Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***कृषीसंस्कृतीचा लोककवी - इंद्रजित भालेराव

कृषीसंस्कृतीचा लोककवी - इंद्रजित भालेराव

                 कवी इंद्रजित भालेराव यांना त्यांच्या सर्जनशील साहित्यनिर्मितीसाठी नुकताच एक लाख रुपयांचा लाभसेटवार पुरस्कार जाहीर झाला आहे. २९ जानेवारी रोजी तो त्यांना परभणी या त्यांच्या गावी समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. त्यानिमित्ताने गावच्या अस्सल मातीशी नातं सांगणाऱ्या, शेतकऱ्यांच्या काबाडकष्टांना आपल्या कवितेतून उद्गार देणाऱ्या या कवीविषयी.. 

                  इंद्रजित भालेराव हा कृषीपंढरीचा कवी महाराष्ट्राला गवसला त्याची कथा मोठी सुरस आहे. १९८५ च्या दरम्यानचा काळ असेल. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचं एक नवलेखक शिबीर कोल्हापूरच्या पन्हाळगडावर सुरू होतं. त्यात भालेराव शिबिरार्थी म्हणून सहभागी झाले होते. कवितांचं सादरीकरण सुरू होतं. भालेरावांची पाळी आली. त्यांनी एक कविता सादर केली. त्यांच्या कवितेत नवशिक्षित शेतकरी दाम्पत्याचं वर्णन होतं. नवविवाहित कुळंबीण आपल्या काबाडाच्या धन्याला सांजच्या पहारी लवकर घरी येण्याचं निमंत्रण कसं देते, हा प्रसंग भालेराव कवितेतून मांडत होते. नवविवाहिता.. ती पण खेडय़ातली.. भरलेलं घर.. घरी वडीलधाऱ्या माणसांसमोर नवऱ्याशी बोलायची सोय नाही. आणि शेतशिवारात आपला शेतकरी कायम गावगडय़ांच्या गराडय़ात.. तिथंही संवादाची सुतराम शक्यता नाही.. तेव्हा तू आज लवकर घरी ये, असा निरोप आपल्या नवऱ्याला भाकरी वाढताना ती अबोलपणे देते.. इतरांच्या भाकऱ्या आणि नवऱ्याची भाकरी यात छोटासा फरक असतो.. नवऱ्याच्या भाकरीला कुंकवाचा इवलासा टिळा लावलेला असतो.. हा सूचक सांगावा नवऱ्याला न सांगता कळतो नि तो सूर्य बुडायच्या आधीच औत सोडतो.. हे निवेदन श्रोत्यांमध्ये बसलेले एक प्रकाशक ऐकत होते. त्यांना या कवीमध्ये 'स्पार्क' दिसला. त्यांनी भालेरावांना गाठलं. त्यांच्या प्रकाशित-अप्रकाशित कविता जमवायला सांगितलं. आणि १९८९ ला त्यांचा 'पीकपाणी' हा पहिला कवितासंग्रह काढला.

                   .. आणि मग पुढे 'आम्ही काबाडाचे धनी' (दीर्घ कविता), 'दूर राहिला गाव', 'कुळंबिणीची कहाणी', 'रानमळ्याची वाट' (बालकविता), 'उगवले नारायण' (लोककाव्य), 'गावाकडं चल माझ्या दोस्ता' (कुमार कविता), 'गाई आल्या घरा' (ललित लेख), 'लळा', 'घरीदारी' (ललित लेख), 'भिंगुळवाणा' (कादंबरी), 'पेरा', 'टाहो', भूमीचे मार्दव (कविता) अशी त्यांची एकामागून एक पुस्तकं येत राहिली. पुढे त्यांनी संत जनाबाई, ताराबाई शिंदे, जिजाबाई यांच्यावर चरित्रात्मक लेखन केलं. बी. रघुनाथांची जन्मशताब्दी सध्या सुरू आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या समग्र लेखनाचं श्रीकांत उमरीकर यांच्या सहकार्याने संपादन केलं. त्यांच्या काव्यावर त्यांनी समीक्षात्मक लेखनही केलं आहे. 
                   परंतु भालेराव यांची मुख्य ओळख आहे ती कवितेसाठी. त्यांच्या कोणत्याही लेखनात कवितेचा पाझर आढळत नाही असं होतच नाही. हा कवी अबोधपणे सतत कवितेच्या शोधात असतो. हा कवी मातीत कुठंही वावरत असू दे, त्याचं मन कवितेच्या पिंग्यात झिंगत असतं असा माझा कैक वर्षांचा अनुभव आहे. म्हणूनच त्यांची कविता लोककविता ठरते. 
                  भालेरावांच्या कविता हजारो- लाखोंच्या सुरात गायल्या गेल्या आहेत. प्रसंग होता खानदेशच्या शेतकरी मेळाव्याचा. तिथे जमलेले शेतकरी कापसाचे चुकारे (देणं) एकरकमेनं व भावहमीनं मिळावेत म्हणून कापूस एकाधिकार खरेदी योजनेसंदर्भात शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत होते. गावागावाहून हजारो शेतकरी बैलगाडय़ांनी आलेले. शेतकऱ्यांचा अशा प्रकारच्या मेळाव्याचा पहिला अनुभव असावा. ते गावजत्रेसारखे इकडेतिकडे ऐसपैस पसरलेले. तेवढय़ात भालेराव माइक हातात घेऊन गाऊ लागले.. त्याबरोबर टाळ्यांचा नाद ठेक्यावर येऊ लागला. जमलेले हजारो शेतकरी एका तालात त्यांच्यामागोमाग गाऊ लागले- 
काटय़ाकुटय़ाचा तुडवीत रस्ता 
गावाकडं चल माझ्या दोस्ता.. 
शेतकऱ्यांना वाटलं, अरे, हे आपलंच पोर आपलं गाणं गातंय, तर आपण पण गाऊ या.
आणि मग ठरूनच गेलं की, भालेरावांच्या कवितेनं शेतकरी मेळावा सुरू व्हायचा आणि शरद जोशींच्या भाषणानं संपायचा. 
शरद जोशींना इंद्रजित भालेरावांच्या कवितेचं अप्रूप होतं आणि आजही आहे. एकदा तर ते हृदयाला हात घालणारी त्यांची कविता ऐकताना लहान मुलासारखे ढसाढसा स्टेजवर रडले. भालेराव गात असलेल्या कवितेतलं शेतकऱ्याचं पोर बापाकडे चिटाच्या सदऱ्याचा हट्ट धरतं. बापाकडे कापसाचे चुकारे थकलेले असतात. बाप शर्ट देऊ शकत नसल्याच्या त्राग्यानं पोराला बदाबदा बडवतो. 'तुझा तूच सदरा घे' म्हणून बजावतो. ते पोर गुरं राखत असताना झाडाला लागलेली बोंदरं (किडलेली, कमी कापसाची बोंडं) विकून चिटाचा सदरा घेतं. असं अस्सल दु:ख भालेरावच मांडू शकतात. म्हणूनच शरद जोशी म्हणाले होते, ''निर्विकारपणे दु:ख पाहण्याचं, ऐकण्याचं मन माझ्याकडे नाही.. तुम्हा साहित्यिकांच्या सहजतेने व्यक्त करायची ताकदही नाही. मग आम्ही काय करतो? आकडेवारीच्या आणि अर्थशास्त्राच्या आलेखामागे लपतो. शेतकऱ्याचं दु:ख आमच्या तब्येतीला सांगणं झेपत नाही. मग रडू येऊ नये म्हणून आम्ही आकडेवारी मांडतो.'' भालेरावांच्या काव्याचं यापेक्षा सुंदर शब्दांत मूल्यमापन, समीक्षा क्वचितच कुणी केली असेल. मातीतल्या माणसाची कविता समजून घ्यायला शिक्षण लागत नाही; लागतं- शहाणपण आणि संवेदनशील मन. अशी सारी माणसं भालेरावांची कविता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गात, गुणगुणत, वाचत असतात. 
                   भालेरावांची कविता म्हणजे कृषीसंस्कृतीचं आख्यान, भारूड, बखर काही म्हणा. त्यात शेत, गवत, जनावरं, वासरं, साप, गाव, पेरा, टाहो, खळं, मळा, माळ, शिव, शीळ, रान, घोंगडं, पाऊससरी, खुरपं, दोर, कासरा, बिंडा असं सारं येणारच. त्यांची कविता छोटय़ा प्रसंगातून मोठं काव्य, जीवन चित्रित करते. डाळ वाळत घातलेली असताना गाईचं खांड त्यात तोंड घालतं नि राखण करणारं पोरगं कसं भांबावून जातं, परीक्षेच्या धांदलीत गरम पाण्यात पेन धुताना त्याचं वितळणं, १५ ऑगस्ट- २६ जानेवारीच्या आदल्या दिवशी गडबडीत धुतलेले ओले कपडे इस्त्री केले की त्यांना आंबट वास कसा येतो, हे भालेरावांच्या कविताच सांगू शकते. एकाच वेळी जीवनाची त्रेधा नि परिस्थितीची तिरपीट वर्णनं तेच करू जाणोत. हास्य तर उभारायचं, पण त्यातला दु:खाचा तळ मात्र सोडायचा नाही, ही या कवीच्या कवितेची पूर्वअट असते. एकवीस पोरांचा शंकऱ्या महार रक्त ओकत राबत मरतो ते फक्त या कवीच्याच डोळ्यांना दिसतं. पुजाऱ्याची पोर दिव्यातलं उरलेलं तेल घेऊन गुजराण करते तेही देवाशी प्रतारणा न करता नि गुराख्याचं पोर उपाशी न ठेवता. रानभर भेदणारी ल्हावरं पाहावीत ती भालेरावांच्याच कवितेत. ही कविता रानफुलांच्या रंगांचं इंद्रधनुष्य रेखाटते नि चिवळ चिमणीची चिवचिवही टिपते. मोहळाच्या मधाच्या मधाळ वासानं ती गंधलेली आहे. या कवितेत पंढरीचा पांडुरंग आहे आणि महात्मा फुल्यांचा निर्मिकही. 'शेतकऱ्याचा आसूड' महात्मा फुल्यांनी वर्णिल्यानंतर जन्माला आलेला हा कवी. त्यानं साऱ्या कवितेत शेतकऱ्यांचे अश्रू पेरलेत.. उद्या सोन्याचं पीक यावं म्हणून!   
                या कवीला मांजराचं पिल्लू साद घालतं तसंच राघूचंही. 'इडापिडा टळो, बळीचं राज्य येवो' म्हणत रानोमाळ भटकणारा अनवाणी शेतकरी त्यांच्या कवितेत ज्या तन्मयतेनं चित्रित झालाय तसा तो दुसरीकडे सापडणं केवळ अशक्य. त्यांच्या कवितेचं बेणं म्हणजे अस्सल देशी वाण. खुरप्याच्या अणीवर शिवार पिकवणारा शेतकरी त्या कवितेत भेटतो. 'मोट झाली जुनी, इंजिनही जुने झाले, माणसांच्या भल्यासाठीच सगळ्यांचे येणे-जाणे' म्हणत भालेराव शेतीच्या बदलाचा इतिहास नोंदवतात. त्यांच्या कवितेत कृषीसंस्कृतीचा मांडव, उत्सव, जत्रा आहे नि दुष्काळ, रोगराईचं तांडवही आहे. उभ्या झाडाला वाळवी लागल्याचं पाहून धसका घेतलेली कुळंबीणसुद्धा आहे.
म्हणूनच शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रा. एन. डी. पाटील यांना भालेरावांची तुलना इंग्रजी कवी रॉबर्ट फ्रॉस्टशी करावीशी वाटते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या टेबलावर नेहमी रॉबर्ट फ्रॉस्टच्या खालील ओळी लिहिलेली टेबलप्लेट असायची- 
The woods are lovely dark and deep 
but I have promises to keep 
and miles to go before I sleep 
भारत हा शेतीप्रधान देश आहे. या देशातील शेतकऱ्यांचे आपण देणे लागतो याचं सदैव स्मरण राहावं म्हणून पं. नेहरू ही टेबलप्लेट ऑफिसातून घरी जाताना रोज वाचत. झोपण्यापूर्वी अजून आपल्याला दूरचा पल्ला गाठायचा आहे याचं भान राहावं म्हणून! कृषीकवीची ही ताकद असते- पंतप्रधानांची झोप उडवण्याची! भालेराव जेव्हा आपल्या कवितेत म्हणतात- 'कुणी यावा भगीरथ, गंगा आणावी गावात, आम्ही त्याच्याच नावात देव शोधू..' तेव्हा त्यांना हेच सुचवायचं असतं की, इतके पंतप्रधान आले-गेले, योजना आल्या, पण शेतकऱ्याच्या अंगणात गंगा वाहून आणणारा भगीरथ अजून जन्माला यायचा आहे. या कवीची कविता त्या स्वप्नांच्या मागे आहे. 'शब्दांनो मागुते या' या म्हणणाऱ्या केशवसुतांप्रमाणे. 'विकासापासून दूर राहिला गाव' ही खंत असलेली ही कविता जेव्हा पारामागं घोंगडी पांघरून बसलेलं सुख कल्पिते तेव्हा लक्षात येतं की, हा शेतकऱ्याला स्वप्न देणारा सौदागरही आहे. तो शेतकऱ्याला निसर्ग आणि देवावर भरवसा ठेवण्यापेक्षा हाताच्या रेघा निर्माण करण्यावर भर द्यायला सांगतो. 'आपला हात जगन्नाथ' हे या कवीचं जीवनसूत्र आहे आणि तत्त्वज्ञानही! 'गंगा मैली कुणी केली तुक्या' असा थेट तुकारामालाच हा कवी प्रश्न करतो, तेव्हा तो पिढय़ान् पिढय़ा शेतकऱ्यास नागवणाऱ्या व्यवस्थेकडे शोषणाचा सातबाराच मागत असतो. 'मातीतून जे जे उगवते वर, खरा तिथे तर धर्म आहे' म्हणणारे भालेराव 'माती हाच माझा मळा, शपथेचा गळा, शेत माझे' असं म्हणत शेतकऱ्यासाठी शेतच सर्वस्व असल्याचं सांगतात. ते हिरावून घेणारे हात प्रसंगी कलम केले पाहिजेत, हेही सांगायला ते विसरत नाहीत. आर्जवं केव्हा करायची आणि आरोळी केव्हा ठोकायची, याचा विवेक या कवीला आहे. कारण तो जगण्याच्या अविरत संघर्षांतून जन्माला आलेला आहे.

                                                                                                                                                                                                           
- सुनीलकुमार लवटे
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(दैनिक लोकसत्ता दिनांक २६ जानेवारी २०१३ वरून साभार)
Share

प्रतिक्रिया