Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



समग्र वृत्तांत : ११ वे अ.भा.म.शे.सा.संमेलन

कृषीपंढरी सह्याद्री फार्म मोहाडी नाशिक  येथे रंगलेय
11 वे  अखील भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन 
 
                गेल्या 11 वर्षापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडिकेने मांडत गाजत असलेले अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे यंदाचे 11 वे शेतकरी साहित्य संमेलन हे कदाचित कृषीपंढरीचे वारकरी युगात्मा शरद जोशी यांच्या आत्म्याला नक्कीच शांती देऊन गेले असेल. याचे कारण ही तितकेच महत्त्वाचे आहे. आयुष्यभर युगात्मा शरद जोशी यांनी भारतीय शेतकरी हा स्वित्झर्लंड येथील शेतकऱ्याप्रमाणे आर्थिक संपन्न व्हावा म्हणून संपूर्ण चार सूत्रावर आधारित "चतुरंग शेती" करण्याचा आग्रह आपल्या हयातभर महाराष्ट्रच नव्हे तर भारताच्या इतर राज्यात फिरून केला होता. परंतु त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना फक्त जनतेशी साधता आला. मात्र कृती कुणालाही करता आली नाही. याचे महत्त्वाचे एक कारण हे असावे की पश्चिम महाराष्ट्रात जसे शेतकऱ्यांना उसासारखा नगदी पिकांचा आधार शिवाय बँकेच्या शेती कर्जाची सहज मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे. ती विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बोलण्यातून समजले की शेतीसाठी कर्ज मिळणे दुरापास्त. त्यात पिके ही लहरी निसर्गावर अवलंबून असणारी. त्यामुळे तेथील शेतकरी आर्थिक दृष्ट्या दुबळाच होता. व आज ही आहेच. शरद जोशींनी विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये शेतकरी संघटनेद्वारे खूप स्फुल्लिंग पेटविले. लाखोंच्या संख्येने अनुयायी बनवले. लाखो शेतकऱ्यांना एकत्रित करून मोर्चे, सभा, भाषणे दिली. परंतु विदर्भातील शेतकरी आर्थिक दृष्टीने कमजोर राहिल्याने चतुरंग शेतीचे प्रयत्न त्यांच्या हयातीत पूर्ण झाले नाही. मात्र त्यांचे शेतीविषयक साहित्य वाचून शरद जोशींचे या स्वप्नांचा नाशिक जिल्ह्यातील आडगांव येथील कृषी अभियंता तरुण श्री. विलास शिंदे यांनी अभ्यास करून 9 शेतकरी एकत्र येऊन चतुरंग शेतीचा प्रयोग सह्याद्री फार्म नावाने राबविला. अनेक अडथळे पार पाडत आज 1000 कोटीचा टप्पा पार पाडत हा कृषी मालावर आधारित उत्पादन करून जगातील 42 देशाची बाजारपेठ काबीज करणारा हा सह्याद्री फॉर्म शेतकऱ्यांच्या दृष्टीने कृषीपंढरीच आहे. आज जगभरातील अनेक नामवंत कंपन्या त्यात हिंदुस्थान युनिलिव्हर महाराष्ट्रातील चितळे बंधू, व अनेक नामवंत कंपन्या त्यांचे प्रॉडक्ट घेतात. मला वाटते एक वेळ शेतकऱ्याने पंढरीची एक वारी कमी करावी पण या सह्याद्री फार्मला जरूर भेट द्यावी. शेतकरी चतुरंग शेतीने किती आर्थिक दृष्टीने समृद्ध होवू शकतो. व आताचे जे उत्तम नोकरीचा वरचा क्रमांक दिसतो तो जाऊन पूर्वीचे उत्तम शेती हा वाक्प्रचार पुन्हा चतुरंग शेतीचा प्रयोग प्रत्येक शेतकऱ्याने अवलंबला तर उत्तम शेती हे पुन्हा रूढ होईल यात शंका नाही. हे या संमेलनाच्या वृत्तांत प्रसंगी सांगू इच्छितो. वाचा सह्याद्री फॉर्मचा उद्देश व विस्तार संवाद.
 
सह्याद्री फार्म

सीड टू प्लेट’ म्हणजे पीक लागवडीपासून ते ग्राहकाच्या ताटापर्यंत अन्न पोहचवताना स्वतःची मूल्यसाखळी विकसित करणारी सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. ही १०० टक्के शेतकऱ्यांच्या मालकीची भारतातील अग्रगण्य शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते . सुमार २०० हून अधिक गावातील सभासद सदस्य तसेच जोडलेले इतर शेतकरी असे एकत्रित ११ हजाराहून अधिक शेतकरी व या सर्वांचे मिळून २५ हजार एकराहून अधिक शेतीक्षेत्र असा कंपनीचा विस्तार आहे. रिटेल बाजारपेठेत कस्टमर डिलाइट (ग्राहकाचा आनंद)’ केंद्रस्थानी असल्याने त्यांना ‘व्हॅल्यु फॉर मनी’ देताना दर्जामध्ये तडजोड करायची नाही, ही सह्याद्री  फार्म्सची ठाम विचारधारा आहे.
                       महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी हा सामूहिक शेती प्रयोग असलेला व जगभरात एक उत्तम फूड  ब्रँड ने नावाजलेला  सह्याद्री  फार्मर्स प्रोड्युसर कंपनी संमेलनास आलेल्या शेतकऱ्यांनी पाहून  बोध घ्यावा.  व इतर शेतकऱ्यांना ही  कृषी पंढरीची वारी घडवावी म्हणूनच या कृषी पंढरीत 11 वे अखील भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन दिनांक 4 व 5 मार्च 2024 रोजी मोहाडी येथील सह्याद्री  फार्म येथे  भरविण्याचा घाट संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री. गंगाधरजी मुटे, संमेलनाध्यक्ष  श्री. विलास शिंदे, संयोजक ॲड. श्री. सतीश बोरुळकर यांनी आखला. आणि तो अखेर फलद्रूप झाला.
 
             ग्रंथदिंडी 
 
      दिनांक 4 मार्च रोजी सकाळी  9 वाजता
 
आता सुजाण व्हावे l शिकण्यास लेखणीने ll चतुरंग वित्तशेती l रुजण्यास लेखणीने ll
 नवज्ञान निर्मितेला l जेथे उभार तेथे ll
आशय हळूच न्यावा l  भिजण्यास लेखणीने ll* 
हा विचार  घेवून  शेती अर्थ प्रबोधिनीच्या सहकार्याने आयोजित 11 व्या अखील भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने  झाली. 
            एका सजवलेल्या  ट्रॅक्टरवर पालखी ठेवून त्यात मान्यवर साहित्यिकांचे  साहित्य ठेवून पालखीने सह्याद्री फॉर्मभोवती परिक्रमा केली. या परिक्रमेत शाळेतील विद्यार्थी - विद्यार्थिनींचे झांज पथक तसेच साहित्यिक ही सामील झाले होते. 
          पाहुण्यांचे आगमन 
                         ग्रंथदिंडी संपेपर्यंत मुख्य अतिथी  या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष हजर  होते.  प्रसिध्द साहित्यिक व मान. शरद जोशी यांचे चरित्र लिहिणारे साहित्यिक भानू काळे, तर उदघाटक  प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर.  प्रमुख अतिथी तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि  संस्कृती मंडळाचे सदस्य मान. श्री. पुष्पराज  गावंडे,  स्वराज्य पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान. श्री. अनिल घनवट,  शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित दादा बहाळे, मान. सरोजताई काशीकर,  मा. आ. ॲड. वामनराव चटप, मान. रामचंद्रबापू  पाटील, मान. स्मिता गुरव, मान. कैलास तवर, मधुसूदन हरणे, ज्ञानदेव राऊत, मान. शंकरराव ढिकले,  ॲड. नितीन  ठाकरे,  मान. दिलीप भोयर, मान. विकास पांढरे, मान. डॉ. सुरेश मोहितकर, या व इतर  नामवंत शेतकरी नेते, साहित्यिक यांचे आगमन झाले. कार्याध्यक्ष श्री गंगाधरजी मुटे व  नुकतेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाची अतिशय सन्मानाची  डी. लिट  पदवीने सन्मानित  झालेले  आजचे स्वागताध्यक्ष डॉ. श्री. विलासरावजी शिंदे यांनी सर्व पाहुण्यांचे प्रवेशद्वारावर स्वागत केले.
           चित्रप्रदर्शनास भेट 
                त्यानंतर सर्व पाहुणे चित्रकार श्री. घनश्याम देशमुख यांच्या व्यंगचित्र दालनास भेट दिली. या प्रदर्शनाचे फित कापून उद्घघाटन नानांनी संमेलनाध्यक्ष  श्री. भानू काळे यांच्या हातून केले. चित्रकार श्री. घनश्याम देशमुख यांनी नाना व इतर पाहुण्यांना चित्रांची खासियत सांगितली. या प्रदर्शनास नानांनी भरपूर वेळ देवून चित्रांची पाहणी केली. 
          उद्घाटन सत्र 
 
                     उद्घाटन सत्रास नाना पाटेकर यांचे विचार ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी जमा झाली होती. शेतकऱ्यांचा पोशाख असलेला  पायजमा शर्ट व उपरणे या साध्यासुध्या शेतकरी वेशात विनयशीलपणे नानांची सभागृहात इतर पाहुण्यांसमवेत एन्ट्री झाली. के. आर.पी हायस्कूल मोहाडी येथील विद्यार्थ्यांनी  श्री. गंगाधरजी मुटे यांच्या " नमो मायभाषा जयोस्तू  मराठी  हे गौरव गीत , नमन गीत व दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. मान. प्रमोद  राजेभोसले यांच्या बहारदार सुत्रसंचलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.  कार्याध्यक्ष श्री गंगाधरजी मुटे यांनी आपल्या प्रास्ताविकात आजपर्यंतच्या दहा संमेलनाचा वृत्तान्त व 11 वे  अखील भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन या सह्याद्री फार्मवरच का घेण्यात आले. याबाबत तसेच संमेलनाच्या निधी मिळवण्याबाबत केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. स्वागताध्यक्ष श्री विलास शिंदे  यांनी युगात्मा शरद जोशी यांच्या चतुरंग शेतीचे सूत्र या विचारांचा आधार घेवून शेतकऱ्यांना घेवून सामूहिक प्रयत्नातून सह्याद्री फार्मची  निर्मिती व वाटचालीची माहिती दिली. शरद जोशींची ही संकल्पना भारतीय शेतीचे भवितव्य उजळविणारी असल्याचे सांगितले.  स्वागत व सत्कार श्री विलासराव शिंदे व श्री. गंगाधर मुटे यांनी केले. सत्कारानंतर मान्यवरांची भाषणे सुरू झाली. 
         पाहुण्यांची भाषणे 
 
  ज्येष्ठ शेतकरी  नेत्या सरोजताई काशीकर 
         यांनी  युगात्मा शरद जोशी यांच्या शेतकरी चळवळीविषयी आठवणी सगितल्या. त्यात महत्वाची आठवण म्हणजे सितामातेच्या नावाने सुरू केलेली कुटुंबातील  महिलांच्या नांवे जमीन नावावर करून देण्याची चळवळ ती म्हणजे सीता शेती. या चळवळीचा इतका चांगला परिणाम जनमानसात  झाला की जवळजवळ दोन लाख शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबातील महिलांच्या नांवे 7/12 उताऱ्यावर  काही जमीन  करून दिल्या. मान. मुख्यमंत्री श्री. सुधाकरराव नाईक यांना त्याचे पुढे  कायद्यात रूपांतर करावे लागले.  शेतकऱ्याला खंबीरपणे दुःखातून बाहेर आणणारे साहित्य निर्माण करण्यावर साहित्यिकांनी भर द्यावा, असे आवाहन  सरोजताई यांनी केले. वामनराव चटप व ॲड. नितीन ठाकरे  यांनीही आपले  मनोगत व्यक्त केले.  महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्य तथा ज्येष्ठ साहित्यिक पुष्पराज गावंडे यांनी मंडळाच्या कार्याविषयी माहिती दिली. या मंडळामार्फत या शेतकरी साहित्य संमेलनास दोन वर्षांतून एकदा 2 लाख रुपये आर्थिक सहाय्य सुरू केल्याचे सांगितले. आणि  साहित्यिक आणि शेतकरी दोघेही मोठे व्हावेत, अशी  संमेलनप्रसंगी अपेक्षा व्यक्त केल्या.  युगात्मा शरद जोशी समवेत नाशिक जिल्ह्यातील जेष्ठ शेतकरी नेते  यांच्या शेतकरी चळवळीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल मान. रामचंद्र बापू पाटील  यांचा  हृदयसत्कार  या संमेलनाच्या निमित्ताने नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्कारानंतरचा  हृदयस्पर्शी प्रसंग म्हणजे स्वतः नानांनी बापूंचे सत्काराचे साहित्य  आयोजकांकडे व्यवस्थित पॅकिंग करून देण्यासाठी दिले. हा ही सत्कारारार्थीच्या  कार्याचा सन्मानच होता.
       नाना पाटेकर 
                    यानंतर या  संमेलनाचे मुख्य आकर्षण असलेले सिनेअभिनेते  तथा नाम फाउंडेशनचे अध्यक्ष श्री नाना पाटेकर यांचे  शेतकऱ्याविषयी अभ्यासपूर्ण भाषण झाले. आपल्या भाषणातून त्यांनी शेतकरी यांचे विविध प्रश्न पोटतिडकीने मांडतांना सरकारचेही वाभाडे काढले. आपल्या सविस्तर भाषणात ते म्हणतात की
 सोन्याचे दर वाढत असतांना गहू, तांदळाचा भाव का वाढत नाही ? देशाला रोज अन्न देणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष करणे ही गंभीर बाब आहे. शेतकऱ्यांनी आता अशा दुर्लक्ष करणाऱ्या सरकारकडे काही मागू नये. सरकार कोणते आणायचे, हे ठरविण्याची ताकद शेतकऱ्यांनी निर्माण करावी. साहित्यिकांना आवाहन करतांना  ते म्हणतात की 
 केवळ गोंजारणारे दुःख न मांडता शेतकऱ्यांच्या अस्सल वेदनांना ताकदीने वाचा फोडण्याची गरज आज आहे. शेतकऱ्याने आता मरु नये. केवळ चांगले दिवस येतील याची वाट पाहू नये तर, जिद्दीने चांगले दिवस आणावेत. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकरी साहित्य संमेलनाच्या उपक्रमाला नाम फाउंडेशनकडून दोन लाख रुपये देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. तसेच ज्यावेळी साहित्य संस्कृती मंडळाकडून निधी मिळणार नाही. त्या त्या वर्षीसुध्धा यापुढे  नाम फाउंडेशन कडून या शेतकरी साहित्य संमेलनाला दोन लाख रुपये निधी दिला जाईल अशी घोषणा केली.
   संमेलनाध्यक्ष श्री. भानू काळे 
               यानंतर संमेलनाध्यक्ष जेष्ठ साहित्यिक तथा समीक्षक मान. भानू काळे यांचे भाषण सुरू झाले. तत्पूर्वी त्यांचे भाषण ऐकण्यासाठी उद्घाटक नाना पाटेकर हे प्रेक्षकांत जावून बसले. आपल्या भाषणात संमेलनाध्यक्ष म्हणाले की साहित्य म्हणजे फक्त ललित साहित्य अशा मर्यादित अर्थाने साहित्याकडे पाहिले जाते. विचारप्रधान साहित्य हा साहित्याचा तितकाच महत्वाचा भाग असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या साहित्याकडेही सन्मानाने पाहिले पाहिजे, असे परखड मत संमेलनाध्यक्ष भानू काळे यांनी मांडले. शरद जोशी यांनी शेतकऱ्यांमधील स्वाभिमान जागवला. त्याच्यातील आत्मसन्मान जागवला. अनुदान संस्कृतीवर त्यांनी कधीच भर दिला नाही. केवळ आंदोलनाने शेती प्रश्न सुटणार नाहीत याची जाणीव शरद जोशींना होती. एका मर्यादेपर्यंत ठिणगी गरजेची असते, पुढे दीर्घकाळ ज्योतीचीच गरज असते, असे त्यांनी मत व्यक्त केले.
             या संमेलनात दोन परिसंवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
 
 परिसंवाद १)-  
  विषय :- शेतीवरील सुलतानी संकट व साहित्यिकांचा दृष्टिकोन . 
 अध्यक्ष :-   ललित दादा बहाळे ( राज्याध्यक्ष शेतकरी संघटना )
सूत्रसंचालन :- प्रा. डॉ. कुशल मुडे 
 श्री. ललित दादा बहाळे:- 
 
                शेतीवरील सुलतानी संकट व साहित्यिकांचा दृष्टिकोन या विषयावर बोलतांना दादांनी पगारदार साहित्यिक  यांच्यासह सर्व साहित्यिकांचे काय लिहावे, कधी लिहावे, किती लिहावे, त्याचे शेतकरी सुधारणेसाठी, सरकार दरबारी  धाक निर्माण होण्यासाठी मदत होईल. यासाठी आपल्या वाणीतून चांगले कान टोचले.  आपल्या भाषणात त्यांनी वरील विषयासंदर्भात खूप चांगले मुद्दे मांडले.
 1) शेतकऱ्यांचे दयनीय चित्र मांडण्यापेक्षा शेतीविषयक जागतिक स्तरावरील  नवनवीन प्रयोग, सह्याद्री फार्मर्स व प्रोड्युसर कंपनी सारख्या कंपन्या कशा काढव्यात. त्याचे फायदे आपल्या साहित्यातून, वाणीतून  आकर्षक पद्धतीने साहित्यिकांनी  मांडावे. त्याचा  फायदा शेतकऱ्यांना होईल. 
2) शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात . व एखादी आत्महत्या झाली व त्याच्या कारणाचा शोध साहित्यिकांनी  घेतला तर  त्याचा समाजावर, कुटुंबावर काय परिणाम झाला व पुढे भविष्यात होतील या प्रत्येक विषयावर एक स्वतंत्र पुस्तक पण तयार होईल.  
3) शासनाच्या जाचक अटींचा  अभ्यास करून शेतकऱ्यावर त्याचे काय सामाजिक व आर्थिक परिणाम होतील. यावर ही साहित्यिकांनी लिहिले पाहिजे.
4) 1950 नंतर लगेचच  1951च्या घटनादुरुस्तीने शेतकरी मालक जावून भोगवटदार बनले. त्यामुळे  जे दुष्परिणाम  शेतकरी आज भोगतात. त्यावर प्रचंड साहित्य निर्माण होईल. ते ही लिहिले पाहिजे. 
5) पाश्चात देशातील शेती पद्धती त्यांना मिळणारे प्रचंड उत्पन्न व भारतीय शेती त्यात अस्मानी व सुलतानी संकटाने झालेले दूरगामी परिणाम यावर ही साहित्यिकांनी  लिहिले पाहिजे.
6) सुलतानी संकटाने देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. यावर चिंतन करून साहित्यिकांनी लिहिले पाहिजे.
7) शेतमालावर  टॅक्स नाही म्हणायचे पण शेतकरी नांगरणी, पेरणीपासून टॅक्स भरतो. तयार माल विकताना व्यापारी टॅक्स कापूनच शेतकऱ्याला भाव दिला जातो. तसेच शेतकऱ्याला लाखो रुपयांना लुटायचे व  हजारो रुपये वाटायचे या सुलतानी संकटांवर बोलले पाहिजे. साहित्यिकांनी  साहित्यातून मांडले पाहिजे. 
          या परिसंवादात अध्यक्ष श्री. ललित दादा बहाळे,  श्री. ज्ञानदेव राऊत, श्री. विकास  पांढरे, श्री. मधुसूदन हरणे व डॉ. सुरेश मोहीतकर यांनी शेती साहित्यावर वरील  विचार मांडले.
       शेतकरी कविसंमेलन  भाग १ - 
 अध्यक्ष - साहित्यिक श्री. राजेंद्र फंड, अहमदनगर.  सूत्रसंचालक :-  सुप्रसिध्द कवी श्री. अनिकेत देशमुख, अमरावती.
सहभागी कवी :- मा. सागर लाहोळकार, मा. तुळशीराम बोबडे (अकोला), मा. दिलीप भोयर (अमरावती), मा. प्रदीप देशमुख (चंद्रपूर), मा. शंकर घोरसे (नागपूर), मा. माधव खलाणेकर, मा. रवींद्र दळवी, मा. प्रकाश होळकर (नाशिक), मा. अनुराधा धामोडे (पालघर), मा. बालाजी कांबळे (बीड), मा. कृष्णा जावळे (बुलडाणा), मा. निलेश तुरके, मा. सचिन शिंदे (यवतमाळ), मा. नरेंद्र गंधारे, मा. राजेश जवंजाळ, मा. रंगनाथ तालवटकर, मा. प्रशांत झिलपे (वर्धा), मा. प्रा. संजय कावरे (वाशिम), मा. डॉ. राजेंद्र गवळी (अहमदनगर), मा. सविता काळे (मुंबई), मा. सुरेश पेहरकर (छ. संभाजीनगर)
 
 शेतकरी  कविसंमेलन भाग २ :- 
 अध्यक्ष '- प्राचार्य रावसाहेब जाधव चांदवड  
सहभागी कवी :-  मा. श्याम ठक, मा. हिंमतराव ढाळे (अकोला), मा. सुधाकर थेटे (अमरावती), मा. नितेश  खरोले (गोंदिया), मा. इरफान शेख (चंद्रपूर), मा. निमा बोडखे (नागपूर), मा. निलेश देशमुख, मा. रामदास पाटील, मा. सोनाली भागवत, मा. विजयकुमार मीठे, मा. संदीप जगताप, मा. राजेंद्र उगले (नाशिक), मा. डॉ. संगीता घुगे (नांदेड), मा. अनंत मुंडे, मा. प्रा. संजय आघाव (बीड), मा. प्रा. महेश कोंबे (यवतमाळ), मा. नारायण निखाते, मा. संदीप धावडे दहिगावकर (वर्धा), मा. युवराज टोपले (वाशीम), मा. माणिक सोनवणे (छ. संभाजीनगर), मा. प्राची मोहोड (बुलढाणा), मा. शालिनी वाघ (अहमदनगर), मा. रजनी ताजने (पालघर), मा. सुरेखा बोरकर (नागपूर), मा. भारती सावंत (नवी मुंबई), मा. किसन पिसे (बुलडाणा), मा. फरझाना डांगे (मुंबई), मा. प्रकाश पाटील (जळगाव), मा. अनिल देशपांडे (अहमदनगर), मा. रविंद्र एस. राजपूत (नंदुरबार), मा. रत्नाकर वानखडे (अमरावती), मा. लक्ष्मीकांत कोटकर, मा. किरण संधान, मा. अलका दराडे, मा. सुभाष उमरकर, मा. सुनंदा पाटील, मा. संतोष झोमान, मा. सुभाष कर्डक (नाशिक)
                      दोन्ही कविसंमेलनात महाराष्ट्रभरातून आलेल्या नामवंत 55  कवींच्या शेतीमातीवर आधारित कवितांनी  सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. 
  प्रकट मुलाखती 
              त्यानंतर दोन दिवसाच्या कार्यक्रमात दोन प्रकट मुलाखती संपन्न झाल्या.  पहिली प्रकट  मुलाखत ही एग्रोवनचे संपादक  मान.  श्री आदीनाथ चव्हाण सो. यांची  पत्रकार तथा साहित्यिक श्री ज्ञानेश उगले यांनी घेतली. आपल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की खास शेतकऱ्यांच्या ज्ञानात वृद्धी व्हावी. शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करून आधुनिक शेती करावी म्हणून सकाळ समूहाने हे  विशेष वृत्तपत्र  ना नफा ना  तोटा या तत्त्वावर चालू केले. दररोजच्या अंकात शेतीविषयक विद्वानांची मते,  कृषी शास्त्रज्ञांची मते , चांगले उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा ही दिल्या जातात.  सह्याद्री फार्म सर्वात प्रथम यशोगाथाद्वारे  जगासमोर आणण्याचे काम एग्रोवन या शेतीविषयक वृत्तपत्राने केले आहे.  आज एग्रोवन हे वृत्तपत्र शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले एकमेव शेतीविषयक वृत्तपत्र आहे. 
                  दुसरी सह्याद्री फार्मचे  संस्थापक श्री विलास शिंदे यांची प्रकट मुलाखत  समीक्षक स्वानंद बेदरकर यांनी घेतली. या मुलाखतीमधील युगात्मा शरद जोशींचा शेतीविषयक अजेंडा असलेला  चतुरंग शेतीचा प्रयोग आपण कसा तडीस नेला व आज ही जागतिक दर्जाची शेतकऱ्यांनी उभारलेली शेतकऱ्यांची कंपनी समोर उभी दिसतेय ती चित्ररूपाने, शेतकरी ,साहित्यिक यांचेसमोर उभी केली. 
 
 परिसंवाद 2:-  भारताकडून इंडियाकडे (अर्थात शेतीबदलाचे वारे ) 
 अध्यक्ष :- श्री अनिल घनवट (अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष) 
सूत्रसंचालक :- श्री. रमेश खांडेभराड.
 
1 ) श्री आदिनाथ ताकटे ( मृदशास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी) :- 
           भारताकडून इंडियाकडे या परिसंवादात बोलतांना डॉ. ताकटे यांनी जमिनीच्या शास्त्रीय पद्धतीने माती परीक्षण, पाणी परीक्षण,  माती व पाणी  परिक्षणातील शेतकऱ्यांची निष्क्रियता, रासायनिक  खतांचा वापर, जैविक  खतांचा वापर, सलग एकच पीक घेण्याचे दुष्परिणाम, पाण्याचा अतिरिक्त वापर, जमिनीची सुपीकता, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हावाइज जमिनीच्या पोटातील अन्नद्रव्यांची कमतरता यावर शास्त्रीय भाषेत सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे असे आहेत की ते म्हणतात की शेती हा व्यवसाय आहे. तो करतांना आपल्या जमिनीत कोणते पीक येवू शकते . किंवा आपल्या जमिनीत कोणते अन्नद्रव्य कमी आहे आणि त्याची मात्रा भरून काढण्यासाठी आपल्याला कोणते रासायनिक, जैविक, सेंद्रिय खते घालून आपली जमीन सुपीक ठेवून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल. याचे ज्ञान शेतकऱ्यांनी घ्यायला हवे. आपली जमीन आजारी असेल तर माती व पाणी परीक्षण करून योग्य उपचार करायला हवेत. आपली शेती जिवंत ठेवायची असेल तर सेंद्रिय खतांसाठी आपल्याकडे जनावरे हवी आहेत. चांगले आधुनिक जास्तीत जास्त उत्पादन देणारे  बियाणे हवे आहेत.  रासायनिक खतांचा व पाण्याचा योग्य मात्रेत वापर  जमिनीला हवा आहे. याशिवाय जमिनीचा पोत ही चांगला हवा आहे. 
 2) मान. सीमाताई नरोडे ( शेतकरी नेत्या ) :- 
                  मान. शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेच्या एक लढवय्या शेतकरी नेत्या यांनी भारताकडून इंडियाकडे या भाषणात  दोन तीन चांगले उदाहरणे सांगितली आहेत. त्यात त्या म्हणतात की ज्यावेळी श्री. विलास शिंदे हे भारतातून इंडियाकडे वाटचाल करत होते त्यावेळी इथली व्यापारी लॉबी  त्यांच्या विरोधात त्यांच्याकडील विपुल पैशामुळे त्यांची प्रत्येक ठिकाणी कशी अडवणूक होईल. व हा उद्योग बंद पडेल यासाठी प्रयत्न करीत होती. त्यांनी धोका ओळखला होता की एक सह्याद्री फॉर्म सक्सेस झाला तर हजारो सह्याद्री पुढे येतील. व आपली मक्तेदारी संपेल. त्यामुळे ते शेवटच्या टप्प्यापर्यंत विरोध करत होते. पैशाच्या जोरावर त्यांनी सह्याद्रीचा परदेशात गेलेला माल रिजेक्ट होण्याची नामुष्की आली. कोट्यवधी रुपयांचा तोटा विलासजी यांनी सोसला. पण अखेर इंडियाकडे वाटचाल केली.
                    दुसरा प्रसंग सांगताना त्या म्हणतात की शरद जोशी यांनी "सीता शेती " हा नवीन उपक्रम चळ वळीमार्फत राबविला. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे अधिवेशनात 5 लाख महिला स्वत:चे जेवण व स्वतः च्या व्यवस्थेने आल्या. असा हा न भूतो न भविष्यती असा महिला वर्ग पाहून सरकार ही चक्रावले. या अधिवेशनानंतर 2लाख महिलांच्या नावावर शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. शासनाला अब्रू जावू नये म्हणून महिलांच्या नावावर जमीन करण्याचा कायदा करावा लागला. भारताकडून इंडियाकडे जातांना हे दोन्ही उदाहरणे पहिले उदाहरण म्हणजे विलास शिंदे  यांनी शरद जोशी यांनी सुचवलेली चतुरंग शेती व दुसरे सीता शेती हे भारताचे इंडियाकडे जातानाचे यशस्वी पाऊल ठरले. 
         अजून एक प्रसंग सांगताना त्या म्हणतात. स्विझरलँड येथे असताना एका दुधापासून जवळपास अडीचशे उपपदार्थ बनल्याचे त्यांनी त्यावेळी तेथील मॉल मध्ये पाहिले होते. भारतात आल्यावर माझा भारतीय शेतकरी हे का करू शकत नाही. जर तो एका  दाण्याचे हजार दाणे करू शकतो तर हे का करू शकत नाही. यासाठी येथील व्यवस्था आड येते. ती व्यवस्था बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शेतकरी संघटना मार्फत व्यवस्था बदलण्यासाठी मोर्चे ,चळवळ, धरणे, आंदोलनाचा मार्ग त्यांनी अवलंबला.
                    शेतकऱ्यांनीसुध्धा स्वयंपूर्ण होण्यासाठी घरातील सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. घरातील माता माउलींनी वनवासात न जाता आपल्याकडील झालेल्या उत्पादनातून प्रक्रिया उद्योगात उतरले  तर माजघर शेतीतून निर्यात शेतीत जाण्यास वेळ लागणार नाही. यासाठी जोपर्यंत लायसन्स राज चालू आहे तोपर्यंत प्रत्येकाने कागदी नियोजन ही केले पाहिजेत. किती दिवस शेतकऱ्यांनी झोपडीत रहायचे. गाडी बंगल्याच्या स्वप्न पाहून ते पूर्णत्वाकडे त्यांनी नेले पाहिजे. यासाठी प्रयत्न हवेत.  
            भारताकडून इंडियाकडे जातांना सर्वात प्रथम GM तंत्रज्ञानावर अभ्यास करून एकमेव शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेने य शेतकरी हिताच्या प्रकल्पाला समर्थन दिले होते. मोर्चे आंदोलनाने आवाज उठविला  होता. शरद जोशींचे भारताकडून इंडियाकडे जातानांचे वरील सर्व प्रयत्न अभ्यासपूर्ण होते.
 3) मान. गंगाधरजी मुटे :-  ( संमेलन प्रमुख ) 
                  भारताकडून इंडियाकडे जातांना मुटे सरांनी  समाजातील वेगवेगळ्या अंगाने आपल्या परिसंवादात अंतर्भाव मोठ्या खुबीने केला होता. त्यात आजची लोकशाही,  आगाऊ बोलनारांचे  कान टोचले, वेगवेगळ्या साहित्य चळवळींचा इतिहास,शेतकऱ्यांची मार्केटिंग, स्वातंत्र्योत्तर काळातील संत तुकडोजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व शरद जोशींचे विचार या मुद्द्यावर आपल्या परिसंवादात मांडणी केली
 आजची लोकशाही :- आजच्या लोकशाहीबद्दल भाष्य करतांना ते म्हणतात की
  " आपल्या ही हिता असे जो जागता l
      धन्य त्याची माता लोकशाही ll
         या कडव्याचा आणि  वस्तुस्थितीचा अभ्यास करतांना या लोकशाहीमध्ये जो स्वतः च्या  हितासाठी जागा असतो. स्वतच्याच पोळीवर तूप ओढतो  फक्त त्याचीच माता सध्या लोकशाही आहे. बाकीचे जे आपल्या हिताचा  विचार न करता झटतात. त्यांना नेहमी सावत्रपणाची वागणूक दिली जाते. यातच शेतकऱ्यांची ही गणना होते. हे खडे बोल त्यांनी सुनावले. 
आगावू बोलणारांचे  कान टोचले :- यावर भाष्य करतांना ते म्हणतात की शरद जोशी यांनी लोकांना बोलत केलं. त्यामुळे या चळवळीत जे अबोल होते . ते बोलते झाले. मात्र काही काही फार आगावू बोलणारे होते. त्यांची अनावश्यक बोलती बंद करण्याचे काम या शेतकरी चळवळीला करावे लागले.
 वेगवेगळ्या साहित्य चळवळींचा इतिहास :- 
             आपल्या आवाक्यानुसार विविध चळवळींचा इतिहास सांगताना ते म्हणतात की नारायण सुर्वे यांची लेखणीला धार होती तोपर्यंत कामगार चळवळ जोरात होती. परंतु जेंव्हा नारायण सुर्वे गेले तेंव्हा दुसरे नारायण तेव्हढ्या ताकदीचे तयार न झाल्याने कामगार चळवळ ही  थंडावलेली दिसते. दलीत चळवळींचे ही तसेच दिसून येते. राजा ढाले, नामदेव ढसाळ यांचे स्फुल्लिंग जेंव्हा दलीत चळवळींना मिळत होते. तेंव्हा दलीत चळवळ ही तुफान चळवळ होती. पण ते गेले आणि दलीत चळवळीचे वादळ थंडावल्याचे  मला वाटते. त्याचप्रकारे  शरद जोशी नावाचे वादळ जोपर्यंत लिहिते बोलते होते तोपर्यंत शेतकरी चळवळ अत्युच्च शिखरावर होती. शरद जोशींना भारतातच नव्हे तर जगातही त्यांच्या विद्वत्तेमुळे मान होता. त्यांच्या एका हाकेसरशी लाखो लोक जमा होत. चांदवडचे उदाहरण पहिले तर एका हाकेसरशी पाच लाख महिला स्वत:चे  अन्न व स्वतःच्या साधनाने गोळा होणे. ही त्या काळातील सर्वात मोठी क्रांती होती. त्यांचे हे संघटन, विचार यामुळे त्यांना खरा जगभरात मान होता. आता काहींना वाटते की ही लोकचळवळ आहे. पण माझ्या मते ही शरद जोशी यांच्या विचारांची वैचारिक चळवळ होती. परंतु कुठल्याशा कारणाने त्यांचे लिहिणे आणि बोलणे बंद झाले आणि मला वाटते तेंव्हापासून ही शेतकरी चळवळ मागे आली. आज शेक्री चळवळ चालवतांना आमचे जे वजन आहे ते आमच्यात जेव्हढी वैचारिक ताकद आहे ती विचार नीट समजून घेणं, नीट मांडणं,नीट अभिव्यक्तीच्या माध्यमातून पुढे नेणें हे जेव्हढ आहे. तितकीच ती पुढे सरकत आहे.
 मार्केटिंग :-  आज शेतकऱ्यांनी जो मार्केटिंग करावे असा नारा दिला जातो तो माझ्या दृष्टीने बरोबर नाही असे वक्ते म्हणतात. ते म्हणतात ज्यावेळी माणूस अप्रगत होता. शिकार करून खात होता. त्यावेळी ही त्याची भूक भागली की दुसऱ्याला देत होता. बदल्यात जेंव्हा त्याला शिकार मिळत नव्हती. तेंव्हा ज्या सहकाऱ्याला मिळाली. त्याचे पोट भरल्यावर तो देत होता. द्वापारयुगात गौळणी मथुरेला दही, दूध, तूप, लोणी घेवून  बाजाराला जात होत्या. बदल्यात तेथून गरजेच्या वस्तू घेवून येत होते. खेडेगावात गुजरीत भाजीपाला विक्रीस आल्यावर एकमेकांचा भाजीपाला बदली करत होते. तेली पेंड, करडीच्या बदली तेल देत होता. किराणा दुकानदार धान्याच्या बदली किराणा देत होता. गिरणीवाला धान्य देवून पीठ दळून देत होता. हे सर्व मार्केटिंग नाही तर काय होते. परंतु आता पूर्वीचे मार्केटिंग  शेतकरी का करू शकत नाही तर  स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही ठिकाणी केंद्रीकरण तर काही ठिकाणी विकेंद्रीकरण झाले. काही  गांवे उध्वस्त झाली.त्यातच या व्यवस्थेने विकेंद्रीकरण करू नये अशी व्यवस्था निर्माण केली. पर्यायाने हा व्यवहार थांबला.
 स्वातंत्र्योत्तर काळातील तुकडोजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शरद जोशी यांचे विचार :- 
        स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तुकडोजी महाराजांना वाटले आपले सरकार आले, आपली माणसे आली आता एका अर्थाने  रामराज्य येणार म्हणून त्यांनी आपल्या तुकड्या वाणीतून 
                 चल चल आपल्या गावाला l
                  राहू नको रे शहराला l
                  अन्न न पिकवशिल l
                  तर राहशील उपाशी ll* 
 अशी प्रेमळ हाक शेतकरी पुत्रांना  दिली. तुकडोजी महाराज हे बिचारे संत होते . त्यांना काही राजकारण माहीत नव्हते.  परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुढच्या शंभर वर्षाची दृष्टी होती. म्हणून त्यांनी खेड्यातील दलितांना गरीबांना एक मंत्र दिला तो म्हणजे " शहराकडे चला " आणि मंत्राप्रमाने जे वागले ते शहरात चांगले जीवन जगत आहेत. चांगले रहात आहे. चांगले खात आहेत. चांगले शिक्षण ही घेत आहेत. मात्र ज्यांनी  ऐकूण काणाडोळा केला ते आज ही तेव्हढेच गरीब आहेत. शरद जोशी यांनी ही 1992 साली शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे सोबत " पीक नको हवे घामाचे दान "असा नारा लगावला. आंदोलने केली पण या सरकारला काही फरक पडत नाही असे पाहून त्यांनी घोषणाच बदलली आता त्यांनी " " मिळवू घामाचे दाम " हा नारा लगावला.  शेवटी हे सरकार काही देत नाही हे पाहून  शेतकऱ्यांना " चतुरंग शेतीचा सल्ला देत भारताकडून इंडियाकडे चालण्याचा सल्ला दिला. 
 
  4) श्री.  अनिल घनवट ( राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष ):- 
                     भारताकडून इंडियाकडे या विषयाकडे येतांना सर्वप्रथम लक्ष जाते ते शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेणारे एक दृष्टे विचारवंत  म्हणजे शेतकरी संघटनेचे नेते श्री. शरद जोशी यांचेकडे. यांनी शेतकरी स्विझरलँड  देशातील शेतकरी यांचेप्रमाने आर्थिक संपन्न व्हावा म्हणून  खूप प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नामागे त्यांचा दहा वर्षाचा स्विझरलँड येथील वास्तव्याचा व शेती निरीक्षणाचा दांडगा अनुभव होता. पण या देशातील निष्क्रिय सरकारला त्यांचे हे शेतकरी हिताचे तत्व मान्य नव्हते. गरीब शेतकरी ही येथील सरकारची  व्होट बँक होती. जर शरद जोशींच्या विचाराप्रमाणे योजना राबवून शेतकरी  स्वयंपूर्ण झाला तर आपल्याला कोणी विचारणार नाही. ही नेत्यांची भावना असावी.  व्यापार क्षेत्रात मात्र जागतिकीकरण झाले. जागतिक व्यापार संघटनेमध्ये भारत सामील झाला. औद्योगीकरणाला संधी मिळाली. त्यातून तयार होणारा माल जागतिक बाजारपेठेत विकला जावू लागला. परदेशातून  शेतीमाल आयात होवू लागला पण येथील  शेतकऱ्यांच्या पूर्ण तयार मालाला निर्यातीसाठी सह्याद्री फॉर्म सारख्या शेतीपूरक कंपन्या निर्माण होवू नये म्हणून  बऱ्याच वेळा निर्यातबंदी  ठेवली गेली. त्यामुळे भारतात फार्मर्स प्रोड्युसर  कंपन्या निर्माण होवू शकल्या नाही असे वाटते. 
            ग्रामस्वराज्यासाठी महात्मा गांधी यांनी तरुणांना  " खेड्याकडे चला " हा मंत्र दिला. तर खेड्यात राहून तरुण स्वतः च्या पायावर उभा राहू शकत नाही हे दिसताच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी " शहराकडे चला " अशी हाक दिली.  तर नेहरूनितीमध्ये  शेतकऱ्यांच्या शेतीला पाहिजे तसे स्थान मिळाले नसावे. शेतकऱ्यांची ही दयनीय अवस्था समजण्यासाठी कवी इंद्रजित भालेराव यांची कविता अवश्य वाचा किंवा ऐका. या कवितेतून  अतिशय काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे  अगदी यथार्थ चित्रण त्यांनी केले आहे. आपल्या  कवितेत ते म्हणतात....
"  काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता l
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता..ll धृ ll 
कशी  उन्हात उन्हात तळतात माणस l
कशी मातीत मळतात माणस l
कशी खातात जीवाला खस्ता l
माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता ll 
             दुसरा गारपिटीवर अनुभव सांगताना घनवट साहेबांनी त्यांच्या नाशिक येथील सहकारी मित्रांचे उदाहरण दिले की गारपिटीने त्यांची द्राक्षबाग सगळी वाया गेली होती. ती बाग दाखवतांना आपल्या घरातील कोणी गेले असावे अशी जीव लावलेली  द्राक्षबाग दाखवताना त्यांच्या डोळ्यांची व चेहऱ्याची अवस्था कुणी साहित्यिकांनी पाहून कविता केली असती तर ती रडकी कविता  न होता ती या देशातील व्यवस्थेविरुद्ध पेटून उठण्यासाठीची क्रांतीची कविता बनली असती. 
                     हे सर्व ज्यावेळी शरद जोशी यांनी पाहिले . त्यावेळी 2008 च्या संभाजीनगर येथील शेतकरी मेळाव्यात आपल्या  देशाला जर आंतरराष्ट्रीय बाजारात टिकायचे असेल तर आता आभाळाखालील शेती आता शास्वत नसून शेतकरी हितासाठ  भारताने एरोफोनिक्स तंत्रज्ञान स्वीकारायला हवे. या तंत्रज्ञानात किडीचा प्रादुर्भाव होणार नाही, अतिवृष्टी, गारपिटसुध्धा होणार नाही.  कमी पाण्यात शेतकऱ्याला भरपूर उत्पादन मिळेल. क्षारयुक्त जमिनीत ही चांगले पीक येवू शकेल. आज आपण पाहतो पंजाब सारख्या राज्यात व इतरही राज्यात  गहू ठेवायला जागा नाही. इतके अन्नधान्य आहे. तरी पण आजचा " भुकेचा  निर्देशांक " पाहिला तर आपला नंबर हा फक्त आफ्रिकेतील चार ते पाच देशांच्या वर असावा असे वाटते. यामागे या व्यवस्थेचे नियोजन चुकले असावे. 
               शरद जोशींची दुसरी योजना म्हणजे देशांमधून खनिजतेल आयात करण्यापेक्षा आपल्या देशातील बायोडिझेल असलेले इथेनॉल जर प्रत्येक गावात दारूच्या भट्टीप्रमाने  बनवले तर खनिजतेलाचा खर्च वाचू शकेल. शेतकऱ्यांना पैसा मिळेल . एकीकडे आपल्याला जगाच्या स्पर्धेत उतरायचे असे म्हंटले जाते पण त्याचे तंत्रज्ञान आपल्याला मिळू दिले जात नाही. असे ही वाटते.  हे बदलाचे वारे इकडे फिरकू नको म्हणून की काय  मोठमोठाल्या कायद्याच्या भिंती उभ्या केल्यात की काय असे ही वाटू लागले आहे. 
     शेतीबदलाचे वारे हे शेती तंत्रज्ञानाशिवाय येवू शकत नाही.  जगभर आता BT,STBT, GM तंत्रज्ञान वापरत आहेत.त्यातून शेतकऱ्यांना आताच्या उत्पन्नाच्या दहापट उत्पन्न  मिळेल. शेतकऱ्यांना ही फायदा आणि जनतेला ही फायदा होईल. अनेक वस्तू मिळतील. परंतु या गोष्टीकडे का डोळेझाक होते की काय हे समजत नाही.  शेतकऱ्यांना  तंत्रज्ञानापासून भटकवण्यासाठी आता सरकारने  शेतकऱ्यांच्या  बापजाद्याने स्वातंत्र्यापूर्वी  वापरत असलेले व शेतकऱ्यांना मातीत घालण्याचे  जैविक शेतीचा प्रचार करून पुन्हा भुकेकंगाल भारत करण्याचा विचार चालू केला की काय असे वाटते. एकीकडे  डायबेटिकचे इंजेक्शन हे GM तंत्रज्ञानावर आधारीत आहे. ते मात्र चालते. पण BT तंत्रज्ञानाचा माल यांना चालत नाही. हे असे का ? यांना कोणी तरी विचारले पाहिजे. आम्हाला आता उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळाला पाहिजे . अशी महत्वपूर्ण व शेतकरी हिताची मागणी शरद जोशी यांनी केली आहे. त्यासाठी " आता मागायचे नाही तर घ्यायचे आहे." अशी हाक त्यांनी शेतकऱ्यांना दिली. सगळ्या देशाचे सगळे प्रश्न सोडवायचे असेल तर  शेतमालाला भाव द्या. सगळे प्रश्न सुटतील . असे त्यांचे  ठाम मत आहे. साहित्यिकांना उद्देशून श्री. शरद जोशी यांचे आवाहन आहे की " भारतावरचे इंडियाचे राज्य संपवायचे असेल तर साहित्यिकांनी आपल्या हाती  लेखणी घेवून लेखणीतून तळपते अंगार बाहेर निघायला हवेत.      
 
 शेतकरी  गझल मुशायरा :- अध्यक्ष :- वीरेंद्र बेडसे ( धुळे) 
सूत्रसंचालन :-. 1) मान. मारुती मानमोड ( नांदेड)
                     2) मान. दिवाकर जोशी (बीड)
             अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट सांगण्यासारखे म्हणजे शेतकरी गझल मुशायरा होय. गझल मुशायऱ्याचे दर्दी स्वतः श्री. गंगाधरजी स्वतःच असल्याने सुरुवातीपासून गझल मुशांयरा त्यांनी संमेलनात आवर्जून ठेवला. मात्र त्यातून कोणताही थिल्लरपणाला त्यांनी वाव दिला नाही. यातून ही शेतकऱ्यांना काही देता येईल का  म्हणून " शेतकरी गझल मुशायरा " हा नवीन प्रकार सुरू करून  गझलकारांना शेतीविषयक अभ्यास करण्यास भाग पाडले. हा शेतकरी गझल मुशांयरा आज एव्हढा लोकप्रिय झाला आहे की महाराष्ट्रभरातून नामवंत गझलकार यात हजेरी लावून वाहवा मिळवत आहेत. नुसतेच नामवंतच नाहीत तर नवीन गझलकारांसाठी ही कार्यशाळा बनली आहे. या वर्षीचे दोन्ही गझलकार श्री. मारुती मानमोड व श्री. दिवाकर जोशी यांचे सूत्रसंचालन लाजवाब होते. या शेतकरी गझल मुशायऱ्यामध्ये .. अजित सपकाळ (अकोला), मा. सतिश मालवे (अमरावती), मा. सुनिल बावणे (चंद्रपूर), मा. अझीझखान पठाण (नागपूर), मा. अतुल देशपांडे, मा. जयश्री वाघ, मा. संजय गोरडे, मा. आकाश कंकाळ, मा. हिरालाल बागुल (नाशिक), मा. यशवंत मस्के (परभणी), मा. गंगाधर मुटे (वर्धा), मा. विजय पाटील (नंदुरबार), मा. संजय तिडके (लातूर), मा. नंदकुमार ठोंबरे (नाशिक या सर्वच गझलकारांनी आपल्या गझलांमधून शेतकरीविषयक सुंदर विचार, समस्या मांडल्यात. या गझलांचे सुंदर समालोचन होणे गरजेचे आहे.
 
                 कथाकथन  
 अध्यक्ष :-. मान. श्री. विनय मिरासे यवतमाळ 
सूत्रसंचालन :- मान. श्री. सिध्देश्वर इंगोले (बीड)
 1)  श्री . सिध्देश्वर इंगोले बोड 
                     आजच्या कथाकथनासाठी दोनच वक्ते हजर होते. परंतु या दोघांनी शेतकरी जीवनाचा इतका  दर्दभरी माहोल जमवला की हे सगळे आसपास घडते आहे. याचा प्रत्यय आणून दिला. सिध्देश्वरसरांची कथा सांगण्याची लकब अगदी सहज सुंदर होती. कोठेही कथा ओढून ताणून लांबवली नाही. त्यांच्या कथेची छोटीसी झलक  इथे दिल्यावाचून चैनच पडत नाही.
            पोळ्याच्या सणानिमित्त खांदेमळणी दिवशी सर्व शेतकऱ्यांची लगबग सुरू होती . गणूचे बैलं आणि नामूचे बैल गावातील चौकात समोरासमोर येतात आणि अचानकपणे गरज्या व खलश्या या दोघांची टक्कर लागते.ही टक्कर एवढी भीषण आहे की दोघांचे जणू सात जन्माचे वैर असावे.गावातील सर्व मंडळी सर्व  तऱ्हेचे प्रयत्न करतात परंतू कोणालाच टक्कर सोडविण्यात यश येत नाही.गावातील पोरं कोण जिंकेल यावर सट्टासुद्धा लावतात.गावातील वयस्कर तात्या बातमी ऐकून येतात. व त्यांना उपाय सापडतो.ढवळी नावाच्या गायीला घेऊन आल्यानंतर गरज्या पळत तिच्याजवळ जातो.टक्कर सुटते.कथेत कथाकाराने मातृप्रेम दाखविण्यासाठी कथेतील उत्सुकता ताणून ठेवली होती. आपल्या आईला मारल्याचा बदला एका बैलाने घेतला असा आशय या कथेतून आला आहे.
धन्यवाद मित्रा छान कथेबद्दल.....
 2) श्री. विनय मिरासे यवतमाळ 
               यानंतर कथाकथन क्षेत्रातील एक नावाजलेले नांव विदर्भरत्न साहित्यिक विनय मिरासे यांनी आपल्या दमदार आवाजात  पसतावा या  कथेस प्रारंभ केला. ही कथा म्हणजे शेतकरी आणि बैलाचे नाते कितीही यांत्रिक युग आले तरी कमी होत नाही. जेव्हढे शेतकऱ्यांचे प्रेम बैलावर असते. तेव्हढेच बैलाचे ही प्रेम आपल्या धन्यांवर  असते. आपल्या कथेत ते म्हणतात  त्यांच्याकडे त्यांचेकडे  हरण्या व काजळ्या दोन बैल असतात. त्यांचे आपल्या धन्यावर जीवापाड प्रेम असते. एकदा अतीनिकडीच्या कामाकरीता त्यांना पैशाची खूप गरज असते. विकायला काही नसते. मग ते नाईलाजाने त्यांची बैलजोडी विकण्याकरिता सोडायला जातात पण बैल जागचे हलत नाही.  शेतकरी बैलाला चाबकाने मारतात. बैलाच्या डोळ्यातील पाणी पाहून  शेतकऱ्याची बायको शेतकऱ्याला व डोळ्यातून पाणी  पाहून आपले  दागिने विकून नड भागवा म्हणते. इकडे बैलाला ही आपण मालकाच्या कामी आलो नाही म्हणून दुःख होते. त्यानंतर हरण्या बैलाला डोळ्याला जखम झालेली असते. कावळा येवून त्या जखम असलेल्या डोळ्यावर टोच मारतो. वेदनेने विव्हळून तो शिंग हलवतो. ते शिंग काजळ्या बैलाच्या डोळ्यात जाते. दोघांची टक्कर लागते. मालक येवून दोघांची टक्कर सोडतात. आता हरण्या बैल काजळ्या बैलाची डोळ्यांची जखम पाहतो. व थोड्या वेळापूर्वी झालेली टक्कर विसरून  तो ती जखम चाटून स्वच्छ करतो. मालक त्यांचे प्रेम पाहून बैलांच्या गळ्यात पडतात. व हमसून रडतात.आणि म्हणतात की आता तुम्हाला दावणीवरच शेवटपर्यंत सांभाळणार पण विकणार नाही. त्यावेळी दोन्ही बैल आपल्या धन्याचे पाय चाटत असतात.
 समारोपीय सत्र:- 
यानंतर या संमेलनाच्या समारोप सत्रास सुरुवात झाली. या समारोप सत्रात खालील मान्यवरांची उपस्थिती होती. 
अध्यक्ष : मा. अ‍ॅड. वामनराव चटप, माजी आमदार संसदपटू तथा ज्येष्ठ शेतकरी नेते
प्रमुख अतिथी : मा. स्मिता गुरव, ज्येष्ठ शेतकरी नेत्या
विशेष अतिथी : मा. कैलास तवांर, ज्येष्ठ शेतकरी नेते
सन्माननीय अतिथी : मा. शंकरराव ढिकले, शेतकरी नेते
सन्माननीय अतिथी : मा.दिलीप भोयर, शेतकरी नेते 
सूत्रसंचालन : मा. डॉ. मनीषा रिठे, विभागीय अध्यक्ष, शेतकरी साहित्य चळवळ     
 विश्वस्तरीय  लेखनस्पर्धेचे बक्षीस वितरण 
                    सर्व मान्यवरांच्या हस्ते विश्वस्तरीय लेखन स्पर्धेत विजयी स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले. यात
कथा - प्रथम - रावसाहेब जाधव - नाशिक - तिचं परगती पत्रक
2. गझल  -  प्रथम - गंगाधर मुटे - वर्धा - आत्महत्या बळीच्या तू रोख वामना
3. गझल - द्वितीय - चंद्रकांत कदम - नांदेड - एल्गार
4. गेय रचना - प्रथम - रंगनाथ तालवटकर - वर्धा - अश्रूंच्या बांधावरती
5. गेय रचना - द्वितीय - सुनिल बावणे - चंद्रपूर - एकदासं तू मरणं देगा
6. छंदमुक्त कविता - प्रथम - नरेंद्र गंधारे - वर्धा - बळीराजा : "तेव्हा आणि आता सुद्धा"
7. छंदमुक्त कविता - द्वितीय - खुशाल गुल्हाने - अमरावती - आत्महत्या
8. छंदमुक्त कविता - तृतीय - राजेश अंगाईतकर - यवतमाळ - पुन्हा जन्म घे बळीराजा
9. छंदोबद्ध कविता - प्रथम - सुरेखा बोरकर - नागपूर - दानशूर बळीराजा
10. छंदोबद्ध कविता - द्वितीय - विनायक अंगाईतकर - अमरावती - कोणे एकेकाळी
11. पद्यकविता - प्रथम - प्रशांत झिलपे - वर्धा - बळीचे वचन (अभंग)
12. पद्यकविता - द्वितीय - यशवंत पुलाटे - अहमदनगर - बळीनामा...
13. पुस्तक समीक्षण - प्रथम - अजित सपकाळ - अकोला - पुस्तक समीक्षण : बळीवंश
14. ललितलेख - प्रथम - कृष्णा जावळे - बुलडाणा - कष्टकरी जनतेचा राजा बळीराजा
15. ललितलेख - द्वितीय - भारती सावंत - नवी मुंबई - अन्नदात्या संस्कृतीचा महानायक : बळीराजा
16. वैचारिक लेख - प्रथम - दिलीप भोयर - अमरावती - बळी बळीराजाचा
17. वैचारिक लेख - द्वितीय - सतीश मानकर - वर्धा - बळी असेच कितीदा स्वतःला गाडून घेणार?
18. वैचारिक लेख - तृतीय - अनुराधा धामोडे - पालघर - अवघ्या जगाचा अन्नदाता
19. शोधनिबंध - प्रथम - प्रज्ञा बापट यवतमाळ - आधुनिक वामन आणि आधुनिक बळीराजा
20. शोधनिबंध - द्वितीय - रविंद्र गोरे - अहमदनगर - बळीचे कर्तुत्व झाकले गेले
 
 लेखन स्पर्धा परीक्षक :-  मा.. प्रा. डॉ. ज्ञानदेव राऊत (लातूर), मा. विवेक पटाईत (दिल्ली), मा. विनोद इंगोले (अकोला), मा. डॉ. सुरेश मोहितकर (चंद्रपूर), मा. डॉ. मीना सोसे (बुलढाणा), मा. डॉ. सिद्धार्थ तायडे (बीड), मा. शालिनी वाघ (अहमदनगर), मा. मीना नलवार (नांदेड), मा. ज्ञानेश उगले (नाशिक), मा. प्रवीण आडेकर (चंद्रपूर)
 
 लेखनस्पर्धा संयोजक मंडळ : मा. गंगाधर मुटे (वर्धा), मा. राजेन्द्र फंड (अहमदनगर), मा. रविंद्र दळवी (नाशिक),  मा. डॉ. मनीषा रिठे (वर्धा),  मा. मुक्तविहारी (बीड)
                        या सर्व संमेलनाचा डोलारा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतलेल्या कमिटयांचा नामोल्लेख  करणे अतिशय उचित आहे. हा जगन्नाथाचा  ओढणारे सेवेकरी ..........
 आयोजन समिती 
 
स्वागताध्यक्ष : मा. श्री. विलास शिंदे
कार्याध्यक्ष : मा. श्री. गंगाधर मुटे
संयोजक : मा. श्री. अ‍ॅड सतीश बोरुळकर
 
आयोजन समिती : मा. जयंत बापट (यवतमाळ), मा. अर्जुन तात्या बोराडे, मा. निवृत्ती कर्डक, मा. भानुदास ढिकले, मा. निवृत्ती नाना संधान, गोविंद नाना नाटे, शिवाजी पाटील नाटे (नाशिक), मा. शिवाजीराव शिंदे (नांदेड), मा. अरविंद तायडे (अकोला), मा. गुलाबसिंग रघुवंशी (धुळे), मा. रामेश्वर अवचार (परभणी)
 
 संयोजन समिती : मा. प्रमोद राजेभोसले (अध्यक्ष), मा. सोपान संधान, मा.अंबादास ढिकले, मा. भाऊसाहेब भंडारे, मा.नजमोद्दीन शेख (नाशिक), मा. सुभाषराव बोकडे, मा. रवींद्र खोडे, मा. प्रभाकरराव झाडे, मा. मुकुंद खोडे, मा. भारत लाखे, मा. धनराज दारुणकर (वर्धा)
 
 नियोजन समिती : मा. ज्ञानेश उगले (अध्यक्ष), मा. प्रविण अहिरे अबांसन (नाशिक), मा. प्रा.रमेश झाडे (मुंबई), मा. विजय पाटील (नंदुरबार), मा. नामदेवराव काकडे, मा. दशरथ बोबडे (यवतमाळ), मा. माधव कंदे (लातूर), मा. ललित जैस्वाल, मा. नंदकिशोर खेरडे (अमरावती), मा. हेमंत चौधरी (नंदुरबार), मा. अरविंदराव बोरकर, मा. प्रमोद तलमले, मा. दत्ता राऊत, (वर्धा)
 
 स्वागत समिती : मा. शंकरराव ढिकले (अध्यक्ष), मा. दत्तात्रय संधान, मा. रविंद्र दळवी (नाशिक), मा. निळकंठराव घवघवे (वर्धा), मा. रमेश खांडेभराड (जालना), मा. अ‍ॅड. प्रकाशसिंह पाटील (औरंगाबाद), मा. प्रा. भूपेश मुडे (मुंबई ) मा. उषा दरणे, मा. प्रतिमा परमोरे, मा. उज्वला मुटे, मा. वंदना कातोरे, मा. प्रतिभा काळे
 
 व्यवस्थापन समिती : मा. दुर्वेश उमाटे, श्री.धोंडबा गावंडे, मा. सचिन डाफे, मा. भाऊराव उमाटे, श्री.गजानन इटनकर, मा. मुकेश धाडवे, मा. अशोक कातोरे, मा. महादेव धरमुळ, मा. सुरेश जयपूरकर, मा. विनोद काळे
 
 सभागृह व्यवस्था समिती : मा. गणेश मुटे (अध्यक्ष), मा. अशोक दांडेकर, मा. प्रविण पोहाणे, अक्षय मुटे, ऋतिक उमाटे, शुभम मुटे, शिवम मुटे, सुहास भोमले, कु. अश्विनी दांडेकर, कु. कल्याणी काळे, कु. कीर्ती काळे, कु. श्रेया मुटे, कु. चंचल दारुणकर, क्षितिज काळे, आदित्य भोमले, आदित्य कोहळे, शुभम यादव, साहिल चौधरी, प्रकाश दांडेकर
 
 स्वागत कक्ष समिती : मा. सारंग दरणे (अध्यक्ष), मा. संदीप अवघड, मा. अरविंद राऊत, मा. प्रवीण परमोरे, मा. नरेश नरड, मा. राजेश भोमले, सौरभ मुटे
=-=-=-=
 या संमेलनाने आम्हा सर्वांना काय दिले :- 
1)  सर्वात प्रथम एक शेतकरी म्हणून, शेतकरी साहित्यिक म्हणून युगात्मा  शरद जोशी यांचे स्वप्न असलेला व तो प्रकल्प साकारणारे श्री विलास शिंदे यांचा चतुरंग शेती वरील आधारित व्यापाराचे चार ही खांबावर उभा असलेला "  सह्याद्री फार्मर्स प्रोडुसर कंपनी " पहावयास मिळाली. त्यांच्या फॅक्टरी आउटलेटमध्ये आपलाच येथील शेतमाल आपल्याला अतिशय सुंदर स्थितीत व चांगल्या किमतीत विकू शकतो याचे प्रात्यक्षिक मिळाले. व ठरवले तर शेतीतून खूप चांगले पीक काढून  असा नफा मिळवू शकू याची खात्री झाली.
2) संमेलनास नाना पाटेकर यांच्या उपस्थितीने विशाल सभागृह तुडूंब भरले. त्यांच्या भाषणाने  तर  शेतकरी हिताचे सरकार कोणते आणायचे हे तुम्ही ठरवा. या वाक्याने महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील सर्व टिव्ही वृत्तवाहिन्या, न्यूजपेपरमार्फत हे संमेलन एकाच दिवसात देशभर झळकले. व्हॉट्स अप, ट्विटर, फेसबुकद्वारे या संमेलनातील नानांचे  भाषण अजून ही व्हायरल होते आहे.  कदाचित या वर्षीच्या निवडणुकीत त्याचा असर निश्चित दिसेल असे वाटते.
3)  शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय, राज्यस्तरीय नेते यांचे विचार ऐकायला मिळाले. साहित्यिकांना  शेतकरी विषयक लेखनासाठी नेमके  काय मुद्दे, विषय असावेत. जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. राज्यकर्ते, सरकार यांच्यावर ही या लिखाणामुळे वचक बसेल . हे ही समजले.
4) राज्यभरातून आलेले साहित्यिक, कवी यांचे विचार ऐकावयास मिळाले. त्यांच्या ओळखी झाल्या. राज्यभरातील  वेगवेगळे साहित्य संमेलन, दिवाळी अंक यांची माहिती झाली. 
5) या संमेलनात शेतकरी नेत्यांकडे भरपूर साहित्य त्यांच्या अनुभव विश्वात आहे.  ते बोलतात चांगले पण ते लिहिण्याचा  प्रयत्न करत नाही. या सर्वांना  गंगाधरजी मुटे सरांनी लिहिण्याचे स्फुल्लिंग दिले. पुढच्या संमेलनात हे साहित्यिक म्हणून ही दिसतील. 
6) या संमेलनाचा नानाच्या भाषणामुळे धसका निश्चित सरकारने घेतला असावा. या तापलेल्या तव्यावर फक्त संमेलनात काही ठराव होणे आवश्यक होते. व ते सरकार दरबारी जाणे आवश्यक होते. पुढच्या वर्षी तो प्रयोग करू.
7) 11 वे अखील भारतीय शेतकरी साहित्य संमेलन हे मोहाडी येथील भव्य वातानुकूलित सभागृह, उत्तम जेवणाची व राहण्याच्या व्यवस्थेमुळे  साहित्यिकांना  पंचतारांकित असल्याचे दिसून आले. 
8) संमेलन संपल्यानंतर पायी जाणाऱ्या साहित्यिकांना श्रीमान विलासजी शिंदे यांचे धर्मपत्नी स्वत:च्या गाडीत बसवून नाशिकपर्यंत लिफ्ट दिली. या प्रवासात सह्याद्री  फॉर्म अजून चांगल्या प्रकारे समजला.
 
              शब्दांकन :- श्री .  राजेंद्र फंड,  
                        राहाता.   अहमदनगर 
                          मो. 9881085671.
Share