नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
@ काय सांगू राज्या.....
सालो साला पासून अशेच सरत चालले साल
काय सांगू राज्या साध्या मानसाचे हाल...
@
नेम नायी निसर्गाचा कवा हुईन कोप
ह्या कळाहून त्या कळावर राती येत नायी झोप
काय पेराव मातीत माती देत नाही साथ
अभाय हानते राज्या वरतून कंबळल्यात लाथ
सरकारचंबी निर्रा हाय मतलबी धोरन
अंधारात दिवायी दारी नाही तोरन
माशी हाये पडून सत्तेच्या तुपात
वामन पुन्हा जल्मला सावकारी रुपात
कृषीप्रधान देश फक्त कागदावर राह्यला
मले सांगा शेतकरी कोनं सुखी पाह्यला?
अरे,येन्ड्रीन पिउन मेला ना ह्याचा बाप काल
काय सांगू राज्या माह्या कास्तकाराहीचे हाल...
@
इकास हुईन आपला,हे आता इसरा
चादर पाहून आपले हात पाय पसरा
जास्तीत जास्त आपन मध्यमवर्गीय होवू
अन् शिरमंत होन्याआंदीच स्वर्गीय होवू
मानुसकीच्या बनेनीले पळले हाये शेद्र
अन् चाळीस रू किलो झाले इलायती भेद्र
पोट्ट्याची ढुंगनावर चड्डी गेली फाटून
पोट्टीच्या नाकात शेंबुळ बारमाही दाटून
पिच्चून गेले जवानीतच बायकोचे गाल
काय सांगू राज्या माह्या कुटुंबाचे हाल...
@
पर्यावरनाले आता राह्यला नाही समतोल
मातीच्या गर्भात बी दिसत नायी ओल
कारखाने भकाभक जहर राह्यले ओकून
गाव झाले ओसाड मानसं गेले सोकून
वांग्या टम्याट्याले आता राह्यली नायी चव
गुलाबाच्या पाकयीवर थांबत नाही दव
जंगल झाले बोडखे नद्या राह्यल्या आटून
आंगनातल्या आंब्याले उदास राह्यलं वाटून
फाटून राह्यली टर्र्र्र हिरवी निसर्गाची शाल
काय सांगू राज्या माह्या निसर्गाचे हाल...
@
मानसाचा मानसाले ठाउक नायी पत्ता
ज्याले त्याले प्यारी आपली आपली धर्मसत्ता
धंदा बुवाबाजीचा जो-यात हाय सुरू
गोटा उचला इचिबिन तिथं भेटते गुरू
धर्मगुरूच असे मोठ्या कांडामंदी अटकन
तुमच्या माह्या डोयात सांगा काहून नायी खटकन
इञानाची बदनामी इञानाचं खाऊन
कांप्युटरात साह्याचे हे कुंडली राह्यले पाहून
देवळाभाईर देव उपाशी पुजारी आयता खाते माल
काय सांगू राज्या माह्या भारताचे हाल...
- किशोर मुगल.."झोलाझेंडी"
------------------------------------
प्रतिक्रिया
विदारक
वास्तव
हेमंत साळुंके
अभिनंदन.
अप्रतीम रचना. स्पर्धेतल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन. http://maymrathi.blogspot.com/
पाने