Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




हतबल झाली प्रतिभा

लेखनप्रकार: 
गद्यलेखन स्पर्धा-२०१६
लेखनविभाग: 
अनुभवकथन

हतबल झाली प्रतिभा

प्रसंग दिनांक ०१-१०-२०१६ : रात्रीचे १ वाजून ३४ मिनिटे झाली आहेत. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ मध्ये सहभाग नोंदवण्याची घडी उलटून गेली आहे. या स्पर्धेत मला एक शेतकरी गीत द्यायचे होते पण प्रतिभाच हतबल झाल्याने स्फूर्ती येऊन शब्द सुचायलाच तयार नाहीत. नको तेव्हा वारंवार उतू जाणारी प्रतिभा गेल्या काही महिन्यापासून पदरामध्ये मान खुपसून निवांत पडली आहे. स्वेच्छेने हवी तशी मुक्त विहरणारी प्रतिभा एका ध्येयपूर्तीच्या चाकोरीत शिस्तबद्ध चालून कसोटीच्या टोकावर आव्हान स्वीकारायची वेळ आल्यावर कशी असहाय आणि दीनवाणी होऊ शकते, याची मी आज पुरेपूर अनुभूती घेत आहे.
=======
 
प्रसंग ३ सप्टेंबर २०१५ चा : स्थळ पुण्याजवळील चाकण येथून ९ किमी अंतरावरील महाळुंगे येथील हॉटेल पॅराडाझज, निमित्त युगात्मा शरद जोशींच्या ८० व्या वाढदिवसाचे. त्यांच्या हयातीत झालेला हा शेवटचा वाढदिवस. कार्यक्रम संपवून सज्जनगडला जाण्यासाठी गाडीकडे निघालो असताना चालताचालताच युगात्मा शरद जोशी मला म्हणाले, "तू मला शेतकरी संघटनेसाठी एक कविता लिहून दे" मी लगेच तत्परतेने हो म्हणालो पण कविता कशी हवी? असा लागलीच उलट प्रश्न मी त्यांना विचारू शकलो नाही. त्यांची प्रकृती अस्वास्थ्यता बघता त्यांना एक-एक शब्द उच्चारणे कठीण जात होते. चालताचालता बोलणे तर फारच कठीण जात असल्याने मी स्वाभाविकपणे विचार केला की त्यांना या विषयी जरा निवांतपणे विचारूयात. त्यांनी "तू मला शेतकरी संघटनेसाठी" असे वाक्य वापरल्याने त्यांना कशी कविता हवीय, थीम काय असावी, आशय काय असावा, रस कोणता असावा.... इत्यादी त्यांच्या कल्पना काय आहेत, हे कळणे गरजेचे होते. सज्जनगडला आम्ही एकत्र असून सुद्धा मला त्यांना विचारणे शक्य झाले नाही. नंतरच्या काळात तर त्यांची प्रकृती आणखीच खालावत गेली. त्यानंतर दोनदा भेटी होऊनही विषय काढताच आला नाही.
 
         १० नोव्हेंबर २०१५ ला दुपारी ते अत्यवस्थ असल्याचा संदेश आल्याने रवीभाऊ काशीकर, सरोजताई काशीकर, सुमनताई अग्रवाल, शैलजाताई देशपांडे, पांडुरंग भालशंकर आणि मी लगोलग रात्रीच्या फ्लाईटने पुण्याला पोचलो. रुबिया हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर तशा अवस्थेत त्यांना काही विचारणे शक्यच नव्हते.... याची पूर्व कल्पना आलीच होती. मी त्यांना भेटायला रूममध्ये गेलो तेव्हा ते गाढ झोपेत असावे, असे वाटले. त्यांना आवाज देऊन जागवण्याचा किंवा त्यांची विचारपूस करण्याचेही प्रयोजन नव्हते. एखाद्या आराध्य दैवतासमोर निस्तब्ध व निश्चल उभे राहावे तसा मी उभा राहिलो. भेटीची निश्चित वेळ संपल्याने माघारी वळलो. दाराकडे निघत नाही तोच पुसटसा आवाज आला. मागे वळून बघितले तर ते “माझी कविता आणलीस का?”असे पुटपुटले. डोळे मिटलेलेच होते. मी लगेच उत्तरलो “होय साहेब, कविता लिहून तयार आहे. तुम्ही ठीक झाले की तुम्हाला ऐकवतो. तो पर्यंत एखाद्या योग्य संगीतकाराकरवी छानशी चाल वगैरे लावून घेतो.” त्यावर पुन्हा ते काहीच बोलले नाही आणि डोळेसुद्धा उघडले नाही.
 
          मी निखालस असत्य बोललो होतो, कारण मी कविता लिहिलेलीच नव्हती. मी निखालस असत्य बोललो याची मला खंत नाही कारण त्याक्षणी जे बोलायला हवे होते तेच मी बोललो होतो. मी असत्य बोललो असलो तरी योग्य वेळी योग्य तेच बोललो होतो. पण बोच आणि शल्य हे आहे की यातून आता उतराई कसे व्हायचे? कशी लिहायची “त्यांची” कविता? त्यांना काय हवे होते याचे अंदाज आणि आराखडे बांधायचे तरी कसे? मी आतापर्यंत मला सुचल्या तशा ५०० पेक्षा जास्त कविता लिहिल्या आहेत. त्यापैकी बहुतांश कविता त्यांनी वाचल्याच होत्या. “रानमेवा” काव्यसंग्रहाला तर त्यांनी प्रस्तावनाच लिहिली होती. तिन्ही पुस्तकांचे प्रकाशन त्यांचेच हस्ते झाले होते. मी आजवर लिहिलेल्या कवितांपेक्षा काहीतरी वेगळे त्यांना हवे होते आणि त्यांच्या कल्पनेतील कविता मी शेतकरी संघटनेसाठी लिहू शकेन, एवढी माझी योग्यता आहे हे त्यांनी जाणले असल्यानेच ही जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली असणार, हेही उघड आहे.
 
            पण आता सारेच संपले आहे. त्यांच्या कल्पनेतील कविता लिहून काढणे ही बाबच इतिहास जमा झाली आहे. मात्र मी त्यांच्या कल्पनेतील कविता लिहू शकणार नसलो तरी दिलेल्या शब्दातून उतराई होण्यासाठी शेतकरी संघटनेसाठी एक कविता लिहून देणे, एवढी नैतिक जबाबदारी तर माझी आहेच आहे.

            पण; गेल्या काही महिन्यापासून प्रयत्न करूनही ’ती’ कविताच सुचत नाही आहे. जोपर्यंत ही कविता लिहून होत नाही तोपर्यंत दुसऱ्या कुठल्याही कविता लिहायच्या नाहीत, असे बंधन मी स्वतःवर लादून घेतले आहे पण काहीच उपयोग होत नाही आहे. स्पर्धेच्या निमित्ताने तरी लिहिणे होईल असे प्रयत्न केले पण निष्फळ गेले आहेत. प्रतिभेला कड येत नाही आणि शब्द काही स्फुरत नाही, अशी स्थिती झाली आहे.
 

- *गंगाधर मुटे*
~~~~~~~~~~~~~~~~~

Share

प्रतिक्रिया