काही सुटे अन काही मुटे शेर
तू कोसळ मुसळधार, जशी हवी तशी, कुठेही, कशीही
मी ओढ्याच्या रुपात, सावरेन तुला, बाहूत घेऊन
© गंगाधर मुटे १७/०७/१९ #थेट_बांधावरून
=-=-=-=-=
कशासाठी विचारावे की पक्ष तुझा कोणता
तुझे कूळच तर सांगते की पक्ष तुझा कोणता
© गंगाधर मुटे #माझी_वाङ्मयशेती #लोकशाही #पचायला_अवघड_डोज
=-=-=-=-=
येते कधी कधी पण; सांगून येत नाही
इतक्याच कारणाने संधी कवेत नाही
मी मेघ बाष्पधारी वणव्याकडे निघालो
मम वाट रोखणारा वारा सचेत नाही
- गंगाधर मुटे
=-=-=-=-=
साम-दामाविना जन्म व्यर्थ आहे, नर्क आहे?
लोकशाहीस इतुकाच अर्थ आहे? तर्क आहे!
- गंगाधर मुटे
=-=-=-=-=
प्रश्न हा नाहीच की आता प्रश्नच बाकी नाही
प्रश्नच प्रश्न सोडले तर प्रश्नच बाकी नाही
- गंगाधर मुटे
=-=-=-=-=
जिंकावया जगाला ऐटीत तो निघाला
मुलखात मुद्रिकेच्या अलगद शिकार झाला
- गंगाधर मुटे
=-=-=-=-=
धुंदलेल्या वादळाला तू असे अडवू नये रे
तप्त झाल्या भावनेची तू नशा चढवून ये रे
- गंगाधर मुटे
=-=-=-=-=
तापणारा तापतो अन मजवरी संतापतो
मी खुबीने ताप त्याचा धस्कटाने मापतो
तापल्या मातीकुतीला या ढगांची ओढणी
ओढताना ओढणीला सूर्यही मग धापतो
- गंगाधर मुटे 'अभय’
=-=-=-=-=
जगामध्ये चमकायला अक्कल पहिजे
अक्कल नसेल तर निदान टक्कल पाहिजे
- गंगाधर मुटे
=-=-=-=-=
ऐकताना कान त्यांनी झाकले अन्
बोलले तेही जणू उपकार केले
- गंगाधर मुटे
=-=-=-=-=
जरी हे खरे की रसिकामध्ये प्राविण्य पाहिजे
परंतु; कविते तुझ्यातही थोडे नाविण्य पाहिजे
- गंगाधर मुटे
=-=-=-=-=
ती किंचाळली तेव्हा रात्र निजली होती
जागी होईस्तोवर पहाट भिजली होती
- गंगाधर मुटे
=-=-=-=-=
झोपेमध्ये असतो तेव्हा मनिषा जागत असते
उघड्या माझ्या जखमांवरती फ़ुंकर घालत असते
जिथे श्रमाने दमल्यावरती बुद्धी लोळण घेते
घट्ट धरोनी तिथे मनाला उमेद धावत असते
- गंगाधर मुटे ’अभय’
=-=-=-=-=
न गरजतो, न बरसतो, नुसताच रिमझिमतोय
हा पाऊसच आहे की पुणेरी माणूस?
- गंगाधर मुटे
=-=-=-=-=
निर्ढावल्या नभाशी खेटून ठाकला तो
भांबावल्या दिशांना आधार वाटला तो
गगनात एक पक्षी ललकारतो हवेला
आभाळ पेलण्याच्या स्वप्नात गुंतला तो
अदृश्य एक वारा, असतो सदा सवेला
बघता उदास मुखडा, गोंजारतो मला तो
- गंगाधर मुटे ’अभय’
=-=-=-=-=
कुणी रेटून जात आहे, कुणी खेटून जात आहे
उरले-सुरले उगवतीचा गर्भ तुडवून जात आहे
फायद्याचा दिसतो सौदा तोपर्यंत ... तोपर्यंतच
पुढे पुढे मिरवतो त्याची तो स्वत:हून जात आहे
- गंगाधर मुटे
=-=-=-=-=
चंद्राळतो जणू मी दिसताच मित्र माझा
बरसात चांदव्याची करताच मित्र माझा
-गंगाधर मुटे "अभय"
=-=-=-=-=
प्रतिक्रिया
कवी शेती करत नाही
कुणाचे कुणाला कळेनाच काही
© गंगाधर मुटे २५/०२/२०२४ #थेट_बांधावरून
शेतकरी तितुका एक एक!
गारपिटीच्या अंगसंगाने
गारपिटीच्या अंगसंगाने गर्भपातल्या रानी
अश्रू होऊन हवेत विरले पाटामधले पाणी
. - गंगाधर मुटे ’’अभय”
शेतकरी तितुका एक एक!