नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कंणसातली माणसं
किंमत: 100/- रुपये
सहभागी कवी : इंद्रजित भालेराव, श्रीकृष्ण राऊत, ज्ञानेश वाकुडकर, शेषराव मोहिते, गंगाधर मुटे, रवी धारणे, रवींद्र कामठे, रावसाहेब जाधव, राज पठाण, रावसाहेब कुंवर, दर्शना देशमुख, विनिता कुलकर्णी पाटील, सौ शैलजा कारंडे, धीरजकुमार ताकसांडे, राजीव जावळे, प्रकाश मोरे, किशोर बळी, संघमित्रा खंडारे, रामकृष्ण रोगे, विनिता माने पिसाळ, डॉ रविपाल भारशंकर, निलेश कवडे, श्रीकांत धोटे, नजीम खान, दीपक यादवराव चटप, नयन महेश राजमाने, बदिउज्जमा बिराजदार, दिलीप भोयर, शरद ठाकर.
संपादकीय .........
“देवाची कृपा होईल, निसर्ग देवता प्रसन्न झाली की बदाबदा पाऊस कोसळेल. बदाबदा पाऊस कोसळला की रान हिरवेगार होईल. रान हिरवेगार झाले की सुगीचे दिवस येऊन शेतकर्याची गरिबी एका रात्रीतून संपुष्टात येईल” अशा येरागबाळ्या, अर्थवादाचा लवलेश नसलेल्या शास्त्रशून्य भिकार कल्पनाविलासापलीकडे आजवरच्या स्वत:ला शेतकरी पुत्र म्हणविणार्या कवींनाही फार काही उंच भरारी घेता आली नाही, असेही इतिहास नमूद करतो. “शेतीत गरिबी असण्याचे कारण शेतकरी अज्ञानी, व्यसनाधीन, उधळ्या, आळशी आहे म्हणून नव्हे तर तो घाम गाळून जे पिकवतो तो शेतमाल स्वस्तात लुटून नेण्यार्या शासकीय अधिकृत शेतकरीविरोधी धोरणात दडले आहे” एवढे एक वाक्य उच्चारायला व लिहायला युगपुरुष शरद जोशींना जन्म घ्यावा लागला, यातच शेतीसाहित्याच्या अनुपयुक्ततेचे गमक दडले आहे. खरं तर हा शेतीसंबंधित साहित्यिकांचा सपशेल पराभव असल्याचे एकदातरी जाहीरपणे मान्य करायलाच हवे.
आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की समग्र वैचारिक उत्क्रांतीच्या प्रवाहाची दिशा फक्त लिहिणारे आणि बोलणारेच ठरवू शकतात. ही क्षमता तिसर्या कुणातच नसते. शेतीमधली गरिबी आणि शेतकर्याच्या आयुष्यातील लाचारीचे जिणे संपवून त्याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाने जगण्याइतपत दिवस खेचून आणायचे असेल तर जनमानसाची सामूहिक विचार पद्धती बदलावी लागेल आणि हे कार्य फक्त लिहिणारे व बोलणारेच करू शकतात. गेले सुमारे तीन तप राज्यात शेतकरी चळवळ भक्कम अर्थशास्त्रीय पायावर उभी आहे. या चळवळीने मुक्या-बहिर्या शेतकर्याला बोलते केले. आज शेकड्याने, हजाराने नव्हे तर लाखोच्या संख्येने तर्कशुद्धतेने शेतीविषयावर बोलणारे व शेतीशास्त्र मांडणारे योद्धे या चळवळीने गावागावात निर्माण केले ही शेतकरी चळवळीची जमेची बाजू असली तरी लिहिणारे निर्माण करण्यात मात्र हीच शेतकरी चळवळ सपशेल अपयशी ठरली. सर्वश्री प्रा. भास्कर चंदणशीव, इंद्रजित भालेराव, शेषराव मोहिते, अमर हबीब व आणखी काही तुरळक अपवाद वगळता तर्कशुद्ध अर्थशास्त्रीय साहित्यसृजकांची यादी इथेच आटोपते. युगात्मा शरद जोशींचे अर्थशास्त्रीय विचार अडाणी शेतकर्यांच्या माजघरात पोचले पण हेच विचार साहित्य सृजकांच्या अंगणातील दारापर्यंतही का पोचले नाही? हा कळीचा मुद्दा आहे. शेतकर्यांचे पोट शेतीवर अवलंबून असते याउलट साहित्य सृजकांचे पोट शेतमालाच्या लुटीतून निर्माण होणार्या संचयावर अवलंबून असते, हेच तर या मागचे कारण नाही ना?
कल्पनाविश्वात रमणार्या आभासी शेती-साहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी काही संबंध उरला आहे किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी, कृषिजगताला भेडसावणार्या समस्यांची मराठी साहित्य विश्वासोबत सांगड घालण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी आणि मराठी साहित्यविश्वाकडून कृषिजगताला असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी नागपूर येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात २० व २१ फेब्रुवारी २०१६ ला दोन दिवसाचे दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच केवळ मर्यादित न राहता सारस्वतांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.
या दुसर्या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या निमित्तानेच प्रत्यक्ष कृतीचे पहिले पाऊल म्हणून “कणसातली माणसं” हा प्रातिनिधिक शेतकरी काव्यसंग्रह वाचकांच्या भेटीस येत आहे. प्रयोग नवा आहे आणि माझ्यासहित बहुतांश कवीही नवखेच आहेत. जे थोरामोठ्यांना जमले नाही ते या नवख्या कवींना जमलेच पाहिजे, असा आमचा दुराग्रह नाही तद्वतच कुणाचा असूही नये. त्यामुळे या संग्रहातील रचनांना साहित्यिकमुल्याच्या वगैरे कसोट्या लावण्याचे अजिबात प्रयोजन उरत नाही.
वास्तव आणि प्रगल्भ शेतीसाहित्यकृती निर्मितेच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल म्हणून रसिक वाचकांनी व समीक्षकांनी या काव्यसंग्रहाचे स्वागत करावे, अशी माफक अपेक्षा आहे.
- गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पीडीएफ फाईल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.