नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अभिनंदन..!!
ज्याच्या अंत:करणात अभिजात कवितांच्या ओळीच्या ओळी सतत झंकारत असतात ते पुरूष भाग्यवान असतात. अशाच काव्यवृत्तीने झपाटलेल्या, कवी हृदयाच्या, तरल मनोवृत्तीच्या, श्रेष्ट पुरूषोत्तमाकडूनच दर्जेदार कवितासुद्धा लिहिल्या जातात. त्या कविता प्रसिद्ध होतात. रसिक वाचक अशा दर्जेदार कवितांना अप्रतिम दाद देतात. अशा चांगल्या कवितांचे जेव्हा संग्रह प्रसिद्ध होतात तेव्हा त्या कवितांना शाश्वत मूल्य प्राप्त होते.
चांगली,लयदार,आशयघन कविता गंगौघासारखी असते. तिचा प्रवाह पवित्र असतो,निर्मळ असतो.अर्थाचे आणि अभिव्यक्तीचे दोन्ही काठ ती कविता समृद्ध करते.गेली सातशे वर्षे अभिजात मराठी काव्यविश्व असेच बहरले आणि काव्यरसिकांकडून असेच जोपासले गेले.
तेराव्या शतकाच्या उत्तरचरणात ज्ञानदेवांसारखा अवतारी महापुरूष आळंदीत अवतरला. नेवाश्यात गीताभाष्याच्या निमित्ताने काव्यगंगेचा उगम झाला आणि अनेक वळणे घेत एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात ही काव्यगंगा वर्धा जिल्ह्यातल्या छोटी आर्वी ह्या छोट्या गावात वळणे घेत घेत, येवून पोचली. श्री गंगाधर मुटे ह्या आर्वी गावातल्या एका अभिजात कवीच्या काही कविता वाचनात आल्या आणि माझे काव्यभारले मन एकदम प्रसन्न झाले. कवी गंगाधर मुटे यांचे सर्वात मोठे यश हे आहे की, त्यांच्या एकूणच काव्यविश्वाला वृत्ताचे भान आहे. शब्दकळा त्यांच्यावर प्रसन्न आहे. विशेषत: ‘माय मराठीचे श्लोक’ हे भुजंगप्रयातातील श्लोक तर उत्तमच आहेत. मराठी भाषेचे पदलालीत्य प्रस्तुत पाच श्लोकांमधून खूप सुरेख प्रगट झालेले आहे.
कवी गंगाधर मुटे हे सहृदय अंतकरणाचे कवी आहेत ह्याच्या अनेक खुणा प्रस्तुतच्या ‘रानमेवा’ मध्ये मला प्रत्यक्षात जाणवल्या. त्यांचे “पहाटे पहाटे तुला जाग आली” हे विडंबनकाव्य वाचतांना मला आचार्य अत्रे [केशवकुमार] ह्यांच्या काही विडंबन कवितेच्या ओळींची आठवण झाली.
‘आर्वी’सारख्या छोट्या गावात राहून कविता जोपासणे एवढे सोपे नाही. परंतु कवी गंगाधर मुटे ह्यांनी उजव्या हाताच्या तळव्यावर नंदादीप जपावा तसे आपले पवित्र काव्यविश्व फ़ार उत्कटतेने जोपासलेले आहे. त्यांच्या हातून अधिक उत्तम कविता लिहिल्या जातील ह्याची मला निश्चितपणे खात्री वाटते. प्रस्तुत संग्रहातील विशेष उल्लेखनीय कविता म्हणून मी “हताश औदुंबर” ही कविता निवडेन. सद्यस्थितीवर इतके उत्तम भाष्य फ़क्त श्रेष्ठ कवीच करू शकतो ह्याचे ही कविता म्हणजे उत्तम उदाहरण ठरेल.
माझ्या अंत:करणपूर्वक शुभेच्छा.
वामन देशपांडे
१३, प्रियदर्शिनी, अग्रवाल हॉल लेन
मानपाडा रोड, डोंबिवली,पूर्व(मुंबई) ४२१२०१
....................... **............. ......... **.............. **.............