Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




पावसामुळे अकोल्याच्या जुन्या शहरातील उन्मळून पडलेल्या पुराण पुत्र पिंपळास मोर्णा मायचे पत्र…

लेखनविभाग: 
पावसाचे दुःखद अनुभव

पावसामुळे अकोल्याच्या जुन्या शहरातील उन्मळून पडलेल्या

पुराण पुत्र पिंपळास मोर्णा मायचे पत्र…

प्रिय, पुराण पुत्र पिंपळ...

फार वर्षापूर्वी सध्याच्या अकोला शहरातील जुनी वस्ती आधी एक ओबडधोबड टेकडी होती, त्या टेकडीला वळसा घालून मी वाहत होती. टेकडीवर हिरवीगार वृक्ष संपदा होती. टेकडीवरच्या हिरव्यागार वृक्ष संपदेमुळे जणू या टेकडीला एका बेटाचे स्वरूप आले होते. टेकडीवरचे सौंदर्य आजूबाजूच्या गावातील लोकांना भुरळ पाडणारे होते. कालांतराने या टेकडीवर मानवी हस्तक्षेप वाढला. आजूबाजूच्या गावातील काही लोकांनी या उंच टेकडीवर आश्रय घेतला. छोटी मोठी घरे रचली जाऊ लागली. आजूबाजूच्या परिसरातील शेती कसने सुरू झाली तशी या टेकडीवर वर्दळ वाढली. हळूहळू या टेकडीला गावाचे स्वरूप येऊ लागले. तसे अकोलसिंह नावाच्या एका रजपूत राजाच्या नावावरून या टेकडीला 'आकोला * हे नाव पडलेले होतेच. या आकोल्यात पूर्वी अनेक गढया होत्या. पुढे मोगलांचा वऱ्हाडात अमल वाढला तेव्हा बाळापूर आणि नरनाळा किल्ल्याला अधिक सुरक्षित करण्याच्या हेतूने ने या वस्तीचा ताबा औरंगजेबच्या सैन्याने घेतला. 'असदखान' या मुघल सरदाराने टेकडी भोवताली मजबूत भिंती उभारून तटबंधी बांधली. टेकडीच्या सभोवताली बुरून उभारला आणि 'असदगड किल्ला' नावारूपास आला. तोवर या छोट्याशा किल्ल्याला आधी आकोला किल्ला म्हटले जात होते. या सर्व घटनांचे साक्षीदार मी तर आहेच पण सोबतच माझ्या किनारी डौलाने उभा असलेला तू सुद्धा आहेस. तुला मी लाडाने माझा, म्हणजेच 'मोर्णा मायचा पुराणपुत्र पिंपळ' म्हणत असते. भूतकाळामध्ये तू वारंवार छाटल्या गेलास, कितीवेळा तोडल्या गेलास परंतु तरीही तू तग धरून होतास. इथल्या मातीशी जुळून होतास… किल्ल्यावर वस्ती स्थिरावल्यानंतरच्या काळात साधारणतः इसवी सन १८५० पासून तू मोठे विस्तीर्ण रूप घेणे सुरू केले. इसवी सन २०१० नंतर जन्मलेल्या अकोलेकरांना प्रमाण मानले तर सुमारे सात - आठ पिढ्यांचा साक्षीदार तू पुराणपुत्र पिंपळ होतास.

माझ्या काठावर तुझे बालपण गेले. माझ्या पाण्याने तू मी तुझे सिंचन केले. तू अकोला शहराच्या जडणघडणीच्या नोंदी ठेवल्या. सद्याच्या अकोला महानगरात सर्वात उंचीचे भौगोलिक ठिकाण म्हणजे जयहिंद चौक जुने शहराचा परिसर होय. तू या भागात सर्वात उंचीचा वृक्ष होतास. तुझ्या सावलीत अनेक पिढ्यां लहानाच्या मोठ्या झाल्यात. तुझी उंची कायम अकोलेकरांना प्रेरणादायी राहिली. तुझ्या उंचीचे व्यक्तिमत्त्व या मातीमध्ये तुझ्याच सावलीत घडलेत.

तुझी सावली कातरवेळी थेट माझ्या पात्रापर्यंत पोहचायची तेव्हा तुझा दिवसभराचा शीण माझ्या पदराच्या स्पर्शाने जायचा.

पूर्वेकडून अकोल्याला आलेल्या माणसांना त्यावेळच्या अकोल्याचे प्रतिबिंब माझ्या संथ, नितळ आणि स्वच्छ प्रवाहात दिसायचे, तुझी हिरवीगार प्रतिमा माझ्या पात्रामध्ये पाहूनच जणू या मोर्णामायला 'मोरपंखी मोर्णा' ही उपमा मिळाली होती की काय असे मला नेहमी वाटते. याचा किती! किती! अभिमान वाटायचा मला! "राजराजेश्वराच्या चरणी लीन होण्यास जाणारा शिवभक्त" असो वा "खिडकीपूरा मस्जिद मध्ये नमाज पठणास जाणारा मुस्लिम धर्मीय" तुझ्या सावलीने कुणाचा कधीच भेदभाव केला नाही. तुझा शितल वारा असदगडाच्या हवामहलात सुद्धा पोहचायचा.तुझा गार वारा जीव लावायचा इथल्या प्रत्येक अकोलेकरांवर. अकोल्याच्या अनेक पिढ्यांना तुझ्याशिवाय दुसरा आधार तरी कुठे होता? पोळा, नवरात्र, गणपती उत्सव, कावड पालखी महोत्सव, ईद आणि इतरही अनेक सण-उत्सव आजवर तुझ्याच छत्रछायेत आनंदाने साजरे झालेत. जेव्हा जेव्हा चंद्र जेव्हा तुझ्या डोक्यावर यायचा तेव्हा मला तुझ्या रुपात साक्षात राजराजेश्वराचे दर्शन घडायचे.

जेव्हा माझ्या पात्रावर एकही पूल नव्हता तेव्हा दहीहंडा वेशीतून अकोल्याला आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना सर्वप्रथम तुझं दर्शन व्हायचं. अकोल्याला आलेल्या पाहुण्यांचे तू खुल्या मनाने स्वागत करायचा. जुन्या अकोल्याची तू ओळख बनला होतास. तुझ्या छायेखाली माझ्या अनेक लेकरांचे बालपण गेले. डाबडुबली आणि लपंडाव सारखे खेळ खेळायला आलेल्या लेकरांना तू अंगावर खेळवले. तुझ्या सावलीत तरुण 'हुतुतू' खेळायचे. हुतुतू खेळून घामाघूम होऊन दमणाऱ्या खेळाडूंना तुझा गार वाराच तर नवचैतन्य द्यायचा. तुझ्या शेजारी कुस्त्या लढवल्या जायच्या. तुझ्या पारावरच्या गप्पा मी जीवाचा कान करून ऐकायची. देह जीर्ण झालेल्या म्हाताऱ्यांचा तर तू जिवलग मित्र बनला होता. तुझ्या सानिध्यात अनेकांचे एकटेपण दूर होत होते. तुझ्या प्रत्येक पानांशी त्यांचा संवाद व्हायचा. तुझ्या पानांचे मधुर संगीत अकोलेकरांना मायेने कुरवाळत होते. तुझ्या पानांची लयबद्ध सळसळ ऐकून माझ्या पात्रात तरंग उठायचे. "शहराळलेल्या" अकोलेकरांना 'आता कोण मायेने कुरवाळणार?' तुझी कित्येक जाळीदार पानं इथल्या लेकरांनी काळजाच्या वहीत जपली आहेत. कित्येक चुलींना तू 'सरपन' पुरवलेस. तुझ्या पानांनी आजवर अनेक प्राण्यांची भूक भागवली. पक्ष्यांना तू हक्काचा निवारा दिलास.

तू अकोला शहरातले अनेक पूर पाहिलेस. दुष्काळात तुझी हिरवळ या शहराला कायम दिलासा देत आली. इथल्या स्वार्थी माणसांना तुझी अडचण झाली तरी तू त्यांना शुद्ध प्राणवायूंची कधीही चणचण भासू दिली नाहीस. पहाटेच्या वेळी तुझ्या फांद्यांवर बसून पक्षी भूपाळी गायचे. तुझ्यामुळेच जुन्या अकोल्याची सकाळ आल्हाददायक वाटायची. एकादशीला तुझी पानांची टाळ विठ्ठल नामाचा गजर करायची. या शहरातल्या विविध क्षेत्रातील चढ-उतार तू अनुभवले आहेस. तुझ्या किती! किती! आठवणी आहेत माझ्या काळजात… मला तर तुझ्या आठवणींनी गहिवरुन येत आहे.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर तुझ्या उंच फांदीवर फडकवलेला आपला राष्ट्रध्वज तिरंगा माझ्या आजही स्मरणात आहे. तू किती स्वाभिमानाने उंच गगणी डौलाने तिरंगा फडकवला होतास! स्वातंत्र्याचा जयघोष तुझ्या पानांनी उंच गगनात पोहचवला होता. शहरात झालेल्या अनेक आंदोलनांचा तू साक्षीदार होतास. तुझ्या सावलीत सणावाराला बाजार फुलायचा. तुझ्या फांद्यांना झुला बांधून झुलणाऱ्या लेकी भुलाबाईची गाणी तुझ्या पारावर गायची. अकोल्याच्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक तू होतास…

काँक्रीटच्या अतिवापरामुळे जमिनीत तुझ्या मुळांना होणारी अडचण मी जाणून होती. तुझा भला मोठा विस्तीर्ण पसारा सांभाळतांना तुझ्या मुळांना करावी लागणारी कसरत मी जवळून पाहत आली आहे. तू आजवर अनेक वादळांना धैर्याने सामोरा गेलास, कित्तेक संकटं तू परतून लावलीस मात्र १९ मे २०२१ रोजी रात्री आलेल्या वादळाने घात केला आणि तुझ्या खोडाला तडा गेला. रानातल्या या पावसामुळे आलेल्या वादळ वाऱ्यात दुर्दैवाने तू खोडापासून उन्मळून पडलास. तू पडल्यानंतर लगेच तुझ्या तुटलेल्या खोडांना आणि फांद्यांना तोडून वेगळे करणे सुरू झाले. जेसीबी मशिनव्दारे तुझे अवयव उचलणे सुरु झाले. तुझी मूळं जमिनीत शाबूत असतांना ही माणसं आता तुला कायमचे तोडणार की काय? ही धास्ती आता मला वाटतं आहे. तुला पुन्हा मोहरायची संधी देणार की नाहीत या प्रश्नाने मी व्याकूळ झाले आहे. तुझे अस्तित्व जपण्यासाठी… अकोल्याच्या इतिहासाला जपण्यासाठी तुला पुन्हा संधी मिळालीच पाहिजे, तू पुन्हा मोहरावं ही या चिंताग्रस्त मोर्णामायसह अनेक अकोलकरांची इच्छा आहे. पुढे काय होईल हे मला ठाऊक नाही मात्र तुझ्या मुळांमधून तू माझ्या किनारी पुन्हा एकदा डौलाने उभा राहा… सद्या जिथे आहे तिथे तुला मोहरण्याची संधी मिळाली नाही तर तू माझ्या काठावर कुठेतरी पुन्हा मोहर… ही या मोर्णामायची... एका आईची तिच्या मुलाकडून इवलीशी इच्छा आहे, माझ्या पुराणपुत्रा पिंपळा माझी ही इच्छा तू पूर्ण करशील ना !

….. तुझीच मोर्णा माय

निलेश श्रीकृष्ण कवडे
अकोला

Share

प्रतिक्रिया