नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे रावेरी, जि. यवतमाळ येथे होऊ घातलेले यावर्षीचे ७ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन हे प्रत्यक्षात होऊ शकले नसून त्यास पर्याय म्हणून आभासी/ ऑनलाईन पद्धतीने झूम व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सुरू असलेल्या 'वेब मिलन सप्ताहाचे' आज दिनांक २१/०३/२०२१ ला दुसरे पुष्प 'शेतकरी - महीला' कवी संमेलन" गुंफण्यात आले. झूम मीटिंग व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साकारण्यात आलेले हे कवी संमेलन श्रोत्यांना खरेच खूप आनंद देऊन गेले व ते साक्षात मंचावर होत आहे की काय असे जाणवले. सदर कवी संमेलनाला अध्यक्ष म्हणून अनुपमा जाधव तर सूत्रसंचालक म्हणून कुमारी लक्ष्मी बल्की हे लाभले.
भूषण तांबेकर (ठाणे) यांच्या "शेतकरी आंदोलन आणि कृषी कायदा" या अत्यंत सुंदर अशा कवितेने सुरू झालेल्या सदर कवी संमेलनात अध्यक्षांसह ऐकून नऊ कवींनी आपल्या बहारदार रचना सादर करून अक्षरशः श्रोत्यांची मने जिंकली. हिंमत ढाळे (अकोला) यांनी, "आठवण" ही कविता सादर करून लहानपणी घरी असलेल्या पारिवारिक एकोप्याची जाणीव करून दिली. व त्या आठवणींनी कसा आजही अंगावर काटा येतो अशी मार्मिक भावना आपल्या कवितेतून व्यक्त केली. त्यानंतर आलेल्या तुळशीराम बोबडे (अकोला) यांनी, महिला विश्व विषयक सादर केलेल्या आपल्या कवितेतून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण केवळ बोलतो पण कृती मात्र काहीच करत नाही असे सांगितले.
त्यापाठोपाठ आलेल्या तेजस आंबाखाये (यवतमाळ) या वयाने अतिशय तरुण असलेल्या कवीने शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनाविषयी त्याला पडलेले प्रश्न आपल्या कवितेतून मांडले. डॉ. सुनील पखाले (वर्धा) यांनी, "टीस" या आपल्या कवितेतून 'हाताच्या फोडावाणी मायी वाढवली पोरं, आता गिधाड नजरेचा लागला जिवाला या घोरं", या ओळी सादर करीत आपल्या मनाची अस्वस्थता उपस्थित केली. ऍड. सुशांत बारहाते (हिंगणघाट) यांनी, संकटांशी लढण्यासाठी आता मी तैय्यार आहे, असे सांगणारी धाडसी वृत्तीची, "साथ अपेक्षित आहे" ही कविता सादर केली. त्यानंतर आलेल्या संदीप धावडे (वर्धा) यांनी, शेतकऱ्यांच्या जीवनावर एक भन्नाट कविता सादर केली. "घे पोट्ट्या घे, ते सरकीचं पाकीट घे.. घ्या दोन दोन सासं, अन पेरा आपलेच श्वासं" या त्यांच्या ओळी श्रोत्यांच्या अंतरंगात कोलाहल मचवून गेल्या.
त्यानंतर सुत्रसंचालिका कुमारी लक्ष्मी बल्की (यवतमाळ) यांनी, "बाप - अश्रू" ही आपली कविता सादर करून श्रोत्यांच्याही नयनात पाणी आणलं. शेवटी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष मुटे सरांनी, "सच्चे दिन म्हणता म्हणता लुच्चे दिन आले, अन् शेतमालाचे भाव तमाम लंबेलाट झाले" ही आक्रोश - पूर्ण कविता सादर केली व सदर कवी संमेलनाची यशस्वी सांगता झाली.
सदर कवी संमेलनाच्या अध्यक्षा, अनुपमा जाधव (पालघर) या तांत्रिक अडचणींमुळे कार्यक्रमात भाग घेऊ शकल्या नाहीत.
- डॉ. रविपाल भारशंकर