नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


४ थे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई

वृत्तांत, छायाचित्र, Vdo आणि बरेच काही >>>  Fingure-Right    क्लिक करा.

  

# जाच...

Gujarathi sandip Vikas's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
पद्यकविता

# जाच...

काळ्या मातीत राबतो। माझा काळाच रे बाप !
दुःख मोजावं कशानं । थिटे झाले सारे माप !

मोल फुकट घामाचं । कशालाच नाही भाव!
सावकाराच्या वहीत । दरवर्षी येई नाव !

आता बघवत नाही । मायचाही गळा सुना !
म्हणे धनीच गं माझा । गळ्यातला डाग जुना !

आम्ही अंधाराचे धनी । बोजे कर्जाचे वाढले !
काळजाचे केले पाणी । शेत विकाया काढले !

किती नशीब फुटकं । बाप कोरडाच रडे !
आता सुखाचं सपान । कुणालाच नाही पडे !

रोजरोजचे भांडण । आला विट जगायचा !
डोळे मिटुनच बाप । रातरात जागायचा !

जाच, सावकाराचा रे । कसं जगावं हे जिणं !
नाही घरात दमडी । आता कसं विष पिणं !

जीव झाला चोळामोळा । सारे उपाशी तापाशी !
प्रेम दिलं पोटभर । घेतली बापानं फाशी !

माय हमसून रडे । गेलं कुंकवाचं लेणं !
साता जन्माचेच भोग । कोण फेडील हे देणं !

पेपरात बातमीही । आली तळाला छापून !
कुणी वाचली फाडली । नाही ठेवली जपून !

रात्री तीच बातमी, मी । डोळेपुसून कापली !
कुणालाच का वाटावी । आहे उगीच आपली !

शासनाची मदतही। कागदावर राहिली !
मृतात्म्यासही रे फक्त । फुले शब्दांची वाहिली !

गेलं घराचं छप्पर । बदलला सातबारा !
नातं तुटलं रक्ताचं । संसार पांगला सारा !

सरकारनं केलंय । म्हणे कर्ज आता माफ !
पैसा नकोय साहेब । परत देता का ? बाप !

माझ्या बापानं जे केलं । तसं करु नका कुणी !
हात जोडतो तुम्हांला । दिस येतो सोन्यावाणी !

संदीप विकास गुजराथी,
सोमवार पेठ, चांदवड जि. नासिक
मो. 9604502715
gujarathi.svcoe@snjb.org

Share

प्रतिक्रिया