Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




शेतकरी साहित्य चळवळ : दिशा व कार्यपद्धती - भाग - १

शेतकरी साहित्य चळवळ : दिशा व कार्यपद्धती - भाग - १

प्रस्तावना : 
 
             २७/०२/२०१४ रोजी माझ्या जन्मदिवसाच्या निमित्ताने एखादा संकल्प करून एखादे कार्य हाती घ्यायचा विचार आला तेव्हा साहजिकच २७ फेब्रुवारी हा दिवस "मराठी भाषा दिवस" "जागतिक मराठी भाषा दिवस" "मराठी भाषा दिन" म्हणून जगभरातील मराठी भाषिकांकडून साजरा केला असल्याने या दिवसाचे औचित्य साधून आपणही मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी आपल्यापरीने प्रकल्प हाती घ्यावा, असा एक कच्चा विचार डोक्याला स्पर्श करून गेला.  
 
             पण माझा मुख्य विषय आणि रुची म्हणजे शेती. शेतीविषयाशिवाय मराठी भाषेच्या उत्कर्षासह इतर सर्व विषय माझ्या दृष्टीने दुय्यमच. मग शेती आणि मराठी भाषा यांचा सुवर्णमध्य साधून जर प्रकल्प हाती घेतला तर एकाचवेळी दोन्ही इसिप्त साध्य होतील आणि काम करताना आनंदाचा परमोच्च बिंदूही साधता येईल असा थोडासा विचार करताच दोन प्रकल्प हाती घेण्यासारखे आणि काळाची गरज असल्याचे जाणवले. त्यातील पहिला म्हणजे  www.sharadjoshi.in  अर्थात "योद्धा शेतकरी" या एका महत्त्वाकांक्षी संकेतस्थळाच्या निर्माणाचा एक महाप्रकल्प हाती घेणे. हे संकेतस्थळ म्हणजे शरद जोशी आणि शेतकरी संघटनेविषयी परिपूर्ण माहितीने ओतप्रोत भरलेला अनमोल खजिना व्हायला हवा. शरद जोशींच्या समग्र लेखनासहित अधिवेशने, मेळावे, रस्ता रोको अथवा रेल्वेरोको दरम्यान वेगवेगळ्या आंदोलनस्थळी घडलेल्या घडामोडीविषयीचे शक्यतो फोटोसहित सर्व वृत्तांत येथे उपलब्ध व्हायला हवेत. त्यादृष्टीने कार्य सुरू केले पण हे संकेतस्थळ परिपूर्ण करण्याचे कार्य वाटते इतके नक्कीच सहजसाध्य नसल्याने अजूनही पूर्णत्वास पोचलेले नाही. अजून खूप काम बाकी आहे. आजपावेतो झालेल्या कामाबद्दल मी स्वतःही समाधानी नाही. पण त्याविषयी नंतर कधी तरी सविस्तर लिहेन.
 
              दुसरा प्रकल्प म्हणजे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीची बांधणी करणे. मराठी भाषेच्या इतिहासात आजपर्यंत मराठी साहित्य चळवळ, प्रादेशिक भाषा साहित्य चळवळ, ग्रामीण साहित्य चळवळ, कामगार साहित्य चळवळ, दलित साहित्य चळवळ अशा अनेक व नानाविध साहित्य चळवळी निर्माण झाल्या, अ.भा. स्तरावर साहित्य संमेलने झालीत पण या देशाचा ’कणा’ असलेल्या शेतीची अ.भा. शेतकरी साहित्य चळवळ मात्र कधी उभी राहिली नाही. ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक या क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट झाल्यामुळे निकोप शेतीविषयक मानसिक मनोभूमी तयार होण्यास व शेती व्यवसायाविषयी समाजमनाची सकारात्मक मानसिकतेची जडणघडण होण्यास मारक ठरलेले आहे. साहित्यातून समाजाच्या सामुहिकमनाचे वास्तव प्रतिबिंबित व्हायला हवे; पण मागील काही वर्षाचा शेतीसंबंधित साहित्यिक आढावा घेतला तर ते सुद्धा झालेले दिसत नाही. हाच विचाराचा धागा पकडून या दिशेने पाऊल टाकण्याचा प्रयत्न करायचे ठरवले. हे कार्य किती कठीण आहे याची जाणीव असली तरी हे कार्य अशक्यप्राय नाही याची मात्र खात्री होती.
 
             मी रस्ता चालायला सुरुवात केली आणि रस्त्याने सहकारी मिळत गेले. हुरूप वाढवणारे पहिले मौल्यवान सहकार्य लाभले गझलनवाज पं भीमराव पांचाळे यांचे. मग त्यांच्याच सहकार्याने त्यांच्याच जन्मगाव असलेल्या अमरावती जिल्ह्यातील आष्टगाव येथे दिनांक २४ ऑक्टोबर २०१४ रोजी सायंकाळी ४.०० वाजता अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या स्थापनेचा सोहळा गझलनवाज पं भीमराव पांचाळे यांच्या शुभहस्ते, श्री विजय विल्हेकर यांचे अध्यक्षतेखाली आणि श्री संजय कोल्हे, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. मग इथेच पहिला शेतकरी गझल मुशायरा संपन्न झाला. या पहिल्यावहिल्या शेतकरी गझल मुशायर्‍यात गझलकार चांदूर बाजारचे श्री नितीन देशमुख, नेरपिंगळाईचे श्री लक्ष्मण जेवणे, यवतमाळचे अनिल कोसे, सुदाम सोनुले,  विद्यानंद हाडके, गंगाधर मुटे यांनी गझला सादर केल्या. अशा तऱ्हेने आष्टगावला शेतकरी साहित्य चळवळीची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. त्याच वर्षी पहिली आंतरजाल-विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१४ आयोजित केली गेली. ती आजतागायत सुरू असून पाचवी लेखनस्पर्धा यावर्षी आयोजित केली गेली आहे.
 
             यासंबंधात एक बाब प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की शेतकरी साहित्य चळवळ म्हणजे शेतकरी संघटना, शेतकरी आंदोलन, शेतकरी चळवळीला पर्याय नसून फक्त पूरक ठरू शकते. शेतकरी आंदोलनाला शेतकरी साहित्याची जोड मिळाली तर आंदोलनाच्या प्रभावाची तीव्रता वाढू शकते. १९८०-९० च्या दशकात युगात्मा शरद जोशी यांच्या शेतकरी आंदोलनाला साहित्यिकांचे पाठबळ मिळाले असते तर शेतीचा प्रश्न कदाचित तेव्हाच कायमस्वरूपी निकाली निघाला असता पण इंद्रजित भालेराव, भास्कर चंदनशिव, शेषराव मोहिते आणि काही अपवाद वगळले तर शेतकरीपुत्र असलेल्या साहित्यिकांनी मनाचा आणि लेखणीचा कोतेपणाच दाखवला. त्यांना राजाश्रयाच्या वैभवावर पाणी सोडता न आल्याने शेतकरी आंदोलनाचे फार मोठे नुकसान झाले. 
 
             “साहित्य हा समाजाचा आरसा असतो” असे म्हणतात. ते जर खरे असेल तर साहित्यात समाजातील वास्तवतेचं, वास्तवतेच्या दाहकतेचं प्रतिबिंब उमटायलाच हवं ना? सर्वच साहित्यिक उच्चकोटीचे विचारवंत-अर्थतज्ज्ञ-शास्त्रज्ञ-शेतीतज्ज्ञ नसतात असे मान्य केले तरी प्रतिभावंत तर नक्कीच असतात ना? मग प्रतिभेला अभ्यासाची जोड देण्यात काय अडसर असावा? निदान समाजातील प्रतिबिंब साहित्यात प्रतिबिंबित करण्यात काय तरी अडचण असावी? पण गेल्या २०-२५ वर्षांमध्ये देशात ६ लाखापेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याची दखल साहित्यक्षेत्राने गांभीर्याने घेतलेली दिसत नाही किंवा त्याचे प्रतिबिंब साहित्यात प्रभावीपणे उमटलेले सुद्धा आढळत नाही. शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे पुस्तक एक शरद जोशी सोडले तर साहित्यक्षेत्रात उपलब्ध नाही. पूर्ण देशासहित विदर्भप्रदेश गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांमध्ये होरपळत आहे पण शेतकरी आत्महत्यांवर सर्वंकश प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध आणि मागोवा घेणारे आज एकही पुस्तक उपलब्ध नसणे ही बाब साहित्यक्षेत्रासाठी शोभादायक नाही. साहित्यक्षेत्रातील ही शेतीसाहित्याची उणीव भरून काढण्यासाठी शेतीशी प्रामाणिक व कटिबद्ध असणार्‍या लेखक-कवी-गझलकारांनी आता सर्व बंधने झुगारून, स्वत:चा अहंकार बाजूला सारून, वास्तवनिष्ठ, शास्त्रशुद्ध व तर्कसंगत विचाराची अत्युच्च पातळी गाठण्यासाठी प्रथम अभ्यासाला लागले पाहिजे. अभ्यासाला अनुभवाची जोड दिली पाहिजे. आपल्याला जे लिहायचे आहे ते लिहिण्यापूर्वी शेतीअर्थशास्त्राच्या कसोटीवर तपासले पाहिजे. आपण जे लिहिणार असू ते शेतीची बिकट समस्या सोडवण्यासाठी उपयोगी की उपद्रवी याचेही मंथन केले पाहिजे आणि नंतरच लेखनाला सुरुवात केली पाहिजे. काळ्या मातीशी इमान राखणारे लेखन करायचे असेल तर सृजनशीलतेला पहिल्यांदा भ्रामक कल्पनांतून बाहेर काढले पाहिजे.  लेखनशैलीचा उपजतपणा, स्फूर्ती, प्रतिभा व परकाया प्रवेश वगैरे कल्पनांना टाळून कृत्रिम का होईना पण वास्तवाला चितारणारी अभ्यासपूर्ण लेखनशैली जाणीवपूर्वक विकसित करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे.
 
             साहित्यक्षेत्रात आजपर्यंत झालेले लेखन बहुतांशी “शेतीच्या शोषणाला पोषक” असेच लिहिल्या गेलेले आहे आणि “मला जे स्फुरले ते मी लिहिले” हाच दृष्टिकोन त्याला मुख्यत्वे कारणीभूत आहे. साहित्य म्हणजे केवळ वाचकांच्या करमणुकीसाठी लिहायचे नसते, स्वत:ला महानतेकडे पोचविण्यासाठी व स्वत:चे लेखन साम्राज्य वाढविण्यासाठी तर अजिबातच लिहायचे नसते. वाचकाची दिशाभूल करण्याऐवजी त्याला विषयाची योग्य जाणीव करून देण्यासाठी लिहायचे असते, याचा विसर पडल्याने दमदार शेतीसंबंधित साहित्यकृती निर्माण झालेली नसावी, असे समजायला बराच वाव आहे.
 
             केवळ आरशासारखी मर्यादित भूमिका सुद्धा साहित्याची असू नये. समाजमनाच्या सामूहिक जडणघडणीचे व मानवीमूल्यांच्या उत्क्रांतीचे उगमस्थान साहित्य हेच असते कारण मनुष्य जन्माला घालण्यापूर्वी माणसाला एखाद्या विषयात पारंगत करायची देवाकडे अथवा निसर्गाकडे कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे जन्माला आल्यानंतर कुठल्याही माणसाला कुठलाही विषय ज्ञात करून घ्यायचा असेल तर त्याच्यासमोर “साहित्य” हाच एकमेव पर्याय आहे. अनेकजण मानवीमूल्यांच्या जडणघडणीसाठी ’संस्कार’ महत्त्वाचा मानतात. पण ते सत्य नाही कारण संस्कार देणार्‍याची मानसिक व वैचारिक जडणघडण सुद्धा साहित्यातून झालेली असते. संस्कार देणार्‍या व्यक्तीचीच जर साहित्याने दिशाभूल केली असेल तर दिले जाणारे संस्कार हे निर्दोष सुसंस्कार नसून सदोष कुसंस्कारच असणार हे उघड आहे. निकोप मानसिकतेचा समाज घडविण्याचे काम मुळात साहित्याचे आहे. म्हणून लेखनी हाती घेऊन खरडणारांना सामाजिक वास्तविकतेचे भान असणे ही मूलभूत गरज साहित्यिकांसाठी अनिवार्य मानली गेली पाहिजे.
 
             बदाबदा पिले प्रसवण्याची रानडुकरांची क्षमता जशी वादातीत असते तद्वतच बदाबदा पुस्तके प्रसवण्याची साहित्यिकांची प्रजनन क्षमता असणे ही काही साहित्यिकाच्या सृजनशीलतेची, सृजनाच्या प्रगल्भतेची कसोटी होऊ शकत नाही. आजपर्यंत हजारो, कदाचित लक्षावधी पुस्तके लिहिली गेलीत पण “शेतीमालाला रास्त भाव मिळत नाही म्हणून शेतीत गरिबी आहे, शेतमाल स्वस्तात लुटून नेला जातो म्हणून गावगाडा भकास आहे” एवढे एक वाक्य लिहिण्याइतपत सुद्धा अभ्यास, वास्तविकतेची जाण आणि भान एकाही साहित्यिकाला का असू नये? शेतकर्‍याच्या पोटी जन्म न घेता, शेतीशी दूरान्वयानेही संबंध नसणार्‍या शरद जोशींना जे कळले ते शेतकर्‍याच्या रक्ताच्या, हाडामांसाच्या शेतकरी पुत्र साहित्यिकाला का कळले नाही? याचा निदान शेतकरीपुत्र असलेले साहित्यिक तरी विचार करणार आहेत की नाही? आत्मचिंतन करणार आहेत की नाही? भाकड साहित्यनिर्मितीमुळेच शेतीचे प्रश्न सुटण्याऐवजी आणखी किचकट झालेत, शेतीच्या लुटीच्या व्यवस्थेला आणखी बळ मिळाले, हा दोष साहित्याने व साहित्यिकांनी स्वीकारला पाहिजे.
 
             वास्तवतेशी प्रतारणा करून आभासी विश्वात रमणार्‍या व कल्पनाविलासाचे मनोरे रचून केवळ पुरस्कार, पारितोषिकांकडे टक लावून बसलेल्या बाजारी साहित्यिकांकडून शेतीला न्याय मिळण्याची शक्यता नसेल तर आता प्रत्यक्ष शेतकर्‍यांनीच समोर आलं पाहिजे. आमचं आयुष्य जगलो आम्ही, आमचं आयुष्य भोगलं आम्ही. रक्ताचं पाणी करून राबलो आम्ही, हाडाची काडं करून झिजलो आम्ही..... अनुभूती आमची आणि आम्ही म्हणतो आम्ही लिहिणार नाही. दुसर्‍याने कुणीतरी लिहावं! पिढ्यानपिढ्या उलटून गेल्या पण आमचा शेतकरी बोलायला तयार नाही. मुळात भारतातील शेतकरी मुकाच आहे. तो बोलत नाही, लिहीत नाही आणि वाचतही नाही. हे चित्र बदलायचं असेल तर शेतकर्‍यांनी एका हातात नांगर आणि दुसर्‍या हातात लेखनी धरली पाहिजे. हा संदेश देण्यासाठी व त्यादिशेने प्रारंभिक पावले टाकण्यासाठी या शेतकरी साहित्य चळवळीचे प्रयोजन आहे.
 
             शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवू पाहणाऱ्या हौशा-गौशा-नवश्यांचा जमाव एवढेच केवळ मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि यातून लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवी पिढी जन्माला यावी, अशी अपेक्षा आहे.
 
             समाजाची मानसिक जडणघडण व वैचारिक उत्क्रांतीची दिशा बदलण्याची ताकद साहित्यात आहे आणि साहित्याला बदलण्याची ताकद शेतकर्‍यांच्या मनगटात .....! म्हणून....  काळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो, चला जरासे खरडू काही.....!!  काळ्याआईविषयी बोलू काही......!!!
 
- गंगाधर मुटे
 

Share