Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



पावसाचे नियोजन

लेखनविभाग: 
वैचारिक लेख

रानातला पाऊस
**************

कशी असेल सुगी यंदा..??
हा प्रश्न मनातला ,
शेतकऱ्यांचे जीवन म्हणजे
*"पाऊस रानातला"*.....
भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील निम्म्यापेक्षाही जास्त लोक शेती व्यवसायावरच अवलंबून आहेत. शेतकऱ्यांना आपण अन्नदाता, पोशिंदा म्हणून ओळखतो.पण शेतकऱ्याचे नाव जरी तोंडात आले, तर डोळ्यासमोर येते ती त्याची गरिबी, कर्जबाजारी, अनुदानासाठीची लाचारी.... पण याच शेतकऱ्यांनी पिकविलेल्या पिकावर व्यापारी मात्र पुढे जातात.श्रीमंत होतात.परंतु शेतकरी मात्र गरीबच राहतो.कारण भारतातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते.
नोकरी करणाऱ्या माणसांना महिनाभर काम करून महिना अखेर पगार मिळणार याची खात्री असते.व्यापाऱ्यांना त्यांच्या वस्तू विकल्या की नफा मिळतो. ते आपल्या उत्पादनाचा प्रचार, प्रसार करू शकतात.परंतु शेतकऱ्यांकडे यापैकी कोणताच मार्ग उपलब्ध नसतो.त्याने कितीही कष्ट केले तरी त्याला रानात पडणाऱ्या पावसावरच अवलंबून राहावे लागते. म्हणून
*"रानातला पाऊस"*शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचा घटक आहे.
पूर्वीची माणसे सांगतात की पूर्वी पाऊस खुप नियमित पडायचा आणि म्हणूनच बळीराजा सुखात होता.त्याकाळी उत्तम शेती,मध्यम व्यापार,आणि कनिष्ठ नोकरी असेच समीकरण होते.व्यापरापेक्षा आणि नोकरीपेक्षा ही शेती श्रेष्ठ समजल्या जायची.शेतीला पूरक पावसाची साथ तेंव्हा त्यांना मिळायची. मग आताच हे ऋतुचक्र का बदलले...??आणि आताच हा पावसाचा लहरीपणा का सुरू झालाय..?? रानात वेळेवर हजेरी लावणारा पाऊस हल्ली का वाट पाहायला लावतोय...??
कारण लोकसंख्या बेसुमार वाढली आहे.तसेच निसर्गावरील आक्रमणामुळे निसर्गाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. जागतिक तापमानवाढ होत आहे.या तापमान वाढीला आपण *"ग्लोबल वार्मिंग"* म्हणतो.या तापमान वाढीचा ऋतुचक्रावर विपरीत परिणाम होतोय.आणि त्यामुळेच तर कधी दुष्काळ तर कधी पूर तसेच चक्रीवादळे, अतिवृष्टी, ढगफुटी,उन्हाळा, उष्म्याची लाट,अवकाळी पाऊस, गारपीट ,अशा अनेक प्रकारची आस्मानी संकटे हवामानाच्या बदलामुळे वारंवार येत आहेत. गेल्या काही वर्षांपासून पावसाचं येणं बेभरवशाचं झालं आहे.रोप वरती आल्यावर पावसाने पाठ फिरवली तर दुबार पेरणी करायची वेळ शेतकऱ्यांवर येते.अलीकडच्या काळात पावसाची लय थोडी बिघडल्यासारखी झाली आहे. पूर्वी रोहिणी नक्षत्रापासून म्हणजे २५मे पासूनच वळीवाच्या सरी कोसळायच्या, गेल्या काही वर्षांपासून हे नक्षत्र जवळजवळ कोरडेच जाऊ लागले आहे.मृग नक्षत्राला तर काही अर्थच राहिला नाही.मृग नक्षत्राचं मुहूर्त धरून बरसणंही अनिश्चित होऊ लागलं आहे. रानातल्या पावसानं पाठ फिरवलीयचे मात्र खरंय......
बदलत्या काळानुसार शेतीचं तंत्र बदललं तरी पावसावरचं अवलंबित्व कमी झालेलं नाही.काही शेतकऱ्यांकडे स्वतः चं जोतं ही नसतं .(स्वतः ची बैलजोडी व नांगर) त्यामुळे जोतंU असलेल्याच्या सोयीनुसार शेतीची सगळी कामे करावी लागतात. तशातच पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना मजुरीशिवाय पर्याय नसतो.
एका रात्रीत पासष्ट मी.मी.च्या वर पाऊस झाला तर अतिवृष्टी मानली जाते. शंभर पेक्षा अधिक झाला तर ढगफुटी होते.परंतु २००८ पासून महाराष्ट्राला कमी जास्त पावसाचा फटका बसतच आहे. मान्सून च्या पावसाला सातत्याने उशीर होत आहे,वास्तविक २००० साला पासूनच म्हणजे गेल्या वीस पंचवीस वर्षात महाराष्ट्रास कमीजास्त प्रमाणात जवळपास तेरा वेला दुष्काळाने जवळ केले आहे.जून व जुलै महिन्यात मृग,आर्द्रा व पुनर्वसू या पावसाच्या नक्षत्राने जर दगा दिला तर खरीप हंगामातील पिकाला मोठा मार बसतो. उडीद, तीळ, मूग कापूस ही पिके तग धरत नाहीत. खरिपातील भुईमूग व ज्वारीची जागा आता सोयाबीन, सूर्यफूल व हायब्रीड ज्वारीने घेतली आहे.राज्यातील जवळजवळ ७०% पेक्षा जास्त पेरा हा खरिपाचा असतो. आणि खरीपावर शेतकऱ्यांच्या जास्त अपेक्षा असतात.म्हणून खरीप हातून गेल्यावर शेतकरी जास्त विवश होतो , डबघाईला येतो.
राज्यातील बहुतांश शेतकरी पर्जन्याधारितच शेती करतात. व ज्यांना धरण व कालव्याचा आधार आहे त्यांना पण पाऊस न पडल्यामुळे जलाशयात पाणी नसते.आणि म्हणून शेतकरी खरीप पिकाला पाणी देऊ शकत नाहीत.
बऱ्याच वेळा चांगला पाऊस होईल म्हणून हवामान खात्याचा अंदाज असतो.तर ग्रह, नक्षत्रे चांगला पाऊस घेऊन येणार असे योग आहेत हे पंचांगकर्ते सांगतात. आणि ह्या दिलासादायक बातमीने शेतकरी हुरळून जातो.पण प्रत्यक्षात चित्र वेगळेच दिसते. *रानातला पाऊस* सार्वत्रिक सारखा नसतो.कुठे धुवांधार बरसतो, तर कुठे रानातला वरचा पापुद्रा हि भिजत नाही.कधी गाव शिवारत छान पडतो, तर माळ पठारावर पावसाचा थेंब ही नसतो. शेतकऱ्यांच्या या संक्रमण काळात पावसाने साथ दिली नाही तर शेतकऱ्यांचा कणा मोडल्या शिवाय राहणार नाही.शेतकऱ्यांचे सारे लक्ष आभाळाकडे लागलेले असते. कधी काळ्याकुट्ट ढगांनीअभाळ भरून येते पण पाऊस आणणारे हे ढग कुठे पसार होतात ते कळतच नाही. पाऊस ढगांचा हा लपंडाव सतत1चालू असतो. खरे पाहता शेती, व शेतकऱ्यांचे जीवन पावसाच्या ऋतुचक्रावर तर अवलंबून असते.रानात पावसाने दडी मारली की शेतकऱ्यांचे हात कपाळावर व डोळे आभाळाकडे लागलेले असतात. पण हवामान बदलामुळे दरवर्षी सारखीच परिस्थिती पहावयास मिळत आहे. बद्दलत्या निसर्ग चक्रात मान्सून ही आपली चाल बदलत असल्याने शेतकरी मात्र गलितगात्र झालेला पाहावयास मिळतोय.
अनेक वेळा जून जुलै मध्ये पावसास सुरवात होते.शेतकरी अत्यंत उत्साहाने व घाईने बाजारातून महागडे बी विकत घेतो आणि पेरणी करतो.मोडही उगवतात.आणि मग अचानक पाऊस गायब होतो.आलेले मोड सुकुन जातात.वेळ गेल्यावर, मोसम गेल्यावर पुन्हा पाऊस पडतो.तोपर्यंत शेतकऱ्यांच्या हातून सर्व गेलेले असते. म्हणून त्याला दुबार पेरणी करावी लागते. तेव्हा त्याच्याकडे बी नसते.बाजारातील बियाणांच्या कंपन्या नेमक्या याच अडचणींचा पैसे कमावण्याची संधी म्हणून फायदा करून घेतात.त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीची यंत्रणा फार दुबळी असल्याने, निकृष्ट बियाणे बाजारात विक्रीला येते. हतबल झालेला शेतकरी बाजारातून बियाणे विकत आणतो.त्यासाठी त्याला खाजगी लोकांकडून जबर व्याजाने कर्ज घ्यावे लागते. आणि मुळात बियानेच चांगले नसल्याने मोड फार कमी उगवतात.पण त्याची तक्रार कोणाकडे करणार...???
नेमके मोड कशामुळे उगवले नाहीत हे समजणे कठिण असते.मग रास कशाची करायची...?? कारण रास करण्यासारखे पिकच आलेले नसते.आणि डोक्यावर मात्र कर्जाचा डोंगर वाढत असतो.आणि मग शेतकऱ्यांच्या आत्महत्येची सुरवात येथूनच होते असे म्हणायला हरकत नाही....
शेतकरी शेतात कोणते पिके येतील ...?? आपण शेतात काय घ्यायला हवे..??याचा विचार आधीच करतो.आणि त्यानुसार बियाणांची व्यवस्था करतो. पाऊस उशिरा जरी आला तरी तो जे जवळ आहे ते शेतात पेरतो. मृग, आर्द्रा ही नक्षत्रे कोरडी गेल्यावर उडीद मूग तीळ कापूस ही पिके पेरायला नको म्हणून तो सोयाबीन , तूर बाजरी या पिकांवर भर देतो.आणि त्याच वेळी त्यांचे बी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसते. आणि दुर्दैवाने शेतकऱ्यांना फटका बसतो. शेती लहान म्हणून काही वेळेला बैल बरदाना नसतो. तसेच बऱ्याच वेळा काही जमिनी लहान शेतकऱ्यांला कसायला देतात. ज्यांनी जमीन कसायला दिलेली असते, त्यांचाच मनावर बियाणे, खते व औषधे शेतकऱ्यांना विकत घ्यावे लागते. परंतु मार्गदर्शन करणाऱ्या मंडळींना खरे तर शेतीतले काहीच माहीत नसते.तसेच कृषिविद्यापीठा तुन डिग्री घेतलेले अनेक तरुण फक्त नोकरीच्या पाठीमागे लागलेले असतात.महाविद्यालयातुन तसेच विद्यापीठातुन त्यांना तशीच प्रेरणा मिळालेली असते. अपवादाने एखादाच कृषी शास्त्राचे शिक्षण घेऊन बियाणे, खते,इत्यादि च्या व्यवसायात येत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अशा अडचणीच्या वेळी मार्गदर्शन करणारा कोणीच नसतो.कृषी खात्याची विस्तार सेवा फक्त नावापुरतीच असते. कारण विद्यापीठातील प्राध्यापकांना शिकवणे व परीक्षा घेणे एवढेच माहीत असते. याला काही अपवाद आहेत. ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात, पण त्यांची संख्या फार नगण्य आहे. आणि अशा या दुष्टचक्रात शेतकरी अडकला आहे.शेतीत फायदा नसला तरी वेड्या आशेने तो शेती करीत राहतो.
जागतिक तापमान वाढीमुळे कधीकधी धोधो पाऊस पडतो, चोवीस तासात किमान अडीच मी.ली.पाऊस पडला तर तो दिवस पावसाचा मानला जातो. पण अशा पावसाच्या दिवसात गेल्या काही वर्षांपासून घट होत चालली आहे.खरं तर पाऊस कमी नाही. पण कमी दिवसात काही वेळेला जास्त पाऊस पडतो आणि शेतीसाठी असा पाऊस धोकादायक असतो.शेतीला संततधार पावसाची गरज असते. कमीअधिक पाऊस, हिमवर्षाव, शितलहरी, दोन पावसातील खंड,तापमान वाढ अशा बदलत्या नैसर्गिक घटकांचा शेती व्यवसायावर अनिष्ट परिणाम होत असतो. अशा आपत्तींना सामोरे जाताना लहान व सीमांतिक शेतकऱ्यांना त्यांच्या उपजीविकेचे साधन केवळ शेती असल्याने मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो.त्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी शेतकऱ्यांनी विचारात घेतल्या पाहिजेत....

(१).
कमी पावसाच्या काळात बारमाही पिके वाढविणे म्हणजे मोठे संकट असते, त्यामुळे कमी पाण्यावर पण मर्यादित क्षेत्रांवर संरक्षित सिंचनाच्या माध्यमातून उत्पादन काढण्यात शेतकरी यशस्वी होऊ शकतो.
(२)
पर्जन्यछायेच्या प्रदेशात बारमाही पिकांच्या विशेषतः ऊसावर मर्यादा आणणे आवश्यक आहे.
(३)
कमी पावसामुळे रबी हंगामात गव्हासारख्या पिकाची साथ सोडून हरभरा, करडी,ज्वारी अशा पिकांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे वाटते.
(४)
कमीतकमी पावसावर जास्तीत जास्त उत्पादकता मिळवून शेती करण्याचे प्रत्येक शेतकऱ्याने ध्येय ठेवणे आवश्यक आहे.
(५)
शेतकऱ्यांना जगण्याचा आधार मिळेल म्हणून एक लाख रु. पर्यंत केवळ २% व्याजाने सहज कर्ज उपलब्ध झाले पाहिजे. त्यासाठी बँकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे.
(६)
दहा गुंठ्याच एक असं हरितगृह प्रत्येक शेतकऱ्याला उपलब्ध करून देण्याची गरज आहे त्यामुळे भाजीपाला, रोपवाटिका इ.माध्यमातून पाणी टंचाईच्या काळात पण शेतकऱ्याला आधार मिळेल.
(7)
जसा निसर्ग बदलेल तशा रेडिओ, दूरदर्शनवर, वर्तमानपत्रातून शेतकऱ्यांना पर्जन्याधारीत शेतीत नेमकं काय करावं याचे सातत्याने मार्गदर्शन व्हायला हवे.
(८)
तीन वर्षात, पाच वर्षात सर्व ऊस ठीबकाखाली आणायच्या निर्धाराचे काय झाले...?? याची विचारणा पण समाजाने केली पाहिजे.
(९)
बांध, साखळी सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण, विहिरी पुनर्भरण इत्यादी तसेच मृदा व जल संधारणाची कामे त्वरित करून घ्यायला हवीत.
(१०)
अवकाळी पावसाचे प्रमाण वाढल्याने एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास ,राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, जलयुक्त शिवार अभियान इ. उपक्रम जोमाने राबवले गेले पाहिजेत.
(११)
जमिनीच्या खोलीनुसार प्रतवारी विचारात घेऊन पिकांचे नियोजन केले पाहिजे.
(१२)
प्रत्येक पिकाला मुबलक पाणी देण्याऐवजी त्यांच्या संवेदनशील अवस्थेत फक्त एक, दोनच पाण्याचा पाळ्या दिल्यास मोजक्या पाण्यात अधिक क्षेत्र सिंचनाखाली येऊन उत्पन्नात भरीव वाढ होऊ शकते.

शेतकऱ्याचे एक स्वप्न असतं, ते म्हणजे मृगानंतर पावसाळा वेळेत यावा.जेष्ठात संततधार असावी. आणि जमिनीची तहान भागावी.आषाढात तो सोंडेच्या धारांनी कोसळावा.आणि नद्या, नाले ओढे तलाव खळखळून वाहावेत. ऊन पावसाचा मोहक खेळ रंगवत श्रावण, भाद्रपदात पाऊस संपून जावा. पण शेतकऱ्यांच्या स्वप्नातले हे चित्र सत्यात उतरत नाही.
गेल्या बऱ्याच वर्षात *रानातला पाऊस* खात्रीचा नाही ,पुढेही नसेल त्यामुळे मिळणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब साठवणे व पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. तसेच शक्य तितक्या पाण्याचा पुनर्वापर करणे, भुजलाचे संवर्धन करणे असे उपायच पाण्याच्या दुर्भिक्षाला आळा घालू शकतात.फुगणारी शहरेव औद्योगिकरणाच्या वाढत्या रेट्यामुळे पाण्याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे.
पावसाचा लहरीपणा आपण घालवू शकत नाहीत. पण *रानातल्या पावसाचे* नियोजन करायला प्रत्येक शेतकऱ्याने शिकले पाहिजे.
**********

सौ. सुनिता दिक्कतवार, कोंमावार.
सरकारवाडा
परळी वै. 431 515
जि .बीड
9405464314
ई-मेल kommawarsunita@gmail.com

Share

प्रतिक्रिया