प्राक्तन फ़िदाच झाले : गझल ॥२४॥
प्राक्तन फ़िदाच झाले यत्नास साधताना
मोती पुढ्यात आले वाळूस गाळताना
शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली तारुण्य जाळताना
हलक्याच त्या हवेने का कोसळून जावा ?
हेका उगीच होता तो स्तंभ बांधताना
पिकल्या फ़ळास नाही चिंता मुळी मुळीची
दिसलेच ना कधीही हितगूज सांगताना
द्रव्यापुढे द्रवीतो का कायदा म्हणावा?
नेमस्त गांजलेले कानून पाळताना
आता ’अभय’ जगावे अश्रू न पाझरावे
आशेवरी निघावे ही वाट चालताना
- गंगाधर मुटे 'अभय'
=÷=÷=÷=÷=
एक/तीन/दोन हजार दहा
(वृत्त - आनंदकंद )
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
प्रतिक्रिया
Facebook Link
Facebook Link
https://www.facebook.com/gangadharmute/posts/pfbid02t6Wt3BRVZLQohxyqzbf9...
शेतकरी तितुका एक एक!