असा आहे आमचा शेतकरी
मुंबईतील ‘चतुरंग प्रतिष्ठान’ संस्थेचा या वर्षीचा सामाजिक क्षेत्रासाठी असलेला ‘जीवनगौरव’ पुरस्कार शेतकरी संघटनेचे प्रणेते श्री. शरद जोशी यांना प्रदान करण्यात आला. मुलुंड, मुंबई येथील कालिदास नाट्यगृहात १८ डिसेंबर २०१२ रोजी संपन्न झालेल्या भव्य संमेलनात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी उपस्थितांनी सुमारे पाच मिनिट उभे राहून प्रचंड टाळ्यांचा गगनभेदी कडकडाट करून मा. शरद जोशींना मानवंदना दिली. त्या क्षणापासून सतत एक विचार मनात घोळतोय, अनेक प्रश्न मनात निर्माण होतात ज्याची उत्तरे मिळत नाहीत. उत्तर मिळाल्यासारखे वाटत असतानाच पुन्हा एक नवीन प्रश्न निर्माण होतो.
त्या सभागृहात उपस्थित असलेल्या सुमारे अडीच हजार उपस्थितांपैकी बहुतांश शहरी आणि मुख्यत्वेकरून मुंबईकरच होते. ज्यांचा कधीही शेती विषयाशी दूरान्वयानेही संबंध आलेला नव्हता. शेतीमालाला रास्त भाव मिळाले तर त्याचा त्यांना लाभ मिळण्याऐवजी फटकाच बसणार होता. दूध आंदोलनाने दुधाचे भाव वाढले तेव्हा त्यांच्याच खिशातून जास्तीची रक्कम खर्च झाली होती. उसाचे दर वाढून साखर महाग झाली तेव्हा त्यांच्याच घरगुती बजेटवर आघात झाला होता. शेतमालास उत्पादनखर्चानुसार रास्त भाव द्यायच्या प्रयत्नापोटी अन्नधान्याचे दर वाढले तर त्याचा तडाखाही त्यांनाच बसणार होता आणि तरीही ही शहरी मंडळी शरद जोशींच्या व्यक्तिमत्त्वासमोर नतमस्तक होऊन मानवंदना देण्यासाठी पाच मिनिटे उभे राहून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करीत होती. याचे कारणही स्पष्ट होते; की त्यांना शरद जोशी आणि त्यांचे कर्तृत्व कळले होते.
मात्र याउलट स्थिती ग्रामीण महाराष्ट्रात पाहायला मिळते. शेतीमालाला रास्त भाव हा एककलमी कार्यक्रम घेऊन ज्यांच्या साठी शरद जोशींनी उभे आयुष्य खर्ची घातले, संसाराची राखरांगोळी होत असतानाही अविचल राहून ऋषितुल्य जीवन जगून नेटाने शेतकरी चळवळ पुढे नेली, अडगळीत पडलेला शेतीच्या अर्थवादाचा विषय कृतिशीलतेने केंद्रसरकारच्या अजेंड्यावर आणून ठेवला, त्या शरद जोशींविषयी ग्रामीण महाराष्ट्र उदासीनता का दाखवतो? असा प्रश्न वारंवार पडणे स्वाभाविक आहे. ज्या शेतकरी संघटनेने अनेकदा आंदोलने करून शेतमालाला भाव मिळवून दिले, शेतकर्याला स्वाभिमानाने जगायला शिकविले, दोनदा हजारो कोटी रकमेची कर्जमुक्ती मिळवून दिली त्या संघटनेला राजकीय यश मिळवून देताना शेतकरी समाज कंजूषी का दाखवतो, असाही प्रश्न उपस्थित होऊन मनात निराशा येणे स्वाभाविक आहे. मात्र ग्रामीण महाराष्ट्राला शरद जोशी आणि त्यांचे कर्तृत्व कळले नाही, असे म्हणता येत नाही. इतिहासातला एकमेव शेतकरी नेता म्हणून शरद जोशी यांचे नाव जनमान्यता पावून प्रत्येक शेतकर्यांच्या हृदयात कोरले गेले आहे. शेतकर्यांना संघटित करून “भीक नको हवे घामाचे दाम” असा मंत्र देऊन शेतकर्यांना सन्मानाने जगायला शिकविण्याचे त्यांचे योगदान वादातीत आहे. शेतकर्याच्या मरणाचे कारण सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामध्ये दडले आहे, याविषयी सुद्धा आता कुणाचेच दुमत राहिलेले नाही, पण; जातिभेदांचे अडथळे दूर सारून शरद जोशींच्या पाठीशी एकसंघ उभे राहण्याची ऊर्मी शेतकरी समाजामध्ये का निर्माण होत नाही, हाच खरा कळीचा मुद्दा आहे. शेतकरी आंदोलनामुळे शेतमालाला बरे भाव मिळालेत, असे खाजगीत मान्य करणारा शेतकरी जाहीरपणे तसे मान्य करेलच याची खात्री देता येत नाही. शरद जोशींमुळेच कर्जमुक्ती मिळाली असे चार भिंतीच्या आड बोलणारा शेतकरी चावडीवर बसल्यानंतर गावच्या राजकीय धेंडासमोर बोलताना कृषिमंत्र्यांनी कर्जमुक्ती केली असावी, असे कसे काय म्हणू शकतो, हाही चिंतनाचाच विषय ठरतो.
मात्र शेतकरी समाजाविषयी माझी काहीही तक्रार नाही; आणि तक्रार असण्याचे कारणही नाही. हजारोवर्षे आर्थिक गुलामगिरीचे, लाचारीचे व अपमानास्पद जीवन जगता-जगता स्वाभिमान व सन्मानाचे जीवन जगण्याची प्रेरणा देणारी जनुकेच या शेतकरी समाजाच्या रक्त-मांस-पेशीतून हद्दपार झालेली असणार हे उघड आहे. आंदोलनाने शेतमालाचे भाव वाढून शेतकर्याच्या घरात स्वतःच्या हक्काचे वीस-पंचेविस हजार रुपये जास्त आले तरी त्याला ते महत्त्वाचे वाटत नाही व संघटनेचा झेंडा हातात घ्यावा, असेही वाटत नाही, मात्र; एखाद्या पुढार्याने कोंबडी-बकरी घेण्यासाठी हजार दोन हजार रुपयाची अनुदान स्वरूपातील भीक मिळवून दिली तर त्या शेतकर्याला त्या पुढार्याचा झेंडा हातात घेऊन नाचावेसे वाटते; एवढेच नव्हे तर आयुष्यभर त्या पुढार्याचे धोतर धूत बसावेसे वाटते, हा स्वाभिमान निर्माण करणारी जनुके निष्क्रिय किंवा नष्ट झाल्याचा पुरावाच मानावा लागेल. पन्नास रुपयाची तूर बियाणाची पिशवी अनुदानावर फुकटात मिळविण्यासाठी साठ-सत्तर रुपये बसचे तिकीट खर्च करून तालुक्याच्या ठिकाणी सोसायटीसमोर चार तास रांग लावणारी माणसे शेतकरी समाजात मुबलक आणि घाऊक प्रमाणात उपलब्ध आहेत. शेतमालाचा उत्पादन खर्च दर्शविणार्या हिशेबाशी शेतकर्याचे हाडवैर आहे. ताळेबंद आणि अंदाजपत्रक या दोन शब्दांची त्याला ऍलर्जी आहे. वर्षभराचा शेतीचा खर्च एका वहीत लिहून नफा-तोटा याचा आढावा घेणारा शेतकरी लाखात एखादा मिळाला तर आश्चर्य वाटावे, अशी स्थिती आहे.
शेतकर्यांची संघटना असावी असे त्याला वाटते, पण त्यात आपलेही योगदान असावे, हे त्याला मान्य नाही. शिवाजी जन्माला यावा; पण तो शेजार्याच्या घरात, आपल्या घरात नको, हीच त्याची मनोधारणा कायम आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आपली लोकशाही प्रगल्भ झाल्याचा आपण कितीही दिंडोरा पिटत असलो तरी जात आणि धर्म बाजूला ठेवून विकास किंवा अर्थकारणाच्या आधारावर मतदान करून देशाला उज्ज्वल भविष्याकडे नेणार्या नेत्याला किंवा उमेदवाराला मतदान करायचे असते, या मूलभूत जाणीवेपासून आमची लोकशाही हजारो मैल दूर आहे.
एका-एकुल्या 'व्होटा'साठी, थैली-थैली नोटा
कुणी पिलवती इंग्लिश-देशी, कोणी हाणती सोटा
कोणी करिती लांगूलचालन, कोणी लोटांगण जाती
भले-शहाणे-सुविद्यही खाती, जातीसाठी माती
ज्या लोकशाहीत सज्जन असो वा दुर्जन, पुढारी असो वा पत्रकार, वकील असो वा न्यायाधीश, शिक्षित असो वा अशिक्षित, श्रीमंत असो वा गरीब, थोर विचारवंत असो वा महान कलावंत; या सर्वांना जाती-पाती धर्म-पंथाच्या आधारावर मतदान करण्याचा रोगच जडला आहे, त्या लोकशाहीत केवळ शेतकरी तितुका एक-एक होऊन जाती-धर्माला तिलांजली देऊन पोटापाण्याच्या प्रश्नाच्या आधारावर मतदान करेल, ही कल्पनाच व्यर्थ ठरते. त्यामुळे मतपेटीतून प्रश्नाची उकल होण्याची शक्यता निकाली निघते.
लोकशाहीत दबावगटाला अनन्यसाधारण महत्त्व असते. शासकीय निर्णयप्रक्रियेवर प्रभाव पाडण्याची दबावगटाची क्षमता निर्विवाद असते पण तेथेही आमचा शेतकरी तोकडा पडतो. अन्यायाविरुद्ध शेतकरी पेटून उठत नाही, पूर्ण ताकतीनिशी संघटित शक्तीचे प्रदर्शन करीत नाही त्यामुळे कधीकधी संघटनेच्या कार्यकर्त्यामध्ये नैराश्य येते आणि संघटनेचे कार्य थांबवून द्यावे, अशी दबक्या आवाजात कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू होते. अडीच तपाएवढा प्रदीर्घ काळ शेतकरी चळवळीसाठी खर्ची घालूनही जर शेतकरी समाजामध्ये हव्या त्या प्रमाणात जनजागृती होत नसेल तर या समाजासाठी पुढील उर्वरित आयुष्य खर्ची घालून वेळ दवडायचे थांबवून द्यावे काय, असाही एक मतप्रवाह अधुनमधुन उचल खात असतो.
अशावेळी सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, अनेक पिढ्या शेतकरी समाजाला शुद्रतेची वागणूक मिळाल्याने या समाजातून सन्मानाने जीवन जगण्याची प्रेरणाच लोप पावलेली आहे. “ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान” हाच त्याने जीवन जगण्याचा मूलभूत सिद्धांत म्हणून स्वीकारलेला आहे. देशातील इतर नागरिकांप्रमाणे सन्मानाने व सुखाने जगण्याचा आपलाही जन्मसिद्ध अधिकार आहे, याचा त्याला विसर पडलेला आहे. शेतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करण्याचा एक भाग म्हणून शेतकरी संघटना स्थापन झाली ती शरद जोशींना तशी आवश्यकता वाटली म्हणून; शेतकर्यांना संघटनेचे महत्त्व पटले होते म्हणून नव्हेच. शेतकर्यांना ना संघटनेची गरज होती ना शेतमालाच्या भावाची. लाखो शेतकरी एकत्र येऊन पहिल्यांदा संघटना स्थापन करण्यात आली आणि त्यांनी नंतर आपला नेता निवडला असे कधी घडले नाही. शरद जोशी परदेशात असताना भारतातल्या शेतकर्यांनी त्यांना पत्र लिहून भारतात येऊन संघटना स्थापन करण्याची विनंती केलेली नव्हती की "आदरणीय साहेब, भारतातील आम्हा शेतकर्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे, तेव्हा तुम्ही तातडीने भारतात या आणि आमच्यासाठी शेतकरी संघटना स्थापन करून या हलाखीच्या स्थितीतून आमची मुक्तता करा." अगदी गावपातळीवर सुद्धा सर्व शेतकर्यांनी स्वयंप्रेरणेने एकत्र येवून बैठक घेतली आणि शेतीच्या मुक्तीसाठी शेतकरी समाजामध्ये एकोपा घडवून आणायचा प्रयत्न केल्याचा इतिहास सांगत नाही; निदान माझी तरी तशी माहिती नाही.
शेतकरी समाजाची स्थिती अत्यंत दयनीय व हलाखीची आहे, यातून काहीतरी मार्ग निघायलाच हवा. त्यासाठी आपले सर्वस्व पणाला लागले तरी चालेल, अशातर्हेची मानसिक बैठक असणार्या काही मंडळींना तशी गरज वाटायला लागली आणि त्यातूनच शेतकरी संघटनेचा उदय झाला. शेतकर्यांचे लाचारीचे जिणे संपवून त्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे सन्मानाने व सुखाने जगता यावे याकरिता पक्ष, धर्म, जात वा इतर कोणत्याही भेदाभेदांचा अडथळा न येऊ देता प्रयत्न झाले पाहिजेत, असे ज्यांना-ज्यांना वाटले ते शेतकरी संघटनेचे पाईक झालेत.
शरद जोशींनी मांडलेले विचार आणि भारताच्या आर्थिक स्वातंत्र्याचे अर्थशास्त्र गावागावात जाऊन शेतकर्यांना समजावून सांगण्याचे कार्य गेली अनेकवर्षे संघटनेचे पाईक करत आहेत. त्यातून नव्या लढाईची बीजे रोवली जात आहे. शेतकरी समाजात पावलोपावली व्हिलेज-बॅरिस्टर असूनही "शेतमालास उत्पादनखर्च भरून निघेल एवढेसुद्धा भाव मिळत नाही म्हणून शेतीत अठराविश्व दारिद्र्य आहे" एवढा साधा उलगडा देखील त्यांना आजवर झालेला नव्हता. शेतकर्याच्या घरात जन्माला येणे म्हणजे कर्जात जन्मणे, कर्जात जगणे आणि कर्जात मरणे, हे विधिलिखित असते, यावर शेतकर्याचा ठाम विश्वास होता. त्याला ’सुखाने व सन्मानाने’ जगण्याचे स्वप्नही अजून पडलेले नसावे. तसे नसते तर शेतकर्याने नक्कीच काही ना काही हालचाल करून उपाय शोधलेच असते. नाकतोंडांच्या वर पाणी आले तर तो आत्महत्या करून मरायला तयार आहे पण रणांगणात उतरून लढायला तयार नाही, यातच सारे काही आले.
एवढ्या विपरित परिस्थितीत शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची बांधणी केली. शेतकर्यांना लढाऊ बाणा शिकवला. शेतीच्या अर्थशास्त्राची शास्त्रशुद्ध पायाभरणी केली. मोठमोठ्या अर्थशास्त्र्यांना झेपणार नाही असे अर्थशास्त्र शेतकर्यांच्या भाषेत शेतकर्यांना समजावून सांगितले. हे काम नक्कीच सोपे आणि सहजसाध्य नव्हते. महात्मा गांधींना स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करून स्वातंत्र्यचळवळ उभारणे सोपे गेले कारण देशाला स्वातंत्र्य मिळाले तर सत्तेची खुर्ची आपल्याच ताब्यात येईल याची खात्री बाळगणार्या व त्यासाठी गुढघ्याला बाशिंग बांधून तयार असणार्या पुढार्यांच्या फळीचा त्यांना भक्कम पाठिंबा लाभला होता. याउलट शरद जोशींचे तत्त्वज्ञान स्वीकारले तर शेतकर्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळून राजकीय सत्ताकेंद्रेच प्रभावहीन होण्याची भिती या राजकीय मंडळींना कायम वाटत आली आहे. शेतकर्यांची लाचारी संपून जर तो स्वावलंबी झाला तर राजकारणाचा पायाच ढासळेल म्हणून कोणताही मजबूत राजकीय नेता किंवा पक्ष कधीच शरद जोशींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दलित समाजात जागृती घडवून आणणे तुलनेने सोपे गेले कारण दलित समाजाचा सवर्णांकडून झालेला छळवाद याला दलीतसमाज आधीच कंटाळला होता आणि त्यातूनच त्या समाजात सन्मानाने जगण्याची प्रेरणा जागृत झालेली होती. शिवाय आंबेडकरांनी ज्या समाजासाठी कार्य केले तो समाज त्यांच्याच जातीचा होता. दलित समाज सर्वच जातीमध्ये विखुरलेला नव्हता. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला वर्णसंघर्षाची धार प्राप्त झाली. मात्र शेतकरी चळवळीबाबत असे म्हणता येत नाही. शेतकरी समाज अनेक जाती-धर्मामध्ये विभागला असल्यामुळे या चळवळीला वर्गसंघर्ष किंवा वर्णसंघर्ष अशी जोडही मिळाली नाही. या अनुषंगाने विचार केला तर या जातिव्यवस्थेमुळे संघटनेला काही फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक झाले आहे. जातीच्या आधारावर संघटनेत फूट पाडण्याचे काही राजकीय पक्षांकडून वेळोवेळी जाणीवपूर्वक प्रयत्न झालेले आहेत. त्या प्रयत्नांना प्रतिसाद देवून दुसर्या व तिसर्या फ़ळीतील नेते संघटनेला रामराम ठोकून अन्य पक्षात गेलेलेही आहेत. मात्र; वैचारिक मतभेद झाल्याची सबब पुढे करून शरद जोशींना सोडून जाणारे तुरळक अपवाद वगळता बहुतेक सर्व थेट आपापल्या जातीच्या नेत्यांच्या कळपातच का जातात, हे सुद्धा एक न सुटणारे कोडेच ठरले आहे.
या सर्व पार्श्वभूमीचा विचार केला तर शेतकरी समाजासाठी कार्य करणे हे तुलनेने अधिक कठीण काम असले तरी ऐतिहासिक आणि महानकार्य आहे, याची खूणगाठ मनाशी पक्की बांधून घेणे गरजेचे आहे.
- गंगाधर मुटे
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
फेसबुक लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/posts/1933390160018996
शेतकरी तितुका एक एक!