एल्गार
सामान्य माणसांचा एल्गार येत नाही
तोवर इथे बळीचे सरकार येत नाही
निर्भीड स्वाभिमानी वंशज खरा बळीचा
करता मला कुणाला जोहार येत नाही
जर्जर अशी कशाने झालीस तू व्यवस्थे?
कामास कोणताही उपचार येत नाही
सोडुन जसा प्रजेला गेला बळी निघूनी
घरट्यामधे कुणाच्या सणवार येत नाही
प्रश्नासवे मुलाच्या रडले शिवार सारे
वाट्यास आमच्या का रविवार येत नाही?
मी ह्यामुळेच मागे पडलो असेल दुनिये
मजला तुझ्याप्रमाणे व्यवहार येत नाही
नांगर कुदळ घमेली सोडून कास्तकारा
हातात आपल्या का तलवार येत नाही?
दुखणे उभ्या जगाचे मी जाणतो तरीही
समजुन कुणास माझा आजार येत नाही
शिखरावरी कधी ना पोहोचणार कारण
होता मला कधीही लाचार येत नाही
घालत सदैव असतो मी मागणी तरीही
मजला कधी सुखाचा होकार येत नाही
मनगट सशक्त तोवर आयुष्य नांगरूया
चालुन घरी कुणाच्या उद्धार येत नाही
---- चंद्रकांत देवराव कदम (सन्मित्र)
नांदेड (9921788961)
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे. "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे. "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी आणखी सांगड घालण्याचा प्रयत्न करायला हवा.
पाने