाजवली. दादा लालबुंद झाला. दादाची नशा आता उडालेली होती. दादा काहीच बोल्ला नाही. का चुकलं आपलं ? हाच प्रश्न दादाला पडला. आमदार डोळे वटारून दादाला म्हणाला,"आबे, लेका फटाके फोडायचे ते गावाच्या बाहेर...वस्तीत लोकाच्या आंगावर उडले न् त्यायले काई झालं असतं...तर आजचं मी वांद्यात आलो असतो...लेका, नाही सोसत एवडी तर कायले घेतली." असा म्हणून आमदार शांत झाला. सर्वत्र सामसुम झालेलं होतं. दादा झोपुन उठल्यागत तसाच बसुन होता. आपलीच चूक शोधत. विचार करत.
"चाला रे ! आणि आता फटाके फोडू नका. माफ करा मित्र हो...याच्याकून मी माफी मांगतो." आमदार अगल्या पक्षाच्या माणसांना म्हणाला नि गाडीत चढला. फेरी सुरू झाली. सर्व फेरीत मश्गुल झालेले. दादा तसाच अस्वस्थ वाटेत बसून होता. सर्वत्र सामसूम झालेलं होतं.
तेव्हाची अस्वस्था न् आजची सारखीच होती. दादांना जूना प्रसंग आठवला. अजून त्याच्या उदासीत भर पडली. तेवा पण आपल्याले समजलच नाई. आपण आमदाराच्या कडावर पडून लयच आंगात आणत होतो. पऱ्हाटीतून चालत-चालत वावराच्या मध्यभागी दादा विचार करत येवून थबकला. भोवती असलेल्या बांधा मेरावरच्या उदास झाडाकडं व्याकुळ नजरेनं पाहू लागला. मंदपणे उजव्या हातावरून भवताल फिरला. ह्या फिरण्याने होये का काय तर दादाच्या डोळ्यांवर एकाकी अंधारी आली. दादा एकदम खाली बसला. हे अंधारी कसी का आली ? अाज पावतर ह्या वावरात तप्त उन्हात राबलो. तवा असं काई झालं नाई. अाज का असं झालं ? पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मनाच्या सर्च बॉक्स मध्ये टाकून शोधू लागला. नजर भिरभिरत्या पाखरावानी सैरवैर फिरू लागली. चौ दिशांनी मगाचेच झाडं उदास दिसली. वाराही गपगुमान बसला होता. नदीच्या डोहात भोवरा यावा. आणि भोवऱ्यातून गरगर फिरत बुडावर जावं. तसा विचाराच्या गरगरात तो मागे गेला.
दुपारची वेळ होती. बळवंता, सुदामा, गणपत आणि पुन्हा शिवारातले बरेच वीस पंचवीस लोकं दादा संग आमदाराच्या बंगल्यावर गेले होते. शिवारातले हे सारे माणसं आपलं शेत सुटेल या आशेचे पोहचलेले होते. गेटवर गार्डने सर्वांना अडविले. "थांबा ! थांबा ! न विचारता कुठे चालले ?" गार्डने प्रश्न विचारत थांबवले. तसाच दादा म्हणाला," आवो, कावून इसरले का ? निवडणूकीच्या काळात आमीच प्रचार कराले होतो. तवा तुमाले मी दारू पाजली होती....मटणाच्या पार्टीत आपण जास्तच वकलो होतो...आठवा ?"
"हे का बोलता. तुमी का मले बेवडे समजले का काय ?" गार्ड असा बोल्ला. नि दादा हिरमुसला. चूप बसला. दादाचा चेहरा काळवंडला. काय बोलू न् काय नाही. त्याला समजेनासं झालं. "आवो, आमच्या जमिनी बद्दल आमदारासी बोलाचं हाये...आमच्या जमिनी आमचा इस्वासघात करून हिसकावल्या.!" दादाच्या पाटी मागून घरा शेजारचा अशोक बोल्ला. तरी गार्ड काही ऐकत नव्हता. "काही नाही...मले नका सांगू...साहेब बंगल्यात नाही...तुमी जावून तरी का करसान." गार्डचं असं बोल्न ऐकून दादा नि संगचे लोकं विचारात पडले. कामं धामं टाकून आमदार भेटन या आशेने आलो. सकाळी फोन केल्ता त या म्हणे...मनाशी बोलत दादा पुन्हा म्हणाला," आवो...आमाले जावून बसू द्या. येईन तवा आमी भेटीन." म्हणून दादा गप झाला. तसाच गार्ड हसत बोल्ला," अहो, पण साहेब मुंबईला गेले.....ते आज उद्या काही भेटणार नाही." असं आयकून गार्डनी त्यांना परतवले. दादा नि बाकीचे माणसं बस स्थानकावर आले. बसची वाट पाहत सर्व उभे होते. कोणी पान ठेल्यावर खर्रा पान खायला गेल्ते. तर काही दादापाशी उभे होते. इतक्यात दाहा बारा जणांचा जमाव एका बस मधून उतरला. या जमावात त्या दिवशीचे फेरीत फटाक्या संदर्भात दादाला मारणारे ते कार्यकर्ते होते. त्यांची नजर दादाच्या जमावाकडे गेली. त्यातल्या एका इसमाचे काही लक्ष नव्हते. तो सांगायला लागला," आमदार...बंगल्यावरच हाये म्हणे...मले आत्ताचं फोन आल्ता...आता इकडं तिकडं फटकू नका...सिधे सिधे चाला." असं आयकून दादाचं काळीज चिरत गेलं..आपण आमदारासाठी काय नाही केलं. आज पावतर चार पंचवार्षीक झाल्या त्याला निवडून आणत आहो...विचार करून पुढच्या जमावाकडे लक्ष ठेवले. दादांनी बराबरीच्या माणसांना कानोकानी सांगितलं. नि पुन्हा दुसऱ्या रस्त्त्याने आमदाराच्या बंगल्यावर आले. आल्या आल्या दिसलं की, मगाच्याच गार्डनी त्या मगाच्या जमावाला आत घतले होते. दादा संग सर्व निर्धार करून गेट जवळ आले. गार्ड पुन्हा त्यांना थांबवत म्हणाला," आवो..आवो..थांबा..थांबा..मंगाच सांगलं तर आयकू नाही आलं का ?" गार्डच्या बोलन्याकडे दूर्लक्ष करत दादा संग सर्वच आत गेले. गार्डनी शिट्टी वाजवली. बाकी गार्ड शिट्टीचा संकेत समजले. गार्ड गेटवर आले. दादाच्या जमावाला थांबवू लागले. बघता बघता कोणी "आमदार साहेब...आमदार साहेब !" असा आवाज देवू लागले. पण आमदार काही प्रती उत्तर देइना. आलेल्या गार्डनी दादांना व इतर सोबत्यांना बाहेर हाकलले. नि दादाला भडकन दिसी गेटमधून धकवून दिले.
दादा चालता चालता वेलात पाय अडकून गपकन पराटित पडला. नजर चारीमेरापासुन पायाकडं आली. हे का झालं गा दादाराव. मांगचा प्रसंग आयकुन असं का पडलो. का ह्या येलानं पाडलं ? केविलवाणा होवून रोज हिरवागार असणारा वासणीचा येल आज उदासीने काळपट होवून पायात अडकला. आपल्या धण्यानं दूर नाई जावं. असं या वेलाला वाटून राह्यल का काय ? असं दादांना वाटलं. त्या दिसी आमदार भेटला नाही. फुकट दिवस गेला. पिपरगाववाले म्हणत होते का, आपल्या जमिनी बळकावन्याचं काम ह्या तिमांडे आमदारानचं केलं. ह्याचाच हात हाये. सरकार कडून लय पैसा आला. पण आपल्याले काय तर सिरनी दिली. हे सारं खरं असन का ? का खोटं असन ? दादाच्या मनात विचार चाळवला.
इतक्यात शिळान पडली. आत्ताच ऊन होती. न एकाएकी शिळान कशी झाली. दादांनी आकाशाकडं पाह्यलं. राखाडी रंगाच्या ढगांनी सुर्याला पुर्णता झाकून टाकलं होतं. सुर्याच्या आजू बाजूला पुन्हा काही ढगांची सेना धावत येत होती. सुर्य मात्र मंदपणे कासवाच्या पायाने आपल्या मार्गी लागत होता. परंतु ढगांनी त्याला संपुर्ण वेढलं होतं. आरे ! हे का झालं. एवड्या मोठ्या सुर्याला हे ढगं बंद करू लागले. झाकू लागले. हे ढगं तर त्याच्यावर आक्रमक होवू लागले. दादाच्या मनात आलं. ह्या ढगासारखे साले संत्री मंत्री हाये. जगवणाऱ्या सुर्याले हे साले दाबून टाकते. आभाळ डोक्यावर आणून ग्रहण चढवते. कवा कवा वादळ उठवून गरीबांच्या डोळ्यातून पाणी पाडते. हेच तर नाही सांगत असेल हे ढगं...हे आभाळ..हे सुर्य. आपल्याले ह्यांचा डाव काई समजलाच नाई. हे वाक्य काळजाच्या कानापर्यंत जावून भिडलं. मनाच्या खोल सुनसान विहीरीत आवाज निनादावा तसं.
आपल्याले आयुष्यात का समजलं ? आपल्याले बुध्दी हाये. आपल्यात जीव हाये. आपल्या संगच्या मानसांनी घरं-दारं, बिल्डींग्या बांधल्या...घरी चार चाकी गाड्या लावल्या. पोरांना इंग्रजी शायेत घातलं. आपल्याले हे समजलच नाई. शिक्षणासाठी आपल्या पासून पोरं दूर झाले. दुसऱ्याच्या कामाले जावून शिक्षण शिकले. शिक्षणासाठी पर गावी गेले. आपण फक्त त्यायले इरोध करतच राह्यलो. वावरात काम करत नाई म्हणून मारहाणही केली. उपाशी ठेवलं. तरी पोरं पुस्तकापासुन दूर नाई झाले. एवढी इस्टेट असून ती कोण्या कामाची. वावरात उतरले पाह्यजे म्हणून आपण त्यायले बोलत राह्यलो.
" आरे ! घडी-घटका येत जा वावरात !" असं म्हणूनसन्या आले त आले. ते ही पुस्तक घेवूनच. त्यायचं मन कसं आपल्याले समजल नाई. अाज पोटचे असून परक्यावानी ऱ्हात हाये. रक्ताचेच दूर हाये. आण् अाज त आपणही ह्या माती पासुन दूर होणार हावो. म्हणून त सारं वावर नाराज हाये. सारं आयुष्य ह्या मातीमंदी उजळून जाईन असं सप्न पाह्यल. पण दैवचं असं फुटकं. तवाही पिकवतांनी ह्या दैवांनी साथ नाई देली. कोण्या वर्षी साल चांगलं पडलं...त कोण्या वर्षी वांगलं पडलं. ह्या वावराले दुसऱ्याच्या ताब्यातून सोडासाठी कमी वयात लग्न केलं. आयुष्याची बायको डोमडी केली. का तं हुंड्यासाठी. हुंडा घेवून वावर सोडलं. माय बाप सांगत गेले. आपण तसं करत गेलो. लग्न झालं. लहान पणापासुन ह्या वावरात कष्ठ केले. शाया सोडून माती धरली. माय-बाप म्हणत गेले. तसं बैलावानी राबत गेलो. आण् आखिर का झालं. आपल्याच माय-बापांनी दूसरी सून आल्या बरोबर घरातून काढून देलं. जूनं आठवलं न् दादाच्या डोळ्यात टचकण पाणी आलं. जून्या प्रसंगाला डोळ्यापुढं आणून काळीज भडभडून आलं. काळजाच्या कप्या कप्यातून अश्रू डोळ्यांच्या कोपऱ्यात गर्दी करू लागले. दातात होठ धरून दादा पिकांकडं केविलवाणी पाहत रडू कोसळले. मनाच्या जंगलात विचारांची वावटळ घोंगावू लागली.
सोताचे माय-बाप असे करण म्हणून वाटलं नोतं. पण आपणही थेच कराले निंगालो होतो. आपणही आपल्या पोरायले वावरामंदीच काढाले लागलो होतो. एवढं वेढ आपल्याले वावराचं होतं. पण आज तेच वावर आपल्या पासुन दूर होत हाये. आन् आपण काई करू शकत नाई. अाज सकाळ पासुन आपलं वावर उदास हाये. एक एक झाड धूळीनं माखलं हाये. आज ह्या मातीले हे झाडं दूर होणार हाये ठावूक हाये. म्हणून बिचारी शेवटचं आलिंगन झाडांना देत हाये. त्यांचं चूंबन घेत हाये. त्यांना गोंजारत हाये. वासणीच्या वेलानं आपले पाय धरले. ह्याला ही आपण दूर नाई जावं. असं वाटत असेल. म्हणून तर साऱ्या रानातील झाडं उदास उभे हाये. एवढं दूर होण्याचं दु:खं ह्या मातीला झालं. जिच्या दु:खानं सारं रान विषण्ण भासत हाये. पक्षीही कुठं दिसत नाई. एवढं सारं आज उध्वस्त होणार हे आपल्याले समजलच नाई. कसं का समजल नाई ? इचार करत करत दादा हिरमुसले. तसेच ते चालू लागले. शिळान पडूनच होती.
परत त्यांनी चालता-चालता आभाळाकडे पाहीलं. ढगांनी सुर्याला आपल्या साखळ दंडातून सोडलं नव्हतं. पुन्हा त्याला गुंतवून ठेवलं होतं. जखडून ठेवलं होतं. नि आपलं साम्राज्य सर्वत्र ढगांच्या सैन्याने जिंकलं होतं. लय दूर-दूर पर्यंत ढगांचे ढिगं दिसत होते. काळे क्रूर ढग सर्वत्र पसरले होते. पाऊस येण्याची शक्यता दाट जाणवत होती. दादा पावसाच्या इचारानं द्रवले. परंतु कपाशीतून चालता-चालता पावला पावलावरती कपाशी आपल्या फांद्या आडव्या करीत होती. दादाना त्या फांद्या दूर सारतांना कसंकास वाटत होतं. दादा अस्वस्थ होत होता. तो पावलागणिक थांबत होता. कासाविस डोळ्यांनी आपल्या रानाकडं पाहात होता. त्या झाडांना लहानच्या बाळासारखं कुळवारत होता. त्यांच्याशी बोलत होता. भुईशी संवाद साधत होता.
" माफ कर माय मले...मीनं सोताच तुले परक्यांच्या हाती सोपल...माफ कर मले !"
इथलेच बाभळीचे झाडं आपण खांदून टाकले. बोरीचे झाडं तोडून ही कुपाटी वाह्यतीत आणली. झाडं-झुडपं तोडून ह्याच जमिनीतून आपण पिक घेतलं. अाज इतची पऱ्हाटी छाती-छाती आली. इतला कचरा साफ केला. इतले काटे उडवले. पण आज सारंच दूर होणार. फाटून जाणार. सालं आपलच चूकलं. आपण पैसे नस्ते उचलले त का होत होतं. थो पिपरगावं इनमीन पन्नास घराचा. थ्या गावानं एकी करून कोणत्याच नोटीसावर एकाही माणसानं सही केली नाई. आज आपले प्रश्न सरकार म्होरं मांडून पुरे एक ताट उभे हाये. मान खाली घालून विचार करत दादा आपल्या झोपड्याकडं आला. तसाच दादाच्या कानी मागून आवाज आला, " थांब गा दादा ?" दादांनी मागे पाहीले. वावरा शेजारचा बळवंता पाहून दादा गपगुमान चालू लागला. दादांच्या चेहऱ्यावर अचानक क्रोध उसळला. डोळे लाल झाले.
" अय दादाराव...का झालं गा....थांब नं !"
" आत्ता का हाये थांबून ?"
" असा कावून बोलते गा !"
" मंग कसा बोलू त ?"
" तू थांब त सई !" दादा थांबला. जिथं दादाले थांबाचं होतं, तिथं दादा थांबला. हेच ते ठिकाण होतं. दादा अडापाशी गेला. बालटी भरून पाणी काढलं. बालटी तोंडावर धरून गटागटा पाणी पिवू लागला. उरलं पाणी डोक्यावर टाकलं. जवळ असलेल्या बळवंताला दादाचं अप्रुप वाटलं. हा असा का डोस्क्यावर पाणी वतू राह्यला. बळवंता पाहात राहीला.
इतक्यात समोरच्या पांदीनं दादाची- लक्ष्मी शिदोरी घेवून येत होती. दादा विहीरी जवळच्या मुरूमाच्या ढिगावर दुचागती होऊन एक सरळ नि एक पाय मुडपुन बसलेला होता. आपली खरबरीत बोटं त्यांने हिरव्या - पिवळ्या मुरमावरून फिरवली. जवळ असलेला बळवंता बाजूला बसत म्हणाला, " दादाराव तू मले कावून वाईट समजू राह्यला. गावातल्या मालदार लोकांनी तुह्या घरी चकरा मारल्या. त्यायनं तुले धरणाच्या नोटीसावर सही कराले तैय्यार केलं. ह्यात माह्या का गुन्हा हाये."
" तुह्या गुन्हा नाई...मी का तुह्या गुन्हा हाये म्हन्ल का ? पाटलानं तुह्य नाव सांगलं. म्हणे ," तुह्या वावरापासचा बळवंतानं धरणाचे पैसे उचलले. तुही उचलून घे....नाईतं थे ही भेटन नाई...सरकारी धरण होये. इतं आपलं काई जमत नाई. आपण कितीही ताणलो. तरी सरकारले बरोबर सिदं करता येते...म्हणून म्या पैसे उचलले."
" आगा त का झालं....जावू देनं...चार साल झाले....धड खा पुर्त वावर पिकत नाई....कर्ज चूकत नाई...आता त पैसे भेटले धरणाचे."
" किती भेटले ?"
" किती भेटले म्हन्जे ?" प्रश्न करत बळवंता ऑ वासून प्रश्नार्थक मुद्रेनं पाहत राह्यला. दादा पुढं म्हणाला, " मले फक्त बारा एकराचे साडे सा लाख रूपये भेटले."
" मलेही तेवडेच भेटले.....बारा एकराचे."
" मंग आजच्या घडीले एवडूशा रूपयात का भुरका भेटते का ?" दादा व्याकुळ होऊन म्हणाला.
" मंग आता करते का गा ?" बळवंता.
" म्या पह्यलेच साऱ्या शिवाराले सांगलं होतं. का पह्यले आपल्या मांगण्या टाकाच्या. आमच्या एका पोराले नवकरीवर घ्या...आमाले बत्तीस न् तीस हजार रूपे एकरी भाव मान्य नाई. चालू रेट नुसार पैसे द्या. पण असं झालच नाई. आपल्या सारख्याचं कुठ चालू देते का ? आपल्या गावातले प्रस्थापीत लोकं....थ्या आमदाराच्या ढुंगणामांगं फिरू फिरू लेकायनं पह्यले चेक उचलले. मंग आपल्या मांगं हिंडले. उचला उचला करून...यायचे पोट्टे मस्त पुण्या-मुंबई कडं शिकाले हाये. त्यायच्या जवळ पैशाले काई तोटा नाई." दादा जिवाच्या आकांतानं बोलत होता. गावातल्या त्या एका कुळाच्या प्रस्थापित लोकांचा त्याला खुप राग येत होता. काळीज धडधडत होतं. आत अंगार पेटलेली होती. चीड शिगेली पोहचली होती.
" बरोबर हाये तुह्य...पण करते का ? आपलं चाल्ल नाई तवा ? थ्या मोठे लोकांच्या जमीनी गेल्या तरी काई फरक पडलं नाई. फरक पडला आपल्याले. त्यायनं बराबर शहरात तालूक्याले आपले धंदे लावले....आपण मात्र वावर जाण्याच्या दु:खातच हावो.आणि आपुन तवा आमदाराले भेटाले किती चकरा मारल्या. तरी तो भेटला का साला...कवाही गेलो का नागपुरले गेले...मुंबईला गेले....दौऱ्यावर गेले. जवा आपलं काम होतं त्या माजरचोदाले तवा तो गावात सतरा वेळा मुख दाखवे....आता मेला का जिता हाये...काही पताच नाही."
" हो..तुह्य पण खरं हाये. पण मंग का कराचं एवढ्या रूपयात.....कुठं वावर भेटते आता...धड एकर भर वावर भेटत नाई. सात सात न् आठ आठ लाख रूपये एकर जमिनीचे भाव हाये. माह्या साडे भावानं तिकडं राळेगावाकडं पाच एकर जमिन घेतली. त आठ लाख रूपे एकर भावाची घेतली. तेही कोरडवाहू...आपली तं वलतीची गेली...आत्ता पुन्हा घडन का अशी काळीची जमिन ? " दादा अश्रू गाळत बळवंता पुढं आपलं दु:खं मांडत होता. बळवंताही अश्रू ढाळीत आयकत होता. दोघंही आपापली व्यथा परस्परा पुढं मांडत होते. हळहळत होते. डोळे पुसत होते.
दादा वरघणे बारा एकराचा धणी. अंगा पिंडानं किरकोळ. मात्र हाडाचा शेतकरी होता. आई-वडीलानी बाहेर काढून दिल्यावर त्याने घरच्या सहा एकराले जोड व्हावं म्हणून वावरा लगतचं गहान पडलेलं वावर लग्नाच्या हुंड्यातून मोकळं केलं. त्या वावरातले झाडे - झुडपं रात्रीचा दिवस एक करून खांदून काढले. विहीर खोंदली. कष्ठाचं फळ वरच्याने विहीरीच्या पाण्यात बक्कळ दिलं. नगदी पिकांसोबत तो भाजीपाला पिकवू लागला. आता चांगला जम पकडला होता. त्याच्या प्रपंच्याने. त्याच्या कष्ठाने. नुपरीत तेरावा म्हणावं बिलकुल तसं झालं. होय, असच झालं.
दादाच्या वावराला लागून असलेल्या वघळावर धरण आलं. सरकारणं हा प्रकल्प पुर्वी दुसऱ्या गावात उभारला होता. परंतु तिथे साकार नाही झाला. कारण त्या गावातील पिढीजात असलेलं संताचं देवूळ ह्या धरणात येत होतं. त्या गाववाल्यांनी एकी करून नोटीसं सरकारला पाठवले. गरीबाच्या कष्ठाचे त्यांच्या विसाव्याचे देऊळ व त्या देवळातले दिन रात्र कष्ठ करून जगाला पोसणारे देव मात्र उघड्यावर आणले. त्यांच्या तोंडाची भाकर हिसकावून घेतली. पाया खालची जमिन सरकून दिली. त्यांच्या संसाराच्या रथाची चाके आज बसून गेली. हे संकट ओढून घेण्यासाठी दादाच्या शिवारातल्या काही बड्या कास्तकारांचा यात हात होता. तर काही वावराला कंटाळणारे कास्तकारही त्यांच्या सोबत होते. मात्र दादा सारख्याचं यात मरणं झालं होतं.
आज आपणच रस्त्यावर नाही आलो. तर आपल्या येणाऱ्या पिढ्याही वाटेवर आल्या. आपले पोरं भुमिहीन झाले. आपण कष्ठ करत बसलो. पोरा-बारांसाठी पुंजी शिल्लक राहीन म्हणून वावर कसत राह्यलो. पण हे त अलगच झालं. ह्या विचाराने दादा हादरून गेलेला होता. दु:खांचे डोंगर कोसळून डोळे भरलेले होते. चेहऱ्यावरून अवसान गळाल्याचा अदमास येत होता. दादाले असं केविलवानं पाहून लक्ष्मीबाई भरीत भर घालावी तशी म्हणाली, " रडू नोका..रडून काई भलं होणार हाये का ? अाज आपल्या वावरात कानं जे. से. पी. येणार हाये माती काढाले." एकाएकी फोर व्हिलरचा टू व्हिलरले धक्का बसावा. तसा दादाला हे आयकुन जोराचा धक्का बसला. होतं नव्हतं बळ धक्याने गिळंकृत केलं. वल्या झाडाचा फांदा अवचित मोडावा तसी दादाची अवस्था झाली. दरदरून दादाला घाम फुटला. पापणीच्या काठा काठाने असलेल्या देटादेटातून थेंब थेंब गळू लागले. डोळे वाहू लागले. दादा परत सोताले म्हणवून घेवू लागले...हे कसं आपल्याले समजलं नाही. आज हे कापुस भरल्या पिकात जे. से. पी. घालणार तर आपण उभ्या उभ्याच मेलो.
इतक्यात बळवंता म्हणाला, "दादा, हेच म्या सांगाले आल्तो. मांगल दिसा आपल्या कडून नोटीसावं सह्या करून घेतल्या. ते नोटीस याचेच होते. कोणतेही पीक घेवू नका. अन्यथा पेरल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही.'' दादा आयकुन ओल्या आवाजात "हो का !" म्हणाला. आणि पुन्हा दादाचा उर गदगदून आला. तो मस्तकावर हात ठेवून रडू लागला. आपल्याले वाचता नाई आलं. आपुन फक्त सई देत गेलो. तवा आपुन शिकलो अस्तो. त आता असं रडाचं काम पडलं नस्त. दादा विचार करत रडत होते. आपले पोरं बरोबर सांगत होते. शिक्षण हे वाघीणीचे दूध हाये. हे पेल्यानं माणूस डकरते. त्याच्यावर रडाची पाळी येत नाई. पोरांच आठवुन दादा अश्रु गाळीत होता.
पुढं असलेल्या पराटीत कापुस भरलेला होता. सर्वत्र पांढारही पांढार दिसत होतं. काचोळ्यायच्या पाचही बोटात कापुस मावत नवता. काही कपाशीचा कापुस खाली लोंबलेला होता. मजूर भेटन म्हणून दादानं आज पर्यंत वाट पाहीली होती. परंतु ह्या तिसऱ्या फेराले मजूर भेटल नव्हतं. दादा नि लक्षीबाई जेवढा जमते तेवढा कापुस वेचत होते. तुरीही कापणील्या आल्या होत्या. क्वचित काही शेंगा वाळायच्या होत्या म्हणून दादांनी तुरी कापायच्या थांबवल्या होत्या ; पण आज सारं रान दादांना उदास उदास भासत होतं. लक्ष्मीबाईंनी शिदोरी सोडली. कोर कुटका रोजच्यावानी आजू बाजूला फेकला नि दादाला म्हणाली,
" खावून घ्या दोन घास !"
"मले नाई भूक....तू खावून घे !"
"कितीक दिवस उपासी राहान.....जे व्हाचं होतं ते झालं...आत्ता उपासी राहून मराच हाये का ? का ?" लक्ष्मी समजावत म्हणाली. तसाच बळवंता म्हणाला," आगा, खावून घे....गेलं त गेलं वावर...आता असं राहून का होईन !"
" बरवंता, तुले वावर घ्या नाई लागलं. तुले आज्या बापाचं भेटल. मीनं हाडाचे काडं न् रक्ताचं पाणी करून इकत घेतलं. त्यात सप्न पाह्यले...सप्न पेरले. आजही ते जुने दिवस आठवते." दादाचं असं ऐकून लक्ष्मी नि बळवंताला कसंकास झालं. ते गप बसले. दादाचं असं ऐकून का बोलावं आपण ? हाच प्रश्न त्यांना पडलेला होता. लक्ष्मीबाईनं मग ती शिदोरी न खाता तिला गुंडाळून ठेवली.
काही वेळ गेला. मध्यान झाली. भुईली तापली. या तप्त उन्हात पुढच्या पांदीनं पोकलँड, जे. सी.पी. नि चार टिप्पर येतांना लक्ष्मीला दिसले. ती तशीच कापुस वेचता वेचता दादांना म्हणाली," आवं, पाहा..माती काडासाठी जे. सी. प्या आल्या !" दादा विचाराच्या तंद्रीतून गपकन जागा झाला. हातातला कापुस सटकन खांदाडीत घातला. गरीब व्याकुळ नजरेनं टुकटूक येणाऱ्या मसनीऱ्यायकडे पाहू लागला. डोळे भरलेले होते. बळवंता पुन्हा वावरातून दादाकडं आला. त्या सोबतच बरेचसे कास्तकार आलेले होते. काही येत होते. गावातून काही साहेबांचे चमचे लोकं पण त्या मसनिऱ्यायवर बसुन आले होते. दादा जे. सी. पीं ना आडवा झालेला. दोन्ही हात आडवे करून धीटपणे उभा होता. एक जे. सी. पी. त्याच्या पुढं उभी होती. तर काही बांधा मेरावरचे झाडं-झुडपं पाडायला लागली होती. दादाला असं आडवं उभं पाहून काही आलेले माणसं- पोरं हासत होते. तर काही म्हणत होते.
"दादाराव, अलग होय. कायले बयाडावानी असा उभा झाला !"
"आगा, आता आपुन चोर हावोत. साऱ्या कागद पत्रावर आपुन सह्या देल्या आणि तुह्यीच गेली का एकट्याची जमिन. आमचीपण गेली. आमीही असच करावं. पागलागत." असं दुसरा म्हणाला.
"पैसे उचल्ले...आता आपुन काई करू शकत नाई." तिसरा. तसाच हासत चौथा उद्गाला,
" आगा, चूकच्याप दूर होय...नाईतं त्यायले बरोबर अलग करता येते." सारं ऐकून दादा मसनिऱ्याकडे पाहून बोल्ला," थांबा रे थांबा चालवू नोका मशिनी. हात जोडतो पाया पडतो..थांबा." एवढ्यात साहेब दादाला म्हणाले,
" दादाजी, असं करून काही होणार नाही. काम काही थांबणार नाही. जे करा लागत होतं ते आधीच करा लागत होतं. आत्ता सारं झाल्यावर असं उभ राहून सोताचा तमाशा नका बनवून घेवू......करू द्या काम." तसाच दादाराव केविलवाण्या स्वरात अगतिक होवून म्हणाला,
" साहेब, मले फक्त हा कापुस वेचू द्या. ह्या तुरी सोंगवू द्या. मंग कुठूनही तुमी मशीन बिनधास चालवा." पुढं एक हात खिशात घालून फोनवर बोलत असलेला साहेब दादाच्या डोळ्यातले अश्रु पाहत हसत म्हणाला," आत्ता रडू नका. रडून काई फायदा होत नसतो. आधीच काही तरी तडजोड केली असती तर हा दिवस नसता आला." साहेब मसनिरायच्या चालकाकडं पाहत म्हणाला," काढा रे माती. एक जण इकडून लागा. एक जण त्या तिकडच्या आवडात जा." कसलीही दया न बाळगता निष्ठूर होवून साहेबांनी मसनिऱ्यावाल्यांना हुकूम बजावला. तेही तेच बघत होते. त्यांनी मशीना सुरू केल्या. उभ्या पांढऱ्या पिकात घातल्या. कापुस पराटीचा पार गळून गेला. कापणीला आलेली तूर चूरा झाली. डोळे पांढरे करत सारं पिकं निपचीत पडलं. मशिनी तुडवत कामं करू लागल्या. सारं चित्र पाहून लक्ष्मीला असह्य झालं. तिला न राहवलं. ," साहेब, तुमाले आमचच वावर भेटलं का ? बाकी लोकांचे वावरं खाली झाले. त्यायचे पण वावरं धरणात गेले. त्यायच्या वावरातली नोये का काढाची माती...सरकारले फारस्टेची जागा नोयती सापडली का धरण कराले. ज्या जमिणीवर माणसं जगत हाये. सुखानं नांदत असलेल्याच्या पुढचं तुमी ताट हिसकलं. त्यायच्याच पायाखालची जमिनी हिसकली. आत्ता आमी कुठं हक्कानं उभं राहाचं." लक्षी बेंबीच्या बुडातून बोलत होती. मशिनिच्या पुढं पुढं मशिन थांबवासाठी दादा प्रयत्न करत होते. परंतु ते सारे अयशस्वी झाले. बघायला आलेले लोकं दादाचं वेड्यागत वागणं पाहून हासत होते. "बांधा मेराचे झाडं आन् नाल्याला लागून असेलेल्या पडितातली मातीही काढा रे !" असं म्हणून साहेब एका झाडाकडे मोबाईल कानाला लावून वळलेले. तसाच बळवंता म्हणाला, " साहेब, त्या आमदाराकडे आमी गेलो. तवा तो एकाही दिसी भेटला नाही. खासदाराले भेटाले गेलो...तवाही तसच झालं...कोणाचीच माय जंदली नाही. कोणीच मेले का जित्ते हाये. पाहाले आले नाही." तसाच साहेब बोल्ला,
" अहो, पण मला काय सांगता. मी समजू शकतो. पण काही करू शकत नाही." साहेबाचं असं ऐकून दादा त्यांच्या पायी पडला. लक्ष्मीबाई गळ्यातली एकदाणी साहेबा पुढं काढून उभी होत म्हणाली," घ्या, साहेब हे घ्या.. कमी पडत असेल तर आणखी आनून देतो. पण आम्हा गरिबाले येवढं पिक काढू द्या...ही पोटची भाकर नका हिसकू साहेब..ह्या भाकरीसाठी रात रात राबलो. दिवस रात एक केली. हाताव आणून पानाव खाल्लं. कवा उपाशी निजलो."
" आमच्या गरिबाचा साठीसराप नका लावून घेवू साहेब. हाततलं ताट ह्या सरकारनं आंदीच हिसकावलं. एवडा घास तोंडात पडू द्या हेच इनंती हाये साहेब. " जीवाच्या आकांतानं गलबलून नवरा बायको केविलवाण्या स्वरात विनवणी करत होते. होतं नव्हतं अवसान खचलं होतं. दादा हताश झालेले होते. डोळे रडू रडू लालोलाल झालेले होते. डोळ्यातून अश्रूंची चंद्रभागा दू थडी भरून वाहत होती. वाहत्या नदीत आशेचा डोंगा या थडीचा त्या थडीला खेलकावत होता. पंढरीच्या पांडूरंगाला विनवणी करून करूनही त्याला जाग आलेली नव्हती. पाणी कापता कापता घशाला कोरड पडलेली होती.....
- आशिष वरघणे
रा. सिरूड पो. वेळा त. हिंगणघाट जि. वर्धा.
मो. ९३५९६७९०९३
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने