नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पोळा अन ती
: रावसाहेब जाधव(चांदवड)
७०,महालक्ष्मी नगर,चांदवड,
जि.नाशिक ४२३१०१
९४२२३२१५९६/
rkjadhav96@gmail.com
“मंदे, आता कवर त्या घमिल्यात शेनाचं हात बुडवून बसनारेस? डाल ते बकरं, आन घरात ये लवकर. कवरबी चिटकून बस्ती एकच कामाला? बिकर पटकन.”
सडा टाखुन झाल्यावर हात धुवायला घमिल्यातल्या पान्यात बुडविलेत, हेही इसरून गेलेली मंदा आत्याबाईच्या वरडन्यानं भानावर आली. शेनाचे हात घमिल्यात कसेबसे खळबळले आन मनात सवत:ची चूक कबूल करत दूध सरलेले शेळीचे सड चीटून शेळीला हैराण करणाऱ्या बकरांला पकडून प्लास्टिकच्या कारेटखाली डालले. त्यावर जड दगड ठीवला.
“आत्याची काय चुक्ये म्हना! कवाधरून सडा टाक्तेय. आज जरा लवकर आवरून आत्याला मदत कराया पायजे.” असा ईचार करत मंदानं तोंडावरून पाण्याचा वल्ला हात फिरवला. पदरानं तोंड पुसत घरात गेली. कपाळावरली टिकली सावरायला मातीच्या भिताडात कोरून बसिवल्या आरश्यात चेहरा पाहायचा प्रीयत्न करू लागली. बराच येळ आरसा पुसत ऱ्हायली पर अंधुकल्या कोपऱ्यात चेहऱ्यावर मनातले भाव काय नीट दिसंना.
“मंदा?” आत्याबाईनच्या प्रीमळ हाकेनं तिचं चित वेधलं गेलं तव्हा आत्याबाई आपल्या कारागिरीची चुणूक दाखवत ढणढणत्या चुलीवर तापलेल्या खापरावरील मांडा उलटवत व्हत्या.
“काय वं आत्या?” मंदानं ईचारलं खरं पर तिचं मन आजून बी काबूत येत न्हवत. काळजाची धडधड कमी करायसाठी भूतकाळाला दूर लोटून मनाला पुन्ना वर्तमानात वढून आनण्याचे तिचे आटोकाट प्रीयत्न चालले व्हते.
खरं तर, दीड वर्सापुर्बीच मंदा या घरात लगन व्हऊन आली व्हती, पर तिच्या मनाच्या हिरव्या पानाला चावून घायाळ करणारा हा भूतकाळाचा जबडा दरवर्शी या दिवशी उघडत व्हता. सगळयांसाठी आनंदाचा, मातीला मन देणारा हा पोळ्याचा सन तिच्या मनाच्या मातीची पोत धुवून नेत व्हता.
शेतशिवारभर पसरलेल्या हिरवाईवर उंडारणारी मानसांची मनं गुरावासरांच्या सोबतीनं मोकळी हिंदकाळत व्हती. तुटपाणकळ्यामुळं नदीचं पाणी वाळूत दडून वाहू लागलं व्हतं. त्यामुळं यंदा नदीवर बैलं धुवाया नेनं शक्य न्हवतंच, म्हणूनच मंदाच्या नवऱ्यानं तिच्या धाकल्या दिराला सोबत घेऊन बैलं हिरीच्या धावंवरच धुवायचा बेत आखला. लाईट जायच्या आत त्यांना बैलं धुवायचे व्हते. आन तिसरा पारच्याआधी त्यांच्या शिंगांला हिंगुळ-बेगडं लावून सजवायचं काम उरकायचं व्हतं, म्हणून त्यांनी मोटार चालू करून पइपच बैलांच्या अंगावर धरून मनसोक्त बैलं भिजवले.
मंदा बाहेर आली. कशासाठी? खरं तर ते तिलाही कळत न्हवतं. तरीबी तिची नजर हिरीच्या धावावरंच रुतत ऱ्हायली. आनंदभरल्या मनाने आपला नवरा व दीर बैलांला कसं धुताहेतं हे पाहात आसताना पुन्ना एगदा आचानक भूतकाळाच्या काळ्या धडकांनी तिचं काळीज घायाळ करायला सुरवात केली. भूतकाळाच्या अधीन झालेली मंदा घरात आत्याबाईला सैपाकात मदत करायची हाये, हेबी साप ईसरून गेली. मस्तकातला भूतकाळ डोळ्यापुढंल्या वर्तमानाचे शेपूट पिरगाळीत मंदाच्या मनावर चाबकाचे वळ उठवितच ऱ्हायला.
खरं तर, मागचा सोम्मार हा सनबाजार व्हता. आत्याबाईसंगत मंदाबी बांगड्या भरायला गेली व्हती. तीथच शिप्याच्या दुकानात तिची आन आईची भेट झाली. मुलीसाठी साडी घ्यावी म्हणून आई बाजारला आल्याचं कळल्यामुळं मंदाच्या सासूनं तिला तिच्या आईच्या हावाली करून, सोबत आणलेलं डालकीभर माळवं ईकण्यासाठी बाजारतळात निंघून गेली. दुकानदारानं टाकलेल्या साड्यांचा ढिगारा चिवडताना त्या दोघीबी आपल्या काळजावर मनमोकळ्या डीजाइन आन पोत रेखाटत वढीतल्या गप्पागोष्टीनी रंग भरू लागल्या.
“आई पोळ्याच्या आदल्या दिसीच मुऱ्हळी पाठव बरं का. खूप आधी नको धाडू. दोन दिस आधी नाय पाठवायचे माला.” तिची माहेरी जायची वढ वाढलेली व्हती. कारणही तसेच व्हते. आई आजारी पडली व्हती तव्हा नवऱ्यासंग ती आईला उभर उभर भेटून आली व्हती पन या बी गोष्टीला आता उलटले व्हते स्सा महिने.
“आता कोण येईल बाई मुऱ्हळी? तूच सांग पावन्याला. द्या म्हना पोचून.” आईच्या उत्तरानं कधी न्हाय तो आज तिच्या मनावर वरखडा वढला गेलाच. तरीबी आपल्याला मूळ लावायला भाऊ नसल्याची खत तिनं काळजाच्या कोपऱ्यात लोटून दिली. तसं बी तिचं मन माहेरी खूप काय रमू शकत नव्हतंच. वयाच्या बाराब्या वर्शीच बापाला मुकलेली मंदा लगनाच्या दिसापर्यंत आईच्या उघड्या कपाळासोबत कष्ट सोसत ऱ्हाइली. माहेरच्या अंगणातल्या तुळशीपेक्शा सासरची तुळस तिला सुख देत व्हती. न्हाई आसं न्हाई. पर तरीबी तिच्या काळजातला तो खड्डा कशानंच बुजू स्यकत न्हवता. पदराच्या कितीबी गाठी सोडून फेकल्या अन आता नको त्या आटवनी म्हनून तोंडाला टाळं लावलं तरी काळीज मात्र न कटाळता त्या परसंगाला उखाड्यातल्या हाब्बूसारखं पाळत व्हतं.
ऐन पेरनीच्या हंगामात शंकरचा बैल पान लागून मेला. शंकर हा रघूचा एकुलता मुलगा. वाचन्यापुरतं शिकलेला. बापाला सरनावर वाटं लावून आल्या आल्या कारभाराचं जू आपल्या लाडक्या बैलांसंगत खांद्यावर घेतलं. वाट्याला आलेली शेती फुलवताना फुलासारख्या सेवंतासी लगन बी झालं.
ऐनयेळवर पेरनीची आडचण व्हायला नको म्हनून त्यानं नवीन बैल ईकत घ्यायचा ईचार सेवंताला बोलून दावला. “कशाला घाई करीत्या? घेऊ पुढं. सध्या कोनात तरी पडजी करून घ्या. सखा तात्याला बी एकच बैल हाय. त्याला इचारा.” सेवंताचं हे बोलनं शंकरच्या डोक्यात काय रुजलं न्हाई.
“जो-तो आपलं आधी पेरितो. दुसर्यांच्या कलानं नाय चालता येनार आपल्याला. आपली पाळी यवस्तोर पार वल उडून जाईल. आन पोळा बी आलाय जवळ, पोळ्याला एकटा बैल ववाळणं आपल्या नाय हिसोबात बसत.” बायकोला समजावत डोक्यातला ईचार पक्का करून रविवारच्या सकाळीच सखातात्याला सोबतीला घेतलं आन खेडगावच्या बाजारात बैल घ्यायला निंघून बी गेला. बाजारहून आलेल्या शंकरनं दुपारी चार वाजता खरुखरंच एक उमदा लाल रंगाचा खांदेदार बैल पीकअप गाडीतून उंच बंधणीवर उतरवला. बैल पाहण्यासाठी मळ्यातून गर्दी जमली. एका हुशार पैलवानानं एक हाताची दोन बोटं बैलाच्या नाकात घालून दुसऱ्या हातानं खालचा व्हट खाली लोटत बैलाच्या दातांची रचना दावली. सर्व्यांनी मंग त्याचे दात हिरड्या न्याहाळून वय ठरवलं.
“आजून कडदात करतोय.” सखा तात्याने आपला सौदा किती यौग्य आहे हे पटवण्याचा प्रीयत्न केला. बैलाला ववाळून सेवंता घरात गेली. शंकरनं आपल्या घरच्या काळ्या बैलाशेजारी नवा बैल खुट्याला बांधला. वळ्हईतून कडब्याची पेंढी वढली. कुर्हडीने खटाखटा तुकडे केले. तोडलेला कडबा कवळी भरून गव्हणीत नेऊन टाकला. नव्या बैलापुढे जरा जास्त लोटला. आन नव्या बैलाईषयी चर्च्या रंगात आलेल्या मळेकरांच्या बैठकीत जाऊन बसला. बारा वर्शाची मंदा नवीन बैलाच्या जवळ जाऊन त्याच्या नाकावरून घाबरत घाबरत हात फिरवायचा प्रीयत्न करू लागली. “याचं नाव काय ठिवायचं दादा?” मंदाच्या लाडिक्या प्रस्नावर शंकर हासला खरा पर बैल ईकत घेताना मूळ मालकानं ठीवलेलं नाव विचाराया ईसरला याचा खेदही वाटला त्याला.
“मंदे, तूच ठिव तं त्याचं नाव.” सखा तात्याने मंदाला सुचवल्यावर मंदानं तिच्या मनात रेंगाळणारं नाव सांगून टाकलं, “लाल्या.”
“चांगलंय चांगलंय.” म्हनत सखा तात्यानं पुरीला शबासकी दिली आन बाजारातल्या बैलांचं वर्नन करत, आपल्याला सौदा कसा परवडला, हे पटवून देत चालल्या बातांमंधी पुन्ना सभागी झाला. चहा पेऊन सर्व्यानी कपबशा जमिनीवर ठीवल्या आन आपापल्या वाटेनं आले व्हते तसे निघून बी गेले. सेवंता कपबशा उचलून घरात घेऊन गेली. शंकर उठला आन कडबा खाणाऱ्या लाल्याच्या पाठीवर थाप मारत त्याला दोन्ही हातांनी चोळून आपलं काळीजपिरेम त्यच्या नसानसात वतू लागला.
“मंदे, पान्याची बादली भरून आन. पाणी दावून पाहू.” हे ऐकून सेवंता पान्याची बादली घेऊन आली. लाल्यापुढे ठीवली. लाल्यानं बादली रिकामी केली. मंदा शेजारी उभी ऱ्हाऊन रिकामी व्हत जानारी बादली पाहात ऱ्हायली.
“लईच तहानलाय.” सेवंता
“बस झालं, उगाच उरी भरंल.” असे म्हणत शंकरनं सेवन्ताला आशा येळी जादा पानी पाजल्यावर व्हनाऱ्या पोट्फुगीची जानीव करून दिली.
“चाला, जेवून घ्या. कालवन उकळत आलंय.”
“तू भाकरी थाप. तुझा सैपाक व्ह्स्तोर मी याची टेस घेऊन पाहतो.” शंकरचा उतावळेपणा वाढत व्हता. निदान औताचे दोन वळणं करून पाहिल्याबिगर त्याला जेवण गोड लागणार नव्हतंच. शंकरने लाल्याचा आन काळ्याचा कासरा खुट्यापासून सोडला. दोन्हीच्या कासऱ्याची एकत्र गाठ मारली तोवर मंदानं भितीच्या खुटीवर टांगलेले शिवळा-जोते काढून बापाच्या हातात आणून दिले. लाल्या पुढं, काळ्या मागं अन स्वत: मात्र दोघांच्या मंधी कासऱ्याची मधली गाठ धरून खांद्यांवरल्या शिवळा-जोते सावरत वावरात पोचला. नागरतासाच्या वरंभ्यात पास घुसून पडलेल्या वखराचे उभे जू आडवे केले. त्यात शिवळा घातल्या. ते बैलांच्या खांद्यावर ठेवून यवस्थित जोते दिले. वखराच्या पाठीवर उभा ऱ्हायलेल्या शंकरच्या आख्ख्या भारासह मातीच्या पोटात रुतलेली पास वढायला बैलही सज्ज झाले. पांडात पावलं टाकत सगळ्या ताकतीनिशी दोन्ही बैलांनी एकजीवाने वखर वढत बांधापर्यंत नेला. पण पुढं काय फिसकटलं कळलंच न्हाई. मेराला वळण घेत असताना लाल्यानं मागच्या पायानं माती उकरायला सुरवात केली. शिवळ सांडली. जोतं निसटलं. यसनीचा कासरा नेमका त्याचयेळी माथूटीत गुतला. शंकरनं आख्खी ताकद लावून कासरा वढण्याचा प्रीयत्न चालवला. उपेग झाला नाही. लाल्याच्या डोळ्यांत लाली उतरली. तो शंकरवर चाल करू लागला. शंकर त्याची येसन धरून आवरण्याचा प्रीयत्न करत असतानाच एका धडकीत त्यानं शंकरला तासात आडवं पाडलं. ताकदवान शंकरनं त्याचे दोन्ही शिंगं आपल्या मजबूत हातात धरले. बचाव करू लागला. शेवटी शंकरच्या काळजात कळ उठली. मोठ्यानं वेदनादायक आरोळी ठोकली तव्हा लाल्याचा मांगचा पाय शंकरच्या पोटावर व्हता आणि लाल्याची शिंगं शंकरच्या हातातून सुटली व्हती. घरापसुन हे सर्व पाहणारी मंदा मोठ्यानं आरडू लागली. सेवंता घरातून भायेर आली. हातात काठी घेऊन धावत सुटली. शेजारचे मळेकरी धावत आले. लाल्याच्या धडका शंकरच्या छातीची हाडं कुस्करून टाकत व्हत्या. हातात येईल त्या लाकडानं जो-तो लाल्याला ढोसून दूर लोटायचा प्रीयत्न करत व्हता. काही जन त्याच्या अंगावर ढेकळांचा मारा करत व्हते. जरावेळाने लाल्याने हार पत्करली आणि माथ्याच्या कासऱ्यासह पळत सुटला. पापनी टेकायच्या आत दिसेनासा झाला. शंकरला मळेकऱ्यांनी उचलून घरी आनलं.
बेसूद्ध शंकरच्या शरीदावरून नजर फिरवत सखातात्यानं आपलं निदान मांडलं, “आवघड जागी पायाची खुर लागल्याली दिसतेय. चटकन उचला.”
शेवटची आशा म्हनून समजुतीखातर शेजारी ऱ्हानाऱ्या भिवरावच्या पिकअप गाडीतून शंकरला दवाखान्यात नेलं तसंच परतही आनलं. गावावर आवकळा पसरली.
आठच दिसांवर पोळ्याचा सन व्हता. पोळा आला तसाच गेला. सगळ्यानलाच सुतूक आसल्याने कोनी बी सन न्हाय केला.
“वयनी, झाली का घेऊन साडी? येवडा येळ काय करत्याय बाई? सारं दुकानच खर्दी करत्या काय मायलेकी?... चाल बाई लवकर. तिला बांगड्या भरायच्याय आजून.” थोडसं ईक्रीला आणलेलं माळव कसबसं ईकून आलेली मंदाची सासू शिप्याच्या दुकानात साड्या निरखीत बसलेल्या मायलेकींकडे पाहून म्हनली तव्हा मंदाची तंद्री भंगली. तिनं डोळे पुसले आन हातात येईल ती साडी आईच्या हातात दिली, “ही चांगलीये.”
“पटली ना तुला? तुलाच नेसाय्चीये.”
“हा.”
“चाल मंग.”
दुकानदाराशी साडीचा सौदा झाल्यावर साडी उचलून पिशीत कोंबत सेवंताने आर्जवी बोलीत विहीनबाईला साकडं घातलं, “बायसायब, मंदीला पर्वा द्या धाडून पाव्ण्यासंग.”
“धाडलं असत वयनी, पर इकडं तिचा पहिलाच पोळा हाय. सगळ्याईचं म्हणनं पडलं, या वर्सी तिच्या हातनच बैलं वावाळायचे. माझं काय बी म्हन्न नाय बाई. तू म्हणशील सासूच धाडत नही. पर त्याइनीच ठरीवलय. आपलं कोन ऐकतं आजकाल? वाटलं तं पोळा झाल्यावर देईल धाडून चार दिस.”
“तुमची सून, तुमाला वाटलं ते करा. माजं बी काय म्हन्न न्हाय बायसायब. पर आस आस्ती सनवाराची, म्हनून म्हन्ल.”
याउपर शिप्याच्या दुकानापसून कसाराच्या दुकानापर्यंत कोनीबी कोनाशी काहीच बोललं न्हाई. फक्त चालत ऱ्हायले.
पलिकडच्या गल्लीततल्या कसाराच्या दुकानात बसल्यावर दोघी विहिनींचे एकमत झालेल्या रंगाच्या बांगड्या मंदाच्या मनगटात चढवल्या गेल्या.
घरी आल्यावर बाजारातून आणलेला बैलांचा साज पाहण्यात मंदाचा नवरा व दीर रमून गेले. गोंडे, माधुटी, चौर, तोडे, हिंग्ळाचे डब्बे, बेगड, या सगळ्या वस्तूंचे आकार, रंग, गुफण पाहता पाहता जेवनेळ झाली. मंदानं वाढून दिलं. जेवन आवरल्यावर सारेजन आपापल्या बिस्तराकड गेले.
मंदाचा डोळा लागंना. डोळं मिटू लागलं की पोळ्याचा साज चढवलेला लाल्या समोर दिसायचा. आईचं पांढरं कपाळ दिसायचं. ती उगाचच सवत:च्या कपाळावरली टिकली बोटाने नीट चाचपून पाहायची.
“हातात काठी घेतल्याबिगर बैलं सोडत जाऊ नका.” नवऱ्याला कितीतरी येळा तिनं हाच सल्ला दिला व्हता.
“काय नाय गं, गरीब हायेत आपले बैलं. मी काय आजकाल सोडतो व्हय?. उगाच घाबरवतेय तू माला बी.” हेच वाक्य तिच्या नवऱ्यानं तिला तितक्या येळा थोड्याफार फरकाननं ऐकवलं व्हतं.
तरीबी ती सवत: बैल सोडून पाण्यावर घेऊन जायची. चारा टाकायची. नवऱ्याने बैलाजवळ जाउच नये आसं तिला वाटायचं. ‘आपण सवत: औताला जावं’ असही तिला कधी कधी वाटायचं. पर तिचं ते वाटणं तिला टाळणं भागच व्हतं. तरीबी औताला गेलेल्या नवऱ्याकडे ती शक्य तितक्या येळा बगून घ्यायची. कधी निन्दत आसताना कळ मोडण्याच्या भाण्याने उभी ऱ्हाऊन पाहून घ्यायची. कधी घरात आसली तर केरपुंजा टाकायच्या भाण्याने भायेर येऊन पाहून घ्यायची, पुन्हा घरात जायची आन घरातलं काम करू लागायची.
“ये बाई..., मंदे,... अगं ते भज्याचं पीट कालव त्या भगुन्यात.”
मंदाने ईळा घेतला आणि भूतकाळाच्या शिंगाचा शेंडा कापून फेकत गिलक्याच्या बारीक गोल चकल्या ती कापू लागली. लगोलग तिचे सरावले हात भजे काढयसाठी पातील्यात पीट बी भिजवू लागले.
“आटप लवकर... खुरपं घे आन आंगनात चार खड्डे खंद. त्याच्यात उडीद-जोंधळे टाक आन वरून शेणाच्या गोळ्यान नीट सारव. आता येतीलच पोरं बैल मिरऊन.” असे सांगत आत्याबाई गव्हाच्या पिठाचे वळलेले नऊ शेंगुळे गोल बांगडी करून चुलीतून ओढलेल्या विस्तवावर भाजू लागली. “हे शेंगुळे बैलांच्या शिंगात घालायचे. मग ववाळायचं.” सासूबाई मंदाला पद्धत समजून सांगत व्हत्या.
मंदा लगबगीने खुरपे घेऊन अंगणात गेली. खुरप्याच्या चोचीनं लहानशे खड्डे खंदून त्यात उडीद-जोंधळे पुरले. सारवले. घरात आली.
“खुटीवरलं सुपडं काढुन घे आन उभ्या पोत्यातून दोन चीटके गहू काढ त्यात.”
आत्याबाईच्या पुढयात मंदाने गहू घातलेले सूप ठीवलं. आत्याबाईनं त्यात देव्हऱ्यातलं निरंजन ठीवलं. पिठाचे शेंगुळे ठीवले. टोपल्यात घड्या घालून ठीवलेल्या मांड्यातून एक मांडा उचलून ठीवला. त्याचे घडीसह समान दोन तुकडे केले. एक रुपयाचं नाणं ठीवलं.
“मंदे, तुहं मंगळसूत्र ठीव याच्यात. पैसा आन सोनं नीट बैलाच्या कपाळाला लावाव. मंग आपल्याला बरकत व्हतीय.” आत्याबाईचे सांगनं पुरं व्हायच्या आतच मंदानं आपली मंगळसूत्राची पोत गळ्यातून काढून सुपात ठिवून दिली व्हती.
गळ्यातल्या घुंगुरमाळांचा आवाज आला. बैलं जवळ आल्याची ती कानगी समजून मंदानं एका हातात पाण्याचा भरलेला तांब्या व दुसऱ्या हातात सूप घेतलं आन आंगनाकडं येणाऱ्या बैलांच्या चालीपेक्षा नवऱ्याच्या हालचाली कौतुतिकानं नेहाळू लागली.
बैलं अंगणात येऊन उभे ऱ्हायले. मंदानं डोक्यावरला पदर सावरला. बैलांच्या पुढच्या पायांवर तांब्यातल थोडं थोडं पानी फेकलं. तांब्या खाली ठीवला. सूप हातात घेतलं. बैलाच्या कपाळाला हळदकुकू लावलं. नवरा आणि दिराला बी गंद लावला. पैसा व सोन्याचं मंगळसूत्र सोन्यासारक्या बैलांच्या कपाळाला लावून पुन्ना सुपात ठिवलं आन आर्धा मांडा उचलून ढवळ्या बैलाच्या तोंडात देऊ लागली तोच दुसऱ्या उतावळ्या बैलानं खाली दिसनाऱ्या सुपापर्यंत आपलं तोंड लांबवलं. सुपातला मांडा वढून गपना भरला.
“ वयनी, शिंग लागल... सरक सरक.” मंदाच्या दिराला थट्टा करायची लहर आली. मंदाच्या नवऱ्यानं ढल्याचा कासरा तारवला. ढल्यानं सुपातलं तोंड उचललं अन मांडा चघळत ऱ्हायला. मंदा मांगं सरकली. पाहाते तं काय.... तिला ढल्या बैलाच्या तोंडातून काही काळे अन दोन सोन्याचे मनी खाली वघळताना दिसले. मंदा वराडली. बैलांन पोत गिळली.
सुपातल्या मांड्यासंग मंदाची पोत मंगळसुत्रासअ बैलानं गिळल्याचं सार्यांनच्या लक्शात आलं. तव्हा पोत बैलाच्या पोटात पोचली व्हती.
पोत मिळवायच्या सगळ्या ईक्त्या सरल्या. पोत गिळलेला बैल येगळा बांधायचा आन आठुडाभर त्याचं शेन तपासायचं असं सगळ्यांच्या मतानं ठरलं आन मंदाच्या यंधळटपणावर तोंडसुख घ्यायच्या हेतूनं आत्याबाईनं मंदाला हाक मारली. “मंदे...”
पर..... मंदा ? ... मंदा आधीच घरात बेसुद होऊन कोसळून पडल्याचं दिसलं. मंदाच्या दिरानं देवाऱ्यातल्या देवाच्या भंडाऱ्याची चिमुट तिच्या कपाळाला लावली आन दातखिळी उचकायसाटी तिच्या तोंडात उचटनी घालू लागला.
मंदा दवाखान्यातल्या खाटंवर सुद्धीवर आली तव्हा शेजरीच उभ्या आसलेल्या नवऱ्याच्या हातावर आपल्या एका हाताची पकड घट्ट करत दुसरा हात कपाळावरल्या टिकलीवर ठीवून “लाल्या... लाल्या...” वरडत व्हती.
तिच्या वराडन्याचा जो-तो आपल्या आपल्या परीने आर्थ लावायचा प्रीयत्न करू लागला.
...................................
: रावसाहेब जाधव (चांदवड)
७०, महालक्ष्मी नगर, चांदवड
जि.नाशिक ४२३१०१
९४२२३२१५९६
rkjadhav96@gmail.com
प्रतिक्रिया
माझी कथा
नमस्कार!
सर्वांनी काळजीपूर्वक वाचावी अशी कथा पुढे ठेवली आहे।
रावसाहेब जाधव (चांदवड)
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद!
धन्यवाद!!!
रावसाहेब जाधव (चांदवड)
पाने