नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गद्यलेखन स्पर्धा - २०१९
विभाग : कथा : कर्जाच्या विळख्यात शेती
मातीमोल आयुष्य
विठोबा ! नावासारखाच साक्षात विठुमाऊलीच रूप ! सावळा रंग , कंबरेला सफेद धोतर , पायात कोल्हापुरी आपल , अगदी साधी राहणी . दिवसभर शेतात राब - राब राबायचे आणि संध्याकाळी विठोबाच्या देवळात भजनाला हजर राहायचे . रात्री चटणी - भाकरी खाऊन , हाताची उशी करून , फाटलेली गोधडी पांघरून झोपी जायचे . हा विठोबाचा रोजचा दिनक्रम . आणि यात त्याच कुटुंब त्याची साथ द्यायचा . त्याची बायको जणा आणि दोन मुलं महेश , रुपाली . खूप गोड कुटुंब .
विठोबाचे जीवन बऱ्यापैकी चालले होते . दोन वेळची भाकरी , अंग झाकण्यापुरते कपडे , घरखर्च कसाबसा भागत होता . विठोबा खूप मेहनती होता . त्याची बायको जणा घर व्यवस्थितरित्या सांभाळायची त्याबरोबरच शेतीच्या कामातही त्याला मदत करायची . असा एकमेकांना आधार देत त्यांचा संसार सुखाचा चालला होता . महेश आणि रुपाली गावातल्या सरकारी शाळेत शिकत होती . दोघे मन लावून शिकत होती .
पण म्हणतात ना की देव प्रत्येकाची परीक्षा बघत असतो किंवा असही म्हणता येईल की या सुखी संसाराला बहुतेक कोणाचीतरी नजर लागली असावी . त्या वर्षी पावसाने हजेरी लावलीच नाही . दुसऱ्या सगळ्या शेतकऱ्यांसारखे विठोबाही शेतात बैलजोडी जुंपून शेत जोतायच्या तयारीत होता . जवळ - जवळ पूर्ण शेत जोतून तयार झाले होते . आता फक्त पाऊसरायाच्या आगमनाकडे डोळे लागले होते . एकदा का पाऊस पडला की बिया पेरणीचे काम सुरू करण्याच्या तयारीत विठोबाच नाही तर गावचे सगळेच शेतकरी होते . परंतू पाऊस विठोबाच्या गावचा रस्ता विसरला होता बहुतेक ! मधेच कुठेतरी वस्तीला राहीला असावा . आकाशाकडे नजर लावून सगळ्यांचेच डोळे थकले होते . पण पाऊसराया काही दर्शन द्यावयास तयार नव्हता . का झाले असावे असे ? आधी असे कधीच घडले नव्हते . उशिरा का होईना , पाऊस आपली हजेरी लावायचाच . पण शेत जोतून एक महिना उलटला तरी आकाशात काळे ढग काही दिसेनात . आता मात्र विठोबासह गावातल्या प्रत्येक शेतक-याच्या मनात धडकी भरली आणि सगळ्यांना दुष्काळाची भीती सतावू लागली . पण कोणी बोलून दाखवत नव्हत , कारण अजून कोणी आशा सोडली नव्हती .
दोन महिने उलटले . आता मात्र विठोबाला काळजी वाटू लागली . शेतात जमिनीला भेगा पडल्या होत्या . गावातल्या तळयाचे , विहीरीचे पाणी आटून गेले होते . पाण्यासाठी गावकरी वणवण फिरत होते . दोन - तीन किलोमीटर अंतर चालून पाणी भरून आणत होते . जनावरही चारा आणि पाण्याविना अर्धमेली झाली होती . आपल्या सर्जा - राजाच्या काळजीने विठोबाला रात्र - रात्र झोप लागत नव्हती . त्यांना सुकलेला चारा का होईना तो पुरवत होता . पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत होता . कारण सर्जा - राजा ही विठोबासाठी फक्त बैलजोडी नाही तर त्याच्या कुटुंबाचा भाग होता . त्यांच्या जीवावरच इतकी वर्षे विठोबा शेतीची कामे पूर्ण करायचा . आता अशा कठीण परिस्थितीत त्यांची काळजी घेणे हे त्याचे कर्त्तव्य होते . घरात बायको - पोरांची स्थितीही बिकट होती . दोन वेळेचे अन्न शिजवण्यासाठी सुद्धा कष्ट पडत होते . जणा खूप हिंमतीने परिस्थिती सांभाळत होती .
घरातील धान्य संपले होते . त्या दिवशी जणाच्या डोळ्यांत अश्रु काठोकाठ भरले होते . कधी नव्हे ती अशी वाईट वेळ तिच्या कुटुंबावर , गावावर आणि प्रियजनांवर ओढवली होती . विठोबाला जेव्हा हे समजले , एका क्षणासाठी त्याला काय करावं ते सुचेना . मग शेवटी काहीतरी विचार करत तो घराबाहेर पडला आणि थेट जमीनदाराच्या घरासमोर येऊन थांबला . त्याच्या आधीच काही शेतकरी आणि गावकरी जमीनदाराकडून काही मदत मिळते का या आशेने तिथे जमले होते . पण नंतर त्याला समजले की काहीतरी गहाण ठेवले तरच जमीनदार पैसे किंवा धन - धान्य देणार . ही खूप गंभीर बाब होती . जमीनदार अशा अडचणीच्या काळातही गावकऱ्यांचा फायदा उठवण्यास धजत नव्हता . विठोबाला एका क्षणासाठी जमीनदाराचा खूप राग आला . पण काय करणार ? दुष्काळामुळे सगळ्यांचेच हात - पाय बांधले गेले होते . विठोबा त्याच क्षणी घरी परतला . त्याने जणाच्या सोन्याच्या कानातल्या कुडया कापडात गुंडाळल्या आणि जमीनदाराकडे जायला निघाला. जणाच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह उमटले , पण तिने तोंडातून चकार शब्दही काढला नाही . तिला बहुतेक परिस्थितीचा अंदाज आला असावा . विठोबा लगोलग जमीनदाराकडे पोहोचला आणि दागिने गहाण टाकून पैसे घेऊन आला . येताना वाण्याकडून घरासाठी लागणारे जिन्नस घेऊन आला . त्याबरोबरच मुलांना खाऊ , कपडे , शाळेच्या उपयोगाचे साहित्य आणि मुख्य म्हणजे सर्जा - राजासाठी हिरवा चारा ! थोडया वेळासाठी का होईना सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून विठोबाला समाधान वाटले . पण एका विचाराने त्याचे मन धजावले आणि ते म्हणजे हे असे किती दिवस चालणार ? दिवसेंदिवस परिस्थिती अजूनही गंभीर होत चालली होती . घर - दार , बायको - मुले आणि आपल्या जनावरांना दुष्काळाच्या तडाख्यातून वाचविण्यासाठी विठोबाने एक - एक करत जणाचे सगळे दागिने गहाण ठेवले . घरातील तांब्या- पितळेची भांडीही विकली . शेवटी एक दिवस असा आला की ज्या दिवशी विठोबाने जमीनदाराकडे आपली काळी आई , आपल्या जमिनीचा तुकडा गहाण टाकला . जणाने खूप अडवले पण विठोबाला हे हलाखीचे दिवस पाहवत नव्हते . तो आपल्या परिवारासाठी स्वतःचा जीव देण्यासही तयार होता . पण जीव द्यायची वेळ विठोबाच्या जीवनात लवकरच येईल असे त्याला , जणाला किंवा त्याच्या मुलांना स्वप्नातही वाटले नव्हते .
सर्जा - राजाची हालत मुबलक प्रमाणात खाद्य आणि पाणी न मिळाल्यामुळे खूपच खंगून गेली होती . आखिर त्या दोघांनी आपले प्राण सोडून दिले . विठोबा त्या दिवशी दोघांच्या गळ्यात पडून खूप रडला . जणा आणि पोरांचीही आसव थांबायचे नाव घेत नव्हती . कारण त्यांच्या परिवाराचे सर्वात प्रिय सदस्य दुरावले गेले होते . त्यांच्या अशा जाण्याने विठोबा पूर्णपणे खचून गेला . त्याच्या डोळ्यांसमोरून थांबायच - राजाचे चेहरे काही करून हटत नव्हते . त्यांच्या आठवणींनी विठोबाचे काळीज तुटायचे .
कर्जाचा डोंगर विठोबाच्या मानगुटीवर बसला होता . रात्र - रात्रभर त्याच्या डोळ्याला डोळे लागत नव्हते . कधी झोप लागलीच तर दचकून जागा व्हायचा . विठोबाचे धैर्य संपत चालले होते . त्याचा आत्मविश्वास जवळ - जवळ संपुष्टात आला होता . जणाला हे सगळे कळत होते . ती आपल्या नवऱ्याला खूप जपत होती . समजावत होती की ही परिस्थिती अशीच राहणार नाही . लवकरच बदलाव येईल . पाऊसराया आपल्यावर कृपादृष्टी जरूर दाखवेल . काळी आई पुन्हा आपल्या लेकरांना कुशीत घेईल . हिरवाईने आपले जीवनही हिरवगार होईल . पण विठोबाला जणाचे बोलणे स्वप्नगत वाटायचे . हे सुंदर स्वप्न आता कधीच पूर्ण होणार नाही , अशी त्याच्या मनाची खात्री पटली होती . अशाच विचारांनीशी खूप उशिरा त्याचे डोळे लागले .
दुस-या दिवशी विठोबा पहाटेच उठला . जणा आणि मुले अजून झोपली होती . ते सुकलेले चेहरे पाहून विठोबाच्या डोळ्यांत पाणी भरून आले . किती समाधानी जीवन तो जगत होता . पण हे काय होऊन बसले ! निसर्गाचे चक्र इतक्या वाईट रीतीने फिरेल असे त्याला कधीच वाटले नव्हते . तो निसर्गासमोर हरला होता . अंथरूणातून उठून लगबगीने आपल्या शेताकडे चालू लागला . मनात हजारो गोष्टींनी थैमान घातले होते . विचारांच्या तंद्रीत असतानाच तो शेतावर येऊन पोहोचला . तिथे पोहोचताक्षणी काळ्या आईची दुष्काळामुळे झालेली परिस्थिती बघून त्याने जोरात टाहो फोडला . त्याचे आक्रंदन ऐकायला आसपास कुणीच नव्हते . त्याचे रडणे , ओरडणे हवेत विरघळून गेले .
विठोबाच्या शेताच्या बांधावरती वडाचे एक झाड होते . पाऊस न पडल्यामुळे झाड सुकून सगळी पाने केव्हाची गळून गेली होती . विठोबाला एका क्षणासाठी वाटले की त्याची प्रतिकृतीच त्याच्यासमोर उभी आहे . प्रतिकृती - सुकलेली , वाळलेली ! त्याने धावत जाऊन झाडाला घट्ट मिठी मारली . परिस्थितीने जार - जार झालेले धोतर जे त्याने कंबरेवर लपेटले होते , झटकन कमरेवरून काढले आणि झाडाला बांधून त्याचा फास बनवला . तो फास स्वतःच्या गळ्यात अडकवला अन् शरीर झोकून दिले . क्षणार्धात सगळे संपून गेले . सगळी स्वप्ने , आश्वासने , जगण्याची आशा ! सगळेच काही ! गावकऱ्यांकडून ही बातमी जेव्हा जणाला कळाली , आधी तिला विश्वासच बसला नाही . ती वेडयासारखी शेताकडे धावत सुटली आणि तिच्या मागून मुलेही धावली . प्रत्यक्षात ते दृश्य बघून जणा बेशुद्ध होऊन धरतीवर कोसळली . दोन्ही मुले खूप घाबरली होती . त्यांना काय करावे काही कळत नव्हते . आईला उठवायचा प्रयत्न करत होती , रडत होती . आणि हे सर्व बघता तिथे जमलेल्या गावकऱ्यांचे काळीज तुटत होते . कारण काळया मातीचा पुत्र अखेर मातीत एकरूप झाला होता . क्षणार्धात विठोबाचे आणि त्याच्या कुटुंबाचे अख्खे आयुष्य मातीमोल झाले होते .
प्रतिक्रिया
कथेविषयी
Pratibha " Preeti "
कथेविषयी
Pratibha " Preeti "
कथा वाचून अभिप्राय जरूर कळवा
Pratibha " Preeti "
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद
धन्यवाद
Pratibha " Preeti "
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण