नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
तुमचं काय गेलं: प्रेमातील व्यंगातून जीवनभाष्य। मराठी भाषेतील एक अवलिया कवी म्हणजे मंगेश पाडगावकर हे होय. पाडगावकरांच्या अनेक कविता अजरामर झालेल्या आहेत. भावगीत गायक अरुण दाते संगीतकार श्रीनिवास खळे वेगवेगळे गायक गायिका यामुळे तर भावगीत प्रांतामध्ये मंगेश पाडगावकर कायमस्वरूपी लक्षात राहणारे गीतकार कवी म्हणून ओळखले जातात. अनेक वेळा भातुकलीच्या खेळामधली, किंवा या जीवनावर या जगण्यावर अशा गीतांमुळे पाडगावकरांच्या वास्तवदर्शी कवितांवर विचारही होत नाही. पाडगावकर खऱ्या अर्थाने जीवनातील व्यंग टिपणारे आणि यावर परखड भाष्य करणारे कवी होते. अशीच त्यांची व्यंगात्मक खेळकर खोडकर वाटणारी पण तितकीच वास्तववादी कविता म्हणजे तुमचं काय गेलं? ही कविता मंगेश पाडगावकर ह्यांच्या बोलगाणी ह्या संग्रहातील आहे खरे म्हणजे हा प्रश्न निरर्थक गोष्टी वर काथ्याकूट करत स्वतःचे जीवन एका प्रश्नचिन्ह समान करून ठेवणाऱ्या महाभागांवर आहे. त्यातच प्रेम ही संकल्पना असल्यामुळे कवितेची रंगत आणखी वाढत जाते. *त्याने प्रेम केले किंवा तिने प्रेम केले, करु दे की! मला सांगा, तुमचं काय गेलं?* अशी सुरुवात असलेल्या या कवितेतून कवीने तरुणाईवर सातत्याने होत आलेल्या प्रेम सुलभ आरोपाबद्दल भाष्य केले आहे. ते आपलं कोणीच नसतात, त्यांचा आपला यथार्थ आणि काहीही संबंध नसतो तरीही त्यांच्याबाबत सातत्याने कानगोष्टी आणि कुजबुज सुरूच असते. अशावेळी कवी सरळ विचारतात की त्यांचे तसे वागण्यामुळे तुमचा माझ काही नुकसान आहे का? *तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला? नको तितका जवळ जाऊन अंगाशी खेटला? लाल लाल गुलाबाचं फूल होऊन पेटला? भेटला तर भेटू दे की, पेटला तर पेटू दे की! तुमचं डोकं कशासाठी इतक गरम झाल? त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं, करु दे की! मला सांगा तुमचं काय गेलं?* या कडव्यामध्ये पाडगावकरांनी बाग बगीचा उद्याने किंवा सिनेमा गृहात सातत्याने दिसणारे दृश्य त्यावर कुत्सित नजरा, कुचकट बोलणे असे काहीसे संमिश्र चित्र पहायला मिळते त्यावर भाष्य केले आहे. यामध्ये प्रेमाचे प्रतीक समजले जाणारे गुलाबाचे फुल त्यांनी अतिशय चपलखपणे वापरले आहे. या सर्व प्रकारामुळे कुणालाही डोकं करम करून घेण्याची गरज नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. अशावेळी वाटते ही पाडगावकर स्वैराचाराचे समर्थन तर करत नाहीत ना? पण पडलेल्या प्रश्नाचे उत्तर कविता जशी जशी पुढे सरकत जाते तसे तसे मिळत जाते. *एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली? पाऊस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली? घरात तेव्हां कोणीच नव्हतं म्हणून त्यांच फावल? त्याने तिला जवळ घेऊन चक्क दार लावलं? लावलं तर लावू दे की, फावलं तर फावू दे की! तुमच्या माझ्या पूर्वजांनी दुसरं काय केलं? त्याने प्रेम केले किंवा तिने प्रेम केले, करु दे की! मला सांगा, तुमचं काय गेलं?* या कडव्या मधून कवीने बेधुंद तरुणाईची आणखी पुढची पायरी वर्णित केली आहे. पण त्याचवेळी आकर्षणातून निर्माण होणारे प्रेम सरतेशेवटी शारीरिक ओढीकडे झुकतेच आणि येथेच तरुण पिढीचे चुकतंय असं सांगूनही तारुण्यसुलभ क्रिया आणि प्रतिक्रिया ह्या अशात असणार यात काही पाप नाही, आणि असते तर शारीरिक ओढितून सृष्टीची वाढ करणारे आपले सर्व पूर्वज सुद्धा पापी ठरतील? कारण त्यांनी यापेक्षा वेगळे काहीही केलेले नाही, असे सांगून त्यांच्या प्रेमाला नावे बोट ठेवण्याचा आपल्याला अधिकार नाही कारण त्यामुळे आपला काही फायदा नाही तसेच तोटाही नाही. * घरात जागा नसते त्यांचं चालणारच टॅक्सीत प्रकरण! ते थोडेच बसणार आहेत पाणिनीच घोकीत व्याकरण? गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच! कुणीतरी कुणाला जवळ ओढून घेणारच! घेतलं तर घेऊ दे की, व्हायचं ते होऊ दे की! तुमच्या घरच बोचक त्यांनी उचलून थोडस नेलं? त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केले, करु दे की! मला सांगा तुमचं काय गेलं?* या कडव्यामध्ये बाहेर सुरु असलेले सर्व प्रकरणे अनैतिकच असतात असे नव्हे तर कधी कधी काही वैयक्तिक समस्या मुळे सुद्धा मनाचा कोंडमारा होत असतो. तसेच जागेच्या समस्यामुळे मनातील भावनांचा कल्लोळ टॅक्सी मध्ये सुद्धा उघड होतो. याबाबतीत पिया का घर या चित्रपटातील ये जीवन है इस जीवन का यही है रंग रूप या गाण्याची प्रकर्षाने आठवण येते. गुलाबी थंडीचे परीणाम होणारच या वाक्यामधून निसर्ग आपले काम करत राहतो माणसाच्या नैसर्गिक भावना सुद्धा थांबू शकत नाहीत, हे वैज्ञानिक सत्य अध्यात्माच्या पुढे जाऊन मान्य करण्याचा सल्ला कवीने दिलेला आहे. * कानटोपी घातलीत म्हणून फुलं काय बोलणार नाहीत? तुमच्या रुद्राक्षांना भिऊन पाखरं काय झुलणार नाहीत? फुलली तर फुलू दे की, झुलली तर झुलू दे की! खिडकीतून फुकट सगळं बघता तर आलं? त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, करू दे की मला सांगा, तुमचं काय गेलं? * या कडव्या मधून आपण सज्जनतेचा आव आणला, भावनांचा कल्लोळ अव्यक्त ठेवला याचा अर्थ बाकीचे लोक तसे वागतील असे नाही, ज्याप्रमाणे फुले आपलं फुलण्याचा काम करतात त्याचप्रमाणे लोक आपल्या भावना व्यक्त करण्याचे काम करणार. रुद्राक्ष घातले म्हणजे एखादेवेळी भीती नष्ट होईल पण त्यामुळे आनंदाने झुलणारे पाखरं आपलं झुलन थांबवणार नाहीत, आपण या गोष्टीमुळे कासावीस न होता फुलणाऱ्या फुलाला करू द्यावे, झुलणाऱ्या पाखरांना झुलू द्यावे कारण आपले निर्बंध त्यांच्यावर लागू होत नाहीत. मग या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यावा, व्यंगाने का होईना पाडगावकर म्हणतात त्याप्रमाणे खिडकीतून फुकट सगळं बघता तर आलं? याप्रमाणे मनोरंजनात्मक दृष्टीने या सर्वांकडे पाहून आनंद घेतला पाहिजे असे कवि म्हणतात. खरे म्हणजे फक्त प्रेमच नव्हे तर इतर अनेक गोष्टी असतात की ज्या आपल्या अख्यत्यारीत नसतात, आपण त्याबाबत काहीही करू शकत नाही. मात्र आपण त्या गोष्टीमुळे स्वतःला त्रास करून घेत असतो. आपल्या जीवनाचा आनंद उपभोगायचे सोडून निरर्थक बाबींवर चर्चा आणि काथ्याकूट करत जगण्यापेक्षा आनंदाने समोर येईल त्यावर आनंदाची उधळण करत जीवन जगले पाहिजे. प्रेम ही माणसाची स्वाभाविक वृत्ती आहे त्यामुळे त्या बाबीकडे हसत खेळत बघून जीवनाचा आनंद घेतला पाहिजे, असा मोलाचा सल्ला आनंदयात्री म्हणून ओळखले जाणारे चिरशब्द तारुण्य लाभलेले कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी तुमचं काय गेलं या कवितेतून दिला आहे असे मला वाटते. किरण शिवहर डोंगरदिवे, वॉर्ड नं 5, समता नगर, मेहकर। ता. मेहकर जि. बुलढाणा पिन 443301 मोबा क्र 7588565576
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!