नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

दावण ... कविता

सचिन शिंदे's picture
लेखनविभाग: 
छंदमुक्त कविता

लेखन विभाग : छंदमुक्त कविता

दावण ...

पेरणीच्या ऐन मोक्याच्या क्षणी
नसायचे पैसे जेव्हा
बि- बियाणांसाठी बापाकडे
तवा बाप हताश होवून
डोकावायचा नकळत
मोठया आशेने गुरांच्या गोठ्यात

त्याचा काळवंडलेला चेहराच
सांगायचा कहाणी एकेक
निशब्द गुरांना
त्यांना उमगायचं होष्यमान
बापाच्या फाटक्या जिंदगानीचं

घरात खायला दाणा
नसला तरी चालेल
पण गोठ्यात दावण
भरगच्च भरलेली पाहिजे
अशी त्याची दांडगी धारणा

पोटाची भक्की
खोलवर गेलेली गुरे
द्यायचीत बापाला धीर
व्हायचीत अस्वस्थ,
तर कधी गंभीर
नड भागवली पाहिजे
हे त्यांना जणू ठाऊकच

डोळयातली आसवं रोखून
बाप कुरवाळायचा गुरांना
फिरवायचा हात मायेने
त्यांच्या अंगाखांदयावरून
चालायचा संवाद त्यांचा मनोमन
तेव्हा त्यांचेही डोळे
पाझरायचीत हळूहळू

तशी एकेक नड जेव्हा
वाढतच गेली वावराची
एखादया रोग्याच्या रोगासारखी
तसं एकेक जनावर
हद्दपार होत गेलं गोठ्यातून
कधी सावकाराच्या खुंटयाला
कधी खाटीकाच्या वेशीला
तर कधी दलालीच्या बाजारात

नड तेव्हाही भागत नव्हती
ती आताही भागत नाही
सावट संकटाचं अजून
सावरायचं थांबत नाही
अशा वेळी बाप
पाहतो पाणावलेल्या डोळयांनी
परत गोठयाकडे...

तेव्हा
दिसतोय रिता रिता
आस्तित्व गमावलेला
नुसताच चौकोनी आकाराचा
गोठयाचा सांगाडा

तेव्हा
दिसतेय कुठेतरी
लटकलेली वेडीवाकडी
गुरांची रिकामी दावण...

कवी : सचिन शिंदे
मुरली, उमरखेड
जि. यवतमाळ
8421527542

Share

Comments

Layout Settings