Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***उठाव

उठाव

सकाळची वेळ. सुर्याच्या सोनेरी किरणांनी सारं गाव रूपेरी झालेलं. प्रसन्नमय झालेलं. आया-बहिणींनी अंगणात सडा-सारवण घालून रांगोळी रेखलेल्या. अशा चैतन्यमय वातावरणात ढोरम्यांची झाडझूड करून ल्हानच्या तोंडानं दुचागती होऊन पंढरीकाका दाट्यात बसला होता. मीठाचा खडा जसा पाण्यात विरघळावा तसा विचारात विरघळला होता. असा विचारात मग्न बसलेल्या पंढरीकाकाला हाक घालावं तं कवा बोकारून धावन ह्याचा कधी नेम नव्हता.
आता ह्यांना बोलवावं तरी कसं ? ह्या विचाराने मालाकाकू प्रश्नार्थक नजरेनं त्यांच्याकडं पाहात चुल्हीवर पोळ्या टाकत होती. इतक्यात पिंट्या किराणा दुकानातून किराणा घेवून आला. तसाच आल्या-आल्या हातचा थैयला खाली ठेवून पंढरीकाकाला उदास पाहून बोलू लागला," बाबाs.. ओs... बाबा..! कायचा इचार करता ? कवपावतर नुस्ता इचार करसानं ? फक्त इचार केल्यानं कोणत्याई गोष्टीवर तोडगा नाई निंगत. मांगही त्यानं तारीख संपलेलं अवशीद देल्तं. आन् त्याही दिवशी देलं. असं अवशीद कवपावतर फवाराच ? उधारीनं आणतो म्हणून त्यानं असं फसवाच का ? आन् भाव थोच...रूपया बी कमी नाई. बाबा ! आपण मजबूर जरूर हाहोत. पण लाचार नाई. कवपावतर ह्याचा अन्याय असा मुक्यानं कुथत सोसायचा ? आन् का म्हणून सोसायचा ? आपल्याले कवातरी आवाज उठवा लागन ? त्याच्या कुळाचे गावात खंडीभर हाये. म्हणून आपण का...भ्याचं हाये का ?" असं खवळलेलं लेकाचं बोल्न ऐकून काका विचारातून जागा होत म्हणाला," का म्हन्ला पिंट्या ?"
" कवपर्यंत आपण असं थंड बसाचं. थ्या तुक्याला कवातरी इचारा लागननं. का, का म्हणून असं अवशीद मस्तकी मारलं ?" पिंट्यानं पुन्हा थोडक्यात सांगितलं.
" बराबर हाये तुह्य ! पण...?" म्हणून काका उगा राह्यला. बापचं असं बोलता-बोलता एकाएकी थांबून उगं राह्यनं हे पिंट्याला खटकलं. न् त्यानं विचारलं," पण का ? थांबले कावून बोला ? का झालं उगं राहाले ?"
" आरे ! थे लोकं मोठे झगडेल हाये. अज त्याच्या दुकाणात जावून. चार लोकापुडं हे इचारलं. तं उद्या कावरल्या कुत्र्यावानी आपल्यावर धावून येईन. आन् तोंड टाकून खेसकावन." मनातील भीती लेका पुढं मांडत पंढरीकाका बोलला. आणि काकाच्या चेहऱ्यावरती एकदम घाम खळखळून आला. "मंग ह्याची तुम्हाले भीती वाटते तं. पण बाबा, कवपर्यंत हे सहन कराचं ? चूकी त्याची का ? आपली. तसं तं त्यानं भ्याले पाह्यजे. मंग आपण का भ्याचं ? बाबा, 'अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो.' असं म्या कोणत्या तरी पुस्तकात वाचलं होतं. मंग आपण का गुन्हेगार व्हाचं का ? आपण का चोरी केली का ? आपल्या देशासाठी जे लढले. ते का अन्याय सहनच करत बसले का ? तर त्यांनी अन्यायाशी लढा देला. आपल्या हक्कसाठी लढले. मंग आपण का भ्याचं हाये ?" आपल्या बापाचा चेहरा घामाघून झालेला पाहून पिंट्या हक्काचा बोलला. लेकाचं सत्य बोल्न ऐकून काका शहारून गेला. त्याच्या धडधडत्या काळजाला धीर मिळाला.
आपल्या पोराचं का चुकते ? तोही बराबरच बोलते. कवातरी कोणाले नाई कोणाले ह्या बद्दल आवाज कराच लागनं. असा विचार करून अंगात अवसान आणत,"बरं ! पिंट्या, तू म्हणते तं अज आवाज उठवाचाच. पण एकट्यानं नाई. तं साऱ्या मिळून." काकाचं असं ऐकून पिंट्याने विचारले," पण बाबा, सारे कोण ? "
"अरे ! आपल्या घरामांगची सुधा नाई का ? थ्या बिचारीले पण असच अवशीद देलं का नं. बिचारीचा नवरा कर्जापाई मेला. ल्हान-ल्हान पोरं हाये. तिले पण त्यानं हे अवशीद देलं. थ्या एकटी नं हे कोणाले सांगाचं ? थ्या दिसी मले हे सांगता-सांगता बिच्यारी रडली. असच जर बाकी लोकाय संग झालं असन तं ? थे लोकं मंग आपल्याले सोबती होईननं." काका विचारपुर्वक मनोमनी पाऊल कसं टाकाचं ? हे योजून बोलला. " बरं ! बाबा, मंग तुम्ही आता लोकायकडं जाता का ? मी जाऊ ?"
" पिंट्या, तू ढोरायले कुपाटीत अटकवून ये. तव पावतर मी लोकायले जमा करतो." असं काकाचं ऐकून पिंट्या ढोरमे घेवून वावराकडं निघाला. आणि पंढरीकाका एक औषधीची बाटली घेवून गावात निघाला.

पंढरीकाका हा ओलीत पाच एकराचा धनी. पण गरीब होता. गेलसाली त्यानं त्याच्या पोरीचं लग्न केलं. त्या लग्नात वराने बक्कळ हुंड्याची मांगणी केली. पोरीच्या लग्नासाठी कसली ही हयगय न करता मागणी पुर्ण केली. त्या कर्जाची भर गुदस्ता घराच्या बांधणीसाठी घेतलेल्या बँकेच्या कर्जात पडून ते पुन्हा डोईजड झालं. ह्या कर्जाच्या वज्यामुळे रोज उठता-बसता काकाला गुदमरल्यागत व्हायचं. हे कर्ज आज पर्यंत फिटल असतं. परंतु मागल्या वर्षी पाऊसकाळा वेळेवर नाई पडला. म्हणून सोयाबीन नं च्याट दिली. कशा-बशा तुरी पिकल्या. पण त्यांचे भाव एकाएकी कोसळले. तुरीने ही हाती तुरीच ठेवल्या. कापूस जरासा झाला. तो लाव लागवडीत, किरकोळ खर्च म्हणता म्हणता मोठ्या खर्चात गेला. पुन्हा जूनं-नवं सारखचं. पुन्हा नव्याने कंबर कसून पिकवासाठी तैय्यार झाला. परंतु तुका कृषी केंद्रातली उधारी अजून फिटली नव्हती. या ही वर्षी तुका शिवाय आपल्याला गत्यंतर नाही. असं ठरवून तो खते, बियाणं आणि औषधी आणू लागला. यात तुकाने काकांना तारीख संपलेली औषधी दिली. ते असं झालं-
गेल्या मंगळवारी काकाने तुका कृषी केंद्रातून ऐसिफेट, किनालफास आणि एक टॉनिक आणली होती. पिंट्या कॉलेज मध्ये गेल्यामुळे त्यांनी भाजीपाल्यावरच्या अळ्या पाहून तेव्हाच आल्या-आल्या फवारणी केली. एवढ्यात फवाऱ्याचं डबकं पाठीवरून ठेवत नाही. तर पिंट्या वावरात आला. थेट काकाकडे. त्याचं लक्ष एकदम ऐसिफेटच्या पुडक्याकडं गेलं. त्यानं पुन्हा त्या पिशवीला अलटून-पलटून निरखून पाह्यलं. तर त्या पुढक्यावरची तारीख संपलेली दिसली. आणि वर हलक्या-फुलक्या कंपणीची आढळली. हे कळताच काकाला पिंट्या म्हणाला.,"बाबा, हे पुडके बराबर ठेवा. मांगं मीही त्याच्या दुकातून अवशिदी आणली होती. तवा मलेही अशीच तारीख संपलेली अवशीद देल्ती. मले वाटलं रोज हा बराबर अवशीद देते. आज का आपल्या इस्वासाले हा तडा जाऊ देईन. म्हणून म्या तवा अवषधी पाह्यली नाई. आज त्याने तुमाले पण देली. मागं मनोहर आबाजीले पण देली होती." असं म्हणून तेव्हाच त्यानं काकाले आवाज उठवाले लावला होता. परंतु तेव्हा काकाने भीतीपोटी नकार दिला. आता मात्र लेकाचं बोल्न ऐकून तो जागी झाला होता. त्याच्या काळजामध्ये कुठे तरी अन्याया विरूद्ध लढण्यासाठी वात पेटली होती. आज काकाला अन्यायाची चीड आली होती. आजही गरीबी त्याच्या अंगाला चिकटलेली होती. अंगात मळलेली बंगाली, पायात गुडग्यावर खरचटलेला मळका पायजामा. त्याच्यावर शेणाचे ल्हान-मोठे शितोडे. अशाच अवतारात काका गावात निघाला होता.

चालून - चालून जिल्हा परिषदच्या शाळे मागे असलेल्या शंकरदादाच्या दारापाशी आला. नुकताच शंकरदादा वावरातून पऱ्हाटीले पाणी लावून आला होता. तो हात-पाय टॉवेलने पुशीतच एवढ्यात काका म्हणाला, " का सुरू हाये गा शंकर ?"
तसाच शंकरदादा अदबीनं," ये पंढरीभाऊ...बस. काई नाई आत्ताच आलो. वावरातून !" काकांना खुर्ची देत म्हणाला. आणि शंकरदादा पलंगावर बसला.
"मी का म्हन्तो ?"
"म्हणा नं !"शंकर.
"आपल्याले अज अवाज उठवाचा हाये."
"कायच्या बद्दल ?"
"मांगं म्या तुले सांगलं नोयता का ? त्या बद्दल." काका.
" हं..हं..आलं ध्यानात. पाहा म्या सांगतो म्हन्लं तुमाले माई गोष्ट. त रावूनच गेली. थ्या दिसी माह्या पोराले म्या अवशीदीसाठी धाडलं होतं. तवा त्यानं मलेही तारीख संपलेलं आशाटाप देलं...हे पाहा अजून अर्ध तसचं राह्यलं." पंलंगाखालच ऐसिफेट काकांना दाखवित शंकर म्हणाला.
"बरं ! मंग चाल. हे घेवून घे संग त्याच्या तोंडावर माराले." काका म्हणाले.
"थांबा नं. च्या मांडला. च्या पेवूनं जाऊ ?" दादा म्हणाला. गटागटा चाय पेवून काका नि दादा बाहेर पडले. दोन घंरं ओलांडले न् गणेश न्हाव्याच्या दुकानात आले. " राम ! राम ! पंढरीभाऊ. राम ! राम ईवाई." गणेश न्हाव्यानं पंढरीकाकाला राम राम घातला. तसाच शंकरदादानं हसत-हसत ईवाई ऐकून नमस्कार घेतला. " का म्हणता पंढरीभाऊ...कसं का येनं केलं ?" न्हाव्यानं काकाला विचारलं. तसाच काका म्हणाला," गन्शा, गावात तुक्याच्या कृषी केंद्रात अशानं असं सुरू हाये. त आमचं म्हन्हं असं पडलं का, आज त्याच्या दुकानावर जावून हल्लाच कराचा म्हणून." काकानं दुकानवर येण्याचं कारण साऱ्या ग्राहका पुढं न्हाव्याला सांगितलं. तर त्यातला म्हातारा तिरभोन आबा उद्गारला," पंढऱ्या, माह्यासंग बी असं झालं. पण मी अवाज करू शकलो नाई...पह्यलच माह्यं एकट घर...आन् मी परगावून आलेला म्हार...पर अज तुमी पावूल टाकलं तं मी तुमच्या संग हाये." आबाचं असं ऐकून काकाला पुन्हा चीड आली. नि दात ओठ खावून पुटपुटला," तुक्या...साल्या शेटभर वय तुह्य...नं असल्या मजबूर माणसांना थतलवलं..थांब साल्या तुले नं..."
तसाच गणेश न्हावी एका म्हताऱ्या बुढ्याचे डोक्यावरचे केसं वस्तऱ्याने काढत म्हणाला," काका, माह्या बाबतीत असं एक-दोनदा घडलं. पण मले ह्या धंद्यापाई तुमच्याकडं न् त्या तुक्याकडं जाले नाई भेटलं. पण आता चाला....बाकीचे जेवढे राहीले कटींग-दाढी कराचे त्यायनं संध्याकाई या...जा रे...बेटा..जा...!" लहान-मोठ्या गिऱ्हाईकाला सांगत न्हावी बोलला. तसचं त्याने दुकान बंद केलं. "पंढरीकाका, आमी पण येतो. आम्हाले मांगं तुक्या चांगला उधारी बद्दलं माय-बहिण घेवून बोल्ला. त्याले आता माय-बहिण कशी काढाची हे सांगतो." कोलाम पुऱ्यातला अर्जुन्या म्हणाला. त्याच्या सोबत बेघारावरचा राहुल्या आणि भिमवार्डातला गौतम व साजन्या होता. हे तरणेबांड पोरं काकाशी जुळले. काका, शंकरदादा नि गणेश न्हावी पुढे निघाले. त्यांच्या माग्न अर्जून्या, राहुल्या, गौतम्या, साजन्या आणि तिरभोन आबा मागं पुन्हा काही कास्तकार होते. चित्रपटात एखादाला मारासाठी जसे दहा-बारा लोकं बाह्या सवारून निघते. तसेच हे सारे हाताच्या बाह्या दुमडून निघाले होते. साऱ्यांच्या चेहऱ्यावर संताप दिसत होता. चीड चकचकीत होती.
आपण आपल्या अडाणी पणानं दोन दिसाच्या तुक्याला बळी पडलो. कर्जापाई माह्या, पिंट्याले मी सायन्सले नाई जावू देलं. म्हन्ल, तेवढे पैसे नाई आपल्याकडं त तू तालूक्याला आर्टच घे. बायको, गत सालापासून कंबरं न् वातानं बोंबलत हाये. बिचारीले चाल मन्लं दवाखाण्यात तं म्हन्ते, आता नाई दुकत...लावले टूप मेडीकल मंदले. अशा परिस्थितीत आपलं दुक कोणाले सांगाचं ? असा वारंवार पंढरीकाका पुटपुटत पुढं तडाक्याने पावलं टाकीत होता. इतक्यात शंकरदादा म्हणाला," काका, आता कोणाच्या घरी जाचं ?"
"शंकर जास्त वेळ ह्याच्या त्याच्या घरी फिरत नाई बसाचं. जास्तीत जास्त लोकं जितं भेटते. तितं जाचं." काका.
" मंग आता कुठं जाचं ?"गणेश न्हावी म्हणाला.
" आत्ता पाटलाच्या कंट्रोलात. नं मंग चावडीवर....बाकी लोकं आपल्याले तुक्याच्या कृषी केंद्रातचं भेटते." काका म्हणाला.
भकाभका पाय उचलत सिताराम पाटलाच्या कंट्रोलात पोहचले. इथे धोटे मास्तर, विनोद कुबडे, कुंदन चाफले, निखिल महाजन व अर्जून कांबळे हे गावातील ठळक, जाणते नि हुशार लोकं पाटला सोबत कसली तरी चर्चा करीत होती. यांच्या सोबत पुन्हा ह्या त्या शेल्याचे गरीब लोकं पायताणावर ढुंगणं टेकून बसून होते.

काकाने येता येवून पाटलाला सन्मानाने नमस्कार घातला. तसाच पाटलाने देखिल घालून येण्याचं कारण विचारलं. तसच काकाने लोकायसोबत येण्याची बाब स्पष्ट केली. तसाच अर्जून कांबळे काकांकडे पहात म्हणाला,"पंढरी दादा, तू यांना घेवून आला हे बरं झालं. ह्यांच्या संग( गावच्या ह्या त्या शेल्याच्या लोकांकडे पाहात) असच घडलं म्हणून आम्ही इथं चर्चा करीत होतो. मार्ग काढीत होतो. " हो पंढरी..आम्ही ह्यासाठीच आता तुह्याकडं येत होतं...बरं झाला. तूच आला."काकाकडं पाहात पाटील म्हणाला. " मंग चाला नं कायले उशीर करता." हळूच विनोद कुबडे म्हणाला. " हो...हो...चाला...आता चावडीवर...तितं सरपंच्यांना धरू. न त्यांनाही नेवू." निखिल महाजन दमानं बोल्ला.
" चाला..तर...मंग." काकां नि पाटील एका वेळेस बोल्ले नि निघाले. चावडीवर.
चार-पाच घरे मागे टाकले. दरम्यान पांदीचे लोकं यांच्या कडे डोळे फाडूफाडू पाहात होते. आपापसात बातचीत करीत होते. कोण गेलं का ? कोण मेलं ? का कोणी येत हाये राजकारणी नेता ? का कुठं चाल्ले हे कोणाले मारासाठी ? असे सवाल जबाब करू लागले. टकं टकं डोळे वटारून ह्यांच्याकडे एक सारखे आपले डोळे ताणू लागले.
लोंकाकडे नकळत नजरा फिरवत. लोकांच्या लोकांमंदी गप्पा गोष्टी पाहत चावडी आली. चावडीवर सरपंच सोडला तर गावातील बरेच लोकं आपापल्या गोष्टीत तल्लीन होते. पंढरीकाका, पाटील एकाएकी टोळी घेवून दिसले. तेव्हा त्या लोकातील एका गृहस्थाने पाटलाला विचारलं," पाटील , ह्यो कायचा मोर्चा काडला.?" पाटील जोरात म्हणाले," हा मोर्चा नाई. तर हा उठाव हाये. जो तुक्याच्या कृषी केंद्रावर चाल्ला." त्यातल्या काई शेतकरी बांधवाना तुक्याच्या दुकाणात का होत आहे. हे मालूम होतं." ज्यांना कळलं नव्हतं. ते मूलमूल एकामेकांचे थोबडे पाहात होते. पंढरीकांकानी त्यानां दोन घटकात सारं प्रकरण समजावून सांगितलं. मग एकच गवगवा सुरू झाला. एकच कल्ला, आवाज उठला," तुक्या, चोर हाये. आन् आपण चोराचे हात भरत होतो. हे थांबवलं पायजे." असं म्हणून " चाला...चाला...! मी तुमच्या संग याले तैय्यार हाये" एक गृहस्थ मुठी आवळून दात ओठ खात जोरात बोलला. "चाला...रे...या...मागे." असा म्हणीत पंढरीकाका पुढं धजला. सहा-सात घरं ओलांडून एक मोड पार केली. एवढा चालत्या लोकायचा जमाव पाहून. कुत्रे भुंकू लागले. विव्हळू लागले. भाद्रपदात जसे बोंबलतात तसे. गावातील बाया नि उर्वरीत माणसे, पोरं-सोरं घरच्या माडीवरून पाहू लागले. बाळबोध प्रश्नवाले मुलं-मुली आपापल्या आई-वडीलांना काय झालं कुठं ? असे म्हणत विचारू लागले. कोणाच्या घरी चाल्ले ? कोणं का केलं ? कायच्यासाठी एवढे लोकं जमा झाले ? ते ही समवयस्क लोकांना कॉल करून विचारू लागले. गावात-परगावात व्हास्टअपच्या माध्यमातून पाच-दा मिनिटात भरभर बातमी पोहचली. 'कास्तकारांचा उठाव....तुका कृषी केंद्रावर'.

सुर्य लंगड्या पायाने दम टाकीत दिवसाचा चढ चडीत होता. कोवळ्या तांबड्या किरणांचे आता पिवळे फिक्कट उन्ह झाले होते. पंढरीकाका साऱ्यांना घेवून तुका कृषी केंद्रात पोहचला. काकांसहीत तुक्याकडं पाहून सारे जन डोळ्यातून आग ओकीत होते. तारीख संपलेलं अवशीद आम्हाले का दिलं ? हे कवा कवा विचारतो यासाठी अधीर होते. तर काही तुक्याला आज चांगलीच अद्दल घडवायची या बेताने होते.
पंढरीकाका, पाटील, गणेश न्हावी, अर्जून कांबळे, विनोद कुबडे धोटे मास्तर आणि शंकर दादा ही कर्ती सवरती बोलणारी मंडळी कृषी केंद्राच्या पायऱ्या चढीत. तसाच तुका एकदम भांबावून आपल्या व्हीआयपी नरम खुर्चीवरून उठला. हे सारे लोकं कायले आले आपल्या दुकानावर ? ह्यांनी आता काय आणलं ? समोरच्या लोकांची गर्दी. त्यांच्या चेहऱ्यावरचा संताप, राग हे सारं विलक्षण पाहून तुका जरासा अंदरून गांगरला. तुका पुढं पंढरीकाका ताडकन उभा झाला. तशीच पंढरीकाकाने आपल्या हातची तारीख संपलेली बाटली तुकाच्या टेबलावर फेकत," का बे तुक्या, का हे मले देलं ? साल्या, फुकट त मी नेणारच नोयतो. मंग हे असं तारीख गेलेलं अवशीद आम्हाले का देलं ?" असा अवचित आभाळ गरजावं तसा गरजला. काकाचं तप्त गरजनं ऐकून तुका घामानं डबडबून गेला. त्याच्या मनात आत्ता लोकांचा जमाव. त्यांचं असं झुंबडीनं येणं. हे त्याच्या दिमाखात बसलं. आता काय करू ? कोणाले हाक मारू ? कसं यांच्याशी बोलू ? का यांच्याशी बोलू ? जे हे म्हणते ते ऐकून गुन्हा आंगावर घेवू, का खोटंनाटं काही सांगू ? तोडगा काडण्याच्या बेतात ऑ वासून काकाकडे पाहातच राहीला. " बोल नं रे ! भाड्या. का चूप रायला ? जमावातील एक इसम बोल्ला. तुकाची आता तर जी हिंमत उरली होती. ती ह्या झटक्यात ढासळून गेली.
मस्तकावर दरदरून घामाचा थर एकाएकी उखळून आला. गोरा चेहरा सफरचंद झाला. ओठ, हात-पाय बीनताकती होऊन थरथरू लागले. काय करू नं काय नाही ? त्याला कळेनासे झाले. तो फक्त मुर्तीवानी एक सारखा विचारांच्या जाळ्यात फसला होता. भीतीने काळजाचे ठोके धडधडत होते. " का रे ! बायल्या...बोल नं आता. का येवू तितं ?" जमावातील पुन्हा दुसरा इसम खवळून खेसकला. तरी तुका शांतच. झाडावानी एकाच जागेवर. ना हालींग ना डूलींग. एवढ्यात "जाऊ दे...पंढरी. जाऊ दे..चूकीनं आलं असलं ?" असा केविलवाणा काकुळतीला येवून तुकाचा बाप म्हणाला. "व्हा मांग...चाला व्हा...घराकडं...माह्या पोरानं का केलं ? व्हा दुकानाच्या बाह्यरं ?" अशी खेसकावत तुकाची आई आली. पण दोघांच्या बोलण्याचा परीणाम तीळभर ही कोणत्या व्यक्तीवर झाला नाही. " बोल नं रे ! भाड्या. भाकऱ्या आता का तुयं तोंड शिवलं का रे नंग्या ! थ्या दिसी दुकाणात आली. तवा मोठ्या माह्या हालचाली विचारे. म्हणे, तुह्या नवरा मेलातं तुले आता झोपही येत नसण ? तू अवशीद फक्त नेत जा. पैशाचं इचार सोडून दे ! मी हाय नं. फक्त एक दिस......!" आपलं बोल्न थांबून तिला एकाएकी भडभडून आलं. तिनं आपल्या पदराचा शेला तोंडात कोंबला नि हुंदके देत म्हणाली," नंग्या...तुह्या बह्यनीचा नवरा मेला अस्ता. न कोणं तिले असं म्हन्लं असतं. त त्याचे हातपाय तोडून ठेवले अस्ते. पण आमच्या सारख्या गरीबाच्या माय-बह्यण्या, बायको-पोरी तुमाले फक्त भाजीपाला वाटते. " असं म्हणून सुधाताई रडरड रडू कोसळली. नुकत्याच मालाकाकू, सुधाताई व गावातील महिला गट येवून जमावाच्या मागे उभ्या होत्या. तिथून सुधाताई आपल्या अंतकरणातीला आकांत मांडीत होती. हिच्या कडे पाहून माय-बापाचे, बहिणी-भावाचे डोळे भरून आले. सारे जण भावूक मुद्रेनं सुधाताई कडं पाहात होते. " आरे..थूत् तुह्यावर. मी त समजीत होती का, माह्या तुका ' तुका' नावापरमाने असनं. दयावान असण. तू तर इच्याराच्या पलीकडल्ला निंगला. तुले तं अद्दल चांगलीच घडली पाह्यजे." तुकाची माय-काशी सुधाला सहानुभूती दाखवत बोल्ली. तसाच तुका आता संपुर्णपणे विखरून गेला. ढासळून गेला. तो मायकडं पाहातच एवढ्यात पिंट्याने त्याचे कॉलर धरून टेबलच्या बाहेर ओढले. तसाच कसा-बसा बाहेर येत नाही. तर जमावातील काही इसम धावून आले. नि त्याच्या दुकानाच्या बाहेर रोडवरती घेवून हाता-पायांनी तुडवू लागले. बडवू लागले. कोणी बुक्या, कोणी गुडगे तर कोणी ढोपळाने त्याला मारू लागले. ज्या ज्या कडावर पडते. त्या त्या कडावर त्याले लगलगे करू लागले. हातंमुठी. जवळचा असो की, दुरचा. आपांपूट आपापल्या परी हात सफ्फा करू लागले. खंडीबर त्याचा गोतावळा होता. परंतु कसली हळहळ नाही की, कळवळ नाही. टकटक नुस्ते सारे पाहात होते. त्यांच्या अशा मुद्रेवरून साफ अदमास येत होता की, त्यांना ही तुकाने तीच औषध दिली की काय ? कुणी काहीच नाही बोलत होते. तुका बिचारा कोसळणाऱ्या लाथा-बुक्यांना हाता-पायांने वाचवित होता. तो ही कोणा कोणाचे अडवणार ? घडीभरानं तेही असह्य झाले. लाचार होवून निमूटपणे मार सोसत राहीला. त्याचे माय-बाप दूरवरून तुकाला मार खात लाचार होऊन पाहात होते. डोळ्यातून घळघळा अश्रू वाहात होते. आपला लेक असा ही दिवस आणेल याचा त्यांनी कदाचित विचार ही केला नसेल. एकटा पोर हरामखोर.

पंढरीकाका मात्र चौअंगानं खुष होता. सकाळ पेक्षा त्याचा चेहरा आता संपुर्ण पणे खुलला होता. काकांसारखे सगळे पिडीत जणलोकांचे ही चेहरे उजळले होते. सुर्य ही बराच वर आला होता.

- आशिष वरघणे
रा. सिरूड पो. वेळा त. हिंगणघाट जि. वर्धा
पिन. ४४२३०१
मो. ९६३७८१३५०६

लेखनप्रकार: 
गद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
गद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
कथा
Share

प्रतिक्रिया