Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



जात्यावरची गाणी

काव्यप्रकार: 
जात्यावरची गाणी

जात्यावरची गाणी

झपाट्याने काळ पालटला आणि जातं, पाटा व वरूटा काळाच्या पडद्या आड गेला. डिझेल-विद्युतवर चालणारी चक्की,पीठ गिरणी आली आणि जात्यावर दळणाची गरजच संपून गेली.
तसा तो काळ फ़ार जुना नाही. अगदी १९८० पर्यंत ग्रामीण भागात दळणासाठी ’जाते’ हेच प्रमुख साधन होते. महिलांच्या कष्टात भर घालणारे पण त्यानिमित्ताने दळतांना ओव्या गाऊन आपल्या मनातल्या भावनांना मोकळी वाट करून देणारे.
जात्यावरच्या गाण्यांना साहित्यिकमूल्य नसेलही पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी ती ही की,
फ़िरत्या जात्याला स्वत:ची अशी एक लय आणि नाद असतो, त्यामुळे कोणतेही गाणे, कोणत्याही चालीत म्हणत दळण दळणे शक्यच नाही. त्यासाठी ठराविक ठेका पकडणारेच शब्दच लागतात. ठराविक घाटणीचेच गीत हवे असते. अशी गीते कवी किंवा गीतकारांनी लिहिली नाहीत म्हणून आमच्या मायमाऊल्या त्यासाठी थांबल्या नाहीत.
कवी, गीतकार आणि संगीतकाराची भूमिका त्यांनीच चोख पार पाडली आणि ……

आणि घराघरात आकारास आले जात्यावरचे गाणे.
काही येथे दिली आहेत, बाकी यथावकाश देण्याचा प्रयत्‍न आहेच.

१) मायबापानं देल्ल्या लेकी,
वाटच्या गोसायाले
नित पलंग बसायाले

२) मायबापानं देल्ल्या लेकी,
नाही पाहिली जागाजुगा
लेक लोटली चंद्रभागा

३) मायबापानं देल्ल्या लेकी,
नाही पाहिले घरदार
वर पाहिला सुंदर

४) आली दिवाळी दसरा,
मी माहेरा जाईन
बंधु-भावाले ओवाळीन

५) माझं जातं पाटा आहे,
जन्माचा इसरा
मला भेटला भाग्यवंत सासरा

(संकलन : गंगाधर मुटे)
…………………………………..

Share

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 07/04/2022 - 09:21. वाजता प्रकाशित केले.
    लोक रामायण......
    जात्यावरच्या ओव्या......
     
    माझं जातं जागं होई
    मग सुर्व्या नारायण
    घरघर नोका म्हणू
    जात गातं माझं गाणं.......(१)
     
    हाता मुठीतले दाणे
    रामपारी त्याचा मान
    आली चैताची नवमी
    ऐकाजी रामायण...........(२)
     
    वावर नागरता
    फाळ नागराचा तिथे
    थांबला थबकला
    जनक मनामधे..............(३)
     
    घेई उचलून लेक
    मया दाटू आली पोटी
    धारित्रीनं गा धाडिली
    लेकबाई माझ्यासाठी.......(४)
     
    रामा माझी लेक
    ठेव गा आयुष्याची
    दु:खी सुखाची साऊली
    आण मोडल्या धनुष्याची.......(५)
     
    कसा आनंदी आनंद
    चौघी बहिणी चौघी जावा
    कुबड्या मंथरेला वाटे
    अवघाच हेवा...............(६)
     
    भरत रडे म्हणे
    माये ,कशी गे तुझी करनी
    पिताजी गेले स्वर्गी
    बंधु धाडिलेस  वनी..........(७)
     
    सुलक्षेना सकवार
    सीता‌ घाबरी घुबरी
    समोर उभी ठाके
    शूर्पणेका निलाजरी......(८)
     
    निलाजरी शूर्पणेका
    रामा लक्षुमणा झोंबी
    झिंज्या मोकळ्या गळ्यात
    उघडी पाठ उघडी बोंबी......(९)
     
    गुंजभर सोनियानी
    गळसरी शोभे गळा
    सोनियाच्या हरणाचा
    कागे सीताबाई लळा..........(१०)
     
    धाकटा देर बाई
    धाकटा पाठी भाऊ
    लक्षुमण तुला तसा
    संशेव नको घेऊ.........(११)
     
    दहा तोंडाचा रावण
    घेतो संन्याशाचं सोंग
    काय व्होईल सीतामाई
    आता नशीबाले सांग........(१२)
     
    सीता  येकली येकली
    हरिणी तडफडे
    दहा तोंडाचा रावण
    गगनात उडे......(१३)
     
    मी जेटायू गिधाडं
    माझी नजर बापाची
    तू राजा रे रावण
    तुझी नजर पापाची........(१४)
     
    मारोती उडाला
    उलंघिला समुंदर
    रावणाच्या बगिच्यात
    शोधे सीतेला नजर.......(१५)
     
    रावणाच्या लंकेमधी
    सीता अगनीची ज्वाळा
    मारुतीच्या फुंकरीनं
    कसा उठला उबाळा.........(१६)
     
    सीतामाई रडे
    मंदुदरीला ये रडं
    बोलील कशी भर्ताराला
    सोन्यानं गळा जड..........(१७)

    रावणाला हत्ती घोडे
    बंधू भुईवर दोघे
    चोरट्या कोल्ह्याच्या समोर
    दोन वनराज उभे............(१८)

    सोन्याची लंका जळे
    रावण मेला मेला
    सीतामाईचा गे माये
    वनवास ना संपला........(१९)
     
    रामा तुझ्या मनापाठी
    कसा संशयाचा काटा
    वाटे रावणाचा दंभ खरा
    सीतेचा शब्द खोटा........(२०)
     
    तुम्ही ‌मारिला रावण
    संगे मारोती ‌बिभीषण
    सीता झुंजली येकली
    तिच्या नशिबी दूषण.........(२१)

    संकलन : सौ. प्रज्ञा बापट

    शेतकरी तितुका एक एक!