Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***ब. ल. नावाचा अखंडित झरा आज खंडित झाला

ब. ल. नावाचा अखंडित झरा आज खंडित झाला 
 

बब्रूवहन तामस्कर

ब.ल. अर्थात बब्रूवहन तामस्कर! शेतकरी संघटनेतील झऱ्यासारखा सदैव खळखळणारा व झुळूझुळू वाहत राहणारा अखंड प्रवाहित झरा!!
 
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि जम्मू असा ६ दिवसाचा प्रवास आटोपून आज घरी परत असतानाच बातमी येऊन धडकली की बलं गेलेत आणि बलंचा  साक्षात जीवनप्रवास क्षणात डोळ्यासमोर तरळून गेला. बलं म्हणजे शेतकरी संघटनेसाठी एक मजबूत आधारस्तंभ होते आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी अद्भुत आश्चर्य व अनुकरणीय व्यक्तिमत्व होते. शेतकरी संघटनेत संघटनेच्या आरंभापासूनच्या प्रवासामध्ये बलंसारखे व्यक्तिमत्व एकच आणि ते म्हणजे स्वतः बलं.
 
१९९०-९१ मध्ये बलं आणि मी आंबेठाणला सलग एक वर्ष एकत्र होतो. आंबेठाणला कायमस्वरूपी वास्तव्यास असणारे सोडले तर युगात्मा शरद जोशींच्या सानिध्यात सलग एक वर्ष ज्यांना राहायचं भाग्य मिळालं अशा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चारच व्यक्ती आहेत आणि त्या म्हणजे एक बलं, दुसरे अमर हबिब, तिसरे गंगाधर मुटे आणि चौथे कालिदास आपेट. एक वर्षाच्या सानिध्यात त्यांच्यात आणि माझ्यात बरेच स्नेहबंध निर्माण झाले, आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नाते तयार झाले. बलं म्हणजे एक निष्कपट, निर्मळ, प्रांजळ, पारदर्शी व्यक्तिमत्व होते. ते अजातशत्रू होते. ते फटकळ होते, स्पष्टवक्ते होते,  निर्भीड होते, मागे न बोलता थेट तोंडावर बोलणारे परखड स्वभावी होते आणि तरीही ते अजातशत्रू होते. संघटनेमधील कार्यकर्ते त्यांच्याकडे आदराने बघायचे तसेच काहीसे कुतुहलाने सुद्धा बघायचे. बलंची जीवनचर्या-जीवनशैली म्हणजे एक न सुटणारे कोडेच होते. बलंच्या जाण्याने शेतकरी संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्याला आघात पोचणे अगदी स्वाभाविक आहे पण यानिमित्ताने मला आज आणखी एका पैलूवर उघडपणे बोलावेसे वाटत आहे आणि बोलणे आवश्यक आहे, असेही माझे मत झाले आहे. 
 

Tamaskar

युगात्मा शरद जोशी पश्चात शेतकरी संघटनेमध्ये एक वाह्यात व अतार्किक परंपरा सुरू झालेली आहे. आलेल्या बातमीनुसार बलं १५ दिवसापासून आजारी होते. बलं आजारी होते हे आज सर्वांना कळले पण जेव्हा कळले तेव्हा ते निघून गेले होते. खरंतर राज्यभर पसरलेल्या शेतकरी संघटनेतील एखाद्या व्यक्तिमत्त्वाला जर धक्का लागला तरी ती बातमी होऊन राज्याचा संपूर्ण कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचायला हवी. आजारी असेल तर ती बातमी तर नक्कीच पोहोचायला हवी पण नेमके याउलट शेतकरी संघटनेत घडत आहे. एखाद्याचे आजारपण लपवले जात आहे. माहीत असूनही कुणी कुणाला खबरबात देत नाहीत. मला वाटतं की हे योग्य नाही. राज्यभर पसरलेल्या संघटनेत राज्याच्या दोन टोकातील दोन व्यक्तींमध्ये अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असू शकतात. अशा स्थितीमध्ये एखादा व्यक्ती गंभीर आजारी असेल तर त्याची भेट घ्यावी, निदान तो इहलोकातून चालता होण्यापूर्वी तरी त्याला एकदा आपल्या नजरेने बघावे अशी सामान्यपणे अनेकांची भावना असू शकते पण बातमी लपवल्यामुळे आता थेट *विनम्र श्रद्धांजली* इतकं टाईप करून सोशल मीडियावर टाकण्यापुरतंच भाग्य कार्यकर्त्यांच्या वाट्याला येत आहे. कुणाच्या आजारपणात कोणी भेटायला आलं तर त्या आजारी व्यक्तीच्या देखरेखीवर असणाऱ्यांना त्रास होतो हे खरे असले तरी तेवढ्यासाठी बातमी लपवणे योग्य नाही, असे माझे मत आहे. 

Tamaskar

 
आज आणखी एक गोष्ट स्पष्टपणे मी मांडली पाहिजे की युगात्मा शरद जोशींसारख्या महान युगपुरुष व्यक्तिमत्त्वाच्या आजाराची बातमी देखील लपवण्यात आली होती. राज्यातीलच नव्हे तर देशातील शेतकऱ्यांना शरद जोशी गेल्यानंतरच त्यांच्या आजारपणाची बातमी कळली इतके त्यांचे आजारपण गुप्त ठेवण्यात आले. आजारी व्यक्तीची देखरेख करणारे लोक आजारी व्यक्तीचे स्वामी होतात का कि त्यांनी आजारी व्यक्तिमत्वाच्या खाजगी जीवनप्रवासातील सुद्धा निर्णय घेऊन टाकावेत? आपल्याला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सूर्य झाकून संपूर्ण जगालाच प्रकाशापासून वंचित करावे? आजारी व्यक्तीची भेट घेण्यास डॉक्टरांनी जर मनाई केली असेल तर बातमीमध्ये तसा स्पष्ट उल्लेख करून लोकांना भेटीला येण्यापासून मज्जाव करता येतो,  पण निदान माहिती तर गेलीच पाहिजे की नाही? शेतीचा प्रश्न आर्थिक असल्याने शेतकरी आंदोलन निखळ आर्थिक पायावर उभे राहणे व त्यात भावनिकतेला अजिबात स्थान नसणे अपरिहार्य आहे पण; आंदोलनात काम करणाऱ्या व्यंक्तींचे संबंध आर्थिक पायावर उभे नसून प्रेम, जिव्हाळा व भावनेवर उभे आहे, राज्यातील शेतकरी संघटना म्हणजे एक कुटुंब असून रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट नाते परस्परांत निर्माण झाले आहे. माणसाने माणसाशी मानवतेच्या पातळीवरच वागायला हवे की नको. यावर चिंतन होणे गरजेचे आहे..
 
युगात्मा शरद जोशींना लाखोंनी अनुयायी मिळालेत पण या लाखोंच्या भाऊगर्दीतही बलंचे स्थान आगळेवेगळे होते, निष्ठावंतांच्या यादीत बलंचा फार वरचा क्रमांक होता. एक लढवय्या, एक वक्ता, एक आंदोलक आणि एक प्रबोधनकार म्हणून बलंचं व्यक्तिमत्व जगावेगळं होतं. त्यांच्या जाण्याने शेतकरी संघटनेची कधीही भरून न निघणारी हानी झालेली आहे. 
 
Bouquet बलंना विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली  (आणखी काय करू शकतो आपण?) Bouquet
 
गंगाधर मुटे 
प्रदेशाध्यक्ष 
माहिती तंत्रज्ञान आघाडी
शेतकरी संघटना, महाराष्ट्र 

 

Share