नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकरी साहित्याची धूळपेरणी करण्याची सुरवात काही वर्षापूर्वी श्री. गंगाधर मुटे सर यांनी करायला सुरवात केली आणि आज सह्याद्री फार्म्स, मोहाडी, नाशिक येथील दोन दिवसीय संमेलनात या कसदार साहित्याच्या शेतीत विचारांची फळबाग पाहायला मिळाली. हीच ११ व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या यशाची पावती आहे. मा. शरद जोशींच्या स्वप्नातील भारताची एक प्रायोगिक चाचणी या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनुभवायला आली. शेती मातीचे कसदार साहित्य निर्माण व्हावे, या साहित्यातून राबणारे हात लिहिते व्हावे हि संकल्पना कायम ठेवत श्री. मुटे सर आणि त्यांचे सहकारी कायम या पालखीचे खांदेकरी झाले आहेत. आणि या शेतकरी दिंडीत दरवर्षी अनेक वारकरी सामील होत असतात. खरे म्हणजे हि साहित्याची दिंडी वर्षानुवर्षे त्याच ताकतीने पेलणे सोपे नाही पण ते काम मुटे सर पारदर्शक आणि यशस्वीपणे करताना दिसतात. आणि शेती जीवनावर, शेती साहित्यावर याचे होणारे सकारात्मक परिणाम नव्या पिढीला तेवढेच सक्षम आणि कसदार बनवत आहे. हे या साहित्य संमेलनाचे योगदान विसरून चालणार नाही.
जसे शेतीत आपल्याला कसदार पीक घ्यायचे असेल तर त्या शेतीची पूर्वमशागत करावी लागते त्याचप्रमाणे नाशिक येथील झालेले यशस्वी शेतकरी साहित्य संमेलनासाठी झालेल्या पूर्व मशागतीची कल्पना येते. ज्या ताकतीचं हे संमेलन झाले त्याच ताकतीचं नियोजन येथे दिसून आले. गेल्या काही वर्षापासून मी या संमेलनाचा वारकरी आहे. आणि या वारीत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यात जेव्हा संमेलन होत असते तेव्हा त्या भागातील मातीची ताकद कळते, त्या ठिकाणचे पीक कळते याच बरोबर त्या संमेलनातून उगवणाऱ्या साहित्याची ताकद कळते. अश्याच ताकतीचं संमेलन या वर्षी सह्याद्री फार्म्सला झालं याचा अभिमान आहे. संमेलनाच्या पूर्व मशागती पासून ते विचारांचं बीज रुजवण्यापासून तर त्या पिकाची सोगंणी (कापणी) होईपर्यंत जी जबाबदारी एका जबाबदार शेतकऱ्यांची असते तीच प्रचीती प्रत्येक संमेलनात पाहायला मिळते.
या संमेलनाला नाना पाटेकर हे उद्घाटक लाभले असताना मिरगाच्या नक्षत्रातील पहिली मूठ यांच्या विचारांच्या पेरणीतून झाली आणि मिडीयाला देखील ‘पेरते व्हा’ ची हि हाक जनतेला दाखवावी लागली. तेव्हाच खरं म्हणजे सुरू होण्यापूर्वीच हे संमेलन जिंकलं होतं. संमेलनाचे विडीओ वायरल व्हायला सुरवात झाली होती. या वेळीचे चर्चा सत्र, परिसंवाद यातून एक विचारांचा डोस प्रत्येक वक्त्याच्या बोलण्यातून मिळत होता, संमेलनातील कवी संमेलन, गझल मुशायरा हि काळ्या आईची व्यथा सांगत होत्या. त्या व्यथा, विद्रोह संमेलनात पाहायला मिळाला. साहित्याची ताकद काय असते याची जाणीव झाली, साहित्य पेटू शकते, साहित्य आंदोलन करू शकते, साहित्य सरकारला जाब विचारू शकते, हि ताकद शब्दात असते म्हणून साहित्यिकाची लेखणी कुणाकडे गुलाम राहता कामा नये, किंवा साहित्यिकाने आपल्या लेखणीचे टोक कुणासमोर मोडून ठेवू नये, आणि शेतीमातीच्या साहित्यिकांनी तर मुळीच नाही. ह्या विचाराची शिदोरी आणता आली.
‘शेती म्हणजे दारिद्र्य आणि दारिद्र्य म्हणजे शेतकरी’ हि पिढ्यानपिढ्यांची व्याख्या बदलायची वेळ आली आहे. शेतकरी म्हणून आम्ही कधीच सुखी समाधानचं जीवन जगायचं नाही का? आमच्या पोरांनी उच्च शिक्षण घ्यायचं नाही का? आम्हालाही कधीतरी वाटतं की मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन एकदा सिनेमा आम्हीही बघावा. कायम फाटक्या झोपडीतच आम्ही सुख मानत आलो, आम्हाला देखील कळू द्या की सिमेंटच्या घरातील जीवन काय आसतं ते. फोमच्या गादीवर आम्हाला पण झोपून तर पाहू द्या झोप येते की नाही ते. की उगाच आम्हाला वेगवेगळ्या व्याख्या आणि म्हणी सांगून दरिद्री जीवन किती दिवस जगायला लावणार आहात. पोरांनी शाळेतलं दप्तर आणायला सांगितलं तरी चार दुकानं फिरतो आम्ही तरी ते आम्हाला एन्ड़रेसच्या बाटलीपेक्षा महाग वाटतं आणि आम्ही ते नाही आणू शकत. मग एन्ड़रेस घेऊन पुन्हा घराचं तोंड नाही दाखवत आम्ही आणि ती घरची स्त्री अख्खं आयुष्य पांढऱ्या कपाळाने जगते, हे वास्तव बदलण्याची गरज आहे.
आमच्या तरुण पिढीला हे कळून चुकलं आहे की उत्पादन आणि उत्पन्न यामध्ये खूप फरक आहे. शेती उत्पादनात आपण कितीही जोर लावला तरी आपलं उत्पन्न किती असावं याचा कासरा मात्र शासनाच्या ध्येय धोरणाच्या हाती आहे. म्हणून फक्त शेती उत्पादन करून आता चालणार नाही तर उत्पन्नासाठी त्याच्या पलीकडची पावलं आपल्याला उचलावी लागतील. शेती आणि शेतकरी समृद्ध करण्यासाठी शेतमाल प्रक्रिया उद्योग शेतकऱ्यांच्या पोरांना सुरू करावे लागतील, आर्थिक उन्नतीसाठी जुडीतला माल पुडीत विकावा लागेल, शेतात पिकणाऱ्या किंवा निर्माण होणाऱ्या प्रत्येक वस्तूचं मूल्य आपल्याला मिळू शकतं, मातीपासून गवरी पर्यंत सगळ्या वस्तू आपण विकू शकतो फक्त ती विकण्याची तयारी आता आपल्याला ठेवावी लागेल. शेती फक्त आता माती पुरती मर्यादित राहिली नाही याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. (खाउजा) खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण याने आपल्या मर्यादा विस्तारित केल्या असल्या तरी अजूनही आपला शेतकरी शेताच्या धुऱ्याच्या बाहेर जाण्यास तयार नाही. बाजारपेठेचे स्वातंत्र्य शासकीय धोरण आपल्याला द्यायला तयार नाही, तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य अजून आपल्याला मिळाले नाही. त्यामुळे चालत आलेली शेतकरी लूट आजही कायम आहे. म्हणून बदल हवा आहे आणि हा बदल होऊ शकतो याची साक्ष देणारे आणि शरद जोशींच्या विचारांना सत्त्यात उतरवणारे श्री. विलास शिंदे यांनी पुढाकार घेऊन या सगळ्या प्रश्नाची या उत्तरे देणारी एक शेतकऱ्याची कंपनी आज नाशिक मध्ये सह्याद्री फार्म्सच्या निमित्ताने उभी राहिली हे या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जवळून पाहता आले. आजच्या तरून पिढीसाठी हे एक रोल मॉडेल ठरू शकते. अश्या कंपन्या गाव खेड्यात उभ्या राहिल्या, तालुका, जिल्हा पातळीवर उभ्या राहिल्या तर नक्कीच शेतकरी शेती सोबत या बाजार व्यवस्थेचा सुद्धा मालक होईल, विदेशात त्याचा शेतमाल विकल्या जाईल, आता फक्त शेतात डॉलर हरभरा घेऊन आपल्याला चालणार नाही तर त्याचं मूल्य देखील डॉलरच्या चलनात मिळायला पाहिजे, आणि हे शक्य होऊ शकतं याचं उदाहरण विलास शिंदे यांनी सिद्ध करून दाखवलं आहे.
ही विचारांची शिदोरी आणि शेती अर्थ व्यवस्थेचा समृद्धी कडे नेणारा वसा प्रत्येक शेतकरी, साहित्यिक, रसिकांनी सोबत नेत त्या दिशेने वाटचाल सुरू केली तर नक्कीच लवकरच शरद जोशींच्या विचारातील भारत उभा राहील.