नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
सत्ते तुझ्या चवीने
सत्ते तुझ्या चवीने नेते चळून गेले
कुरवाळती कुणाला, कोणा छळून गेले
सारे मिळून भेदू, हा व्यूह ते म्हणाले
लढतोय एकटा मी, सारे पळून गेले
कित्येक चाळण्यांनी, स्वत्वास गाळले मी
उरलीय चित्तशुद्धी, हेवे गळून गेले
समजू नको मला तू विश्वासघातकी मी
पाऊल सरळ होते, रस्ते वळून गेले
आता इलाज नाही, नाहीत मलमपट्ट्या
मजला कळून आले, तुजला कळून गेले
वणव्यात कालच्या त्या, काही उडून गेले
काही बिळात घुसले, बाकी जळून गेले
का सांगतोस बाबा ’अभयास’ कर्मगाथा
द्रवलेत कोण येथे, कोण वितळून गेले?
गंगाधर मुटे
.................................................
(वृत्त - आनंदकंद )
..................................................................
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
...................................................................