नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
सरकारी धोरण, रचे बापाचे सरण
फाटका घालुनी सदरा
बारा ठिगळी धोतरं
भर उन्हात हाकतो
बाप शेतात नांगरं || धृ ||
काळ्या मायीच्या कुशीत
हिरवं सपान पेरतो
घाम गाळून मातीत
रोटी जगाला चारतो
जिवा भावाची गणगोत
ढवळ्या, पवळ्या नि वावरं
भर उन्हात हाकतो
बाप शेतात नांगरं || 1 ||
साऱ्या जगाचा पोशिंदा
नाही धनावर आशा
भेगाळल्या पायामंध्ये
दिसतो जगाचा नकाशा
धूळपेरणी करून
फुलवितोय शिवारं
भर उन्हात हाकतो
बाप शेतात नांगरं ||2 ||
घाव सोसून दुःखाचे
काळजाला आले घट्टे
रक्त पिऊन बापाचे
मालामाल झाले चोट्टे
वाहे सुगंधी घामाचा
रानावनातून पूरं
भर उन्हात हाकतो
बाप शेतात नांगरं ||3 |
जीव झाडाला टांगून
करी रानात पेरण
पासवी सरकारी धोरण
रचे बापाचे सरण
बाप उडून गेल्यानं
झाली अनाथ पाखरं
भर उन्हात हाकती
लेकरं शेतात नांगरं || 4||
कवी
बालाजी सोपानराव कांबळे
ताई निवास परळी वै
ता. परळी वै
जिल्हा. बीड 431515
मो. नो:- 9860806747
प्रतिक्रिया
उत्तम गीतरचना
अतिशय उत्तम गीतरचना सर !
मुक्तविहारी
Dhirajkumar B Taksande
कांबळे साहेब उत्कृष्ट गीतरचना....!!!!
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!