तंत्रज्ञान स्वातंत्र्य परिषद
नमस्कार मित्रांनो,
व्हाटसऍप गृपवर चाललेला युक्तिवाद वाचला. खूपं वेळ लागला पण वाचला. खरंच आनंद झाला. अयशस्वी कार्यक्रमाचे खापर फोडण्यासाठी होणाऱ्या युक्तिवादापेक्षा, यशस्वी कार्यक्रमाच्या बातम्या व्यवस्थित लागल्या नाहीत यासाठी झालेला युक्तिवाद आनंद देणारा आहे. आपल्यातल्या त्रुटी शोधण्याची ही प्रक्रिया होत राहणे आवश्यक आहे.
प्रसिद्धी संबंधी आपली कमजोरी वर गंगाधर मुटे यांनी अचूक बोट ठेवले आहे व उपाय ही सुचविला आहे. यावर गांभीर्याने विचार करायला हवा. एक अडचण आहे की जिल्हावार आवृत्त्या झाल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात ही जबाबदारी समर्थपणे पेलणारी व्यक्ती मिळणे आवश्यक आहे. येत्या कार्यकारिणीत या विषयावर चर्चा करून निर्णय घेऊ.
युवा परिषद यशस्वी झाली. त्यात अकोला जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, युवा आघाडीचे अध्यक्ष सतीश दाणी, राजाभाऊ पुसदेकर, वर्धा जिल्ह्याची पूर्णं युवा टीमचा मोलाचा वाटा आहे. हे श्रेय सर्वांना जाते.
आपला कार्यक्रम आणखी जोरदार करण्यासाठी कार्यकर्त्यामध्ये होणारी स्पर्धा स्वागताहार्य आहे फक्त वैयक्तिक कटुता असू नये. अकोट पेक्षा अकोला जोरदार झाले पाहिजे व त्यात अकोटचा सिंहाचा वाटा असावा याला म्हणतात संघटना. लक्ष्मीकांत अजून नवीनं आहे पण दखलपात्र झाला यातच त्याच्या कामाची पावती आहे.
आता संधी आहे, या संधीचा उपयोग शरद जोशी साहेबांचे व आपले स्वप्न साकार करण्यासाठी कसा करायचा याचा विचार सर्व युवा कार्यकर्त्यांनी करावा. युवा परिषदेत युवकांना बोलण्याची संधी कमी मिळाली ही बाब खटकलीच. संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित असल्यावर प्रोटोकॉल प्रमाणे बोलू द्यावे लागते. युवा परिषदेला जळगाव, पुणे, परभणी, वर्धा वगैरे जिल्ह्यातून अनेक युवा कार्यकर्ते आले होते व बोलण्यास उत्सुक होते पण संधी नाही मिळाली. संघटनेकडे अभ्यासू, त्यागी व एकनिष्ठ ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे व ही अभिमानाची बाब आहे, पण अनेक वर्ष तीच ती भाषणे तरुणांना बोर होतात असे अनेक युवकांनी बोलून दाखवले. नवीन मुलांकडून नवीन कल्पना मिळू शकतात, वक्ते निवडता येतात, त्यांच्या विचारातील त्रुटी दाखवून योग्य विचारधारेवर आणता येऊ शकते.
माझ्या सारख्याला, प्रेक्षकांमध्ये बसून आपल्या पोरांचे कौतुक पाहायला आवडेल. काही गोष्टी युवकांनी समजून घ्याव्या लागतील, काही ज्येष्ठ नेत्यांनी समजून घ्याव्या लागतील व संघटनेची सुरू झालेली घोडदौड ही विजयी घोढदौड ठरेल याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे असे वाटते.
आता मिशन अकोला दि. २० मे रोजी होणारी तंत्रज्ञान स्वातंत्र्य परिषद सुपरहिट होऊन, परिषदेच्या व्यवस्थित बातम्या सर्व वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर झळकतील अशी तयारी करूया. ALL THE BEST
अनिल घनवट
अध्यक्ष, शेतकरी संघटना
(परिषदेच्या प्रचारासाठी त्या विषयातील तज्ज्ञ वक्त्यांची गरज भासल्यास कळवावे)