साप चावलेले रुग्ण इस्पितळात अनेकदा बरे होतात, अनेकदा दगावतात तर अनेकदा शरीराचा एखादा भाग शस्त्रक्रिया करून तोडून सुद्धा टाकावा लागतो. ग्रामीण लोकांकडे असलेले पारंपरिक उपचारशास्त्र कदाचित अप्रगत असेल, त्यावर अधिक अभ्यास व्हायची गरज असूनही त्यावर अभ्यास झालेला नसेल पण म्हणून त्याला एकदम थोतांड किंवा अंधश्रद्धा वगैरे कसे म्हणता येईल? पूर्वी कुत्रा चावला तर गावातच त्यावर इलाज केले जायचे. कुत्रा चावून माणूस दगावल्याच्या फारशा घटना माझ्या पाहण्यात आणि वाचण्यात नाहीत, याचा अर्थ ते उपचार नक्कीच प्रभावी होते. कावीळ रोगावर ऍलोपॅथी, आयुर्वेद, होमियोपॅथी, ऍक्युप्रेशर वगैरे वैद्यकीय शाखांकडे आजही रामबाण इलाज नाही पण गावातील काही लोकांकडे त्यावर रामबाण इलाज आहे. आठवड्यातून दोन वेळा दोन मात्रा दिल्या की कावीळ हमखास बरा होत असल्याची उदाहरणे अनेक आहेत. स्पॉन्डिलिसिससारख्या व्याधीवर जितका आराम योग-प्राणायामाने मिळतो तितका आधुनिक वैद्यकीय शास्त्राद्वारे मिळत नाही. अर्धांगवायू व लकव्यासारख्या जीवघेण्या दुर्धर व्याधींपुढे सारे वैद्यकीय शास्त्र थिटे पडत असताना त्यावर सुद्धा रामबाण इलाज घरगुती उपचारामध्ये आहेत.
जगात सार्वकालीन सर्वश्रेष्ठ असे काहीही नसते. विज्ञानी दृष्टिकोन बाळगायचा असेल तर त्याआधी विज्ञान म्हणजे काय, हे समजून घेणे अपरिहार्य असते पण प्रत्यक्षात तसे होत नाही. मनुष्य एका विशिष्ट वैज्ञानिक चौकटीत बंदिस्त झाला की त्याचा मुख्य फटका विज्ञानालाच बसतो. ज्ञानप्राप्तीची सर्व दारे खुली असतील तर आपण तऱ्हेतऱ्हेच्या मार्गाची चाचपणी करू शकतो, तुलना करू शकतो आणि जो मार्ग सर्वोत्तम वाटेल त्या मार्गाचा अवलंब करू शकतो. उपचार पद्धतीमध्ये जर अनेक पर्याय उपलब्ध असतील तर तुलनात्मक विचार करून जो ज्या रोगासाठी सर्वोत्तम वाटेल तो पर्याय निवडण्यातच खराखुरा शहाणपणा असतो. आज ऍलोपॅथीपासून ते होमियोपॅथी पर्यंत आणि आयुर्वेदापासून ते योग-प्राणायामापर्यंत अनेक पर्याय उपलब्ध असताना केवळ एकच पर्याय तेवढा एकमेव चांगला पर्याय आहे आणि बाकी सर्व पर्याय म्हणजे थोतांड आहे, अशा अविर्भावात जर कुणी ठाम विश्वासाने मांडणी करत असेल तर तो नक्कीच शुद्ध अज्ञानी असतो. जरी तो स्वतःला ज्ञानी समजत असला तरी प्रत्यक्षात त्या व्यक्तीचा अभ्यास, आकलन व अनुभव तोकडा असल्याचेच ते निदर्शक असते.
आयुष्याच्या रेशीमवाटा समुद्रासारख्या अथांग व सर्वसमावेशी असल्या पाहिजेत. समुद्राला अब्जावधी छोटेमोठे प्रवाह येऊन मिसळतात. समुद्राच्या प्रवाहाला दिशा नसते तरीही प्रवाह दिशाहीन नसतो. तद्वतच उपलब्ध असलेल्या सर्व वाटा आयुष्याला येऊन मिळाल्या तरच मानवी मूल्यांच्या लाटा रुंदावत जाऊन रेशीमवाटा चौफेर समृद्ध होऊ शकतात. पुरोगामी-प्रतिगामी, श्रद्धा-अंधश्रद्धा अशा शब्दांची जर नीट व्याख्याच करता येत नसेल तर त्यावर आधारलेली जीवनशैली निर्माणच कशी होऊ शकेल? मी या शब्दांच्या व्याख्या अनेक वर्षांपासून अनेकांना विचारतो आहे. पण तार्किक पातळीवर शुद्ध स्वरूपात कुणीच व्याख्या सांगू शकलेले नाहीत. सरतेशेवटी अंधुकसा आशेचा किरण सापडला तो केशवसुतांच्या कवितेत.
‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’, असे ते म्हणतात पण याचा अर्थ जे जे जुने आहे ते ते सर्व जाळुनी किंवा पुरुनी टाका, असे ते म्हणत नाही. काय जाळायचे आणि काय पुरून टाकायचे याविषयी त्यांनी स्पष्ट शब्दात सर्व संभ्रमांना तिलांजली देत काहीही मोघम ठेवलेले नाही. पुढल्या ओळीत त्यांनी लिहिले की,
सडत न एक्या ठायी ठाका
सावध! ऐका पुढल्या हाका
आधी सावध व्हावे. सावध झाल्यांनतरच पुढल्या हाका सावधतेने ऐकाव्या. भविष्याचा वेध घेऊन उद्याच्या भविष्याला उज्वल करण्याच्या वाटेत जुन्या सवयींचे जे अडथळे उभे राहतात त्यांना जाळून किंवा पुरून टाकण्याची कला ज्याला अवगत झाली, तोच फक्त पुरोगामी असतो आणि तीच खरीखुरी वैज्ञानिक दृष्टी असते.
- गंगाधर मुटे, आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग १५ - दि. दि. ९ मे २०२० - "विज्ञान म्हणजे काय रे भाऊ?"
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========