नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
(दि. २१ जुलै २०११ ला महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रकाशित झालेला लेख)
शेतकऱ्यांच्या आंदोलने सारा देश एकेकाळी हलवून सोडणारे शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेच्या कामाला तूर्त विराम दिला आहे. संघटनेचे मुखपाक्षिक 'शेतकरी संघटक' गेले एक वर्ष नव्या रूपात निघते. या नवलाईचा पहिला वाढदिवस त्यांच्या उपस्थितीत होणार होता. पण ते येऊ शकले नाहीत. त्याआधीच दिल्लीत ते आजारी पडले. त्यातून उठताना त्यांनी संघटनेच्या कामातून किमान वर्षाची 'सबॅटिकल' घेण्याचा विचार केला. खुले पत्र लिहून हा निर्णय सर्वांना कळविला. जोशी यांचे वय, प्रकृती आणि त्यांचा अभ्यासाचा नवा अजेंडा पाहता पूर्वीच्या जोमाने ते पुन्हा संघटनेचे काम करतील, अशी शक्यता मावळली आहे. त्या अर्थाने एक युग समाप्त होते आहे.
गेला बराच काळ शेतकरी संघटनेला नाराजीने, फुटीने, दुर्बलतेने आणि निष्क्रियतेने ग्रासले आहे. वीस वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या जीवनात संघटनेला जे अटळ महत्त्व होते, ते आज नाही. त्यातच राजकीय संसर्ग झाला. हे वर्तमान असूनही शरद जोशी आणि शेतकरी संघटना यांचे स्वातंत्र्योत्तर काळातले कर्तृत्व अभूतपूर्व आहे. शेतकऱ्याचे जगणे त्यांनी प्रथमच ऐरणीवर आणले. सारा देश, तो चालवणाऱ्यांची अर्थकारणी समज व शेतीचे प्रचलित अर्थशास्त्र हे सारे गदगदा हलवले. नव्या आर्थिक तत्त्वज्ञानाची मांडणी केली. व्यूहात्मक (स्ट्रॅटेजिक) तडजोडी केल्या; पण तत्त्व-वैचारिक (आयडियॉलॉजिकल) चौकट सोडली नाही. जातग्रस्त समाजकारणाला तर जाता जाताच चार तडाखे दिले. लक्षावधी कास्तकारांच्या पिचलेल्या मनांमध्ये नवी पेरणी केली. नवा इतिहास घडवला.
आज शरद जोशी प्रसिद्ध तत्त्वज्ञ फ्रान्सिस फुकुयामा यांचा संदर्भ देत नव्या वैचारिक साहसाची मांडणी करत आहेत. फुकुयामा यांनी दोन दशकांपूर्वी 'द एन्ड ऑफ द हिस्टरी अँड द लास्ट मॅन' या पुस्तकात लिबरल लोकशाही हाच मानवी इतिहासाचा अखेरचा मुक्काम, असे म्हटले होते. या लोकशाहीत 'सारे मनुष्यप्राणी समान' असे गृहीत धरले आहे. ते सर्वांनी तत्त्वत: मान्य करणेही. मात्र, झपाट्याने प्रगत होणारी जनुकविद्या तसे मानणार नाही व तो 'लिबरल डेमॉक्रसी'ला धोका होऊ शकतो, अशीही शक्यता फुकुयामा यांनी पुढच्या 'अवर पॉस्ट्युमन फ्यूचर' या पुस्तकात व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर शरद जोशी जनुकांचे स्पर्धात्मक वागणे आणि जनुकांच्या ताकदीवर घडणारे मनुष्याचे भविष्य यांचा अभ्यास करणार आहेत. त्यांच्या मते 'सारे समान' हे प्रमेय एकदा संपले की, 'स्वतंत्रतावादी लोकशाही'वरचे संकट दूर होते. मात्र, जनुकांची रचना, त्यांची स्पर्धात्मक शक्ती यांचा काही संबंध पूर्वजन्म, पुण्यकर्म यांच्याशी आहे का, याचेही कुतूहल त्यांना वाटते. अध्यात्म व जडवाद यांचा उचित संगम झाला तर फुकुयामा यांना वाटणारी 'एन्ड ऑफ हिस्टरी'ची भीती दूर होऊ शकेल का, असा प्रश्न त्यांना पडतो. आयुष्याच्या संध्याकाळी नव्या तत्त्वज्ञानाच्या मांडणीची ओढ वाटून या 'योद्धा शेतकऱ्या'ने रणांगणातून निवृत्ती पत्करली आहे. त्यांच्या अभ्यासाने नव्या दिशा उजळोत!
- सारंग दर्शने
-----------------------------------------------------------------------------------------------------