Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



आधुनिक वामन आणि आधुनिक बळीराजा

लेखनविभाग: 
शोधनिबंध
लेखनाचा विषय: 
शेतकऱ्याचा राजा बळीराजा
आधुनिक वामन आणि आधुनिक बळीराजा
 
"इडा पिडा जाऊ दे, बळीचं राज्य  येऊ दे" असं ग्रामीण स्त्रिया दिवाळीच्या दिवशी औक्षण करतांना म्हणतात. बळी हा शेतकऱ्यांचा राजा. वामन अवतार घेऊन विष्णूने बळीला पाताळात  पाठवले, ही कथा प्रसिद्ध आहे.   
"अति सर्वत्र वर्जयेत्" म्हणजे सर्वत्र अतिरेक टाळावा, या लोकोक्तीत "अति दानात् बलिर्बद्धो, अति दर्पात् सुयोधन:, विनष्टो रावणो मोहात् अति सर्वत्र  वर्जयेत" || असं सांगितलं आहे. अती मोहामुळे‌ रावण, अति द्वेषामुळे दुर्योधन, आणि अति दान देण्यामुळे बळी पराभूत झाले. 

     विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीला‌ पाताळात पाठवलं ही  पुराणकथा आहे. या कथेवर विश्वास ठेवतांना अवतार ही संकल्पना‌ समजून घ्यावी लागेल. भारतीय तत्त्वज्ञानात‌ सगळ्या सृष्टीत एकच चैतन्य शक्ती - ऊर्जा - एनर्जी आहे असे मानतात. त्या  शक्तीला ती सृजन करते तेव्हा  ब्रह्मा, स्थैर्य देते तेव्हा विष्णू आणि संहार करते तेव्हा शंकर म्हणतात. विष्णू हे स्थैर्याचं प्रतीक,  म्हणून समाजाला, प्रजेला स्थैर्य देणाऱ्या राजाला विष्णुरूप मानतात. चैतन्य शक्तीचे रूप बदलते, ती निर्माणही होत नाही‌, तिचा‌ नाशही‌ होत नाही. हे आजचे विज्ञानही सांगते. तसेच "विष्णू"  या स्थैर्य शक्तीचे वेगवेगळ्या‌  काळात वेगवेगळे‌ "अवतार"  झाले असे मानतात.अवतारकथा ही रूपके आहेत.

वामनाच्या हातावर दानाचे उदक सोडताना बळीराजा (चन्नकेशव मंदिरातील शिल्प)पहिल्या मत्स्य-अवतारात विष्णूने सत्यव्रत नावाच्या राजर्षीला‌, जल प्रलयाचे वेळी सगळ्या धान्यांच्या, औषधी‌ वनस्पतींच्या बिया, प्राणी आणि‌ सप्तर्षींना घेऊन होडीत बसण्याची सूचना केली. प्रलय ओसरेपर्यंत होडीचे रक्षण केले.  नंतर मत्स्यावतारातील विष्णूने सत्यव्रतला लागवडी योग्य जमिनीवर सुरक्षित उतरवले.  नंतरच्या काळात वेगवेगळ्या ‌प्रदेशातील मनुष्यांचे समाज-समूह स्थलांतरामुळे  समोरासमोर येत गेले. त्यांच्यात आधी संघर्ष, नंतर सामोपचार,  समन्वय, नंतर सहजीवन सुरू झाले. तेव्हा विचार, अनुभव, रिवाज आणि संस्कारांच्या देवघेवीचे‌  "समुद्रमंथन"  झाले. त्या वैचारिक‌  मंथनाच्या‌ वेळी विष्णूने सहनशील  संयमी, सहिष्णू तरीही वरकरणी कठोर असणाऱ्या‌ कासवाचे‌ रूप घेतले. तो कूर्मावतार. स्थिर झालेला समाज शेती करू लागला. जलप्रलयाच्या वेळी वराह अवतार घेऊन जणू बुडू लागलेल्या पृथ्वीला वराहाने थांबवून थोपवून मानवी जीवनाला स्थैर्य दिले.

नंतर विष्णूने नृसिंह रूप घेऊन  हिरण्यकश्यपाला मारले कारण तो स्वार्थी आत्मकेंद्री होता. तो यज्ञाचा विरोधक होता. यज्ञ म्हणजे समाजघटकांचे एकत्रीकरण.
१) पूजन - म्हणजे ज्ञानी, शूर, परोपकारी व्यक्तींचा सत्कार.
२)संगतीकरण - म्हणजे समाज घटकांचा संवाद, समस्यांचे निराकरण, सहकार्य, त्यातून  समाजाची समृद्धी.
३)दानसत्र - म्हणजे अज्ञानींना ज्ञान, निर्बळांना बळ म्हणजे पाठिंबा, निर्धनांना काम करण्यासाठी धन आणि कर्महीनांना काम दिले‌ जाई. त्या काळचा मनुष्य अग्नीपूजक होता म्हणून अग्नीपूजा करून यज्ञ -‌ आजच्या भाषेत, कार्यशाळा, प्रबोधन प्रशिक्षण वर्ग‌सुरू होत. समाजाच्या प्रत्येक‌ घटकाला उदरनिर्वाहाला काम मिळेल याची दक्षता यज्ञसंस्था घेत असे.

हिरण्यकश्यपाचा मुलगा प्रल्हाद. प्रल्हादाचा विरोचन. विरोचनाचा मुलगा बळी. बळीने अनेक यज्ञ  केले. दानशूर अशी त्याची ख्याती  होती. त्याच्या यज्ञात दान घेणाऱ्यांच्या समूहात वामनाला पाहून बळीचे गुरू शुक्राचार्य सतर्क‌ झाले. त्यांनी वामनाला  "ओळखले". शुक्राचार्यांनी बळीला परोपरीने समजावले. पण बळीला आपल्या दानशूरतेचा कैफ चढला  होता. बळीने शुक्राचार्यांचा दृष्टिकोन नाकारला, झिडकारला. (यात थोडे‌से नाट्य मिसळून एक रूपक तयार झाले. दानाचे उदक वामनाच्या हातावर पडू‌ नये‌ म्हणून शुक्राचार्य कीटक होऊन पाण्याच्या झारीत बसले. पण दान देणारच असे सांगून बळीने दर्भाची काडी झारीत खुपसली‌ आणि तिथे बसलेल्या  शुक्राचार्यांचा‌ एक डोळा फुटला. मराठीत "झारीतला शुक्राचार्य" म्हणजे कामात अडथळा आणणारी व्यक्ती या अर्थाने हा शब्दप्रयोग रूढ आहे.)

वामनही शुक्राचार्यांना "ओळखत" होता. त्याने शुक्राचार्यांचीही स्तुती केली. बळीवर तर स्तुतीचा वर्षाव केला. वामन म्हणाला "राजा तुझ्या वंशात कुणीच कृपण नाही. प्रल्हाद परम दानी. तुझे‌ पिता   विरोचन - यांना देवतांनी‌ ब्राह्मणवेष घेऊन त्यांचं आयुष्य मागितलं, तेव्हा दानशूर विरोचनाने ब्राम्हण वेषांतल्या देवतांना ओळखून सुद्धा आपलं आयुष्य देऊन‌ टाकलं. तूही त्यांचाच वंशज आहेस. मला तुझ्याकडून फक्त तीन पावलं जमीन हवी आहे. "शुक्राचार्यांनी बळीला पुन्हा सावध केलं" हा बटुरूपधारी विष्णू आहे. हा‌ दोन पावलातच पृथ्वी आणि स्वर्ग ताब्यात घेईल. तिसऱ्या पावलाची जमीन कोणती‌? सर्वस्व दान करूनही अपूर्ण दान दिल्याचा तुला दोष लावून विष्णू तुझी अपकीर्ती करील. यावर बळी म्हणाला "मी ....   प्रल्हादाचा वंशज आहे". बटुरूपात विष्णूंनी येणं म्हणजे माझ्या शौर्याला भिऊन, युद्ध टाळून माझ्या औदार्यामुळे मला भिक्षा मागणं! मग तर मी दान दिलंच पाहिजे. बली आणि त्याची पत्नी विन्ध्यावली, यांनी "दान" दिलं.

वामनाचं खरं रूप ओळखून बळीच्या सैन्यांनी देवतांशी युद्ध सुरू केलं. बळीने युद्ध थांबवलं.  "दान" मिळताच वामनाने मूळ विष्णुरूपांत येऊन पृथ्वी आणि स्वर्ग व्यापले. (बळीच्या डोक्यावर पाय ठेवल्याचा उल्लेख नाही) बळीची राज्यलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, सत्ता हिरावले गेले तरी तो‌ शांत आनंदी आणि धैर्यशील होता. त्याच्या धैर्याचे आनंदी असण्याचे कौतुक करून विष्णूने त्याला सुतल नावाच्या समृद्ध प्रदेशात पाठवले.आणि "तुझे राज्य स्वजन आणि ऐश्वर्याचं मी स्वत:  रक्षण करेन. मी तुझा द्वारपालच‌ झालो आहे." असं सांगितलं. अवतार प्रकरणात पुराणात असा उल्लेख आहे की विष्णू म्हणजे - सुस्थिर, सुदृढ, समृद्ध समाज! हजारो हात, हजारो पाय, हजारो मस्तकं, हजारो डोळे कान असलेले हे रूप उत्तम वस्त्र, मुकुट आणि कुंडलांनी सुशोभित आहे.  या रूपाला नारायण म्हणतात. हेच  रूप अनेक अवतारांचा अक्षय कोष आहे. याच रूपातून सारे अवतार प्रकट होतात. म्हणजे‌  समाजात परिवर्तन घडवून आणणारा समाजातीलच व्यक्ती असतो. हे झालं पुराणातलं कथानक. (संदर्भ- श्री महाभारत शांतीपर्व आणि श्रीमद् भागवत. दोन्ही महर्षी व्यासकृत.गीताप्रेस -प्रत.)

आता वर्तमानात बघूया. वामनाने बळीराजाचं राज्य हिसकावून घेतल्याचं समाजाला पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं. वामनाच्या धूर्तपणाची चीड १९८२ पर्यंत फारशी कुणाला आली नाही. युगात्मा शरद जोशींनी वामनाचे अनेक नवे अवतार आजच्या बळी राजापुढे मांडले पण सगळे बळीराजे पुराणातल्या वामनावरच तुटून पडू लागले. दसऱ्याला रावणाच्या, दिवाळीला नरकासुराच्या लाकडी, कापडी, कागदी पुतळ्यांचं दहन करून आपण स्वत:ला शूर समजू लागलो. आजूबाजूच्या रावण आणि नरकासुरांना विरोध करणं सुद्धा आपल्याला जमत नाही. मूळ घटनेत विष्णूने धूर्तपणे बळीचे जमिनीचे अधिकार काढून  घेतले. मुळात नसलेले परिशिष्ट ९ घटनेमध्ये घुसडून सरकारनेही शेतकऱ्यांचे जमिनीवरचे अधिकार काढून घेतले आहेत. विष्णू बळीच्या तथाकथित दरबारात द्वारपाल आहे. म्हणजे बळीच्या सगळ्या कार्यक्रमांवर कारभारावर विष्णूचे लक्ष आहे, विष्णूचेच निर्बंध आहेत. आजही  शेतमालाच्या खरेदी विक्रीवर आयात-निर्यातीवर सरकारी नियमच लागू आहेत. हे सगळे करतांना बळीची अतोनात स्तुती विष्णू करत आहे. सरकारही अन्नदाता, पोशिंदा म्हणून शेतकऱ्यांचे कौतुक करते आहे. विष्णूने बळीला राज्यातून विस्थापित करून स्वत:च्या अधिकारात असलेल्या सुतल प्रदेशात राह्यला पाठवले. कृषी अर्थ व्यवस्थेतून, अर्थसंकल्पातून, कृषिनीती धोरणातून शेतकऱ्याला पूर्णपणे विस्थापित करून  सरकारने अनुदानाच्या अधांतरी उसनवारीच्या आभासी आकडेवारीत शेतकऱ्याचं सुख ठेवलं आहे. तिसरं पाऊल ठेवायला जागा न दिल्याने बळीला‌ विष्णुस्तुती करणे अटळ आहे.

आजही ज्या कुणाचे सरकार असेल त्यांना मुजरे केल्याशिवाय शेतकऱ्यांची कामे होत नाहीत. बळीची राज्यलक्ष्मी आणि ऐश्वर्यलक्ष्मी विष्णूने हिसकवून घेतली. आज शेतकऱ्यांच्या घरची धान्य - लक्ष्मी अप्रत्यक्ष हिसकावून घेऊन ( शेतमालाचे भाव पाडून ) त्याला‌ अनुदान देऊन श्रमलक्ष्मीला क्षीण करणे सुरू आहे. आम्ही शेतकरी वर्तमानात लुटले जात आहोत आणि पुराणातल्या  लुटारूला झोडपत आहोत. आपण बळीचेच वंशज आहोत. आपल्याही आयुष्यात आपल्याला  भानावर आणणारे, वस्तुस्थितीची जाणीव करून देणारे, रोखठोक बोलणारे शुक्राचार्य आले. त्यांनी आपल्याला आपण कुणाकडून कसे लुटले जात आहोत हे सप्रमाण सिद्ध करून सांगितले. ते आपल्याला पटले. आपण स्वतंत्र होण्यासाठी लढण्याच्या आणा शपथाही घेतल्या. पण पुन्हा आपण लुटणाऱ्यांचेच कौतुक करू लागलो. कोणता लुटारू चांगला, कोणता लुटारू वाईट या मुद्द्यावर आपसात लढू लागलो. आधुनिक वामनांच्या बचावासाठी पुराणातल्या‌ वामनावर तलवार चालवू लागलो.

महात्मा ज्योतिबा फुल्यांचा आपण पराभव केला. वामन विष्णूच्या लुटारूंच्या टोळीत शिरकाव करून घेण्यासाठी आपण लाखालाखाचे मोर्चे काढू लागलो. काहीही करून तुमच्यात सामील करून घ्या असं वामन आणि विष्णूलाच विनवू लागलो.  महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या भटशाहीचे भेदक वर्णन वाचूनही आपण नवभटशाही उभी केली. आपलेच सगे-सोयरे नोकरशाहीत दाखल होऊन आपली लूट करत आहेत, हा त्या महात्म्याचा पराभव नव्हे काय?

स्वत:ला अजूनही फसवून घेणाऱ्या शेतकऱ्यांनी बळीच्या औदार्याची, शौर्याचीही विटंबना केली आहे. बळी जसा वामनाने केलेल्या स्तुतीने हुरळला तसे आपणही हुरळतो. "या‌ पाटील साहेब"  म्हटले की आपण कृषी केंद्रातून आपल्या जमिनीला अनावश्यक खते आणि पिकाला अनावश्यक औषधे, विक्रेत्यांच्या बोलण्याला भुलून पैसे खर्च करून घेतोच. राजकारणी आणि नोकरशाही तर फसवणारच! पण आपण का फसतो हा प्रश्न आहे. बळी सात चिरंजीवांपैकी एक आहे. माणूस ही जात पृथ्वीवर असेपर्यंत शेती आणि शेतकरी असणारच आहे. म्हणून बळी चिरंजीव आहे. हे चिरंजीवित्व सतत पराभूत होऊन पांगळेपणाने कसेतरी कंठायचे की स्वत:च्या पायावर ठामपणे उभं राहून, तर्कशुद्ध विचार करून खंबीरपणे निर्णय घेत लूट थांबवायची हे शेतकऱ्यांना ठरवायचे आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. युगात्मा  शरद जोशींनी म्हटल्या प्रमाणे नवीन तंत्रज्ञान हा दहावा अवतार आहे. तोच शेतकरी समाजाला स्थैर्य देणार आहे. धान्यलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी पुन्हा शेतकऱ्याच्या शेतात, घरात प्रसन्न  होणार आहेत. लूट थांबवण्यासाठी शेतकऱ्यांची एकजूट आवश्यक आहे.

- प्रज्ञा जयंत बापट

Share

प्रतिक्रिया