Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



मरगळलेल्या कृषिक्षेत्राला कोरोनाचा आधार : कोरोना माहात्म्य ||१४|

लेखनविभाग: 
मागोवा
मरगळलेल्या कृषिक्षेत्राला कोरोनाचा आधार : कोरोना माहात्म्य ||१४||
लोकमत
(लोकमत दिवाळी अंक-२०२० मध्ये प्रकाशित)

" मागील ५० वर्षात ज्या तऱ्हेने बिगरशेती क्षेत्रातील उत्पादनात ज्या गतीने दरवाढ झाली आहे तीच दरवाढीची गती शेतीक्षेत्रातही कायम राहिली असती तर आजही शेतीक्षेत्राचा सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP)आणि उत्पन्नात शेतीक्षेत्राचाच सिंहाचा वाटा असता. मागील पन्नास वर्षात विशेषतः हरितक्रांतीनंतर आणि आधुनिक कृषी-तंत्रज्ञानाच्या उदयानंतर ज्या गतीने शेतीक्षेत्राच्या उत्पादनात वाढ झाली तशी वाढ कोणत्याच क्षेत्रात झाली नाही. एका दाण्याचे हजार दाणे होण्याचा चमत्कार फक्त शेतीत होतो अन्य सर्व क्षेत्रात केवळ एका वस्तूचे रूपांतर दुसऱ्या वस्तूत होते; नवनिर्मिती होत नाही. आजही शेती उत्पादनाला रास्त भाव द्यायचे ठरले तर तसा निर्णय झाल्यापासून काही सेकंदाच्या आत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात शेतीक्षेत्र छलांग मारून पहिल्या पायरीवर चढलेले दिसेल. "

       कोविड-१९ ने भूतलावर पहिले पाऊल ठेवले त्याला अजून एक वर्ष सुद्धा व्हायचे आहे. पण इतक्याशा अल्पावधीत त्याने अधिकृत आकडेवारीनुसार जवळजवळ ४ कोटी लोकांची गळाभेट घेऊन संक्रमित केले आहे आणि ११ लक्ष लोकांना स्वर्गाची पाऊलवाट दाखवली आहे. अंकगणितीय विचार केल्यास ज्या कोविड-१९ ने वर्षभराच्या आत १ या एकअंकी संख्येचे ४ कोटी म्हणजे ८-९ अंकी गुणाकाराचे गणित करून दाखवले तो पुढील वर्षभरात ४ कोटीचे किती अंकीय गुणोत्तर करून दाखवेल याचे चवथ्या इयत्तेतील सामान्य गुणाकाराचे गणित ज्याला कळते त्याला ४ कोटी गुणिले ४ कोटी असा गुणाकार केल्यावर आलेले उत्तर बघून त्याला हृदयविकाराचा झटका येण्याचीच शक्यता आहे. परशुरामाने एकवीसवेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली असे म्हटले जाते ते आम्ही पाहिलेले नाही पण करोनाने मात्र त्याहीपेक्षा जास्त वेळा पृथ्वीवरील रस्ते निर्मनुष्य करून टाकलेले आम्हाला प्रत्यक्ष  बघायला मिळाले आहे.

 
       कोरोना संक्रमणाची प्रचंड वेगवान गती हेच कोरोना संकटाचे मुख्य कारण आहे. हीच संक्रमणगती रोखण्यासाठी लॉकडाऊन सारखे प्रतिबंधात्मक पर्याय शोधावे आणि योजावे लागले आहेत. रोगापेक्षा इलाज भयंकर या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे त्याचे प्रात्यक्षिकच कोरोनाने करून दाखवले आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजना करताना मनुष्यप्राणी जितका हतबल झालेला बघायला मिळाला तितका हतबल होताना आजच्या पिढीला कधीच बघायला मिळालेला नव्हता. कोरोनामुळे मृत्यू वाट्यास येत असला तरी त्याहीपेक्षा कोरोनावर उपाययोजना करताना जनजीवनावर भयानक परिणाम होत असून मरण्यापेक्षाही भयंकर जगणे वाट्याला येत आहे.
 
          कोरोनामुळे नव्हे तर कोरोनावर करावयाच्या प्रतिबंधात्मक अनिवार्य उपायामुळे संपूर्ण जीवन प्रभावित होणे स्वाभाविक ठरले. सर्वच क्षेत्राला कमी अधिक चटके सहन करावे लागले, लागत आहे आणि भविष्यकाळातही लागणार आहे. या सर्व क्षेत्रामध्ये सर्वात कमी चटके बसणारे क्षेत्र म्हणजे शेतीक्षेत्र. अन्य बिगरशेती क्षेत्र कोरोना संकटाने कोलमडून पडत असताना शेतीक्षेत्र मात्र ठामपणे जवळजवळ जसेच्या तसे आपल्या पायावर घट्टपणे उभे आहे. शेतीचे सर्व उदीम बऱ्यापैकी व्यवस्थित पार पडले आहेत. बिगरशेती बाजारव्यवस्थेवर प्रचंड बंधने आली असताना सुद्धा शेती बाजार सुस्थितीत सुरु आहे. बिगर शेतीक्षेत्रातील उत्पादन क्षमतेवर गंडांतर आलेले असताना शेतीची उत्पादन क्षमता जशीच्यातशी पूर्ववत टिकून आहे. तरीही कुणी शेतीवर गंडांतर आल्याची हाकाटी पिटत असेल तर ती केवळ रडगाणे गाण्याची स्वभावाला जडलेली सवय आहे. यापलीकडे त्याला फारसा काही अर्थ नाही. कोरोनामुळे शेतीक्षेत्र प्रभावित झालेच नाही असे नाही. पण अन्य क्षेत्रावर पडलेल्या प्रभावाचा विचार करता शेतीवरील प्रभाव नगण्य पातळीवरचाच ठरतो. त्यासोबतच शेतीवर जे बारमाही अरिष्ट कोसळणे सुरु असते त्यातुलनेतही कोरोनाचा प्रभाव नगण्यच ठरला आहे. 
 

"लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्त्या करूनही आत्मचिंतन करून शेतीच्या पुनरुत्थानासाठी सकारात्मक पावले उचलण्याची गरज व्यवस्थेला कधी वाटली नाही. भारत-इंडिया दरी दिवसेंदिवस आणखी रुंदावत असूनही व्यवस्थेला त्याचे शल्य वाटले नाही. शेतीव्यवसाय पूर्णपणे कर्जाच्या ढिगाऱ्याखाली दबून शेतीची दमछाक होत असलेली पाहून शेतकऱ्याला पूर्णपणे कर्जमुक्त करून टाकण्याची लवचिकता व्यवस्था दाखवू शकली नाही; म्हणून काही उत्क्रांतीच्या वाटा अनादीकाळापर्यंत अवरुद्ध करून ठेवता येत नाही. नियती त्यातून नैसर्गिक मार्ग शोधून त्यावर जालीम इलाज करतच असते. त्यामुळे नियतीचे खेळ मोठे विचित्र असतात असे म्हणतात."

         याउलट कोरोना संकटामुळे शेतीक्षेत्रावर जे सकारात्मक प्रभाव जाणवत आहेत ते ऐतिहासिक स्वरूपाचे आहेत. शासकीय तिजोरीत खुळखुळाट असल्याने शेतमाल आयातीवर भरघोस सूट देऊन देशांतर्गत शेतमालाचे भाव पाडण्याचे शासकीय शस्त्र बोथट होत चालले आहे. यंदा तुरीचे वाढलेले भाव आणि तुरीचे भाव पाडण्यात आतापर्यंत शासकीय साम्राज्याला आलेले अपयश हे एक मोठे उदाहरण म्हणून याकडे बघता येईल. कोरोनातून देशाची अर्थव्यवस्था लवकर न सावरल्यास शेतमाल निर्यातीला खुली सूट देण्याची पाळी नाईलाजास्तव सरकारवर येण्याची शक्यता आहे. सरकार जितके मजबूत असेल तितकी शेतीची लूट होत असल्याने सरकारी तिजोरी डबघाईस येणे शेतीक्षेत्राच्या पथ्यावरच पडणारे आहे. दुर्दैवाने सत्य असे आहे कि, कोरोनासारखी महामारी जितकी आक्राळविक्राळ रूप धारण करत जाईल; तितकी शेतीवरील व्यवस्थेची पकड ढिली होऊन शेती कुत्रिम बंधनाच्या कचाट्यातून मुक्त होत जाऊन शेतीची नैसर्गिक स्वातंत्र्याकडे म्हणजे पर्यायाने विकासाकडे वाटचाल होत जाईल. मजबूत व्यवस्थेचा उपयोग कमजोर क्षेत्राला होण्याऐवजी कमजोर क्षेत्रावरच मजबूत व्यवस्थेचा मजबूत प्रहार होण्याची जागतिक व्यवस्थेची रीतभात झाल्याने व्यवस्थाच कमकुवत होणे कमजोर क्षेत्राला तारक ठरू शकते हे एक आणखी दुर्दैवी पण अर्थशास्त्रीय वास्तव आहे.
 
         सकल घरगुती उत्पादनात (GDP) आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत एकंदरीतच शेतीक्षेत्राचा वाटा नगण्य का दिसतो, हे एक गौडबंगाल वाटत असले तरी हे अजिबात नैसर्गिक गौडबंगाल नाही. हे मानवनिर्मित गौडबंगाल आहे. बिगरशेतीक्षेत्रातील उत्पादनाचे कायमच भाव गगनाला भिडत असताना शेतीक्षेत्रातील उत्पादनाचे भाव जाणीवपूर्वक पाताळात गाडून पाताळाच्या पातळीवर ठेवल्याने हे कृत्रिम गौडबंगाल निर्माण झाले आहे. मागील ५० वर्षात ज्या तऱ्हेने बिगरशेती क्षेत्रातील उत्पादनात ज्या गतीने दरवाढ झाली आहे तीच दरवाढीची गती शेतीक्षेत्रातही कायम राहिली असती तर आजही शेतीक्षेत्राचा सकल राष्ट्रीय उत्पादनात  (GDP)आणि उत्पन्नात शेतीक्षेत्राचाच सिंहाचा वाटा असता. मागील पन्नास वर्षात विशेषतः हरितक्रांतीनंतर आणि आधुनिक कृषी-तंत्रज्ञानाच्या उदयानंतर ज्या गतीने शेतीक्षेत्राच्या उत्पादनात वाढ झाली तशी वाढ कोणत्याच क्षेत्रात झाली नाही. एका दाण्याचे हजार दाणे होण्याचा चमत्कार फक्त शेतीत होतो अन्य सर्व क्षेत्रात केवळ एका वस्तूचे रूपांतर दुसऱ्या वस्तूत होते; नवनिर्मिती होत नाही. आजही शेती उत्पादनाला रास्त भाव द्यायचे ठरले तर तसा निर्णय झाल्यापासून काही सेकंदाच्या आत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात शेतीक्षेत्र छलांग मारून पहिल्या पायरीवर चढलेले दिसेल.
 
         केंद्र सरकारने आणलेले नवे ३ कृषी सुधारणा विधेयक ही तर कोरोनाची आणखी एक देण आहे. शेतमाल खरेदीबाजार खुला करावा अशी शेतकरी संघटनेचे प्रणेते युगात्मा शरद जोशी यांनी १९९२ मध्येच मागणी केली होती. शेतकरी संघटनेच्या अधिवेशनात तसा ठराव होऊन शिक्कामोर्तब झाले होते पण गॅट करारावर स्वाक्षरी करूनही तत्कालीन सरकारने शेतीला बंधनमुक्त केले नाही. देशात अन्य सर्व क्षेत्रात खुल्याबाजारपेठेला प्रोत्साहन मिळत असताना केवळ शेतीव्यवसायाला मात्र जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले. आता तब्बल ३ दशकानंतर शेतकरी संघटनेच्या विचारधारेवर सरकारला अधिकृत शिक्कामोर्तब करावे लागले. शेती विषयाचा कळवळा आला म्हणून हे विधेयक खचितच आणले गेले नाही. कोरोनाच्या प्रतापामुळे ही शासनासमोर निर्माण झालेली केवळ अगतिकता आणि अपरिहार्यता आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. 
 
          नवीन कृषी विधेयकामुळे शेतमाल खरेदी बाजारातील एकाधिकारशाही संपून खुली बाजारपेठ तयार होणार आहे. त्यामुळे शेतमालाच्या विक्री संदर्भात शेतकरी खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार आहे. तो त्याला वाटेल तेथे शेतीमालाची विक्री करू शकणार आहे. नव्या विधेयकामुळे स्पर्धेला प्रोत्साहन मिळेल. परिणामी ग्राहकांना दर्जेदार शेतीमाल आणि शेतकऱ्यांना शेतीमालाची चांगली किंमत मिळण्याची शक्यता निर्माण होणार असल्याने ग्राहक आणि शेतकरी या दोघांचाही फायदाच होणार आहे. नव्या विधेयकानुसार करार करणे किंवा न करणे याचे स्वातंत्र्य शेतकऱ्याला कायमच असणार आहे. ज्याला वाटते तो करार शेती करेल, ज्याला करायचा नसेल तो करणार नाही. नव्या व्यवस्थेत कृषी उत्पन्न बाजार समित्या कायमच राहणार आहे. त्यांनी आपली सेवा सुधारावी. खुल्या बाजारात स्पर्धात्मक व्यापाराला चालना देऊन शेतमालाला दोन पैसे अधिकचे मिळतील अशी काळजी घ्यावी. नक्कीच नव्या व्यवस्थेतही कृषी उत्पन्न बाजार समित्या देखील मोलाची भूमिका निभावू शकतात. मरगळलेल्या कृषि बाजार व्यवस्थेत कोरोनामुळे चैतन्य निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये.
 
        कोरोनामुळे प्रतीकारशक्ती हा परवलीचा शब्द झाला आहे. रोगराईवर मात करायची असेल वैद्यकीय उपचारांपेक्षा स्वतःच्या प्रतिकार क्षमतेला अनन्यसाधारण महत्व असल्याची जाणीव जनसामान्यांना व्हायला लागली आहे. ऐहिक, भोगविलासी जीवनशैलीच्या नादात मनुष्याला जीवन जगण्याच्या मूलभूत सिद्धांतांचा विसर पडायला लागल्याने सकस आहाराची जागा कुरकुरीत, खुसखुशीत व चमचमीत भोजनाने घेतली होती. अन्नाचा वापर सकस आहार म्हणून नव्हे तर केवळ उदर भरणासाठी केला जात होता. मुगापासून उडदापर्यंत, तिळापासून मोहरीपर्यंत आणि लिंबापासून आवळ्यापर्यंत सर्व घटकांचा भोजनात समावेश असणे किती महत्वाचे आहे, याचाही विसर गेल्या काही दशकात पडायला लागल्याने या सर्व शेतमालाच्या बाजारातील उठावाची स्थिती मंदावली होती. कोरोनाच्या निमित्ताने सकस आहाराची जाणीव माणसाला व्हायला लागल्यास अडगळीत पडलेल्या पिकांनाही बाजारात मागणी येण्याची शक्यता बळावली आहे. केवळ मास्क साठी कापडाचा वापर वाढल्याने जागतिक पातळीवर मास्कमुळे १३ हजार कोटीची उलाढाल झाली म्हणजे कापसाला नव्याने ग्राहकी निर्माण झाली याचा फायदा कापूस उत्पादकांना होणार आहे.
 
         लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्त्या करूनही आत्मचिंतन करून शेतीच्या पुनरुत्थानासाठी सकारात्मक पावले उचलण्याची गरज व्यवस्थेला कधी वाटली नाही. भारत-इंडिया दरी दिवसेंदिवस आणखी रुंदावत असूनही व्यवस्थेला त्याचे शल्य वाटले नाही. शेतीव्यवसाय पूर्णपणे कर्जाच्या ढिगाऱ्याखाली दबून शेतीची दमछाक होत असलेली पाहून शेतकऱ्याला पूर्णपणे कर्जमुक्त करून टाकण्याची लवचिकता व्यवस्था दाखवू शकली नाही; म्हणून काही उत्क्रांतीच्या वाटा अनादीकाळापर्यंत अवरुद्ध करून ठेवता येत नाही. नियती त्यातून नैसर्गिक मार्ग शोधून त्यावर जालीम इलाज करतच असते. त्यामुळे नियतीचे खेळ मोठे विचित्र असतात असे म्हणतात. 
 
निसर्ग, नियती आणि सृष्टी, क्रूर असती नियम तयांचे
दया न माया, न्याय नसतो, खेळ असती अगम तयांचे
 
         शासन व्यवस्थेला प्रश्न सोडवता येत नसेल तर तेच प्रश्न लीलया सोडून दाखवण्याची धमक नियतीकडे असते, निसर्गचक्र उलट दिशेने फिरवण्याचे कृत्रिम षडयंत्र नियती फार काळ खपवून घेत नसल्याचे इतिहासात वारंवार अधोरेखित झालेले आहे आणि त्याच्या पाऊलखुणा इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात बघायला मिळाल्या आहेत. कोरोनाच्या निमित्ताने नियती शेतीक्षेत्राला न्याय देऊन शेतकऱ्याच्या आयुष्यातील लाचारीचे जिणे संपवून त्याला इतरांसारखे सन्मानाचे जीवन प्रदान करेल, असे अशक्य वाटत असले तरी नेमके असेच घडण्याची पुरेपूर शक्यता निर्माण झाली आहे. 
 
- गंगाधर मुटे आर्वीकर 
(क्रमशः)
=============
या लेखमालेतील इतर लेख http://www.baliraja.com/carona इथे उपलब्ध आहे.
==============
 
Share

प्रतिक्रिया