कसा लिहू मी गझल तुझ्यावर?
सोज्वळ प्रितीची तू प्रतिमा, निर्मळ माया समर्पल्यावर
उरली केवळ पवित्र मीरा, कसा लिहू मी गझल तुझ्यावर?
प्रेमाला बघ उकळ्या येती, इतक्या येती, उतूच जाती
शोधत फिरती कुठे सांडवू, या फुलांवर की त्या कळ्यांवर
काय पिऊनी असा माणसा, न्याय लादतो मानवतेवर
गुन्हा तर पदराने केला, दोष ठेवतो पागोट्यावर
तुलाच दिसतो तुझ्यात भारी, अस्सल गाढा थोर समीक्षक
परी स्वतःला तपासले का, ठेऊन कुल्हा थंड तव्यावर
छल कपटाला दिवस सुगीचे, चतुराईने कमाल केली
हात मारुनी गेला कोल्हा, आळ आणला रानहल्यावर
खपणारे ते खपून गेले, तरी सरेना ठोक विकाऊ
दमून गेली लिलाव-बोली, हाट तरीही ना उठण्यावर
भुमी बिचारी नभा विचारी, अचाट गड़गड़ कशास मित्रा
"हिरवी राने सावध करुनी अभय रोखतो नजर नद्यांवर"
- गंगाधर मुटे 'अभय'
=============
अकरा/आठ/एकेविस