नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
"खाजगी दवाखान्यात जाण्याची आमची ऐपत नाही, म्हणून सरकारी दवाखान्यात आलो, एक दिवस ताप आली वाटलं जाता जाता चार गोळ्या तरी घ्यावं.. तुमचा रिपोर्ट देण्यात काहीतरी घोळ झालाय बघा ,मला कसा होईल कोरोणा...! आम्ही शेतात काम करणारी माणसं काल पावसात सोयाबीन काढलं म्हणूनच ताप आली असणार..!" शकुंतला कळवळून सांगत होती. तिच्या कडे बघून असं वाटत होतं की, कामाहून थेट ती इथेच आली आहे. तिचा नवरा तर डोक्याला हात लावून अगदी हतबल उभा होता.
पाहता पाहता community spread च्या स्टेज मध्ये आपण येऊन पोहोचलो होतो, तेव्हा जास्तीत जास्त रूग्नांचे निदान करण्यासाठी सरकारी दवाखान्यात पुर्ण वेळ एन्टीजन तपासणी सुरू करण्यात आली होती. कोरोणा सदृश्य लक्षणांच्या बाह्य रूग्न विभागातील (OPD) रूग्नांची ही rapid antigen तपासणी केली जात असे.
ऍटीजन तपासणीमध्ये शकुंतला चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, तिला आता कोरोणा केअर सेंटरमध्ये दहा दिवसांसाठी ऍडमिट करण्या करिता पाठविले होते.
पण काही केल्या ती येथे राहायला तयार होत नव्हती. शेतामध्ये शेतमजुरी करून खाणा-या त्या लोकांना, कोरोणा पेक्षा सोयाबीन चा हंगाम महत्त्वाचा होता. ऐन हंगामात मजुरी च्या वेळी ऍडमिट राहून कसं चालणार..? हा एक मोठा प्रश्न त्यांनी आमच्या समोर मांडला होता.. तिच्या प्रत्येक वाक्यासोबत ओघळणारे अश्रू विचार करायला भाग पाडत होते. शकुंतला च्या नव-याची टेस्ट निगेटिव्ह आली होती, तो तिला भरून आलेल्या डोळ्यांनी च धीर देण्याचा प्रयत्न करत होता.
"या वर्षी तुझा हंगाम बुडेल पण तुझा नवरा करेल की काम.. काळजी नको करू तू इथे राहून तब्बेतीचं पहा आधी.." मी तिला उपाय सुचविण्याचा प्रयत्न केला.
त्यावर ती म्हणाली, "मॅडम कोरोणा जगात जेव्हढा आहे त्या पेक्षा जास्त तो लोकांच्या डोक्यात आहे, मी इथं एडमिट म्हणल्यावर यांना कोण घेईल कामावर ? आता कुठं सगळं बरोबर होईल वाटत होतं.. लहान लहान लेकरं आहेत आमची, कधी मला सोडून राहिली नाहीत ओ.." म्हणत तिने परत एकदा पदराने डोळे पुसले. सर्व शक्यता पडताळून फक्त एकच मार्ग निघत होता तो म्हणजे तिनं इथंच एडमिट राहणे, रूग्णांसाठी isolation ची सुविधा होती पण त्या साठी लागणा-या तपासणी उपकरणांचा खर्च ही तिला न परवडणारा होता, घरी विलिनीकरणात राहून तिचं उद्दिष्ट देखील साध्य होणारं नव्हतं... "सकु तु थांब इथं नशीबानचं येळ आणली त्याला काय करणार." म्हणत तिच्या नवऱ्याने तिला दाखल करून घ्यायला सांगितलं.
दाखल केलेल्या रुग्णांचे नातेवाईक एक नव्हे शंभर प्रश्न विचारून डॉक्टर ला भांबावून सोडतात पण हा व्यक्ति मात्र त्याच्या पत्नीला दाखल करून जड अंतःकरणाने काहीही न विचारता निघून गेला, कारण आता त्याला त्याच्या समोर कोरोणा पेक्षा ही अवघड प्रश्न होते.
शकुंतला एकदमच शांत, विचारात गुंतलेली दिवसभर बसून राहायची. तिचा ताप ही कमी होत होता पण त्याच्याशी तिचं काहीही देणंघेणं नव्हतं. तपासणी झाल्यानंतर एखाद्या वेळी दुपारी रूग्णांच्या गॅलरीत सहज चक्कर मारली असता ती अजुनही रडताना दिसायची, तेव्हा आपणच या साठी जबाबदार आहोत की काय असं उगाचच वाटायचं...!
दहा दिवसांत एक-दोन वेळाच तिचा नवरा तिला भेटायला आला, त्यांच्याकडून त्याच्या घराबाहेर ग्रामपंचायतींनी लावलेल्या contentment Zone च्या board विषयी तिला कळालं, गावातील लहान मुलं तिच्या मुलांना खेळायला घेत नसतं. तिच्या नवऱ्याला देखील गावात कुठेच काम मिळतं नव्हतं.. कसंबसं काही लोकांकडून त्यांच्या जेवणाची सोय तो करत होता तिच्या म्हणण्याप्रमाणे, 'कोरोणा हा लोकांच्या डोक्यात ही होताच ..!'
दहाव्या दिवशी तिला डिस्चार्ज साठी बोलवलं तेव्हा ही ती शांतच होती. शेवटच्या दिवशी आनंदात, टाळ्या वाजवत, फुलापाणांनी सत्कार होतं लोकांचे डिस्चार्ज होताना आम्ही पाहिले. " आज तु घरी जाणार आहेस आणि तरीही नाराज का आहेस?" मी तिला विचारलं. शकुंतला म्हणाली, " मॅडम ह्या कोरोणा पेक्षा मोठा आजार आमचा गेलेला रोजगार आहे. ज्या दिवशी मला काम मिळल त्या दिवशीच माझा रोग बरा व्हायला लागल..!"
डिस्चार्ज कार्ड न घेताच, गावापासून ब-याच दूर असणाऱ्या कोविड केअर सेंटर पासून शकुंतला भरभर पायीच निघाली. तिच्या मनात आता अनेक प्रश्न होते.. लेकरांची ओढ होती.. जगण्यासाठी चे मोठे कोडे होते.. तिला आता तिच्या ध्येया पर्यंत पोहचायला खूप अंतर कापावे लागणार होते..
तिच्या पाठमोऱ्या सडपातळ देहा कडे पाहताना लाॅकडाऊन मध्ये मैलोनमैल चालणारे, मिळेल तिथं मिळेल ते खाऊन पायी प्रवास करणारे लोक आठवले, त्यांच्या पायावर च्या जखमा आठवल्या आणि मनातल्या त्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या..!
कोरोणा ची आणखी एखादी लाट येईल की नाही..?
त्याचे किती दुष्परिणाम होतील..?
किती लोक आणखी मरतील..?
हे माहिती नाही, पण गरिबीची दुसरी लाट मात्र अनेक परिवार नक्कीच उध्वस्थ करून टाकेल.
कारण आज पुन्हा एकदा नव्यानं कळालं की, सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे मरण नसून भूक होय, आणि सगळ्यात भयंकर बिमारी म्हणजे गरीबी..!
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे.
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.
पाने