नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम*
*मंगळवार दिनांक २४ सप्टेंबर २०२४*
*विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२४*
*कवी - श्री महेश वसंतराव कोंबे*
शीर्षक *संघर्ष*
*कवितेचा प्रकार - छंदमुक्त*
*रसग्रहण*
*रसिक :- लीलाधर दवंडे*
---------------------------------------------------------
*कवी परिचय*
पांढऱ्या सोन्याची खाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील कवी महेश वसंतराव कोंबे एम ए, एम बी ए, पी एच डी अशा विविध पदव्या संपादन केलेले उच्च शिक्षित असून सध्या वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे शिक्षकपदावर कार्यरत आहेत. गजलकार सुरेश भटांच्या कवितांचा... गजलांचा त्यांच्यावर पगडा दिसून येतो.
ग्लोबल एक्सलंस एज्युकेशन अवॉर्ड सह, आदर्श शिक्षक यासह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले महेश सर मोकळ्या स्वभावाचे धनी आहेत.
--------------------------------------------------------
*मनोगत*
कधीकाळी कृषी प्रधान म्हणून गौरवलेल्या देशात शेती आणि शेतकरी या दोघांनाही आदराचे स्थान होते. काळ बदलत गेला आणि आज भारतासारख्या देशात बळी रसातळाला गेला. सततची नापिकी... वाढता मजूर खर्च... उत्पादन खर्च... भाऊबंदकी आणि ज्याप्रमाणे निसर्गाचा वार शेतकरी झेलतो आहे, त्याचप्रमाणे येथल्या प्रशासकीय व्यवस्थेचा आघात झेलून ... या परिस्थितीशी दोन हात करून केवळ विश्वाच्या उदर निर्वाहासाठी अजूनही शेती मातीत आपले अख्खे आयुष्य खर्ची घालत असलेल्या शेतकरी राजाच्या आयुष्यातील पदोपदी घडत असलेला संघर्ष कवीवर्य महेश कोंबे सर आपल्या संघर्ष या कवितेतून मांडतात... नव्हे... शेतकरी जीवनाचे चटके खाऊन उभं असलेलं जिवंत चित्र डोळ्यासमोर उभे करताहेत.
मराठी काव्यात अभंग, अष्टाक्षरी, गजल, गेय कविता, पोवाडा असे नानाविध प्रकार असतांना गेल्या काही दशकांत उदयोन्मुख झालेला काव्य प्रकार म्हणजे मुक्तछंद. कविवर्य अशोक नायगावकर यांच्या मुक्त छंदातील कविता त्यांच्याच शैलीत ऐकल्या की, त्यातील सौंदर्य दर्शन कळायला लागते. याच मुक्तछंद प्रकारातील आमचे कवीमित्र महेश सरांची कविता अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम,
लेखनाचा विषय : *शेतमालाचे भाव* या स्पर्धेसाठी रसग्रहण करण्यासाठी मी निवडली आहे.
माझ्यासारखा रसिकाने कवितेच्या ओळींतील एकेक शब्द पदर उलगडताना कविता कशी वाटली आणि त्यातील भाव... संदेश काय... बघूया खालील रसग्रहणातून.
-----------------------------------------------------------
*रसग्रहण*
*संघर्ष...*
सलग तिसऱ्या वर्षीही
बापानं दुबार पेरणी केली
दीडीनं कर्ज आणून
डवरणी, फवारणी केली
पिक जोमात असतांना
आस्मानी संकट आलं
तणकट सोडून सारं घेऊन गेलं
गारपिटीनं तूर अख्खी लंबी झाली
शेवटी,
होती नव्हती सोयाबीन सोंगली,
बोंडअळी न सोडलेला कापूस वेचला
अन यंदाही मिळेल त्या भावात विकला
माणसाच्या करणीने वातावरणात बदल झाले आणि त्यामुळे पावसाचं वेळापत्रकच पार बदलून गेलं. अगदी वीस पंचवीस वर्षांपूर्वी नियमित पडणारा पाऊस हल्ली लहरी झाल्यासारखा पडतो आहे. कधी वेळेवर येणं तर कधी पावसाचं गायब होणं... कधी खूपच मुसळधार पडणं... यामुळे अनेकदा शेतकऱ्यांवर दुबार काय आणि तिसऱ्यांदा काय पेरणी करण्याचं संकट ओढवत असतं. शेती उत्पादनासाठी वाढलेला खर्च शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटत असतो. त्यामुळे अगोदरच कुठली संस्था, बँक अथवा सावकारांकडून काढलेलं कर्ज दुबार पेरणीनं अंगावर बसलं असताना पुन्हा एकदा मोड झाली की पुन्हा डवरणी ... फवारणी अशा अनेक शेती कामासाठी कर्ज काढतांना शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा दराच्या व्याजाने कर्ज काढून शेती टिकवावी लागते... पिकवावी लागते. जावे त्यांच्या वंशा म्हणतात ते काही खोटं नाही. आपण उगाच वातानुकूलित कक्षात बसून शेतकऱ्यांच्या आयुष्याचा हिशोब मांडतो अन् त्याच्या कर्जबाजारी होण्याची विविध कारणं शोधत बसतो. अस्मानी अन् सुलतानी संकटांच्या वादळात सापडलेल्या शेतकऱ्याची ही सत्यकथा वाचतांना वाचकाच्या डोळ्यांतून अलगद दोन थेंब तरी गळावे, यातच कवितेचे सार्थक आहे.
एवढं कर्जपाणी करूनही शेतातलं पिक टिकवलं तर पुढ्यात अस्मानी संकट उभं. सांगा कसं जगायचं शेतकरी माणसानं!
पिक ऐन जोमात असतांना आलेल्या गारपिटीनं शेत शिवारातलं फक्त तण तेवढं ठेवलं अन् ऐन भरात आलेली तूर पूर्णतः भुईसपाट करुन टाकली... नव्हे! शेतकऱ्यांचं स्वप्नच जणू या गारपिटीनं नेस्तनाबूत केलं. या गारपिटीचा त्रास बाकीच्या पिकांनाही झाला. कापसाच्या बोंडात अळी शिरली. सोयाबीनवर पिवळा मोझ्याक आला. पानं पिवळी पडली. तरीही अशा परिस्थिती पुन्हा निसर्गाच्या या अवचक्राशी झुंजण्यास शेतकरी तयार झाला. होता नव्हता कापूस वेचला... उरली सुरली सोयाबीन कापली.... काढली अन् दरवर्षी प्रमाणे यंदाही मिळेल त्या भावात कापसाची अन् सोयाबीनची विक्री केली.
भाव वाढून मिळेल या आशेवर बसलेल्या शेतकऱ्याच्या माथी निराशेचे कसे चटके बसतात, याचं दाहक आणि वास्तव चित्रण प्रस्तुत कडव्यातून कवी महेश करतात आणि म्हणूनच कविता मला जिवंत आणि ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणारी वाटून जाते.
एवढ्यात,
मुलगा डिग्री पूर्ण करून आला होता
बापानं त्याला सहज विचारलं,
नोकरीपाण्याचं जमलं का ?
त्यावर मुलगा त्वेषात म्हणाला
नोकरी झाडावर लागत नाही
त्यासाठी संघर्ष करावा लागतो,
दाढी वाढलेल्या चेहऱ्याने मुलाकडे बघून
बाप मिश्किलपणे हसला,
अन यंदाच्या वाहीसाठी वावरात निघून गेला.
अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या झुंडीत सापडलेल्या शेतकरी राजाला कौटुंबिक समस्यांनाही अनेकदा पुढे जावे लागते. आपली अशी दुरावस्था पाहून निदान आपला मुलगा तरी उच्च शिक्षण घेऊन नोकरीला लागावा... एखाद्या चांगल्या व्यवसायात गुंतावा असे वाटून जाते.यासाठी स्वतः खस्ता खाऊन त्याच्या शिक्षणासाठी पुन्हा कर्जबाजारी होतो. डोळ्यांत आस असते, आपला मुलगा शिकून मोठा साहेब होईल. पण, हेही चित्र किती विचित्र असते, शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरणारं असते, याचं करूणामय चित्रण हुबेहूब कवीने दुसऱ्या आणि शेवटच्या कडव्यात केले आहे. हा जिवंतपणा कवीच्या कवितेची जमेची बाजू असून कर्तव्याने शिक्षक असलेले कवी कधीतरी शेती मातीशी जुळलेले असावे, असे वाटून जाते.
मिळेल त्या भावात सोयाबीन अन् कापूस विकल्यावर पुढे जेव्हा आपलं शिक्षण संपवून मुलगा घरी येतो, तेव्हा या शेतकरी राजाच्या डोळ्यांत आशा जागृत होऊन, मोठया कौतुकानं मुलास विचारतो की, "कुठं काही नोकरीपाण्याचं जमलं काय?". यावर येथल्या समाजव्यवस्थेवर आतून चिडलेला शेतकऱ्याचा मुलगा जो उत्तर बापास देतो, त्यातून एका बापाच्या हृदयाच्या झालेल्या चिंध्या अन् तरीही त्या परिस्थितीला हसत हसत गेलेला शेतकरी किती उदार आणि मोठया मनाचा आहे, याची शाश्वती यायला लागते.
आयुष्याची इतकी वर्ष शिक्षणात घालवून सुद्धा जेव्हा शेतकऱ्याच्या मुलास वशिला आणि पैशाशिवाय नोकरी लागत नाही, तेव्हा येथल्या समाजव्यवस्थेवर आपला राग काढू न शकणारा हतबल तरुण आपल्या बापाला "नोकऱ्या काय झाडाला लागतात? त्यासाठी संघर्ष करावा लागतो!" असे उत्तर देतो. एखादया पणतीने सूर्याला कसे तेजाळावे हे शिकवावे... समुद्रातील एखाद्या माशाला त्याच्या नव तरण्या लेकराने या अथांग समुद्रात कसे पोहावे हे शिकवावे, असे प्रस्तुत ओळींतून प्रथम दर्शनी लक्षात यायला लागते. रसिक मनाला ज्या बापाने रक्ताचं पाणी करून मुलाला वाढवलं...शिकवलं, त्या मुलाने असं उत्तर द्यावं...असा उद्धटपणा करावा, याचं वाईट वाटू लागतं. पण, येथल्या समाजव्यवस्थेवर बोट ठेवणारा मुलगा खरे तर या कथेचा उपनायक शोभून जातो... कथेचा नायक शेतकरी राजा मुलाचं हे उत्तर ऐकून संतापत नाही तर आपला अमूल्य वेळ पुन्हा मुलाला समजवण्यात खर्च न करता शेतीची पडलेली कामे करण्यास... एव्हाना त्याची वाढलेली दाढी वयाची आणि गरीब परिस्थितीची जाणीव करुन देणारी ठरते. अन् बापाचा मिश्किलपणा संघर्षाशी पुन्हा दोन हात करण्याची तयारी दर्शविते. शेती कसतांना अस्मानी आणि सुलतानी संकटांशी संघर्ष करणारा बाप आणि उच्च शिक्षित मुलगा यांच्या परस्परांच्या विचारांचा संघर्ष सुद्धा येथे बघायला मिळतो आणि कविता जिवंत होऊन हृदयास भिडते. पुन्हा नव्या हंगामाच्या शेती कामात स्वतःला व्यस्त करण्यास निघून जातो.
*कवितेतील आशय... भाषा सौंदर्य आणि काव्य सौंदर्य*
विशाल आशय सामावलेली मोजक्या शब्दांतील कविता येथे सरते आणि आपोआप डोळ्यांपुढे उभे राहते कधीकाळी शेती संपन्न असलेला महाराष्ट्र... हा भारत आणि आजचा शेतकरी राजा...
कवी मूळचे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याचे रहिवाशी. याच यवतमाळ जिल्ह्यातून शेतकरी आत्महत्यांची सुरुवात झाली होती. त्यामुळे तेथील परिस्थितीची जाणीव कवितेतून व्हायला लागते.
कविता मुक्त छंदात असली तरी त्यातील शब्द शब्द हृदयाला भिडून जातात, हीच कवितेच्या जमेची बाजू आहे.
कवीला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...
( टीप : कवितेचे रसग्रहण करतांना कवीची अनुमती घेतलेली आहे. )
-----------------------------------------------------------
*रसिक*
*लीलाधर रामेश्वरजी दवंडे*
मुक्काम पोस्ट - आजनी ( रडके )
तालुका -कामठी, जिल्हा- नागपूर
मुख्य पोस्ट - कन्हान पिंपरी
441401
संपर्क - 8412877220